लग्नात थोर त्यांच्या बोलाविले मलाही
शिंपून अत्तरांना, ते भेटले मलाही
हासून फक्त तेथे मीही बसून होतो
खोटे रमून जाणे, ते जमले मलाही
एकेक माणसाला मी न्याहळीत होतो
कोणीच दोस्त नाही, ते गमले मलाही
देती यथेच्च सारे उंचीच भेटि सार्या
सजवून भासते का ठेवले मलाही
भर्धाव जाति तेही खाण्यावरी तुटाया
आधाशि भाव त्यांचे, न भावले मलाही
लोटून अन्न सारे फेकून तेहि देता
व्याकूळ आर्ततेने का भेदले मलाही!
येथे बुभुक्षितांचा मेळा जमून आला
लज्जाहि लाजली ती ,"का विकले मलाही?"
चतुरंग
प्रतिक्रिया
30 Apr 2008 - 9:38 am | विसोबा खेचर
भर्धाव जाति तेही खाण्यावरी तुटाया
आधाशि भाव त्यांचे, न भावले मलाही
लोटून अन्न सारे फेकून तेहि देता
व्याकूळ आर्ततेने का भेदले मलाही!
येथे बुभुक्षितांचा मेळा जमून आला
क्या बात है...! बुभुक्षितांचा मेळा हे शब्द अगदी चपखल वाटतात!
वा रंगा! तुझं अभिनंदन...
अतिशय सुरेख गझल लिहिली आहेस...
तात्या.
30 Apr 2008 - 9:51 am | मदनबाण
हासून फक्त तेथे मीही बसून होतो
खोटे रमून जाणे, ते जमले मलाही
जबरदस्तच !!!!!
एकेक माणसाला मी न्याहळीत होतो
कोणीच दोस्त नाही, ते गमले मलाही
व्वा उस्त्ताद वा.....
खुपच सुंदर.....
(भावनांच्या मेळाव्यात हरवलेला)
मदनबाण
30 Apr 2008 - 3:31 pm | प्रभाकर पेठकर
येथे बुभुक्षितांचा मेळा जमून आला
लज्जाहि लाजली ती ,"का विकले मलाही?"
फार भेदक आणि आशयगर्भ गज़ल आहे.
30 Apr 2008 - 4:42 pm | आनंदयात्री
छान गझल !
30 Apr 2008 - 6:15 pm | सुवर्णमयी
शेवटचा शेर खूप आवडला.
3 May 2008 - 2:09 am | चतुरंग
(विशेष आभार - शेवटच्या शेरातल्या दुसर्या ओळीचे श्रेय धनंजय यांना जाते.
माझ्या मूळ गजलेतली ओळ "लज्जाही कोठे गेली ,"का विकले तिलाही?" अशी होती. त्या जागी आत्ताची चपखल ओळ त्यांनी सुचवली. धन्यवाद!)
चतुरंग
6 May 2008 - 10:08 am | बेसनलाडू
कल्पना आवडल्या; पण धूसर आहेत. वृत्त सांभाळणे आणि शेरातील संदिग्धता दूर करणे सरावाने जमेलसे वाटते. त्याने गझल लेखन व वाचन दोन्हींची मजा वाढेल.
शुभेच्छा.
(शुभेच्छुक)बेसनलाडू
7 May 2008 - 12:06 am | llपुण्याचे पेशवेll
गझलेचा प्रत्येक शेर छान जमला आहे. प्रत्येक शेर वेगवेगळा अर्थ प्रतित करत आहे. पण त्यांच्यामधला परस्पर संबंध कळला नाही. पण शब्दरचना एकूणच छान.
लोटून अन्न सारे फेकून तेहि देता
व्याकूळ आर्ततेने का भेदले मलाही!
येथे बुभुक्षितांचा मेळा जमून आला
लज्जाहि लाजली ती ,"का विकले मलाही?"
या ओळी विषेश आवडल्या.
(लाज विकून कपडे घेतलेला)
डॅनी.
पुण्याचे पेशवे