मठ्ठपणाचा भाव असणारी दुपार !!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
16 Nov 2010 - 8:04 am

सुस्त अशी दुपार उगवली आहे
सगळे शरीर सुस्तीने भेंडाळुन यावे अशी दुपार ...!
सर्वत्र सुन्न असे वातावरण
माणसाच्या जमावाला पण ओहोटी लागलीय
सगळीच पेंगत डुलकीच्या नशेत ...
कान नि मन सुन्न व्हावे असे वातावरण
वटवाघळ! सारखी टांगून राहिलेय दुपार

झाडांच्या पानापानानी कसे घेतलेय स्वताला मिटवून
चिडीचुप्प स्वप्नात हरवून
काही गायी म्हशी स्वताला गुंडाळून
रवंथ करीत बसल्यात ही दुपार
कुत्रे देखील डोळे मिटून पेंगत बसलेय
भुंकायचे सोडून

सूर्य नारायणासारखा खत्रूड शिक्षक
नि मठ्ठ अशी ही दुपार
गणित सुटले नाही की पट्टी हातावर
मग दुपार अशी केविलवाणी
रडकुंडीला आलेली
श्वास कोंडून धरलाय
त्यमुळे सगळेच टेन्समध्ये ....,!

मठ्ठ चेह्र्यासारखी दिसतेय ही दुपार
मास्तरांनी शिक्षा दिल्यासारखी ...
पायाचे अंगठे धरून कंटाळलिय ही दुपार
ती वाट पाहतेय घंटेची
मग होईल संध्याकाळ नि गार हवा सुटेल
ही दुपार वाट पाहतेय त्या क्षणाची
तोपर्यत ती निमूट
सहन करतेय आपल्या प्राक्तन-भोगाला ...!!

कविता

प्रतिक्रिया

चित्रा's picture

16 Nov 2010 - 8:13 am | चित्रा

आवडली कविता. पायाचे अंगठे धरलेली दुपार डोळ्यासमोर उभी राहिली.

सगळेच टेन्समध्ये पेक्षा काही वेगळे हवे होते असे एक वाटले.

प्रकाश१११'s picture

16 Nov 2010 - 8:39 am | प्रकाश१११

चित्राजी -कविता एका मूडमध्ये लिहिली गेलीय.
टेन्स मध्ये म्हणजे कसे एक ओढलेले वातावरण असते
त्यासाठी शब्द सहज वापरला गेला .आपल्या प्रतिक्रियेचा जरूर विचार करेन.
प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !!

प्रकाश१११'s picture

16 Nov 2010 - 8:43 am | प्रकाश१११

संपादन उत्तर -
फारच अप्रतिम. सुरेख संपादन !!
मनापासून आभार.!!

अडगळ's picture

16 Nov 2010 - 10:02 am | अडगळ

कविता आवडली.
गुलजारच्या अशाच काहीशा दोन ओळी आठवल्या.

दोपहरे ,
ऐसी लगती है ,
बिना मोहरो के खाली खाने रख्खे हो जैसे ।