मन माझं गोगलगाय !

मितान's picture
मितान in जे न देखे रवी...
14 Jan 2011 - 5:07 pm

मन माझं गोगलगाय
खुट्टं वाजता शंखात जाय

प्राजक्ताचा दरवळ घेऊन
रांगत पहाटवारा आला
शिंका येतील ! आल्या शिंका !!
नाक हाती शंखात पाय !
मन माझं गोगलगाय । खुट्टं होताच शंखात जाय

खुणावताना हिरव्या वाटा
मनास दिसतो केवळ काटा
काटा टोचेल ! टोचला काटा !!
मान फिरवून शंखात जाय
मन माझं गोगलगाय । खुट्टं होताच शंखात जाय

समोर फुटती लाट अनावर
सरसरून ये नभ धरणीवर
थेंब उडतिल ! कपडे भिजतिल
भिजेल डोकं ! भिजतिल पाय !!
मन माझं गोगलगाय । खुट्टं होता शंखात जाय

घुसुन बसावे शंखी आपुल्या
हळु काढावी बाहेर मान
इकडुन तिकडे सरपटताना
टवकारावे दोन्ही कान

विजा नि लाटा, झुळुक नि वाटा
बघुन नाचतो एकच पाय
उपयोग नाय
दुसरा पाय शंखात चिकटुन
पाय नाचरा ओढू जाय
मन माझं गोगलगाय
खुट्टं होता शंखात जाय

कविता

प्रतिक्रिया

पुष्करिणी's picture

14 Jan 2011 - 5:12 pm | पुष्करिणी

सुंदर, खूप आवडली!

असुर's picture

14 Jan 2011 - 5:15 pm | असुर

मस्त जमलीये कविता!! बालगीत म्हणावं तर जब्बर अर्थ आहे शब्दांना, मोठ्यांची कविता म्हणावं तर एकदम बडबडगीतासारखी म्हणतादेखील येतेय!! कवितेवर 'आम्ही मोठे राव, डराव-डराव'चे संस्कार आहेत असं वाटतंय!!
:-)

असल्या जमून आलेल्या कविता आवडून जातात बुवा!!!

--असुर

मेघवेडा's picture

14 Jan 2011 - 9:39 pm | मेघवेडा

>> कवितेवर 'आम्ही मोठे राव, डराव-डराव'चे संस्कार आहेत असं वाटतंय!!

ऐसाच बोल्ताय! मस्त कविता.. आवल्डी!

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Jan 2011 - 5:16 pm | बिपिन कार्यकर्ते

मला कविता वगैरे कळत नाहीत, पण कधी कधी काही कविता आवडून जातात, त्यातली ही एक.

पहिल्या एक दोन कडव्यातच कळायला लागली कविता. एक अशी गोगलगाय जिला गावभर नाचायचंय, उंडारायचंय, दुनिया बघायची आहे! आयुष्य जगायचं आहे. पण कुठेतरी तिला शंखातली ओळखीची ऊब सोडवत नाहीये. पाय घरातून निघत नाहीये. आवा चालली पंढरपुरा, वेशीपासुनी येई घरा! ... याच जातकुळीतली आहे ही कविता.

राघव's picture

14 Jan 2011 - 5:57 pm | राघव

असं आहे होय! कुठल्या कुठे गेला अर्थ! एकदम गंभीर!
आवडली कविता. पु.ले.शु. :)

राघव

मस्तानी's picture

14 Jan 2011 - 7:29 pm | मस्तानी

"मला कविता वगैरे कळत नाहीत, पण कधी कधी काही कविता आवडून जातात, त्यातली ही एक. "

धन्यवाद बिपीन, अगदी माझ्याच मनातल लिहिलंत :)
कविता / निरीक्षण / शब्द / विचार ... सगळंच आवडलं !

परिकथेतील राजकुमार's picture

14 Jan 2011 - 5:19 pm | परिकथेतील राजकुमार

बेष्ट !
आधी वाटले की तू नक्की कुठल्यातरी बालगीताचे भाषांतर केले असावेस, पण हि स्वरचना पण लै भारी.
पेश्शल अबालवृद्धांसाठी ;)

यशोधरा's picture

14 Jan 2011 - 5:38 pm | यशोधरा

:) आवडली.

चित्रा's picture

14 Jan 2011 - 7:22 pm | चित्रा

मस्त कविता.

हा हा मस्त!!! बिकांचे रसग्रहण देखील भारी.

सुरेख!!
खूप अर्थ दडला आहे या कवितेमध्ये.
मस्तच!

अनामिक's picture

14 Jan 2011 - 10:09 pm | अनामिक

खूप आवडून गेली कविता. छान!

मदनबाण's picture

15 Jan 2011 - 6:29 am | मदनबाण

फार सुरेख कविता... :)

sneharani's picture

15 Jan 2011 - 10:25 am | sneharani

सुरेख कविता!
आवडली!
:)

योगप्रभू's picture

15 Jan 2011 - 11:10 am | योगप्रभू

गेयता आणि मध्यवर्ती कल्पना यांचा विचार करता कविता छानच आहे, पण मला एक शंका आहे.

लहानपणी आम्हीही हळूहळू चालणार्‍या गोगलगाईला काडीने स्पर्श करुन तिची शंखात जाण्याची धडपड किंवा लाजाळू वनस्पतीला स्पर्श करुन तिची पाने मिटण्याची मजा घ्यायचो. गोगलगाईला वातावरणाचे किंवा स्पर्श ज्ञान तिच्या डोक्यावर अँटेनासारखे दोन उंचवटे (ज्याला गोगलगाईची शिंगे म्हटले जाते) असतात त्यामुळे होते. तिथे स्पर्श झाला की ती लगेच बचावासाठी शंखाचा आधार घेते. त्यामुळे गोगलगाईच्या जवळ खुट्ट वाजो किंवा ढोल वाजो, तिला जोवर स्पर्श होत नाही तोवर काहीच समजणार नाही. हा! आता वातावरणातील कंपनांमुळे ती शंखात जात असेल तर गोष्ट समजता येईल. पण एरवी गोगलगाईच्या जवळ जाऊन टाळी वाजवली तरी ती आपली चालतच राहील. कारण तिला कान नसतात.

त्यामुळे 'खुट्ट वाजता शंखात जाय' हे वाचताना थोडं अडखळल्यासारखं झालं. (रागावू नका हो...)

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Jan 2011 - 11:50 pm | बिपिन कार्यकर्ते

प्रभूजी, काय योगायोग आहे बघा! लहानपणी मी पहिल्यांदा पंचतंत्रादि गोष्टी वाचल्या तेव्हा मलापण 'प्राणी कुठे बोलतात का?' असं वाटलं होतं. पण नंतर कळलं की ही तर कल्पना आहे! मग मजा आली. :)

योगप्रभू's picture

16 Jan 2011 - 12:29 am | योगप्रभू

बिपिनजी,
खरं आहे तुमचं. कल्पना म्हणून या कवितेची मजा नक्कीच आगळी आहे. मला थोडं वेगळं वाटलं, की इथे मनाला गोगलगाईची उपमा दिलीय, पण वास्तवात खुट्ट वाजलं की ससा, खार असे प्राणी घाबरुन बिळात लपतात. म्हणून मनाच्या घाबरटपणाला एकतर सशाची किंवा संकोचाला लाजाळूच्या पानांची उपमा देतात.

अर्थात हा विचार अगदी ओझरताच होता. अतिचिकित्सकपणा करुन कवीच्या कोमल भावनांचा रसभंग नव्हता करायचा मला. म्हणूनच 'रागाऊ नका हो' असं मुद्दाम आर्जवाने लिहिले. :)

योगप्रभू, जी साधी कविता आहे हो ! जीवशास्त्रीय नाही ;)

खरं तर या कवितेत भित्रेपणा नाही. नवनवीन अनुभवांपासून अंग चोरून घेण्याची प्रवृत्ती आहे. अशी गोगलगाय तुम्हाआम्हा सर्वांमध्ये असतेच की. :)
कविता हा माझा प्रांत नसल्याने भूमिका स्पष्ट झाली नाही असे होऊ शकते.
बाकी राग नाहीच :)

धनंजय's picture

16 Jan 2011 - 4:14 am | धनंजय

कविता आवडली.

इतका गंभीर अर्थ इतक्या हलक्याफुलक्या शब्दांत बेमालूम मांडणे म्हणजे महाकठिण!

प्रीत-मोहर's picture

16 Jan 2011 - 3:06 pm | प्रीत-मोहर

वरच्या सर्वांशी सहमत :)

प्रीत-मोहर's picture

16 Jan 2011 - 3:06 pm | प्रीत-मोहर

वरच्या सर्वांशी सहमत :)

गणेशा's picture

17 Jan 2011 - 3:04 pm | गणेशा

गोंधळणारे .. घाबरणारे .. नविन गोष्टींमधले नाविण्य पाहण्याआधीच तेथुन धुम ठोकु पाहणारे मन गोगलगायीच्या रुपाने छान मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Jan 2011 - 3:36 pm | llपुण्याचे पेशवेll

छान आहे कविता. एकदम आवडली.

सानझरी's picture

31 May 2017 - 10:39 pm | सानझरी

एकदम झकास कविता.. खूप आवडली.. :D

रुपी's picture

1 Jun 2017 - 1:49 am | रुपी

फार छान कविता. आवडली.
पुन्हा वर आणल्याबद्दल सानझरीचे आभार!

छानच कविता! प्रतिसादांमुळे बरीच उलगडली.
आम्ही मिपावर यायच्या आधीची असल्याने वाचली नव्हती, अता खोदकाम काढायला हवं..

सुंदर अर्थगर्भ कविता!