अरुंधती ची म्हातारपणाची प्रार्थना वाचली आणि दै. सकाळ ४/४/२०१० मधे आलेली कविता देशोदेशीच्या सदरात कॉन्स्टंटाईन पी कवाफी या ग्रीक कवि ची म्हातारा ही कविता आठवली. अनुवादक कोण?मला माहित नाही.
म्हातारा
गोंगाट गर्दी असलेल्या या छोट्याशा हॉटेलात
मागच्या बाजुला बसला आहे एक म्हातारा
टेबलावर पुढे झुकून -वाकून
त्याच्या पुढ्यात आहे वृत्तपत्र..
आणि सोबतीला कोणीच नाही त्याच्या...
सध्याच्या हलाखीच्या दु:खदायक वार्धक्यात
त्याच्या मनात सुरु आहेत विचार...
जेव्हा ताकद होती आपल्या शरीरात,
जेव्हा होते आपल्याकडे कमालीचे संवाद कौशल्य
आणी दिसतही होतो आपण नीटनेटके, देखणे..
त्या सार्या वर्षात आपण आयुष्याची मजा किती म्हणजे किती कमी लुटली...!
आता त्याला ठाउक आहे कि तो खुप म्हातारा झालेला आहे,
त्याला ते जाणवतय कि वार्धक्याच्या खुणाही त्याला दिसत आहेत..
आणि त्याला हेही जाणवतय की, तो किती तरुण होता जणु काही कालचीच गोष्ट!
काळ किती तोकडा आहे... किती तोकडा!
त्याच्या मनात हेही विचार सुरु आहेत की
आपले शहाणे असणे, सावध असणे यामुळेच आपण कसे फसविले गेलो...
आणि वर त्या शहाणपणावर विश्वासुनही राहिलो.... किती तो मुर्खपणा!
ते खोटारडे...!म्हणाले होते," उद्या भरपुर वेळ आहे तुझ्याकडे"
त्याला हेही आठवतय कि, आपली उस्फुर्तता आपण कशी दडपुन टाकली..
आपल्या आनंदाचा आपणच कसा बळी दिला...
अशी गमावलेली प्रत्येक संधी
त्याच्या निरर्थक शहाणपणाची अशी कुचेष्टा करत आहे!
... असा खुप विचार करकरुन आणी गतकाळ आठवुन आठवुन
म्हातारा आता पेंगुळला आहे
त्याच्या डोळ्यावर आता झापड आली आहे
आणी हॉटेलातल्या त्या टेबलावरच
डोक टेकवुन तो झोपी गेला आहे
गाढ...... अगदी गाढ!
प्रतिक्रिया
22 Nov 2010 - 8:23 pm | प्रकाश१११
फारच छान कविता .आवडली
माझीपण कविता वाचून बघ
बघ कशी वाटतेय
http://www.misalpav.com/node/15504
22 Nov 2010 - 8:29 pm | प्रभो
बर्याच दिवसानी पकाकाकांना बोर्डावर बघून छान वाटलं...
छान कविता...
22 Nov 2010 - 9:13 pm | क्रेमर
कविता येथे दिल्याबद्दल प्रकाशरावांचे अनेक आभार. कवाफी यांच्या कवितेत व्यक्त केलेल्या भावना 'झोर्बा द ग्रीक' या अप्रतिम कादंबरीची प्रेरणा असावी काय असे क्षणभर वाटून गेले. झोर्बाचे लेखक कझांत्किस आणि कवाफी यांचा कालखंड पाहता कमीत कमी कवाफी यांचा प्रभाव असण्याची शक्यता अगदीच टाकाऊ नसल्याचे लक्षात आले.
22 Nov 2010 - 10:49 pm | राजेश घासकडवी
शहाणपणा, चौकटीत राहाणं, ऊर्मी दडपणं - यातून आपण आनंद न मिळवल्याचं दुःख शिल्लक राहातं. कवीने स्वतःला भीती दाखवण्यासाठी लिहिल्यासारखी वाटली.
मात्र झोर्बाशी साम्य वाटलं नाही. झोर्बा प्रत्येक क्षण उपभोगणारा असावा असं वाटतं. त्याच्या मनात भूतकाळाविषयी खंत नसावी.
23 Nov 2010 - 12:12 am | क्रेमर
झोर्बा आणि कवितेतील म्हातार्यात साम्य अर्थातच नाही. चिरनिद्रेपुर्वीच्या म्हातार्याच्या मनातील भावना/ विषाद - ...उस्फुर्तता आपण कशी दडपुन टाकली...- झोर्बाच्या जीवनात कोठेच नाही. झोर्बा कादंबरीचा निवेदक मात्र म्हातार्याच्या जीवनासारखा चौकट सांभाळत झोर्बाच्या चौकटविरहीततेला कौतुकत राहतो. या अर्थाने मला ही कविता कदाचित झोर्बा या कादंबरीच्या अनेक प्रेरणांपैकी एक असू शकेल असे जाणवले.