मंडळी,
बुधवारी पहाटेच आमचे आगमन आमच्या माहेरी म्हणजे करवीर नगरीत झाले. पहाटे ३.३० ला आम्ही आमच्या मुक्कामी दाखल झालो. घरी पोहोचताच आईने आमच्यावरून्(मी आणि माझा छोटा) भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि आम्हाला घरांत घेतलं. आल्या आल्या घरातल्या लोकांबरोबरच कुत्री, मांजरी यांच्याशीही गाठीभेटी झाल्या आणि त्यांच्या मूक मायेनं मन खरंच भरून आलं. सगळ्यांसाठी आणलेल्या वस्तू बॅगेतून काढून दिल्या.. ..माझी झोप तर उडालीच होती त्यामुळे घरच्यांना (खरंतर आईलाच) झोपू देणार नाही असं सांगून टाकलं. आणि मग इथे येण्याच्या आधी काय काय धमाल चालू होती माझी.. रेडीओवर काय काय घोळ घालते आहे.. आजारी कशी पडले.. यथोचित वर्णन करून सांगून झालं. हे सगळं होईपर्यंत ५.०० वाजले होते आणि उजाडायला लागलं होतं. थोडी फ्रेश होऊन अंगणात आले.
खूप दिवसांनी माझं अंगण पहात होते तेही भल्या पहाटे. खूप बरं वाटत होतं.. एकेक प्रसंग आठवत होते. सहजच पाठिमागे बागेत गेले. पहाते तर काय.. मी लावलेल्या झाडांना सुंदर फुलं आली होती. कणेरी, जास्वंदी, स्वस्तिकाची फुलं... आणि पहाटेच्या त्या रम्य वेळी ती इतकी सुंदर दिसत होती.. वातावरण मायेनं भरून गेलं होतं. असं वाटत होतं, की हि सगळी फुलं मला म्हणताहेत," कशी आहेस गं? बघ, किती दिवसांनी भेटलीस. त्या तुझ्या दुनियेत अनेक रंगिबेरंगी फुलं पहात असशिल.. पण आमची आठवण येते का गं तुला? " मी लावलेल्या, जोपासलेल्या, त्या झाडांना इतक्या देखण्या रूपात पाहून काय करावं आणि काय नको असं झालं होतं. मनामध्ये दाटून आलेली ही हूरहूर मोकळी व्हावी म्हणून कॅमेरा घेऊन आले आणि त्या फुलांचे हसू टिपू लागले. फोटो काढता काढता एका छोट्याशा ३-४ फूट उंच अशा नारळाच्या झाडाजवळ आले. मंडळी, हे रोपाची गंमत अशी.. की एकदा आईने नारळ फोडून दे असं सांगितलं मला. तेव्हा कोठीच्या खोलीतून एक नारळ घेऊन आले. तो सोलला.. पहाते तर त्याला एक कोंब आलेला दिसला. मी तो नारळ तसाच एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन ठेवून दिला. आणि नंतर मी माझ्याच नादात ते विसरूनही गेले. साधारण १५ दिवसांनी मला त्याची आठवण झाली आणि मी खाली जाऊन पाहिलं. चक्क त्या कोंबातून दोन इवली इवली ,नाजूकशी, नितळ हिरव्या रंगाची, निमूळती.. अंगावर रेषा असलेली पानं .. माझ्याकडे पहात होती. ती थोडी मोठी झाल्यावर मी तो नारळ बागेत लावला. पण महिन्याभराने ती पानं मरून गेली. मी निराश झाले होते. त्यानंतर काही दिवस असेच गेले. आणि पुन्हा त्यातून दोन पानं आली... आणि पुढे कित्येक दिवस ती दोनच पानं होती. आणखी पानं येण्याचं नावचं नाही. माझं लग्न झालं तेव्हा जेमतेम ३ पानं होती त्या रोपाला.. जरा मोठी होती इतकंच. त्यानंतर जेव्हा जेव्हा माहेरी आले तेव्हा तेव्हा त्या झाडामध्ये मला फारसा बदल जाणवलाच नाही. आणी आज मात्र ते चांगलं ३-४ फूट उंच जाणवलं... हे माझं झाड. मला ते जणू सांगत होतं ,"बघ, मी किती मोठा झालो... !"
दुसरं झाड म्हणजे कदंबाचं. बागेत जेव्हा मी रोपं लावत होते तेव्हा हे असं आपोआप आलेलं. त्याची पानं सिमेट्रीकल होती आणि चांगली मोठी होती. झाड मोठं झाल्यावर सावली चांगली येईल या विचारने ते तोडून नाही टाकलं. पण ते इतकं भराभर वाढलं की, त्याचा कधी वृक्ष झाला हे समजलंच नाही. आणि एकदा एक स्नेही आमच्याकडे आले होते त्यांच्याकडून समजलं की हा कदंब आहे.
हा वर्षातून एकदाच फुलतो. याचं फुलही गमतीदार असतं बरं का..! म्हणजे दिसताना ते फळासारखं दिसतं आणि त्यावर छोटे छोटे तुरे असतात. आणि एखाद्या चेंडूवर सुवर्णाने भरतकाम करावं तसं ते देखणं फुल मन मोहवून टाकतं. श्रीकृष्ण त्याखाली उभा राहून बासरी वाजवत होता अशी कथा पुराणात सांगतात. खरंतर सुवर्णाच्या त्या विलक्षण शृंगाराने नटलेल्या वृक्षाचा मोह त्याला पडला नसता तरच नवल! पहा ना, नेमका मी येण्याच्या वेळीच हा कदंब नटून, सजून उभा रहावा!! माझ्या या सख्यांनी माझ्यावर किती माया करावी??? त्यांच्या मूक प्रेमानं मी गुदम्रून गेले. मन कुठे मोकळं करावं? आपल्या लोकांजवळचं मन मोकळं करावं या विचारानं हे फोटो इथे देण्याचा माझा खटाटोप. मी कोणी निष्णात फोटोग्राफर नाही पण तरिही या माझ्या चिमुकल्यांना मी कॅमेर्यात बंद केलं. पहा बरं माझे जीवलग मित्र आणि मैत्रिणी कशा वाटतात तुम्हाला??
कणेरी
स्वस्तिकाची फुले
जास्वंदी
कदंबाचं फुल
ंबहरलेला कदंब
बहरलेला कदंब २
माझा ताटवा माझ्या मनात नेहमीच असा बहरत आणि दरवळत राहिल.
- प्राजु
प्रतिक्रिया
1 May 2008 - 1:27 pm | प्रमोद देव
लेख उत्तम उतरलाय. छायाचित्रांमुळे त्याला अजूनच जास्त सौंदर्य प्राप्त झालंय.
स्वस्तिकाच्या फुलांना आम्ही 'तगरीची फुले' म्हणतो.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
1 May 2008 - 1:28 pm | प्राजु
धन्यवाद काका...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 May 2008 - 1:31 pm | विजुभाऊ
तगर वेगळी स्वस्तिकाची फुले वेगळी. तगर गुलाबी रंगाची असते स्वस्तिकाची फुले पांढरी असतात.
1 May 2008 - 1:37 pm | प्रमोद देव
तगर पांढरीच असते. माझे बालपण सगळे तगरीच्या बनात गेलंय.
हो. कारण आमची वाडी म्हणजे एक तगरीचं बनच होते.
अर्थात ह्याला स्वस्तिक म्हणायला माझी हरकत नाही. कारण आकार तसा दिसतोय .
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
1 May 2008 - 6:22 pm | विजुभाऊ
अरे हो. माझा तगर आणि कण्हेरी मधे गोंधळ झाला. :)
1 May 2008 - 1:27 pm | प्राजु
हे प्रकाशित करायचे होते. मात्र आज जमले...
त्याबद्दल मी दिलगीर आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 May 2008 - 1:35 pm | विजुभाऊ
आणी आज मात्र ते चांगलं ३-४ फूट उंच जाणवलं... हे माझं झाड. मला ते जणू सांगत होतं ,"बघ, मी किती मोठा झालो... !"
अनन्त काणेकरांचे "आणिकॅशिया भरारला" आठवले.
सरळ साधे एकदम भिडणारे वर्णन: प्राजु ची खासियत. :)
1 May 2008 - 1:36 pm | मदनबाण
कदंबाच फुल मी कधीच पाहील नव्हत!!!!!
खुपच सुंदर आहे ते.....(अगदी गोंडस ) :)
ताई तुमचे हे जीवलग मित्र आणि मैत्रिणी अगदीच सुंदर आहेत.....
(सुमनांचा प्रेमी)
मदनबाण
1 May 2008 - 1:44 pm | स्वाती दिनेश
प्राजु,सुंदर वर्णन आणि चित्रे! तगरीला स्वस्तिकाची फुले हे नाव छान वाटले.
कदंबाचे बहरलेलं झाड मलाही माझ्या माहेरी घेऊन गेलं.आमच्याकडेही कदंबाची २,३ झाडे होती.आणि कदंब फुलला की पानापानातून ती डोकवायची आणि वार्याच्या झुळुकेबरोबर मंद सुवास यायचा.
स्वाती
1 May 2008 - 1:51 pm | इनोबा म्हणे
आणी आज मात्र ते चांगलं ३-४ फूट उंच जाणवलं... हे माझं झाड. मला ते जणू सांगत होतं ,"बघ, मी किती मोठा झालो... !"
खरंच, ते झाड बोलत असतं तर हेच म्हणालं असतं.
फोटो खूपच छान आले आहेत.कदंबाचं फूल पहील्यांदाच पाहीलं.
सहजसोपी शब्दरचना. लेख आवडला हे.सां.न.ल.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
1 May 2008 - 1:57 pm | प्रगती
ताटव्या बद्द्ल फार सुंदर लेख लिहिला आहे.
" मनामध्ये दाटून आलेली ही हूरहूर मोकळी व्हावी म्हणून कॅमेरा घेऊन आले आणि त्या फुलांचे हसू टिपू लागले". सुरेख वाक्यरचना
फोटो पण अगदी हुबेहूब आलेत.
1 May 2008 - 10:31 pm | आनंदयात्री
सुंदर लेख प्राजु !! आवडला, सकाळी सकाळी घरी पोचल्यावर असेच होते, मनाची अवस्था नेमकी टिपली आहेस.
बाकी कणेर ला आम्ही कन्हेर म्हणतो.
1 May 2008 - 1:59 pm | मन
वाचुन सकाळ अगदि प्रसन्न झाली बघ.
1 May 2008 - 2:31 pm | स्वाती राजेश
तुझ्या लेखनावरून तुझ्या बागेत खुपच रमली आहेस असे दिसते.:) मस्तच!!!!!!!!
फोटो पण छान आले आहेत.
असं वाटत होतं, की हि सगळी फुलं मला म्हणताहेत," कशी आहेस गं? बघ, किती दिवसांनी भेटलीस. त्या तुझ्या दुनियेत अनेक रंगिबेरंगी फुलं पहात असशिल.. पण आमची आठवण येते का गं तुला? " मी लावलेल्या, जोपासलेल्या, त्या झाडांना इतक्या देखण्या रूपात पाहून काय करावं आणि काय नको असं झालं होतं. मनामध्ये दाटून आलेली ही हूरहूर मोकळी व्हावी म्हणून कॅमेरा घेऊन आले आणि त्या फुलांचे हसू टिपू लागले. फोटो काढताना तुझी काय मनस्थिती असेल? हे तुझ्या लेखनातून दिसत आहे.
मस्त लेख.....
1 May 2008 - 4:06 pm | चतुरंग
किती दिवसांनी फोटोत का होईना पण तगर बघायला मिळाली! :)
फुलांसारखेच साधे, सरळ, सुगंधी लेखन! अभिनंदन!!
बहरलेला कदंब बघून तर क्षणात मनाने ओळीच गुणगुणल्या
कदंब-तरूला बांधुनि दोला, उंच-खालती झोले
परस्परांनी दिले-घेतले, गेले ! ते दिन गेले
चतुरंग
1 May 2008 - 4:29 pm | अभिज्ञ
प्राजुताई,
सुंदर लेखन. ब-याच दिवसांनि आपले नवीन लेखन वाचायला मिळाले.
... हे माझं झाड. मला ते जणू सांगत होतं ,"बघ, मी किती मोठा झालो... !"
हे तर छानच.
अबब.
1 May 2008 - 5:56 pm | वरदा
सॉरी गं मी उशीरा वाचलं...तू मला माझ्या बागेची आठवण करुन दिलीस्..माझ्या तर आईबाबांनी पण ते जुनं घर सोडलं आता त्यामुळे मला ती बाग परत नाही पहायला मिळणार....:(
सहज आणि मनापासून लिहीलयस..थेट आत जाऊन भिडलं...
1 May 2008 - 5:57 pm | विसोबा खेचर
प्राजू,
सुरेख लेख आणि चित्रे! जियो...!
तात्या.
1 May 2008 - 6:06 pm | शितल
फुला॑चे फोटोही छान आणि तुझा लेख ही छान झाला आहे. प्रत्येक माहेरवाशीणीला आपल्या माहेरच्या घराची आठवण आठवण करुन देणारा.
1 May 2008 - 6:13 pm | प्रभाकर पेठकर
सुंदर, सुबक, ठेंगणे लेखन. मुद्देसुद, उगीच फापटपसारा नाही तरीही मनीच्या (मनातल्या हो!) भावना व्यवस्थित पोहोचविणारे.
दुसरा फोटो हा तगरीचाच आहे. कदाचित त्याला 'पांढरी तगर' म्हणत असावेत. (फोतो किंचित आउट ऑफ फोकस वाटतो आहे.)
कदंबाची फुले प्रथमच पाहिली. मस्तच आहेत.
नारळाच्या झाडाची जगण्याची धडपड आणि प्रगती कौतुकास्पद.
अभिनंदन.
1 May 2008 - 8:05 pm | मानस
फारच छान वर्णन केलं आहे. बर्याच आठवणी ताज्या झाल्या.
आणी आज मात्र ते चांगलं ३-४ फूट उंच जाणवलं
त्या ३-४ फूटी नारळाचे फोटो पहायला मजा येईल.
धन्यवाद
मानस
1 May 2008 - 8:22 pm | देवदत्त
छान एकदम :)
कणेरीची फुले बहुधा मी नाही कधी बघितली.
अरेच्च्या ही स्वस्तिकाची फुले आहेत का? मला नाव नव्हते माहित. लहानपणी घराच्यासमोर झाड होते. दररोज तोडून देवासमोर वाहण्यास घरी नेत होतो.
जास्वंद मस्त आहे एकदम. एवढ्या जर्द रंगाची फुले फार कमी बघितली मी.
कदंबाच्या फुलांचे झाड आमच्या शाळेत होते, त्याची आठवण झाली. फुले मस्त मऊ चेंडूप्रमाणे असतात.
1 May 2008 - 9:36 pm | पिवळा डांबिस
नारळाच्या रोपाची उपकथा जास्त आवडली.
कदंबाच्या झाडाचे फोटोही आवडले.
विजुभाऊ, इथे माझ्या आवारात आहे कॅशियाचं झाड! नंतर फोटो पाठवीन...
-डांबिसकाका
1 May 2008 - 10:09 pm | प्राजु
सर्वांचे मनापासून धन्यवाद...
माझा ताटवा आपल्याला आवडला यातच सगळं आलं.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
1 May 2008 - 10:20 pm | ब्रिटिश टिंग्या
जास्वंदी अन् कदंबाच्या फुलाचे फोटो मस्तच!
मला ते जणू सांगत होतं ,"बघ, मी किती मोठा झालो... !"
सही रे!
1 May 2008 - 11:45 pm | नंदन
लेख आणि फोटोज दोन्ही आवडले. खासकरून कदंबाच्या फुलांचा. तीन-चार फुटी नारळाच्या झाडाचा फोटोही पहायला आवडेल.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
2 May 2008 - 10:51 am | सुवर्णमयी
कदंबाचे झाड काय मस्त दिसत आहे. छानच फोटो
2 May 2008 - 2:20 pm | झकासराव
चांगल लिहिलय.
सोबत फोटोंमुळे लेख प्रेक्षणीय देखील झालाय. :)
अवांतर :
मग करवीरनिवासिनीच्या दर्शनाचा लाभ घेतला की नाही अजुन??
टॉमॅटो नावाच एक नवीन एफ एम सुरु झालय. त्यात मला दुपारी २ च्या पुढे "ह्या फुलांच्या गंधकोषी" ह्या कार्यक्रमात खुप छान अशी नवी जुनी मराठी गाणी ऐकायला मिळाली होती. हे एफ एम ऐकल का???
(कोल्हापुरि झकास)
2 May 2008 - 2:47 pm | धमाल मुलगा
पुन्हा एकदा प्राजुताई स्पेशल लेख....
साधा...सरळ...सुटसुटीत तरीही भावना जशाच्या तशा पोहोचवण्यात यशस्वी होणारी शब्दसंरचना....
(आयला, मलाच वाटायला लागलंय कोणीतरी दुसरंच माझा आयडी वापरुन प्रतिक्रिया लिहितोय!)
छान गं!!!! मजा आली वाचायला. आ व ड लं....
नारळाची गोष्टही मस्त.
कण्हेरीची आणि जास्वंदाची फुलं मला आवडतात...:) छान वाटलं फोटोत पाहून.
शाळेत असताना कदंबाची फुलं तोडून (किंवा खाली पडलेली उचलून) एकमेकांना मारायचो त्याची आठवण करुन दिलीस :)
अवांतरः गोकर्णाच्या फुलांचा फोटो कोणि देऊ शकेल काय? मला खूप आवडतं गोकर्ण.
2 May 2008 - 3:32 pm | काळा_पहाड
सुंदर लेख आणि फोटो त्याहुनही सुंदर. कदंब फक्त वाचुन माहित होता. प्रथमच फोटो बघायला मिळाला.
धन्यवाद प्राजू.
मिलिंद
4 May 2008 - 7:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मनातील ताटवा मस्तच उतरला, चित्रही सुंदर !!!
स्वस्तीकाची फुलांना आम्ही चांदीपाटाची फुले म्हणतो.
4 May 2008 - 11:10 am | अजिंक्य
उत्तम लेख, उत्कृष्ट छायाचित्रे!
प्राजुताई,
लेख आवडला. वाचून एकदम छान वाटलं. वार्याची एखादी प्रसन्न झुळूक आल्यासारखं वाटलं.
(तुम्हाला बागकामाची आणि फुलांमध्ये रमण्याची आवड आहे असं दिसतंय.)
आणि फोटोंमधली फुलं तर "क्लासिक!!"
जर हे फोटो तुम्हीच काढलेले असतील, तर तुम्ही ग्रेट आहात!
फोटोंमुळे लेखाचं सौंदर्य आणखीनच वाढलंय.
Well Done - अजिंक्य.
4 May 2008 - 6:06 pm | प्रशांतकवळे
सुंदर, सरळ, साधा लेख, फोटोही सुंदर..
जास्वंदीचे फूल खूपच सुंदर, आणि जास्वंदची पानेही पहा, जर्द हिरवीगार....
माझ्याकडे जास्वंदीचे १६ प्रकार होते.. ज्यावेळेला गावात रहायचो.. आता ४/५च उरलेत.
कोणाकडे जास्वंदीचे प्रकार (फांद्या) मिळतील का?
प्रशांत
5 May 2008 - 9:06 am | प्राजु
सगळ्या ताटवा प्रेमींना मनापासून धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/