ओल्या मोज्यांचा येतो तसा शब्दांचा वास येतो.
लोक लिहितात. बोलतात. आपण वास घेतो.
"आजकाल" या शब्दानं सुरुवात झाली की टीकेचा, निराशेचा, अपचनाचा, वार्धक्याचा, त्रिफळा चूर्णाचा वास सुरु.
"आजकाल" हा एवढा शब्द ऐकून मनाची निराशा सुरु करून टाकावी. कारण "आजकाल" या शब्दानं सुरुवात करून कोणी काही पॉझिटिव्ह बोललाय, लिहिलंय असं ऐकण्यात, वाचण्यात नाय बा.
सगळं जड आणि निराशाजनक : आजकाल धावपळीची लाईफस्टाईल, आजकाल पाश्चात्यांचं अंधानुकरण, आजकाल प्रदूषण, आजकाल जंक फूड, आजकाल मुलींची सिगारेट, आजकाल पब कल्चर, आजकाल रिमिक्स गाणी, आजकाल अंगप्रदर्शन, आजकाल टी.व्ही.वरचा हिंसाचार (बीभत्स हा आवडता कीवर्ड), आजकाल मध्यमवर्गीय इकोनॉमीला आलेली सूज, आजकाल मराठीवर आक्रमण, आजकाल गे-लेस्बियन, आजकाल बैठी जीवनशैली, आजकाल जीवघेणी स्पर्धा, आजकाल मुलांकडे दुर्लक्ष, आजकाल लठ्ठपणा ..
आजकाल यांव यांव यांव..
थोडक्यात आता सर्व काही बिघडलं आहे आणि आपल्या (जुन्या) सुवर्णयुगात सर्व उत्तम होतं.
यात खूपशा गोष्टी आजकालच्या नसूनही खपवल्या जातातच. एकदा आजकाल म्हटलं की झालं. जे काय चालू आहे ते आजकालच नव्यानं झालंय..बिघडलंय जग सगळं. काही कायदाकानून नाही राहिलाय इथे.
वाईट वाटतं याचं की बोलणार्याचं वय झालंय. त्याचा काळ त्याला घट्ट चिकटलाय आणि तो त्याला सोडवत नाहीये.
"आजकाल" ची बरीच भावंडं आहेत (जुन्या काळात असायचीच..!!). "आताशा" ("हताशा" शी कित्ती साम्य आहे नाही?), "हल्ली" वगैरे. ही सर्व भावंडं रोज पहाटे पाचला उठतात. भिजवलेले बदाम, मेथीचे दाणे वगैरे आरोग्यप्रधान खाउन स्वत:चा स्वत: चहा करतात. मग अनेकदा पोट साफ करतात. नंतर एक हजार पावलं किंवा तत्सम मापानं चालायला जातात. आंबट तिखट वर्ज्य. कोरफडीचा रस उत्तम. रात्री त्रिफळा चूर्ण. म्हणून "आजकाल","आताशा" आणि "हल्ली" या सर्वांच्या अंगाला चूर्णाचा पादेलोणयुक्त वास येतो.
"आजकाल" वाल्यांचा कंटाळा येण्याचं कारण हे की आपल्याला दिसत असलेली परिस्थिती ते आपल्याला परत दाखवत असतात आणि त्यावर त्यांच्याकडे काही उपाय किंवा आशा नसते. धीराचा शब्द नसतो.
"आजकाल" वाल्यांच्या लेखाचा शेवट असा काहीतरी मोघम घमळू असतो.
१) **** हे मात्र यावरचे उत्तर नव्हे..(म्हणजे काय नाही हे माहीत आहे पण काय आहे हे माहीत नाही..)
२) ***** विरुद्ध आवाज उठवण्याची गरज आहे. (म्हणजे नेमकं काय?)
३) **** लक्षात घेउन **** एकत्र येतील तरच आशेला जागा आहे.
४) **** नाहीतर विनाश अटळ आहे.. (धन्यवाद...)
मारा नुसत्या मचूळ चुळा च्यामारी..
..त्यातून अजिबात वय झालेलं नसूनही कोणी सारखी "आजकाल"ने सुरुवात केली की अजूनच वंगाळ वाटतं.
...हो आणि एक आठवलं.
"खरं सांगायचं तर" आणि "प्रामाणिकपणे सांगायचं तर" अशा पुड्या उघडून वाक्यं "खोलणारी" सत्यवादी माणसं दिसली की मला त्यांच्या एरव्हीच्या "नीयत" वर जबरदस्त "शक" होतो. म्हणजे एरव्ही किती गगनभेदी खोटं बोलत असणार हे नग..?
इंटरनेट वर नाही का वॉर्निंग येत "यू आर अबाउट टू व्ह्यू पेजेस ओव्हर अ सिक्युअर कनेक्शन".. तसं "आता मी जे बोलणार आहे ते मात्र खरं आहे बरं का" असं सांगावं लागतंय?
वत्सा तुजप्रत कल्याण असो..डोंबिवली असो..
नेमकं काय बोलायचं हे माहीत नसल्यानं समोरच्याला पटवता येत नसेल तर त्याला कन्फ्युज करणं हे राजमान्य आहे.
म्हणूनच प्रश्न काहीही असो. त्यानं काही फरक पडत नाही.
म्हणजे बुवा कुपोषण ग्रस्त मुलांचा प्रश्न कसा सोडवावा..
किंवा "गे" चूक की बरोबर?
टी.व्ही. वर तज्ञ ढुढ्ढाचार्य प्रश्नाला उत्तर देतात: "या प्रश्नाचा आपल्याला दोन पातळ्यांवर (किंवा दोन बाजूंनी, दोन अंगांनी) विचार करायला हवा."
किंवा
"यात दोन भाग आहेत."
कन्फ्युजन जितकं वाढवायचं असेल तितके भाग, बाजू, अंगं वाढवायची. अगदी आठ पैलू आहेत असं म्हणायलाही हरकत नाही. कारण आपल्याला पुढे फक्त पहिली बाजू ठोकायला सुरु करायची आहे. बोलता बोलता मूळ विषय बाजूला पडेलच. दुसरी, तिसरी बाजू, आठवा पैलू वगैरे सांगावा लागणार नाही. कारण महाचर्चा वगैरेचा हिरो anchor
आणि वादावादीतले इतर उंट-घोडे तुम्हाला तेवढं बोलूच देणार नाहीत. मध्ये तीनेक मिनिटांनी "ब्रेक" ही येईल. शिवाय प्रेक्षकही कुठून सुरुवात झाली होती हे विसरतील. तुम्हीही विसराल. ही ट्रिक फुलप्रूफ आहे.
माझ्या लहानपणी शाळेत जमिनीवर बसकण मारून टिळक पुण्यतिथीला भाषणं ऐकायला लागायची. पाहुण्यांच्या परिचयातच हाडके अवघडायची. नंतर मुख्य भाषण. असेच एका करुणप्रसंगी ढुंगण, मांड्या आक्रंदून ओरडत असतानाही त्यांना चुळबुळत चूप बसवून आम्ही पोरं "टिळकांच्या व्यक्तिमत्वाचे आठ पैलू" या विषयावर भाषण ऐकत होतो. एक तास शब्दफैरी झाडून वक्ते क्षणभर थांबले. आम्ही अत्यानंदाने चड्ड्या झटकत उठायला तयार झालो..(आता फक्त आभार प्रदर्शन..की झालं..!!)
तेवढ्यात पाणी पिऊन वक्ते उद्गारले "माझ्यामते हा होता टिळकांच्या व्यक्तिमत्वाचा पहिला पैलू".
मला रडू फुटलं..
असो..लांबड लागली. विषय तीनदा की चारदा बदलला. माझा वास तुम्हाला यायच्या आत आम्ही बास..!
प्रतिक्रिया
23 Nov 2010 - 11:46 am | परिकथेतील राजकुमार
प्रामाणिकपणे सांगायचं तर तुम्हालापण एक डायरी द्यायला हवी ;)
23 Nov 2010 - 11:54 am | गवि
तुम्हालापण एक डायरी द्यायला हवी ..
ससंदर्भ स्पष्ट करा..(२ गुण)
:-)
23 Nov 2010 - 12:44 pm | सुप्रिया
मस्त् !
आजकाल तुमचा लेख म्हणजे मेजवानीच वाटायला लागली आहे.!
-सुप्रिया
23 Nov 2010 - 12:15 pm | मनीषा
खरं तर ... काय लिहावं हे कळत नव्हतं, तसच लिहावं कि नाही हा प्रश्नं होताच.
मिपा वर आजकाल जे मराठी साहित्य वाचायला मिळत आहे .. त्या पैकी तुमच्या साहित्याचे अनेक पैलु लक्षात आले..
त्यातला पहिला आणी महत्वाचा पैलु म्हणजे ते वाचनीय आहे हा होय..
(काही शब्दांना ओल्या मोजांसारखा वास येतो खरा .. पण सगळ्याच शब्दांबाबत तुम्हाला असे म्हणायचे नाही ना ?)
23 Nov 2010 - 12:23 pm | गवि
कॉमेंटबद्दल धन्यवाद..
मोजे कोणी घातले आहेत आणि किती दिवस बदललेले नाहीत, त्यावर वास अवलंबून आहे.
:-)
ओके..मान्य..
करेक्शन..
"काही शब्दांना ओल्या मोजांसारखा वास येतो .."
शिवाय एका ठिकाणी "खाउन" झाले आहे ते "खाऊन" असे वाचावे..असे शुद्धिपत्रक या निमित्ताने..
23 Nov 2010 - 12:42 pm | गोगोल
मस्तच .. खूप हसलो वाचून.
23 Nov 2010 - 1:39 pm | तिमा
आजकाल ने सुरवात करुन कायम निराशावादी सूर लावणे हे चुकीचेच आहे हे मान्य. पण नवीन घडणार्या सर्वच गोष्टी चांगल्या आहेत आणि त्या ज्यांना आवडत नाहीत ते सर्व जुनाट, बुरसटलेल्या विचारांचे, जुन्या काळाला चिकटलेले, हे मान्य नाही. प्रत्येकाला आपापले मतस्वातंत्र्य आहे.
गगनांत विहार करताना लांबून सर्व चांगलंच दिसतं. जवळ जाऊन अनुभव घेतल्याशिवाय वास्तव कळत नाही.
23 Nov 2010 - 1:58 pm | गवि
एकदम सही बोल्या माणूसघाणेसाहेब..
फक्त शब्दाच्या टोन विषयी लिहितोय.
"पण नवीन घडणार्या सर्वच गोष्टी चांगल्या आहेत आणि त्या ज्यांना आवडत नाहीत ते सर्व जुनाट, बुरसटलेल्या विचारांचे, जुन्या काळाला चिकटलेले.."
हे असं काही यात नाहीच आहे, त्यामुळे मान्य नसण्याची आवश्यकताही नाहीच.
म्हटलेलं तर नाहीच, पण नीट पाहिल्यास आडून आडून सूचितही केलेलं नाहीये.
"आजकाल" वापरून सुरुवात केली की जनरली उद्देश फक्त दोष दाखवून निराळे होण्याचा असतो. त्याविषयी आशादायक किंवा ठोस प्रोग्नोसिस दिलं जात नाही. दोष तर आपल्याला ढळढळीत दिसतच असतात.
..म्हणून ती उदाहरणं दिली..
बरेच दोष हे "दोष" नसतातही..पण "आजकाल" म्हटलं की टोन बदलतो.
उदाहरणं देण्याची सवय कधी जाणार कोण जाणे, पण देतो.
सुरुवात १. "वडा पाव, बर्गर आणि इतर प्रोसेस्ड फूड रोजच्या अन्नात घेतलं तर लठ्ठपणा आणि कोलेस्टेरॉल वाढते. यावरच्या उपायांचा विचार आपण या लेखात करणार आहोत.."
सुरुवात २. "आजकाल पाश्चात्यांचे अंधानुकरण करून पिझ्झा, बर्गर अशा फास्ट फूड्चे जे फॅड आले आहे त्यामुळे लठ्ठ्पणा आणि हृदयविकाराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.."
नं २--यात फॅक्ट अशी आहे की नवीन जे काही होतंय त्याचा स्वीकार नाहीच.
आपल्या आधीच्या पिढीत श्रीखंडावर तूप घालून ओरपणारे पणजोबा अचानक ताटावरच मान टाकून कसे गेले किंवा साजुक तुपातली बिर्याणी, पैजा मारुन खाल्लेली जिलेबी रबडी यांच्या कथा आठवून आणि संध्याकाळी ऑफिसमधे मागवून खाल्लेली अस्सल देशी भजी आठवून, वाढीव कोलेस्टेरॉल ही केवळ "आजकाल"ची किन्वा "अंधानुकरणाची"समस्या नाही हे लक्षात घेतले पाहिजे आणि आशावादी दृष्टीने मूळ समस्येवर उपाय शोधण्याची भाषा हवी.
कॉमेंटबद्दल आभार.
23 Nov 2010 - 6:04 pm | सविता
आजकाल.....तुमचे बरेच लेख येतात.........
आणि बरेचसे चक्क वाचनिय पण असतात.
24 Nov 2010 - 12:40 am | राजेश घासकडवी
आणि हे प्रत्येक पिढीतले लोक म्हणत आलेले आहेत! मात्र नक्की सर्वोत्तम कालखंड सांगा म्हटलं की कोणाला सांगता येत नाही.
:)
विंदा करंदीकरांच्या साठीच्या गजल मधील 'बाविशीत बुढ्ढा' चा उल्लेख आठवतो.