वसंतोत्सवाची खासियत असणार्या ह्या पदार्थाला सृष्टीमध्ये नवचैतन्य आणणार्या वसंतऋतुचेच नाव ह्या पदार्थाला देणारे चिनी रसिकच म्हणायला हवेत,नाही का?ह्या स्प्रिंग रोल्सची मजा घ्यायला दर वेळी 'हाटेल' गाठायची गरज नाही.ही घ्या रेसिपी-
साहित्य- कोबी,गाजर,सिमला मिरची (लाल,पिवळी,हिरवी अशा रंगीत असल्यास उत्तम,नसल्यास ज्या असतील त्या),सेलरीपात २ काड्या,पातीचे २कांदे+कांदापात - ह्या सर्व बारीक चिरलेल्या भाज्या १.५ ते २ कप.
सोयासॉस,मिरपूड,चिलीगार्लिक सॉस(किवा मिरची+लसूण पेस्ट),मीठ,अजिनोमोटो - चवीनुसार.
स्प्रिंग रोल किवा एग रोल शीट्स (बाजारात तयार मिळतात.),एका अंड्यातील पांढरे.
तळणीसाठी तेल.
कृती-
गाजर,कोबी किसणे.बाकीच्या सर्व भाज्या बारीक चिरणे.१कप पाणी उकळत ठेवणे. ह्या सर्व चिरलेल्या भाज्या पाण्यात घालणे.झाकण ठेवून वाफ आणणे. नंतर एका तसराळ्यावर सुती फडके घालणे आणि ह्या वाफवलेल्या भाज्या त्या फडक्यावर ओतणे.गाठोडे करुन पाणी पिळून टाकणे,शक्य तित़के पाणी पिळून टाकणे,जे पाणी खाली तसराळ्यात पडेल ते फेकून न देता व्हेज स्टॉक म्हणून सुपात,मांचुरीयन इ. च्या ग्रेव्हीत वापरता येते.घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून फ्रिज मध्ये ठेवले तर एखाद दोन दिवस राहू शकते.लगेचच वापरण्याचीही गरज नाही.
आता ह्या भाज्या एका दुसर्या तसराळ्यात घेऊन त्यात चवीनुसार मीठ,अजिनोमोटो,मिरपूड घालणे,१चहाचा चमचा सोयासॉस,१ चहाचा चमचा चिलीगार्लिक सॉस/पेस्ट घालणे.चांगले एकत्र करणे.तिखट हवे असल्यास अजून चिली गार्लिक पेस्ट घालणे.स्टफिंग तयार झाले.
चिकन/मटण स्प्रिंग रोल्स - ह्या करता भाज्यांऐवजी चिकन/मटणखिमा वापरणे.बाकी साहित्य व कृती सारखीच.
स्प्रिंगरोल शीट वर एका बाजूला हे सारण घालणे आणि शीटची गुंडाळी करणे.
रोल करताना घट्ट गुंडाळणे,अर्ध्यावर आल्यावर पाकिटाप्रमाणे दोन्ही बाजून बंद करणे ,त्यावर अंड्यातील पांढर्याचा हात लावणे,तिसर्या बाजूलाही अंड्याचा हात लावणे व तिसरी बाजू गुंडाळून रोल बंद करणे.
अंड्याचा हात लावल्याने रोल नीट बंद होतो व सुटत नाही,ज्यांना अंडे नको असेल त्यांनी पाण्याचा हात लावून बंद करावे पण अंड्यामुळे जास्त व्यवस्थित बंद होते.
तेल कडकडीत तापवणे आणि मोठ्या आचेवर बदामी रंगावर तळून काढणे आणि लगेचच सर्व्ह करणे. जास्त वेळ ठेवले तर ते मऊ पडतात.तेल कडकडीत तापलेले असणे जरुरी चे आहे,अन्यथा रोल तेल पितात.
तळण्याऐवजी रोल्सना तेलाचा हात लावून अवन मध्ये १५ ते २० मिनिटे १८० ते २०० अंश से. वर बेक केले तरी चालेल पण तळलेले रोल्स अर्थातच जास्त रुचकर लागतात.
हे रोल्स तयार करून फ्रिज करून ठेवू शकता आणि आयत्या वेळी तळून काढता येतात.फ्रिज केलेले रोल्स तळायच्या आधी १/२ ते ३/४ तास बाहेर काढून ठेवावेत आणि तळताना काळजी घेणे आवश्यक आहे कारण रोल्स फ्रिज केले की थोडा पाण्याचा अंश त्यात असतो.
प्रतिक्रिया
21 Apr 2008 - 2:18 pm | स्वाती राजेश
रेसिपी छान आहे.
एग रोल घरी सुद्धा करता येतात. तुला माहीत आहे का कृती?
21 Apr 2008 - 2:24 pm | स्वाती दिनेश
एग रोल/स्प्रिंग रोल शीट घरी करता येतात पण फार वेळ जातो(आणि त्याची रेसिपी इथे आत्ता माझ्याकडे नाहीये,भारतात आहे:( आणि बाजारात मिळतात ग तयार शीट्स :)
फरक- एग रोल शीट्स मैदा+कणकेच्या असतात आणि स्प्रिंग रोल शीट्स कॉर्नफ्लोअरच्या असतात.
एवढेच लक्षात आहे,प्रमाण बिमाण लक्षात नाही,:(
स्वाती
21 Apr 2008 - 2:37 pm | स्वाती राजेश
मी १/४ कप मैदा, १/२ टे.स्पून कॉर्नफ्लोअर ,चिमूटभर बेकिंग्पावडर घालते व घट्ट मळते. अर्ध्या तासाने पातळ पोळी लाटून भाजी भरून रोल करून तळते.
पण अंडे घालून, पातळ डोसा बनवून अशी काहीतरी रेसिपी आहे ती तुला माहीती आहे का? म्हणून विचारले.
21 Apr 2008 - 4:10 pm | विसोबा खेचर
वा स्वाती, अतिशय सुंदर पाकृ आणि फोटोदेखील!
माझी ही अत्यंत आवडती डिश आहे.
चिकन/मटण स्प्रिंग रोल्स - ह्या करता भाज्यांऐवजी चिकन/मटणखिमा वापरणे.बाकी साहित्य व कृती सारखीच.
मला मटणखिम्याचे स्प्रिंगरोल्स अधिक आवडतात, सिंगलमाल्ट ग्लेनमोरांजीसोबत फारच छान लागतात! ;)
तू पाठवलेला फोटू मिळाला, त्याबद्दल धन्यवाद..
काही फोटू अद्याप रांगेत आहेत, नंबराप्रमाणे तुझ्या स्प्रिंगरोल्सचा फोटूही मिपाच्या मुखपृष्ठावर चढवणार आहे! ;)
तात्या.
21 Apr 2008 - 5:50 pm | वरदा
शीट्स आणते आजच ......झक्कास रेसिपी ...फोटो पाहूनच भूक लागली...
25 Apr 2008 - 5:44 am | चतुरंग
पा.कृ.छान वाटते आहे, करुन पहायला हवी.
तयार 'स्प्रिंग रोल शीट्स' ग्रोसरी स्टोअरमधे कुठच्या सेक्शनमधे शोधावेत?
चतुरंग
25 Apr 2008 - 1:58 pm | स्वाती दिनेश
कोणत्याही एशियन दुकानात (चिनी,जपानी,थायी,श्रीलंकन्,भारतीय इ. बहुतेक दुकानात असतात) फ्रोझन सेक्शन मध्ये असतात.
25 Apr 2008 - 9:23 am | प्रभाकर पेठकर
स्वाती दिनेश,
पाककृती चांगली आहे. ह्यात पाणी सुटणार्या, म्हणजे भोपळी मिरची सरख्या, भाज्या टाळाव्यात किंवा कमी वापराव्यात.
कोबी, गाजर, फरसबी अशा भाज्या वापराव्यात. भाज्या पाण्यात टाकून शिजवून नंतर पाणी काढून टाकण्या पेक्षा तेलावर (किंचित) थोडे आलं-लसूण परतून त्यावर भाज्या डायरेक्ट टाकाव्यात त्यातच तुम्ही लिहील्याप्रमाणे इतर साहित्य घालून भाज्या टॉस कराव्यात किंवा फुल गॅसवर झरझर परताव्यात. ह्या अर्धवट शिजवायच्या असतात, पूर्ण नाही. गॅस बारीक असेल तर ह्या भाज्यांनाही पाणी सुटण्याची शक्यता असते. असो. भाज्या अर्धवट कच्या/अर्धवट शिजलेल्या असणे महत्त्वाचे. तेलावर परतल्या मुळे, पाण्यात शिजवण्यापेक्षा, वेगळी आणि चांगली चव येते. झंझटही कमी आहे.
ज्यांना अंडे नको असेल त्यांनी पाण्याचा हात लावून बंद करावे
नुसत्या पाण्यापेक्षा मैद्याची पातळ पेस्ट वापरावी.
स्वाती राजेश,
अंडे घालून, पातळ डोसा बनवून अशी काहीतरी रेसिपी आहे ती तुला माहीती आहे का?
मैदा, कॉर्नफ्लोर आणि अंडे मिसळून थोडे पाणी घालायचे आणि हे मिश्रण हाताने एकाच दिशेने खूप - खूप फेसायचे. नंतर एक छोट्टेसे धीरडे टाकून, फ्राय पॅन फिरवून, त्याचा पात्तळ थर पॅनला द्यायचा. हे एका बाजूनेच शिजवायचे. असे धिरडे आपल्या मनासारखे पातळ झाले तर बाकीची धिरडी टाकायची अन्यथा थोडे पाणी घालून बॅटर जरा पातळ करून घ्यायचे.
एका रिकाम्या ताटलीवर कॉर्नफ्लोर भुरभुरून टाकायची. त्यावर पॅन मधून काढलेले धिरडे काढायचे त्यावर पुन्हा जरा कॉर्नफ्लोर भुरभुरायची (म्हणजे गरम धिरडी एकमेकांना चिकटत नाहीत) आणि त्यावर दुसरे धिरडे टाकायचे.
प्रत्यक्ष स्प्रिंग रोल्स करताना एका धिरड्याचे मधून सुरीने दोन भाग करायचे. कापलेला सरळ भाग आपल्याकडे घेऊन गोलाकार भाग समोर घ्यायचा. ह्यात आता तयार सारण भरून डाव्या-उजव्या कडा त्यावर वळून नंतर स्वतःजवळची बाजू सारणावर वळत साधारण घट्ट वळकटी वळायची , अंडे लावून बंद करायची. बाकी कॄती वर दिल्या प्रमाणे.
25 Apr 2008 - 11:43 am | स्वाती दिनेश
तुमच्या टीप्स बद्दल धन्यवाद,
ह्म्म.. भाज्या टॉस केल्या तर छान क्रिस्प राहतील आणि झंझट कमी,:) बरोबर ! पुढचे स्प्रींग रोल असेच करेन.:)
स्वाती
24 May 2008 - 1:04 am | स्वाती दिनेश
ह्या वेळी स्प्रिंग रोलच्या भाज्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे जास्त आचेवर अर्धकच्च्या परतून घेतल्या.त्यामुळे कमी झंझट आणि क्रिस्पी राहिल्या भाज्या,असे २ फायदे झाले.धन्यु.
स्वाती
25 Apr 2008 - 1:52 pm | स्वाती राजेश
धन्यवाद, मी किती दिवसापासून पाहात होते.
पण एक शंका..ह्या धिरड्या करून फ्रीज मधे ठेवल्या तर चालतील का? कारण ऐनवेळी करायच्या म्हणजे जरा वेळखाऊ काम आहे नाही?
25 Apr 2008 - 1:57 pm | प्रभाकर पेठकर
ह्या धिरड्या करून फ्रीज मधे ठेवल्या तर चालतील का?
नाही. त्या थंडीने गारठून एकाच जागी बसून राहतील. हा: हा: हा:
ओके. विनोद राहू दे बाजूला. करून फ्रिज मध्ये ठेवायला हरकत नाही. २-३ दिवस टिकतील.
25 Apr 2008 - 11:20 pm | वरदा
गॅस बारीक असेल तर ह्या भाज्यांनाही पाणी सुटण्याची शक्यता असते.
बरं झालं काका मी करुन पहाण्याआधी तुम्ही आयडीया दिली आता तेलावर टॉस करुनच करेन्...शीटस आणुन ठेवल्यात कालच...
26 Apr 2008 - 8:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिनी स्प्रिंग रोल्स बटाटाच्या समोश्याप्रमाणे दिसताहेत तेव्हा अस्सं काही खादाडीला आवडेलच.
रेसेपी नेहमीप्रमाणेच जोरदार !!!
27 May 2008 - 11:05 pm | चकली
मी स्प्रिंग रोल्स पट्टी अशी बनवते ..दूवा
चकली
http://chakali.blogspot.com