खूप पावसाळे डोक्यावरून गेले
मोजू नये ईतकी वर्ष उलटली
परंतु तुम्ही माझ्या आठवणीत
सतत असता बाबा !!
हे शपत कुणाला
सांगायला हवे का ??
तुम्ही अचानक निघून गेलात
असे कुठे तुमचे वय झाले होते बाबा !!
आह्मी तर लहान होतो
नि आईचे तर किती छान दिवस होते
हौस-मजेचे
आणि तुम्ही एकदम निघून गेलात
अचानक !!
किती पोरके पोरके नि उध्वस्त होऊन गेलो आम्ही सर्व
दुखाचा पहाड कोसळला
आई नको त्या वयात म्हातारी झाली
पण बाबा !! काळ कुणासाठी थांबतो ??
माझी बायको मुले फक्त
तुमचा शोकेसमध्ये ठेवलेला फोटो बघतात !!
त्यांना काय वाटते ?
कुणास ठाऊक?
काय असतील त्यांच्या भावना ?
कुणास ठाऊक ??
मी सांगतो तुमच्या विषयी
नि सगळे ऐकत असतात
कधी कधी बायकोच्या डोळ्यात पाण्याचा थेंब दिसतो !
तुमच्या विषयी माझ्या काय भावना आहेत ?
तुमच्या आठवणीने खरेच आता डोळ्यात पाणी नाही येत
पण शप्पत तुमची आठवण येत नाही येत
असे नाही होत बाबा !!
तुम्ही कधी मुंबई टूरवरून
जावून आला की ,
दिलीपकुमार किवा देवानंदच्या
सिनिमाची कथा आम्ही स्टोभोवती
कोंडाळे करून थंडीची जाणीव कमी करत
जीवाचा कान करून ऐकत बसायचो
हरवून जायचो
तो काळ मला कसा आता अगदी
छान दिसतोय ?
असे हे छान दिवस
अगदी हाताशी असलेले वाटतात
नि धरू गेले तर पार्यासारखे
कसे अलगद निसटून जातात बाबा???
किती काळ लोटला
नि तुम्हीपण हरवून गेला बाबा !
आईसुद्धा !!
आम्हीसुद्धा होत्याचे नव्हतो झालो
एका घरट्यामध्ये गच्च मिठी मारून बसलेलो आम्ही
पंखात बळ येताच घरट्याच्या शोधात उडून गेलो
प्रत्येकाचे अलग अलग घरटे झाले आत्ता
नि तुमचा फोटो जेह्वा आतल्या डोळ्याने बघतो
तेह्वा जीव गलबलून येतो
आणि ते दिवस हरवल्याच्या जाणीवेने
मन पार विस्कटून जाते ....!!!
प्रतिक्रिया
1 Dec 2010 - 3:17 pm | गणेशा
नि तुमचा फोटो जेह्वा आतल्या डोळ्याने बघतो
तेह्वा जीव गलबलून येतो
आणि ते दिवस हरवल्याच्या जाणीवेने
मन पार विस्कटून जाते ....!!!
निशब्द झालो मित्रा .. लिहित रहा .....
1 Dec 2010 - 3:30 pm | गवि
तेराव्या वर्षी अगदी असेच बाबा गेले.
वाचताना श्वास अडला.
जाऊ दे..जास्त लिहित नाही.
सुंदर आहे मित्रा..
रोज आठवण, अश्रू वगैरे काही काही नसतं हे खरं पण एकदम मधेच आठवलं, जाणवलं की एकदम मधली सगळी वर्षं सपकन नाहीशी होऊन मनावर वार होतो.
गुदमरवणारं फीलिंग असतं.