ते झाड तोडल्या पासून
त्यांचा आक्रोष वाढला होता
तसा आमचाही नाईलाज होता
त्या झाडाखाली पार्क केलेल्या
आमच्या कीमती गाड्यांवर वादळ वा-यानं
फांद्या तुटून पडण्याचं भय होतं..
नुकसान झालं असतं आमच्या गाड्यांचं
कधीहि भरून न येणारं..!!!!!
त्यापेक्षा त्या झाडाच्या फाद्यांवर वसलेली
त्यांची इवलिशी घरटी, पिलांसकट
उध्वस्त झाली तरी चालतील
असा व्यवहार्य विचार केला आम्ही..!
आहो घरटी काय, ते पुन्हा बांधू शकतात
फुकट !
पिल्ल काय ,ते पुन्हा जन्माला घालू शकतात
फुकट !
पण झाडाची फांदी कोसळून मोडलेली
आमची गाडी घेण्यासाठी,
पैसे मोजावे लागतील आम्हाला..!!
छे ! या व्य्वहारात भावना जपण्यात काही अर्थ नाही
झाड तोडलं ते बरं झालं,
त्यांची काड्याकुड्यांनी बनवलेली
काडीमोल घरटी उध्वस्त झाली खरी
पण आमच्या लाखमोलाच्या गाड्या तर वाचल्या !!
हा, आता त्यांचा हा आक्रोष चालेल थोडे दिवस
तो हि बंद करायचा उपाय आहे माझ्याजवळ
अगदीच डोक्यावरून गेलं तर वापरेन तो ही
नाहीतर काय नसती कट कट...!!!
कुहु कुहु .....
बाबा तुमचा सेल वाजतोय....!
तुमच्या सेलची कोकिळेच्या आवाजाची रिंग टोन
गोड वाटते बाबा....!
आतून माझ्या मुलीचा आवाज...!!!!!!!
प्रतिक्रिया
18 Dec 2010 - 10:06 pm | नगरीनिरंजन
मस्त! पण पाखरांचा आक्रोश आणि त्यांचे दु:ख जाणवू शकणार्या लोकांचे असे प्रकटन ही दोन्ही अरण्यरुदनच ठरणार शेवटी.
19 Dec 2010 - 10:45 am | अवलिया
सहमत आहे. :(
19 Dec 2010 - 12:57 am | शहराजाद
आवडली.
19 Dec 2010 - 2:13 am | राघव
छान. आवडले. :)
राघव