परतून सांग तुजला बोलावणार कैसा?
नाहीस तू मनाला समजावणार कैसा?
पुरते अटून गेले डोळ्यामधून पाणी
कल्लोळ भावनांचा मी दावणार कैसा?
जहरी तुझ्या स्वरांनी शिवलेस ओठ माझे
संवाद अंतरीचा पण थांबणार कैसा?
चाहूल पावसाची सुर्या फितूर झाली
भेगाळला उन्हाळा ओलावणार कैसा?
कंटाळलो कितीही बेरंग जीवनाला
आयुष्य तू दिलेले अव्हेरणार कैसा?
मी हात लावल्याने कोमेजली बिचारी
निष्पाप त्या फुलांना रागावणार कैसा?
ना सांगता कधीही येतेस तू समोरी
माझ्या व्यथे तुला मी हुलकावणार कैसा?
- स्वानंद
प्रतिक्रिया
29 Oct 2010 - 6:33 pm | यशोधरा
छान आहे गझल, पण अटून गेले, ही सूट जरा जास्त झाली.
29 Oct 2010 - 8:19 pm | मेघवेडा
छान आहे गझल, पण अटून गेले, ही सूट जरा जास्त झाली.
असेच म्हणतो.
तसेच
>> चाहूल पावसाची सुर्या फितूर झाली
यातला र्हस्व 'सु' दाताखाली खड्यासारखा येत आहे. तो दीर्घ करा किंवा "चाहूल पावसाची मित्रा फितूर झाली" वापरा. :)
बाकी गझल मस्तच!
29 Oct 2010 - 6:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मी हात लावल्याने कोमेजली बिचारी
निष्पाप त्या फुलांना रागावणार कैसा?
ओळी वाचतांना लाजाळूची पानं डोळ्यासमोर आली.
अजून लिहा.
-दिलीप बिरुटे
1 Nov 2010 - 2:13 pm | गणेशा
आवडली .. लिहित रहा .. वाचत आहे