जख्ख अशी म्हातारी
कोयत्याच्या आकारची !!
कुणास ठाऊक किती वय झालय तिचे ?
हाडाच्या सापळ्यावर लोंबणारी कातडी
बुबुळावरची राखाडी रंगाची साय
खूप पावसाळे डोक्यावरून गेलेत
सहस्त्रचंद्र होऊन सुद्धा उलटून गेलाय काळ ....
किती कुणास ठाऊक ?
आता आताशी म्हातारी कुणाच्याच नसते गणतीत
पोरेबाळे आपल्याच फिकिरीत
नातवाच्या काळजीत खंगून जातात
म्हातारीच लोढणे गळ्यात बांधून
कधी सुटतेय म्हातारी
वाट बघत बसतात ...!!
वाट बघायची म्हणजे भयंकर कंटाळवाणे ...
थकून जातात गात्रे नि गात्रे ....
म्हातारी मात्र असते जिवंत उद्याची वाट पाहत
तिला कधी कधी आठवत असते
नवरोबांनी गर्दीत एकांत शोधीत चिमटा काढलेला
त्या आठवणीनी तिच्या अंगावर उठत असतो
अजूनही एक कोवळा शहारा ...!!
जुन्या जुन्या आठवणी एवढाच तिचा आधार
तिच्या आठवणी असतात शेतावरच्या
विहिरीवर पाणी भरताना
गुणगुणल्याच्या .......
केस सुद्धा झडून गेलेत
तरी आंबाडा घालते
आवळ्यायेवढा असला तरी कधी त्यावर वेणी माळते ,....!
संध्याकाळी मारुतीच्या देवळात जाते
नातवाच्या खांद्यावर हात ठेवून चल म्हणते
नातवंडे संकोचतात भयंकर ...!
लाज वाटते त्यांना आजीची
तिने ठेवलेल्या खांद्यावरच्या हाताची .....!!
संध्याकाळी जपमाळ घेऊन बसते देवाजवळ
नि कुठेतरी जाते हरवून स्वप्नात
तिला ठळकपणे जाणवते
आपल्याच पोरांच्या नजरेतील परकेपण
ती बघत बसते आतल्या मनाने
देवाचे घर ...!!
तिची झालीय तयारी
माहेरी जाण्याची
ती त्याच स्वप्नात जाते हरवून
नि डोळे घेते मिटून
त्याच्या बोलावण्याची वाट पाहत
ताटकळत
कोंबडा देईल कधी बांग ?
त्याची कधी होईल पहाट
कुणास ठाऊक.... ??