आपल्या लेकाच्या - रायबाच्या लग्नाचे आवतण अर्थात् आमंत्रण द्यायला आलेल्या तानाजीला जिजाऊंच्या मनातील सल ऐकून रहावले नाही आणि आवतण द्यायच्या ऐवजी तो जिजाऊंचे हे आवतण स्वीकारून कोढाणा केवळ चारशे मावळे आणि भाऊ सूर्याजी यांच्यासह जिंकून मृत्यूला सामोरा गेला ! - शिल्प - अकलूज येथील भावी "शिवसॄष्टी" - कविता माझी !
मी बघता उचलू नजर
पाहते "हिरवा" हा कोंढाणा !
करी ताठ अता हा कणा
बोलली जिजाऊ काढून फणा !
ऐकताच पिळुनी मिशा
गर्जला नादवीत दिशा
"मी आलो होतो आवतणाला
लगीन ह्या "राया"चे
स्वीकरले म्यां तुमचे आवतण
घेऊन दर्सन या पायांचे !"
झुंजला मर्द घेऊन चारशे
मावळे - ताना वाघ ढाणा
छाटून उदयभानूस , जिंकला
मध्यरातीस गड कोंढाणा !
दिसणार कंदीबी न्हाई आऊ
झेंडा तुमाला "हिरवा"
म्यां निंगालो म्होरं , शिवबा,
रायाची वरात पर् तुमी फिरवा !
प्रतिक्रिया
17 Apr 2008 - 11:58 am | धमाल मुलगा
हर हर महादेव !
काश, हम भी होते उस जमाने में...
- (मावळखोर्यात फिरणारा ढाण्या छावा) ध मा ल.
17 Apr 2008 - 12:10 pm | उदय सप्रे
तुम्ही माझे शिवरायांवरचे २ लेख मि.पा. वरचे वाचलेत का? नसतील तर वाचून मला तुमचा अभिप्राय जरूर कळवा.
17 Apr 2008 - 2:14 pm | मनस्वी
काव्य आवडले.
17 Apr 2008 - 2:56 pm | सागर
उदय मित्रा,
नेहमीप्रमाणेच जोशपूर्ण काव्य आहे.
झुंजला मर्द घेऊन चारशे
मावळे - ताना वाघ ढाणा
छाटून उदयभानूस , जिंकला
मध्यरातीस गड कोंढाणा !
या चार ओळी तर मस्तच
शिवाजी महाराजांच्या काळच्या इतिहासावरचा अधिकार आणि तुझी प्रतिभाही शब्दां-शब्दांतून दिसते...
असेच लिहित रहा आणि समस्त महाराष्ट्राला शिवरायांच्या तेजाने भारुन टाक...
आजच्या रयतेला आणि नेत्यांनाही अशा प्रेरणेची गरज आहे.
(शिवरायांच्या सुराज्याची पुन्हा स्वप्ने पाहणारा) सागर
17 Apr 2008 - 4:27 pm | उदय सप्रे
प्रतिक्रियांबध्दल आभार !
मला वाटले होते की शेवटच्या ४ ओळींनी तानाजी च्या स्वराज्याच्या प्रायोरिटीज् आणि आपण रायबाच्या लग्नात नसलो तरी चालेल पण आपला बाप "शिवबा" ही कसर नक्कीच भरून काढेल असा विश्वास आणि म्हणूनच हक्कचे शिवबांस सांगणे पण दिसते , हे सर्व बघुन डोळ्यांत पाणी येईल.....
दिसणार कंदीबी न्हाई आऊ
झेंडा तुमाला "हिरवा"
म्यां निंगालो म्होरं , शिवबा,
रायाची वरात पर् तुमी फिरवा !
17 Apr 2008 - 5:51 pm | सागर
मित्रा
तानाजीची अवस्था आणि शेवटचे कडवे - डोळ्यांत पाणी तर येणारच
पण मी उल्लेखिलेल्या ओळींमुळे त्वेष आणि जोश दोन्हीही येतो.
सध्या तरी आपल्या समाजाला अश्रू गाळण्यापेक्षा त्वेषाची आणि जोशाची गरज जास्त आहे
बाकी प्रत्येक शब्दन् शब्द टच् करणारा आहे यात शंका नाही
जय भवानी जय शिवाजी
(मावळा) सागर
17 Apr 2008 - 4:35 pm | विदेश
कोंढाणा- कोढाणा यातील मी काय वाचू!
माझ्या अल्पमतीनुसार कोंडाणा वाचू का?
पुन्हा गैरसमज नको-(काव्य उत्तमच आहे याबद्दल दुमत नाहीच)
17 Apr 2008 - 4:50 pm | उदय सप्रे
या किल्ल्यावर फार पूर्वी कौडिण्य ॠषींचे वास्तव्य होते , पण गडाचे नाव लिहिताना इतिहासात "कोंढाणा" असेच म्हणतात असे मला वाटते.
आम्ही पण अल्पमतीच आहोत , आमचा काहीही गैरसमज नाहिये साहेब कुणाहीबध्द्ल , "कोढाणा" ही टंकलेखनातील चूक आहे - म्हणून जाहीर माफी मागतो !
उदय सप्रेम
17 Apr 2008 - 4:50 pm | naaradmunee
सुन्दर कविता
17 Apr 2008 - 5:20 pm | विसोबा खेचर
सुंदर कविता...
तानाजी मालुसरे की जय!
महाराजांच्या या छाव्याला मिसळपाव परिवाराचा मानाचा मुजरा...!
तात्या.
17 Apr 2008 - 9:02 pm | चतुरंग
कोंढाण्यावरच्या त्या सिहांस मानाचा मुजरा!
चतुरंग
18 Apr 2008 - 9:29 am | प्राजु
अतिशय सुंदर कविता.
'गड आला पण माझा सिंह गेला' इतिहासात वाचलेले हे शिवरायांचे शब्द आठवले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Apr 2008 - 11:13 am | उदय सप्रे
प्राजु,
अभिप्रायबध्दल धन्यवाद !
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुमच्यापासूनच स्फूर्ती घेऊन माझे ब्लॉग्ज तयार केले आहेत , सवड मिळेल तेंव्हा बघा आणि मला अभिप्राय जरूर कळवा.
कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/
आणि
कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/
आपला मित्र,
उदय सप्रेम
18 Apr 2008 - 10:53 pm | विकास
कविता आवडली. चित्र मात्र दिसत नाही आहे.
बाकी एक अवांतर आठवणः काही वर्षांपुर्वीची (भारतातील - महाराष्ट्रातील) - मित्र मित्र बोलत असताना "सिंहगड" हा शब्द आला. त्यावेळी एका मराठी मुलाने प्रश्न विचारला - म्हणजे तोच नं, ज्याचा "सिंहासारखा शेप" आहे तो? ;)
18 Apr 2008 - 11:15 pm | प्रमोद देव
उदयराव हे एक काव्य म्हणून उत्तम आहे पण त्यात एक ऐतिहासिक चूक आहे.
ही चूक सुधारता आली तर पाहा.
झुंजला मर्द घेऊन चारशे
मावळे - ताना वाघ ढाणा
छाटून उदयभानूस , जिंकला
मध्यरातीस गड कोंढाणा
ह्यामध्ये तानाजीने उदयभानाला छाटलेले नाहीये तर ते त्याच्या मामाने... शेलारमामाने छाटलेय. उदयभानाशी लढताना तानाजी कामी आला हा इतिहास आहे.
अर्थात तानाजीच्या हौतात्म्यामुळे शिवाजी महाराजांनी कोंडाण्याचे नाव बदलून सिंहगड(तानाजी म्हणजे सिंह ... असे महाराज म्हणाले) केले.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
22 Apr 2008 - 9:57 am | उदय सप्रे
प्रमोदकाका,
आणखीन एक लिहायचं अनावधानानं राहून गेलं : "सिंहगड" हे नांव फार आधीपासून प्रचलित होते , तानाजीच्या स्मॄतीप्रित्यर्थ महाराजांनी कोंढाणयाचे नांव बदलून "सिंहगड" केले हा एक पाठ्यपुस्तकी कल्पनाविलास आहे !
"गड आला पण माझा सिंह गेला" ही पण कल्पनाच आहे पण ती तानाजीच्या हौतात्म्याला अगदी साजेशी आणि महाराजांच्या माणसांवरील प्रेम करण्याच्या स्वभावाशी अगदी सुसंगत अशीच आहे - त्यामुळे हे लिहिणार्या लेखकाच्या कल्पनाशक्तीला सलाम !
19 Apr 2008 - 9:37 am | उदय सप्रे
प्रमोदकाका,
सर्वप्रथम तुमच्या या पत्राबध्दल आभार ! कारण कविता वास्तवाचे भान ठेवून वाचणारे खूप कमी लोक असतात आणि तुम्ही त्या खूप कमी लोकांतील एक आहात हे जाणवले.
काही स्पष्टीकरण :
१. राजा शिवछत्रपती आवृत्ती १४ वी , पान ७७७ पहा :
तानाजीचा वज्राघाती तडाखा उदयभानला बसला ! उदयभानचा शिलाघाती प्रहार तानाजीवर कोसळला ! दोन्हीही महप्रचंड शिखरे एकदम एकांच क्षणी धरणीवर कोसळली !
२. छत्रपती शिवाजी महाराज - कृ.अ.केळुस्कर्-तिसरी आवृत्ती- पान ३४० :
दोघेही वीर मोठे शूर्,बलवान असल्याकारणाने त्यांची झटापट बराच वेळ मोठ्या निकराने झाली.दोघांसही पुष्कळ जखमा झाल्या आणि शेवटी परस्परांचे वार परस्परांच्या वर्मी लागून ते दोघेही एकाच वेळी समरभूमीवर चित् होऊन गतप्राण झाले.
३. श्रीमान योगी - रणजीत देसाई - अठरावी आवृत्ती - पान ६२१-तानाजीचा भाऊ सूर्याजी राजेंना तानाजीच्या बलिदानाची हकीकत सांगताना म्हणाला :
उदयभानूच्या तडाख्यानं त्यांची ढाल तुटली.डाव्या हातावर वार झेलीत तानाजी उदयभानूला भिडले; आणि काय होतय् ,हे कळायच्या आत दोघेही जमिनीवर कोसळले !
प्रमोदकाका, यातील संदर्भ क्रमांक १ व २ यांचा शिवाजी महाराजांच्या इतिहासावरील अधिकार वादातीत आहे. क्रमांक ३ - कै.रणजीत देसाई हे भाषाप्रभू आणि म्हणूनच माझा आदर्श आहेत , त्यांचा संदर्भ ऐतिहासिक दृष्ट्या दिलेला नाही , माझा मानाचा मुजरा म्हणून दिला आहे !
शेलारमामांनी उदयभानूस छाटले नव्हते ! हा शाळेतील पाठ्यपुस्तकातील भाग वाटत आहे - तरीही तुम्ही मला संदर्भ दाखवा , मी चूक नक्कीच सुधारीन ! यत फक्त मावळे ३०० होते की ४०० हाच वाद आहे पण त्यामुळे जास्त संख्या असलेल्या गनिमांपुढे कमी मावळे झुंजले या सत्यास गालबोट लागत नाही !
"ऐतिहासिक काव्य किंवा कादंबरी लिहीत असताना कल्पनाविलास करता येतो पण ऐतिहासिक सत्य डावलता येत नाही !"याची विनम्र जाणीव मला आहे कारण संभाजी महाराजांसारख्या वादग्रस्त वादळी व्यक्तीमत्वावर मी कादंबरी लिहीत आहे त्यामुळे असले विवाद उद्भवणार याची मी मनाची पूर्वतयारी केली आहे.
या उत्तरामधे आपल्याबध्दल कुठलाही आकस वा गैरसमज नाहिये ह्याची कृपया नोंद घ्यावी , उलट एक सुजाण आणि दक्ष वाचक मला लाभल्याबध्दल आणि हे व्यासपीठ मला दिल्याबध्दल तुमचे आणि मि.पा. चे कोटी कोटी आभार !
आपल्याशी प्रत्यक्ष भेट वा बोलायला आवडेल.
आपला विनम्र,
उदय सप्रेम
भ्रमणध्वनी : ९९६७५ ४२७०३
22 Apr 2008 - 11:39 am | प्रमोद देव
उदय माझे इतिहासाचे वाचन आणि ज्ञानही मर्यादित आहे. आम्हाला दुसरीत एक नाट्यप्रवेश होता ... गड आला,पण सिंह गेला!
त्यावेळी तो मला मुखोद्गत होता. त्यात जे म्हटले होते त्याप्रमाणे... मी म्हटलंय. बाकी माझ्याकडे अजून काही माहिती नाही. जे काही पाठ्य पुस्तकात वाचले त्यालाच आम्ही भाबडेपणाने खरा इतिहास मानतो. तेव्हा तुम्ही म्हणता आहात तेच जास्त खरे असेल असे मी गृहीत धरतो.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
13 Aug 2009 - 12:58 pm | विशाल कुलकर्णी
जबरदस्त कविता ! मिपाची जुनी पाने चाळताना आज खजिनाच सापडतो आहे.
सस्नेह
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!
13 Aug 2009 - 1:11 pm | आशिष सुर्वे
'कोंढाण'' ... निश:ब्द!
इतिहासावरील चर्चा वाचून आनंद झाला..
अशा चर्चा होणे फार गरजेचे आहे असे मला वाटते..
ज्ञानात फार मोलाची भर पडतेय.
हर् हर् महादेव!!
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
13 Aug 2009 - 1:25 pm | मदनबाण
सुंदर कविता... :)
दिसणार कंदीबी न्हाई आऊ
झेंडा तुमाला "हिरवा"
म्यां निंगालो म्होरं , शिवबा,
रायाची वरात पर् तुमी फिरवा !
अप्रतिम !!!
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
13 Aug 2009 - 7:41 pm | फ्रॅक्चर बंड्या
आम्ही तोरणा चढत होतो..
एक आज्जी भेटल्या ,
त्या म्हणाल्या " आर दमताय काय ? आमचा शेलारमामा अर्ध्या तासात चढायचा"
आमच्या अडानी मित्राला शेलारमामा कोण हेच माहीत नाही
तो म्हणाला आणा शेलारमामाला जर १/२ तासात चढला तर १००० रुपये देयिन
आम्ही हसुन हसुन दमलो .
नंतर त्याला चुक कळल्यावर चेहरा त्याचा बघण्यासारखा झाला होता
13 Aug 2009 - 7:43 pm | फ्रॅक्चर बंड्या
दिसणार कंदीबी न्हाई आऊ
झेंडा तुमाला "हिरवा"
म्यां निंगालो म्होरं , शिवबा,
रायाची वरात पर् तुमी फिरवा !
हे आवडले कविता पण आवडली
14 Aug 2009 - 12:13 pm | पूजादीप
करी ताठ अता हा कणा
बोलली जिजाऊ काढून फणा !
बाणेदार मासाहेबांचे दर्शनच ..
(शिवप्रेमी) पूजा