हे मासे दिसायला अगदी सुंदर असतात. खादाडीतील गोल्डफिश हे मला सुचलेल नाव (फिशटॅकमधील नव्हे. नाहितर त्यावरुन वादाच्या पोस्टी पडतील). ह्यांचे आकारमान एवढेच असते. अजुन मोठे मी कधीच पाहीले नाहित. चविलाही तितकेच सुंदर असतात.
मांदेली तळण्यासाठी
मांदेली हवी तेवढी.
हिंग
हळद
मसाला
मिठ
लसूण पाकळ्या ४-५ किंवा आल,लसुण वाटण
तेल तळण्यासाठी
प्रथम मांदेलीची खवले काढून घ्यावीत. मांदेलीची खवले तरती असतात. अगदी हातानेही सहज निघतात. मग डोके, शेपुट व बाजुची परे काढून तिन पाण्यात स्वच्छ धुवुन घ्यायची. (सगळेच कापलेले मासे तिन पाण्यातुन धुवायचे.)
आता ह्या कापलेल्या मांदेलींना हिंग, हळद, मिठ, मसाला लावा. जर वाटण लावायच असेल तर तेही लावा.
तवा तापवुन त्यावर थोडे तेल सोडून ठेचलेल्या लसुण पाकळ्या खमंग परतवा (वाटण लावल असेल तर गरज नाही). आता त्यात मांदेली तलण्यासाठी टाका. तेल कमी वाटल्यास बाजुने परत सोडा. गॅस मिडीयम ठेवा. चार पाच मिनीटांनी मांदेली परतुन परत तिनचार मिनीटांत गॅस बंद करा.
तव्यातुन गरम गरम काढलेली मांदेलींचा फडशा पाडा.
अधिक टिपा :
अजुन काही टिपा म्हणजे मिठ मसाला लावताना त्यावर लिंबू पिळुनही चव लागते.
काही जण लसुण किंवा वाटणही नाही लावत. कारण तळलेल्या माश्यांना वईस वास येत नाही (सुरमई, बांगडा सोडून).
ह्याचे सुकेसुकेच कालवण छान लागते. मांदेलिंवर मिठ, मसाला, हिंग, हळद, चिंचेचा कोळ मोडलेली मिरची कोथिंबीर, ठेचलेला लसुण आणि तेल सगले एकत्र करुन मंद किंवा मिडीयम गॅसवर शिजवायचे. अप्रतिम लागते ह्या पद्धतीने. लसूणाची फोडणी देउनही करतात. पाणी मात्र घालायचे नाही जास्त. मी फक्त चिंचेचा कोळच घालते.
प्रतिक्रिया
9 Nov 2010 - 1:22 pm | विसोबा खेचर
तीव्र निषेध..!
तुम्हाला मिपावरच काय, परंतु मराठी आंतरजालावर कुठेच लिहायची परवानगी नसावी..!
तात्या.
9 Nov 2010 - 1:24 pm | नंदन
क्या बात है!
+१, वर दिलेल्या कृतीप्रमाणे किंवा पाटा-वरवंट्यावर वाटलेल्या खोबर्याचे दबदबीत कालवण.
हा धागा आठवला :)
9 Nov 2010 - 1:26 pm | मराठमोळा
जबराट...
सोबत आवडीचे सरबत असेल तर यासारखं सुख काही नाही. :)
जागुतैंचे आभार. :)
9 Nov 2010 - 1:27 pm | स्पंदना
हा लेडी फिश ना? काय म्हणतात बर मुडदुशी?
माझी मुल खायला लागली की बस तेव्हढच जेवण होत त्यांच. काय चव असते या माशाला, उद्या आणते आता.
9 Nov 2010 - 9:02 pm | विश्वनाथ मेहेंदळे
जल्ला मेला, मांदेली येगली न मुडदुशी येगली गो बाय !!!!
10 Nov 2010 - 7:31 am | स्पंदना
आर जाळु नको माझी पोर तुझ्या मानगुटावर बसतील .
ह्ये बघ आमी हाय घाटावरच आमची काय मच्छीत पी एएच डी न्हाय साधारण तसा दिसतो म्हणुन म्हंटल.
उगा साम्गायला गेल तर टांगायला नको नेउ.
10 Nov 2010 - 5:55 pm | विश्वनाथ मेहेंदळे
आर जाळु नको माझी पोर तुझ्या मानगुटावर बसतील .
अहो जल्ला मेला म्हणजे कुनाला जालायचा नाय काय. तां एक अशी बोलायची रीत असता.
ह्ये बघ आमी हाय घाटावरच आमची काय मच्छीत पी एएच डी न्हाय साधारण तसा दिसतो म्हणुन म्हंटल.
मिपा वर थोडे दिस राहा आनी अशे धागे वाचीत रहा, PhD होऊन जाईल आपोआप. जल्ला हाय काय आनी नाय काय. बाकी घाटावरच्या थोड्या रेशिप्या पन टाका की आमच्यासाठी.
10 Nov 2010 - 12:01 am | सुनील
हा लेडी फिश ना? काय म्हणतात बर मुडदुशी?
अहो नाही हो! मुडदुशे असे दिसतात!
10 Nov 2010 - 7:33 am | स्पंदना
एव्हढा मसाला लावुन ठेवल्यावर कसे बाइ दिसतील ते? त्या पेक्षा खाउन उरलेले काटे अन शेपट्या दाखवायच्या ना? मग ओळखले असते!
10 Nov 2010 - 12:02 pm | जागु
ते मुडदुशी मसाल्यामुळे दिसत नाहीत. संपुर्ण माश्याचे फोटो मिळतील का ?
10 Nov 2010 - 7:21 pm | सुनील
संपूर्ण मुडदुशाचे फोटो कोळणीकडेच कारण हे मासे घरी आणताना सहसा शिरच्छेद करूनच आणले जातात!
11 Nov 2010 - 4:06 pm | यशोधरा
मुडदुशे म्हंजेच नगली ना?
11 Nov 2010 - 4:43 pm | सुनील
कोंकण - गोवा - मुडदुशे
कारवार - नगली (नोगली)
मंगलोर - काने
इंग्रजी वळणाची भारतीय हाटेले - लेडी फिश
11 Nov 2010 - 4:50 pm | जागु
आता तुम्ही फोटो टाकाच. आमच्याइथे काय म्हणतात कोणास ठाउक ?
11 Nov 2010 - 5:01 pm | सुनील
फोटो सध्या शक्य नाही कारण "आमच्या (सध्याच्या) इथे" हा मिळत नाही! पण नंतर नक्की (अगदी कोळणीसकट!)
9 Nov 2010 - 1:31 pm | मनि२७
धन्य ती जागू ताई...आणि धन्य ते मासे ...
कुठे सापडतात ग तुला असले मासे ज्याचे नाव पण कधी ऐकले नाहीत....
तुला तर आता एक अवार्ड द्यायला हव खर तर...
समुद्रातले , तळ्यातले , नदीतले सगळे मासे तुझ्या परिचयाचे झाले असतील नाही का ;-)
9 Nov 2010 - 1:37 pm | मराठमोळा
>>कुठे सापडतात ग तुला असले मासे ज्याचे नाव पण कधी ऐकले नाहीत....
हॅ हॅ हॅ..
मासे माहित असायला किनार्यावर असायला लागतं, भारताच्या मध्यभागी आणि उत्तर भारतात ते कशाशी खातात हे सुद्धा माहित नसते.
9 Nov 2010 - 10:39 pm | दिपाली पाटिल
.
9 Nov 2010 - 2:50 pm | स्पंदना
अय्यो मनी माउ परिचयाचे होते हो ! खाउन टाकले ना ते , पास्ट झाला त्यांचा झणझणीत !
9 Nov 2010 - 2:53 pm | मराठमोळा
>>पास्ट झाला त्यांचा झणझणीत !
अपर्णा तै,
हाहाहा...
=)) =))
9 Nov 2010 - 2:14 pm | जागु
विसोबा :smile:
नंदन धागा छान आहे.
मराठमोळा धन्यवाद.
अपर्णा नविन नाव कळल तुमच्यामुळे.
मनी अॅवॉर्डच नाव काय द्याल ? बाकी धन्स हो एवढी स्तुती केल्याबद्दल.
9 Nov 2010 - 2:30 pm | दिपक
झकास!!

9 Nov 2010 - 6:15 pm | स्वाती२
व्वा! गरम गरम मांदेलीचे सुके आणि जोडीला आईच्या हातची तांदळाची भाकरी!
9 Nov 2010 - 6:19 pm | प्रियाली
मांदेली आवडते कारण त्याच्या सोबतीने बोंबिल घरात येत. नुसती मांदेली तितकीशी आवडत नाही.
मांदेलीचं आंबट-तिखट सॉल्लिड!!
जागु रॉक्स!
9 Nov 2010 - 8:14 pm | संदीप चित्रे
>> जागु रॉक्स!
असेच म्हणतो !!
9 Nov 2010 - 10:36 pm | दिपाली पाटिल
दिवाळी संपते न संपते तोच जागू हजर मांदेलीसोबत...
10 Nov 2010 - 4:15 am | चित्रा
उतारा नको काय, दिवाळीतल्या गोडाधोडाला?!
मांदेलीसारखेच साधारण दिसणारे स्मेल्टही असे करता येतात.
9 Nov 2010 - 11:58 pm | सुनील
अहाहा!!
चांगली खरपूस तळलेली मांदेली बियरसोबत घ्यावी!
आता पापलेट, सुरमई, रावस अश्या "राजेशाही" माशांच्या तुलनेत मांदेली जरा डाउन मार्केट मासळी. पण चवीला जबरा!
10 Nov 2010 - 8:22 am | राघव
हे असेच चालत राहिले तर माझ्या शाकाहारी बाण्याचे कठीण आहे ब्वॉ.
मी गणपाभौचा, दिपालीतैचा, जागुतैचा एकही पाककृतीचा धागा उघडायचा नाही असं ठरवलेलं असतं.
पण जेव्हा धागा दिसतो तेव्हा सारखं लक्ष तिकडे जात असतं.
मग म्हणतो, फक्त फोटू बघून घेऊ.
केव्हा खालचे प्रतिसाद हळूच वाचून होतात ते समजतही नाही.
कधी कधी मात्र अगदी राहवत नाही अन् प्रतिसाद द्यावाच लागतो...
तुम्ही लोक अक्षरशः महाआआआआआआआआन आहात... _/\_
:)
10 Nov 2010 - 12:15 pm | जागु
दिपालि, दिपक, स्वाती, प्रियाली, संदिप, चित्रा, राघव, धन्यवाद.
सुनिल पण हे छोटे मासेच खुप चविष्ट असतात.
10 Nov 2010 - 5:49 pm | विश्वनाथ मेहेंदळे
छान धागा. मांदेली हा एक स्वस्त आणि मस्त मासा आहे. खोबरे घालून सुके करा किंवा नुसते तळा, उत्तम लागतात. मात्र तळले तर त्याच दिवशी संपवावेत (कुठलेही मासे). सौम्य चवीच्या माशांना तळताना आले-लसणाची पेस्ट लावू नये, मूळ चव दबते त्यात. नुसते मीठ, हळद आणि तिखट यात स्वर्ग उभा राहतो. पापलेट सारख्या माशाला तर तळताना आले-लसूण लावणे हा माझ्या लेखी अक्ष्यम्य अपराध. तो अतिसौम्य चवीचा मासा आहे.
जागुताई, सुरमई तळली तर वास नाही येत (ताजी असेल तर), बांगड्याला मात्र येतो.
11 Nov 2010 - 4:03 pm | यशोधरा
>>पापलेट सारख्या माशाला तर तळताना आले-लसूण लावणे हा माझ्या लेखी अक्ष्यम्य अपराध. तो अतिसौम्य चवीचा मासा आहे.
11 Nov 2010 - 3:03 pm | जागु
सुनिल मग शिरच्छेद केलेले फोटोही चालतील. त्या लिंकमधे मसाला लावल्यामुळे काहीच कळत नाही.
विश्वनाथ तुमच बरोबर आहे. पण सुरमईला थोडा वास येतोच असा माझा अनुभव आहे. कदाचित माझ्या मनातच तो वास बसला असेल.
11 Nov 2010 - 4:30 pm | जागु
विश्वनाथ माझ्या माहेरी तळताना अजिबात लसुण वगैरे नाही लावत. पण माझ्या सासरी लागतोच.
14 Nov 2010 - 9:27 am | गवि
अप्रतिम छान लिहीता हो.काय बोलू?
आतापर्यंत मासे आणायल गेलं की सुरमई किंवा पापलेट घेउन परतायचो.मग "परवडत नाही..परवडत नाही.." म्हणत बसायचं.इथे तर तुम्ही खजिना उघडून दिलाहेत.झकास हो एकदम. धन्यु.
14 Nov 2010 - 9:31 am | स्पा
जागू एकदम झकास... :)
सगळ्यात स्वस्त......
आणि सगळ्यात मस्त......
असं मान्देलीच वर्णन करता येईल.....
7 Dec 2010 - 4:45 pm | जागु
गगनविहारी, स्पा मांदेली खुपच स्वस्त असतात ह्या दिवसांत. वरची मांदेली मी २० रु. मध्ये आणली होती.
7 Dec 2010 - 5:02 pm | गवि
काट्यांचे प्रमाण काय ?
चावून पचवण्यासारखे बारीक की हाडेसदृश मोठ्मोठे ? अर्थात एकूण माश्याचाच साईझ छोटा दिसतोय त्यामुळे ते बारके बारके असतीलसं वाटलं.
ते घासाघासाला मध्यम आकाराचे काटे आले की मग मजा येत नाही. चावून टाकता येत नाहीत आणि सारखे काढत बसावे लागतात तोंडातून.
7 Dec 2010 - 6:06 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मान्देलीला एक मोठा काटा असतो (अर्थात मुळात मासाच छोटा असल्याने तो काटा पण फार मोठा नसतो). या खेरीज काही छोटे काटे असतात पण त्याचा फार त्रास होत नाही. मांदेली तळली असेल तर मान्देलीचा शेपटीकडचा भाग काट्यासकट खाता येतो.
अर्थात काटे पूर्ण टाळायचे असतील तर छोट्या माशांकडे वळूच नये. पापलेट, सुरमई,हलवा आणि रावस बस झाले. पुर्व भारतात गेलात तर रोहू आणि हिल्सा :-)
7 Dec 2010 - 4:49 pm | गणपा
कोण रे तो? जो हे धागे मुद्दाम परत परत वर आणतोय?
ऐन जेवणाची वेळ आहे रे इकडे. दया करा :(
7 Dec 2010 - 5:03 pm | जागु
काट्यांचे प्रमाण काय ?
उवांच्या फणीला असतात तितके काटे. (हसु आवरते घेतेय)
7 Dec 2010 - 5:29 pm | गवि
यक्क.. :-(
बादवे.. अहो आम्ही कोंकणात राहून मासे खाणे अडाप्ट केले आहे. जन्मतः घरंदाज मासेखाऊ नसल्याने काट्यांची अडचण येते..म्हून विचारलं.
7 Dec 2010 - 10:56 pm | जागु
पण खरे तर काटेरी मच्छी जास्त चवदार असते.