असहाय्य

मराठे's picture
मराठे in जनातलं, मनातलं
6 Jan 2011 - 10:17 pm

मला त्यांनी दत्तक घेतलं होतं... नाही "पाळलं होतं" हा शब्दप्रयोग जास्त बरोबर आहे. मला जन्म देणारी आई मला आठवत नाही. पण माझी काही तक्रार नाही. हे नविन घर मला आवडलं होतं. बहुतेक सगळे माझ्याशी चांगले वागत होते. मला चांगलं खायला मिळत होतं, राहायला चांगलं ऐसपैस घर होतं. विशेष म्हणजे मी रात्री उशीरापर्यंत जागत राहिलो तरी मला कोणी बोलायचं नाही.

तुम्हाला घरच्यांबद्धल सांगतो, प्रथम माझी आई.... सुशीला नाडकर्णी. आई माझे खूप लाड करायची. सुरवातीला मी तिला आई म्हणायला जरा घाबरत होतो, पण काही दिवस गेल्यावर मग सर्रास आई म्हणायला लागलो. पण मला वाटतं तिला त्यात काही वेगळेपण जाणवलंही नाही. बरेचदा ती स्वतःच्या तंद्रीतच असायची. पण कशीही का असेना, ती खूप चांगली होती. मला वाटतं, मला घरात घेण्याचं तिनंच सुचवलं असावं. कधीकधी मी तिच्या मांडीवर डोकं ठेऊन दिवाणखान्यात टि.व्ही. बघत बसायचो, तेव्हा ती तिच्या नाजूक बोटांनी माझ्या मानेला गुदगुल्या करायची, किंवा पाठीवरून हात फिरवत राहायची. अगदी सिनेमात दाखवतात ना तश्शीच होती माझी आई.

आणि मग माझे बाबा. त्यांचं नाव वामन नाडकर्णी. त्यांना मी कधीच आवडलो नाही. मी त्यांनासुद्धा "बाबा" म्हणायला लागलो होतो. बर्‍याच वेळा त्यांच्या समोर समोर करायचो जेणेकरून त्यांनी माझ्याकडे बघावं. माझ्या पाठीवर थाप मारावी. पण नाही. मी कितीही प्रयत्न केला, तरी त्यांनी माझ्याकडे रागाशिवाय इतर कुठल्याही नजरेने पाहिलं नाही. ते माझ्यावर कधीच प्रेम करणार नाहीत हे मी समजून चुकलो होतो, मग मीही त्यांना टाळू लागलो. बाबांची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांची शिस्त. स्वतःच्या मुलीला सुद्धा चूक झाल्यावर फटके द्यायला ते मागेपुढे बघत नसत. तिथे माझी काय कथा? सुरवातीला मला शी शू करताना बाथरूम मधे जायची आठवणच राहात नसे. मग ते मला अस्सा जोरदार रट्टा देत, की मी एकदम कळवळून जात असे. असो, पण एक मात्र मान्य केलं पाहिजे, की त्यांच्या या धाकामुळे मी एक चूक पुन्हा कधीच करत नसे.

सगळ्यात शेवटी माझी बहिण, अनू. मी या घरात आलो तेव्हा अनू सुद्धा लहानच होती. माझ्यापेक्षा एक दोन वर्षांनी मोठी असेल. म्हणजे तसे आम्ही साधारण एकाच वयाचे होतो. ती साधारण सात आठ वर्षाची असावी. माझी आणि तिची चांगलीच गट्टी जमली होती. अगदी जीवलग मित्र्-मैत्रीणींसारखी. बर्‍याचदा संध्याकाळी एकमेकांशी गप्पा मारताना किंवा मागच्या बागेत चेंडूशी खेळताना किती वेळ गेला ते सुद्धा कळायचं नाही. अर्थात गप्पांमधे तिचीच बडबड असायची. मी मुकाट ऐकत बसायचो कारण तिची बडबड ऐकायलाही मला खूप आवडायची. एकूण आमचं एकमेकांशी मस्त जमलं होतं. त्या घरात मला राहायला अशी वेगळी खोली नव्हती त्यामुळे मी दिवसभर मी बाहेरच्या दिवाणखान्यातच असायचो. रात्र अनुच्या खोलीतच माझी गादी घातली होती. मला वेगळी खोली नसल्याचं मला काहीच सोयरसुतक नव्हतं. कारण रात्री उशीरापर्यंत अनुशी बोलायला मिळायचं मला. शिवाय एक भाउ म्हणून तिचं रक्षण केलं पाहिजे असंच मला वाटायचं.

पण एका रात्रीत सगळं चित्रच बदललं. ती रात्र मी कधीच विसरणार नाही. त्या संध्याकाळी मी टीव्ही बघता बघता कोचाजवळ बसून डुलक्या देत होतो. अनू दरवाजा धाडकन् उघडून घरात शिरली... नेहमी प्रमाणेच. दरवाज्याचा आवाज ऐकून मी ही जागा झालो. आणि मी दरवाज्यापर्यंत गेलो. तो दिवस बुधवार होता. मला वेळ आणि तारखा फारशा लक्षात राहात नाहीत. अगदी स्पष्टच सांगायचं तर मला घड्याळसुद्धा कळत नाही. पण तरीही तो बुधवार होता हे मी सांगू शकतो कारण अनू त्या दिवशी उशीरा आली होती. दर बुधवारी तिचा कुठलासा क्लास असतो त्यामुळे घरी यायला उशीर होईल असं मला प्रत्येक बुधवारी सांगायची. तिच्या मागून थोड्या वेळाने आई बाबापण त्यांच्या ऑफिसमधून परत आले.

"झोप झाली का बेट्या?" आईनं डोक्यावर हात फिरवत विचारलं, मी नुसतच डोकं हलवलं तोवर आई तिच्या रूममधे गेली. आईचं विचारणं हे असंच... माझ्याकडून कसल्याही उत्तराची तिला अपेक्षाच नसायची. मी तिच्या मागेमागे तिच्या रुमकडे जायला लागलो तेवढ्यात "काही मागे मागे जायचं नाहिये" बाबांचा करडा आवाज कानावर आला. "मी सहज जात होतो" मी तोंडातल्या तोंडात पुटपुटलो. बहुदा त्यांनी ऐकलं नसावं कारण पाठीवर फटका पडला नाही. मी आणि अनू तिच्या रूममधे आलो. अनूने तिची बडबड चालू केली. दिवसभराचा आढावा. तिला इतकं बोलताना धाप कशी लागत नाही याचंच मला आश्चर्य वाटायचं. पण तिला वाईट वाटू नये म्हणून मी शांतपणे बसून तिचं बोलणं ऐकत होतो. तासाभरानंतर आम्ही पुन्हा दिवाणखान्यात टि.व्ही. बघायला म्हणून आलो. मी टुण्णकन् उडी मारून तिच्या शेजारी कोचावर बसलो. माझ्या बालिशपणाकडे एक तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकून तिने रिमोटवरून बटनं दाबायला सुरवात केली. जवळ जवळ दोनेक तास टिव्ही बघण्यात गेला. अनू तशी चांगली मुलगी होती. त्यामुळे कार्टून आणि धामधूम गाण्यांचे कार्यक्रम किंवा आईप्रमाणे रटाळ सिरियल वगैरे न बघता ती डिस्कवरी, अ‍ॅनिमल प्लॅनेट वगैरे बघायची. मलाही तेच आवडायचं त्यामुळे आमचं पटायचं. अ‍ॅनिमल प्लॅनेट तर मला विशेष आवडायचा.

रात्री जेवेणं वगैरे झाल्यानंतर आम्ही पुन्हा टिव्ही पाहणार होतो. पण आईने अनूकडे पाहून डोळे मोठे केले आणि आम्ही दोघं चूपचाप झोपायला अनूच्या खोलीत आलो. खोलीत आल्यानंतर मला काहितरी उगाच चुकल्यासारखं वाटत होतं. नक्की काय ते समजत नव्हतं. अनूने दिवा मालवला. त्याक्षणी मला खिडकीबाहेर काहितरी हलल्यासारखं वाटलं. मी खिडकीत उभं राहून पाहण्याचा प्रयत्न केला पण काही दिसलं नाही. पण मी तरिही सतर्क राहण्याचं ठरवलं. अनूची मला काळजी वाटत होती.

मला बराच वेळ झोप लागली नाही. खिडकीतून येणार्‍या रस्त्यावरच्या दिव्यांच्या प्रकाशामुळे मला अंधारातही थोडंफार दिसायला लागलं होतं. पुन्हा पुन्हा मला खिडकीबाहेर कोणाचीतरी चाहूल लागल्यासारखं वाटत होतं. बाहेर वाहणारा वारा आणि पानांची सळसळसुद्धा मला आता स्पष्ट्पणे ऐकू येत होती आणि मी कान टवकारत होतो. रात्री उशीरापर्यंत मी जागाच राहिलो. माझ्या पापण्या मात्र आता मिटू लागल्या होत्या.

पण थोडा वेळ डोळा लागतो न लागतो तोच बाहेरच्या रूममधून दरवाजा उघडल्याचा आवाज झाला. झट्कन उठून अनूला जोरात हलवत मी म्हणालो "कोणितरी घरात शिरलंय". ती डोळे चोळत उठली. मी वेगात बाहेरच्या रुममधे पळालो. बघतो तर आईबाबांच्या बेडरूमचा दरवाजा उघडा होता. बाबा नेहमी दरवाजा लाउन घेतात. नक्की आई-बाबांना धोका आहे. मी पळत पळत त्यांच्या रूममध्ये घुसलो. पाहतो तर बाबा जमिनीवर पालथे पडले होते. त्यांच्या मानेतून व अंगाखालून रक्ताचा ओघळ वाहात होता.
एक अनोळखी माणूस खोलीत उभा होता. आई बहुतेक बाथरूम मध्ये असावी कारण बाथरूमच्या दाराला आतून कडी लावल्याचा आवाज झाला. तो माणूस, माणूस कसला राक्षसच होता तो, खूपच भयंकर दिसत होता. खूप उंच, धिप्पाड, काळा कुळकुळीत, मोठ्ठे लाल डोळे आणि अंगाला कसलासा घाणेरडा वास येत होता त्याच्या. कपड्यांवर रक्ताचे डाग पडले होते. त्याच्या हातात पिस्तूल होतं. तो बाथरूमच्या दिशेने निघाला. मी ओरडलो "आई".. . तिच्या जीवाला आता धोका होता. मी त्या माणसाच्या अंगावर धाऊन गेलो पण त्याने एक जोरदार लाथ माझ्या पेकाटावर मारली. कळवळून मी कोपर्‍यात जाउन पडलो. आता त्याने बाथरूमचं दार तोडलं होतं. आणखी एकदा मोठ्ठा आवाज झाला आणि आईची किंकाळी मला ऐकू आली. पण मला तिच्या मदतीसाठी उठताही आलं नाही. तो बाहेर आला आणि माझ्याकडे पाहिलं. भीतीने माझ्या तोंडातून शब्दही बाहेर पडत नव्हता. माझ्याकडे पाहून तो फक्त हसला. त्याचे काळे पिवळे दात बघून मला आणखीच भीती वाटायला लागली.

आणि तेवढ्यात ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती तेच झालं. भेदरलेली अनू दरवाज्यात उभी होती. त्या माणसाला पाहून तिने कर्कश्य किंकाळी फोडली. तो राक्षस बाबांच्या पालथ्या अंगावर पाय देउन अनूच्या दिशेने जाउ लागला. अनू दरवाज्यातून पळत पळत दिवाणखान्यात गेली. तोही तिच्या मागून गेला. मी भेलकांडत उभं राहिलो आणि हळू हळू दारपर्यत आलो. अनू अजूनही घरातच पळत होती. "अनू बाहेर जा" मी ओरडत होतो. पण अनू काही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हती. त्या राक्षसाने आता तिचा दंड धरला आणि तिच्या कानशिलात ठेउन दिली. त्याबरोबर अनू बेशुद्ध पडली. त्याने एका हातानेच तिला उचलली... . नाही नाही ! अनूला काही होता कामा नये... ती माझी बहिण आहे.. माझी मैत्रिण आहे... मी ओरडायचा प्रयत्न केला. पण त्या राक्षसाच्या एका नजरेने माझी वाचाच बंद झाली.

तिला पाठीवर टाकून तो जायला लागला. वाटेत माझ्या जवळ येऊन थांबला. वाकून त्याने माझ्या डोक्यावर थोपटलं.... त्याचे गलिच्छ दात दाखवून तो हसला... "गुड बॉय" ... मी चक्राउनच गेलो होतो. मी काहीच हालचाल केली नाही. तो बाहेरच्या दरवाज्याकडे गेला तसा मी खुरडत त्याच्या मागे गेलो. त्याने बाहेर जाउन दरवाजा लाऊन टाकला.

मी दरवाजा उघडायचा खूप प्रयत्न केला. पण कितीही प्रयत्न केला तरी माझ्या पंजांनी मी लॅच उघडू शकत नव्हतो. असहाय्य पणे शेपटी हलवत मी आई बाबांच्या देहाजवळ बसून राहिलो.

कथा

प्रतिक्रिया

सूर्यपुत्र's picture

6 Jan 2011 - 10:33 pm | सूर्यपुत्र

कुत्रा आहे का??
कथा छान आहे.

शिल्पा ब's picture

6 Jan 2011 - 11:22 pm | शिल्पा ब

कथा छान आहे. आवडली.

नगरीनिरंजन's picture

7 Jan 2011 - 1:15 am | नगरीनिरंजन

कथा वाचताना हळूहळू कळत गेलं की तो कुत्रा आहे त्यामुळे शेवट फारसा धक्कादायक वाटला नाही. पण प्रयत्न चांगला होता. ती शी-शूची वगैरे शंका आणणारी वाक्यं टाळली असती तर कदाचित कथा आणखी परिणामकारक झाली असती.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Jan 2011 - 1:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

कथा आवडली. गुड गोईंग!

पान्डू हवालदार's picture

7 Jan 2011 - 7:02 am | पान्डू हवालदार

आवडली

चिगो's picture

9 Jan 2011 - 6:53 pm | चिगो

पण कथानायक (?) त्याला चावला का नाही? :-(

मस्त कन्सेप्ट... झक्कास...

गुंडोपंत's picture

31 Jan 2011 - 6:09 am | गुंडोपंत

मस्त कन्सेप्ट... झक्कास... हेच म्हणतो!