काहीतरी खुपतंय, सलतंय आत
कुठंतरी खोलवर दुखतंय आज
उगाच गहिवर, आवंढा घशात
कोंडलेला श्वास, सैरभैर मनात
मन कसं पिसं झालंय आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज
पापण्यांची होते झालर ओली
रडवेली होते देहाची बोली
कबुली कशाची द्यावी आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज
सयींचं व्याकुळ, आठव मोहळ
उरात कल्लोळ, मौनाचं वादळ
कोरडा श्रावण, भिजवे आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज
जयश्री अंबासकर
प्रतिक्रिया
2 Dec 2010 - 8:11 pm | प्रकाश१११
उगाच गहिवर, आवंढा घशात
कोंडलेला श्वास, सैरभैर मनात
मन कसं पिसं झालंय आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज
छान कविता आवडली मनापासून !!
2 Dec 2010 - 8:37 pm | गणेशा
छान !
पापण्यांची होते झालर ओली
रडवेली होते देहाची बोली
कबुली कशाची द्यावी आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज
2 Dec 2010 - 9:02 pm | मनीषा
सयींचं व्याकुळ, आठव मोहळ
उरात कल्लोळ, मौनाचं वादळ .. खूपच छान !
कविता आवडली
2 Dec 2010 - 9:17 pm | मदनबाण
कविता आवडली...
2 Dec 2010 - 11:10 pm | मयुरेश साने
काय बाय सांगु..कस्स ग सांगु
मलाच माझी वाटे लाज.. काही तरी होउन गेलय आज.....
या गीताची आठवण झाली....
2 Dec 2010 - 11:41 pm | धनंजय
कल्पक, परिणामकारक.
मात्र :
**"पापण्यांची होते झालर ओली" सारख्या समर्थ रूपकानंतर "रडवेली होते देहाची बोली" सारखी बेजान खोगीरभरती करायला नको होती. यापेक्षा परिणामकारक ओळ जमू शकली असती, अशी कवयित्रीबद्दल खात्री आहे.**
3 Dec 2010 - 3:54 pm | विसुनाना
मात्र(त्रे)सह सहमत
3 Dec 2010 - 12:14 am | प्राजु
सयींचं व्याकुळ, आठव मोहळ
उरात कल्लोळ, मौनाचं वादळ
कोरडा श्रावण, भिजवे आज
सुरेख!
3 Dec 2010 - 5:22 am | राघव
क्लास! मस्त लिहिलंय! :)
3 Dec 2010 - 5:31 am | नगरीनिरंजन
मस्त!
3 Dec 2010 - 9:26 am | मिसळभोक्ता
लहान मुलांच्या कवितांना मिळालेला साज. वेदांतल्या ऋचांना देखील तीन स्वर लाअगतात. त्यापेक्षा कॉम्प्लेक्स हवी कविता. नाही का ?
3 Dec 2010 - 10:10 am | पंगा
'रेलगाडी, रेलगाडी, झुकझुक झुकझुक, झुकझुक झुकझुक, पीछेवाले ठेसन बोले "रुकरुक रुकरुक! रुकरुक रुकरुक!"' या 'कविते'त नेमके काय वाईट आहे? (शोधायचाच झाला, तर गहन अर्थही सापडेल त्यात! 'आयुष्य पुढे चालतच राहते, आणि कोणीही कितीही म्हटले, तरी फिरून मागे वळता येत नाही', वगैरे वगैरे.)
फारा वर्षांपूर्वी दूरदर्शनवर एक जाहिरात येत असे. एक साधी, एकहाती काढायला सोपी (आणि एकहातीच काढलेली) अशी एका व्यक्तीची रेखाकृती. आणि मग पंचलाईन. "या माणसाची थोरवी त्याच्या साधेपणात होती."
असो.
3 Dec 2010 - 9:35 am | शैलेन्द्र
"उगाच गहिवर, आवंढा घशात
कोंडलेला श्वास, सैरभैर मनात
मन कसं पिसं झालंय आज"
खुप छान..
3 Dec 2010 - 11:16 am | अवलिया
सुरेख !
3 Dec 2010 - 2:32 pm | जयवी
धन्यवाद मित्रांनो :)
मला स्वतःला कॉम्प्लेक्स कविता नाही आवडत. कविता साधी, समजायला सोपी असायला हवी असं माझं मत आहे.
3 Dec 2010 - 6:47 pm | तिमा
कविता आवडली. आणि काही संबंध नाही तरी नवीन कार्यक्रमाचे नांव आठवले
'खुपते तिथे गुप्ते'
3 Dec 2010 - 10:55 pm | चन्द्रशेखर गोखले
अप्रतिम कविता,, खूप आवडली..!!!
5 Dec 2010 - 5:11 pm | बद्दु
कविता मनापासुन आवडली. आणि हो..कविता साध्या सोप्या शब्दातच असावी म्हणजे रसग्रहण सोपे जाते. नाहीतर शब्दांचे अवडंबर माजविणे काय कठीण आहे? याउलट आपले म्हणणे साध्या सोप्या शब्दात व्यक्त करणे आणि ते पद्य स्वरुपात मांडणे यातच कसोटी आहे..