किती वर्षे झाली तू गेला आहेस
आता तुझे वय देखील वाढले नाही का ..?
तू गेलास तेव्हा मी तसा तरुण होतो
आणि तू तर अगदी मस्त होतास
आता बरीच वर्ष होऊन गेली बघ
अन मी तर आता खूप थकून गेलोय रे
कसे वय वाढते माणसाचे ?
कळत नाही बघ..!!
आता नाहीरे राहिला उत्साह पूर्वीसारखा
तू बोलावतोयस खरा
पण पायच निघत नाही बघ ..
ह्या मातीतून
ही माती मला खूप आपली वाटू लागलीयरे
आताआताशी .....
आपण बघतोयना एकमेकांना
काम्प्युटरवर
तेव्हा किती वाटतो आपण जवळ
आपण बोलतो किती मनमोकळे ....
खूप छान वाटते बघ
कितीवेळा तू स्वप्नात येतोस
अगदी शाळेतल्या वयाचा असतो
तुझ्या हातात कसला कप
आणि फुललेला चेहरा
मला अजूनही आनंद देतो
हे आठवून ....
मी डोळे उघडून बघतो तर
कळते हे स्वप्न आहे ..
डोळ्यातला एक थेंब साक्षी असतो ...!!
खरेच सांगतो:
स्वप्ने मोठी छान असतात
ती आपल्याला कोठेही नेतात
चांगली चांगली फुले होऊन
ती आपल्या बागेत फुलतात ....
तू राहतोस ते घर दिसतेय न मला स्वप्नात
एक निळे निळे फुल डोलते तेह्वा माझ्या मनात
ते रस्ते दिसतात
तो बर्फ दिसतो
तुझे लाकडी सुरेख घर दिसते
तो वळण वाकण रस्ता दिसतो
आणि शप्पत! हे सगळे मी स्वप्नात बघतो ....!!
तुझी आईपण कोठे म्हणते यायचे ?
तिला कोठे येते एस नि फेस
आणि मला तरी कोठे जमते
ते तोंडातल्या तोंडात शब्दाचे घोळ्ने
तुझ्या आईची चालू असते लगबग
तिला परसदारी तुळशीची करायची असते जोपासना
संध्याकाळी तिला लावायची असते पणती
देवापुढे दिवा ....
नि तुझ्याविषयी देवाजवळ
प्रार्थना ...!!
तू तर येणार आहेस ना ह्या मे महिन्यात
आंबे खायला ..?
नि पुरणाची पोळी ..!!
त्यावर तुपाची धरलेली धार....!!
तूच ये बाळा
तुझी वाट बघतेय
तुझी आई
आतल्या डोळ्यांनी ......!!