राम राम पावणं.. मला तर वळिखलं असनंच म्हना तुमी.. अवो, तात्या म्हनं माज्यावर इष्टोरी लिवनार हाय म्हनून वाट बगून राहिले ना मी,पन किती दिस झालं त्यानं काय अजून लिवल नाय ते व्यकतीचित्तर का काय ते! त्या इडली आन वडेदादाला मात्तुर पयला लंबर गावला आन म्या तशीच की, निसतच आपलं त्या साइट का फिइटला फकस्त माजं नाव द्यायाच आन इष्टोरी लिवाची नाय, आमाला बी मन हाये का नाय?
शेवटी मी गेले त्याच्या शालेतल्या मैतरनीकडं अन तिला म्हनलं माजा यो झ्याक फोटू टाक त्येच्या मिसळपाववर.. तो बगूनशान आन रेशिपी वाचून तरी आठवान व्होईल त्याला माजी गोठ लिवाची...आन तिला म्हणल का माजी रेशिपी दे अदुगर...
मामिची पाकृ याआधी मी दिलेली आहे ,पण ती वरदाच्या मिसळ रेसिपीच्या प्रतिसादामध्ये असल्याने सापडायला त्रास होतो म्हणून मिसळाक्कांच्या विनंतीला मान देऊन ती इथे चढवत आहे.
साहित्य -
कांदे ४/५ + वरुन घालण्यासाठी २ ,बटाटे ४/५,लसुण १ मोठा गड्डा,१ बोटभर आल्याचा तुकडा
तेल १.५वाट्या,तिखट १.५वाटी,गरम मसाला ४ चमचे
१०० ग्राम पापडी,२५०ग्राम हिरवे वाटाणे,५००ग्राम फरसाण
चवीनुसार मीठ
कोथिंबिर सजावटीसाठी
कृती -
हिरवे वाटाणे ५/६ तास भिजत घालावेत. नंतर कुकर मधुन ३/४ शिट्ट्या देऊन शिजवावे.बटाटे उकडून घ्यावे.४/५ कांद्यातील ३ कांदे वाटून घ्यावे. लसुण व आले वाटून पेस्ट करावी,उरलेले २ कांदे बारीक चिरुन घ्यावे.
पापडी कुटून घ्यावी व पाण्यात भिजत घालावी.
एका जाड बुडाच्या पातेल्यात १ वाटी तेल तापत ठेवावे. चांगले तापले की त्यात वाटलेला कांदा घालुन परतावे,मग वाटलेले आलेलसुण घालून परतावे. १.५ वाटी तिखटातील ३/४ वाटी त्यात घालावे व भरपुर परतावे,गरम मसाला घालुन परतावे.इतके परतावे की तेल सुटले पाहिजे.मग त्यात उकडलेले वाटाणे घालावे,पाण्यात भिजवलेली पापडी घालावी,मीठ घालावे.पाणी घालून उकळू द्यावे.
उरलेले १/२ वाटी तेल एका कढईत तापत ठेवावे.त्यात बारीक चिरलेले २ कांदे घालून परतावे,उरलेले तिखट घालून परतावे,थोडे मीठ घालावे.व हे मिश्रण वेगळे ठेवावे.
वरुन घालायसाठी कांदे बारीक चिरावे,उकडलेले बटाटे चिरावे.
खोलगट ताटलीत आधी फरसाण,त्यावर बटाटे ,त्यावर रस्सा,आणि त्यावर कांदा घालून द्यावा.कोथिंबिरीने सजवावे.
"जादा तिखा"- ३नं हवे असेल तर वेगळी तर्री वरुन घ्यावी.
प्रतिक्रिया
13 Apr 2008 - 9:56 pm | विदेश
पाव ?
14 Apr 2008 - 11:33 am | स्वाती दिनेश
खरं तर ह्या पाववाल्यांच्या देशात पावाचे अनंत प्रकार मिळतात पण आपण मिसळ,वडा,पावभाजीबरोबर जो पाव खातो तो मात्र मिळत नाही.:( त्यामुळे इथे मिळत असलेल्यापैकी कोणत्या तरी पावाबरोबर मिसळ खावी लागते.चित्रात दिसतो आहे तो 'फ्रेंच बागेत'किवा 'फ्रेंच स्टिक' नावाचा पाव आहे,जो मिसळ ,पावभाजीबरोबर चांगला लागतो.दुसरा एक तुर्की फ्लाडन ब्रोट म्हणजे तुर्की फ्लॅट ब्रेड मिळतो तो ही चांगला लागतो.
स्वाती
13 Apr 2008 - 11:51 pm | विसोबा खेचर
वा स्वाती! मामिचा फोटूही दिलास ते उत्तम केलंस...
मामिची पाकृही झकास..
शेवटी मी गेले त्याच्या शालेतल्या मैतरनीकडं अन तिला म्हनलं माजा यो झ्याक फोटू टाक त्येच्या मिसळपाववर.. तो बगूनशान आन रेशिपी वाचून तरी आठवान व्होईल त्याला माजी गोठ लिवाची...आन तिला म्हणल का माजी रेशिपी दे अदुगर...
हो हो, आता नक्की लिहीन मिसळीचं व्यक्तिचित्रं! ;)
तुझा,
(शालेतला मैतर!) तात्या.
14 Apr 2008 - 12:47 am | व्यंकट
कारण आम्हांस पापडी म्हणजे फरणासाच्या दुकानात मिळते ती माहीती आहे. ती कशी काय भिजवणार ? कुरडई बरोबर अजून एक छोटा पापड असतो; तो तर नाही?
व्यंकट
14 Apr 2008 - 11:37 am | स्वाती दिनेश
कारण आम्हांस पापडी म्हणजे फरणासाच्या दुकानात मिळते ती माहीती आहे
हो तीच पापडी,तीच खलबत्त्यात कुटायची अथवा मिक्सर मध्ये बारीक करुन घ्यायची ,पाण्यात भिजवायची आणि मिसळीच्या रश्श्यात घालायची त्याने ग्रेव्हीला दाटपणा येतो.
स्वाती
14 Apr 2008 - 11:39 am | व्यंकट
धन्यवाद स्वातीताई !
व्यंकट
14 Apr 2008 - 10:47 pm | विदेश
माहितीबद्दल आभारी.
15 Apr 2008 - 12:08 am | वरदा
काय मस्त फोटो...बरं झालं आता रेसिपी शोधायला सोप्पी....