नमस्कार,
याप्रकारे ढोकळा मस्त होतो. अजून टिपा किंवा माहिती असेल तर, खवैयांनी आणि बल्लवाचार्यांनी जरूर सांगावी.
हीच पाककृती येथेही वाचता येईल!
ढोकळा
साहित्य:
१ कप बेसन पिठ
२ चमचे रवा
१ कप पातळ ताक
२ लहान चमचे साखर
१/२ चमचा मिरची पेस्ट
१/२ चमचा आले पेस्ट
१ लहान चमचा हळद
२ लहान चमचे इनो
१ चमचा लिंबाचा रस
१ चमचा तेल
चवीपुरते मिठ
फोडणीसाठी:
१ चमचा तेल, १/२ चमचा मोहोरी, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, १/२ लहान चमचा हिंग
१ चमचा लिंबाचा रस
१ लहान चमचा साखर
२ चमचे पाणी
कृती:
१) १ कप बेसन पिठ, २ चमचे रवा, २ लहान चमचे साखर, १/२ चमचा मिरची पेस्ट, १/२ चमचा आले पेस्ट, १ लहान चमचा हळद, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा तेल, चवीपुरते मिठ हे सर्व साहित्य एकत्र करावे. त्यात १ ते सव्वा कप ताक घालावे.
२) वरील मिश्रण तयार झाले कि मिश्रणाचे दोन वेगवेगळे भाग करावे व वेगवेगळ्या भांड्यत ठेवावे.
३) एक मध्यम खोलीचा पसरट फ्राईंग पॅन घ्यावा. त्यात अर्ध्यापेक्षा किंचीत कमी भरेल एवढे पाणी उकळत ठेवावे. त्या पॅनमध्ये राहिल एवढ्या उंचीचे मेटलचे भांडे घ्यावे त्याला तेलाचा हात लावून घ्यावा. फ्राईंग पॅनच्या झाकणाला स्वच्छ पंचा बांधून घ्यावा म्हणजे वाफेचे पाणी ढोकळ्यात न पडता पंच्यात शोषले जाईल.
४) एक भाग मिश्रणात १ टिस्पून इनो घालून पटापट एकाच दिशेने अंदाजे १५-२० सेकंद ढवळावे. मिश्रण थोडे फसफसायला लागते. लगेच मिश्रण तेल लावलेल्या भांड्यात ओतून पाणी उकळत ठेवलेल्या पॅनमध्ये ठेवावे वरून पंचा लावलेले झाकण ठेवावे. मध्यम आचेवर १५ ते १८ मिनीटे वाफ काढावी. वाफ काढताना झाकण अजिबात उचलू नये. यासाठी अंदाज घेऊन आवश्यक तेवढे पाणी ठेवावे. पाणी कमी पडले आणि सर्व पाणी संपले तर ढोकळा भांड्याच्या तळाला चिकटून करपू शकतो.
५) जोवर ढोकळा तयार होतोय तोवर फोडणी तयार करू घ्यावी. लहानश्या कढल्यात किंवा लोखंडी पळीत १-२ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहोरी, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १/२ लहान चमचा हिंग घालून फोडणी तयार करावी. फोडणी किंचीत कोमट होवू द्यावी. एका वाटीत २ चमचे पाणी, १ चमचा लिंबाचा रस, १ लहान चमचा साखर यांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण फोडणीत घालावे.
६) १५ मिनीटांनी गॅस बंद करावा. १-२ मिनीटांनी भांडे बाहेर काढावे. ढोकळा जरा गार झाला कि सुरीने कापून घ्यावा. त्यावर तयार केलेली फोडणी चमच्याने पसरावी.
ढोकळयाच्या मिश्रणाचा उरलेला भागही वरील प्रमाणेच वाफवून घ्यावा.
हा ढोकळा हिरव्या तिखट चटणी बरोबर झकासच लागतो.
प्रतिक्रिया
11 Apr 2008 - 10:28 pm | वरदा
पण ते पीठ तू भिजवून ठेवत नाहीस का? मी रात्री बेसन ताकात भिजवते मग सकाळी त्यात बाकीचं साहित्य घालून इनो शेवटी घालून करते...थोडं लसूण पण छान लागतं अर्थात आवडत असेल तर...
12 Apr 2008 - 1:38 am | चकली
वरदाताई
मी पिठ भिजवून नाही ठेवले, सर्व जिन्नस एकत्र करून बेसनपिठ भिजवले आणि लगेच ईनो घालून वाफवायला लावले.
चकली
http://chakali.blogspot.com
12 Apr 2008 - 12:18 am | प्राजु
इनो ऐवजी सायट्रीक असीड.. म्हणजे लिंबू फूल म्हणून एक प्रकार मिळतो.. तो घालते. मात्र झाकणाला कापद बांधायचि कल्पना आवडली. नाहीतर ढोकळा तयार झाला की त्यात वरती वाफेचे पाणी पडलेले असते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Apr 2008 - 1:07 am | विसोबा खेचर
अतिशय सुंदर पाककृती..!
चकलीला धन्यवाद..!
तात्या.
अवांतर - ढोकळ्याचे प्रकाशचित्रं सुंदरच आहे, ते इथेही द्यावेसे वाटले म्हणून दिले आहे. त्याचप्रमाणे ढोकळ्याच्या प्रकाशचित्राच्या ऐवजी जो दुवा दिला होता तो दुवाही मूळ प्रकाशचित्रं इथे देऊन त्या खाली दिला आहे, जेणेकरून इच्छुकांना त्या दुव्यावर जाऊनही वाचता येईल. हे बदल आपल्या पूर्वपरवानगीशिवाय केले आहेत, क्षमा असावी!
तात्या.
14 Apr 2008 - 9:46 pm | चकली
तात्या,
पुढच्या वेळेपासून मीच छायाचित्र आणि दुवा देत जाईन, यावेळी ते काम तुम्ही केलेत याबद्दल तुमचे धन्यवाद :)
चकली
http://chakali.blogspot.com
13 Apr 2008 - 2:36 am | स्वाती राजेश
झाकणाला फडके बांधायची कल्पना मस्त.:)
फोटो पाहून आताच करावासा वाटतो.
कृती छान आहे, तुझ्यासारख्या सुगरणी कडून अशाच छान छान चवदार रेसिपी येऊ देत,
वाट पाहात आहे, पुढच्या रेसिपीची....
14 Apr 2008 - 9:47 pm | चकली
धन्यवाद स्वाती !!
चकली
http://chakali.blogspot.com
13 Apr 2008 - 11:00 am | स्वाती दिनेश
ढोकळ्याचं चित्र पाहून एक तुकडा तोंडात टाकावासा वाटतो आहे.:-)
एका वाटीत २ चमचे पाणी, १ चमचा लिंबाचा रस, १ लहान चमचा साखर यांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण फोडणीत घालावे.
हे ऐकले होते पण कधी करून नाही पाहिले.आता या वेळी ढोकळा केला की असे करून पाहतेच.
स्वाती
13 Apr 2008 - 11:09 am | विसोबा खेचर
ढोकळ्याचं चित्र पाहून एक तुकडा तोंडात टाकावासा वाटतो आहे.:-)
क्या बात है! याला म्हणतात "दाद!" :)
मिपाच्या वैशिष्ठ्याला जागलीस बरं स्वाती! :)
तात्या.
14 Apr 2008 - 9:58 pm | चकली
तात्या,
मिपाचे एक वैशिष्ठ्य मला नेहमी जाणवते. मी जेव्हा ब्लॉगवर पाककृती लिहिते ते सिनेमासारखे असते म्हणजे लोक पाहून जातील कदाचित प्रतिक्रिया देतील..पण मिसळपाव वर नाटकासारखी लगेच प्रतिक्रिया मिळते. ती पण उस्फुर्त आणि दिलखुलास. याला खरंच म्हणतात दाद.. सगळ्यांना धन्यवाद
चकली
http://chakali.blogspot.com
15 Apr 2008 - 12:53 am | विसोबा खेचर
पण मिसळपाव वर नाटकासारखी लगेच प्रतिक्रिया मिळते. ती पण उस्फुर्त आणि दिलखुलास. याला खरंच म्हणतात दाद..
चकली, वरील वाक्य लिहून तुम्ही मिपाचा सन्मानच केला आहे! मन:पूर्वक धन्यवाद!
अजूनही अश्याच उत्तमोत्तम पाकृ आणि तुमचे इतरही लेखन मिपावर येऊ द्यात, ही विनंती! मिपा तुमचंच आहे...
तात्या.
14 Apr 2008 - 9:52 pm | चकली
धन्यवाद स्वाती,
लिंबू, साखर व पाणी फोडणीत मिक्स केल्याने खरंच खुप मस्त चव येते. युक्ति अर्थात माझ्या गुजराथी मैत्रिणीची.. मी बराचसा ढोकळा या मिश्रणाबरोबरच खाते अगदी चटणी न घेता.. आणि नुसती तेलाची फोडणी सर्व ढोकळ्याला पुरतही नाही.
चकली
http://chakali.blogspot.com
14 Apr 2008 - 9:52 pm | वरदा
काय मस्त दिसतोय..अगं मला ताई नको गं म्हणू अवघी २५ वर्षाची आहे मी... बरं मग आता मी असा करुनच पाहीन..कुणी येणार असेल तेव्हा पटकन करायला बरं... बाकी ते चित्र एकदम सॉलीड आहे...ती कापड लावायची आयडीया मलाही नव्हती माहीत..मस्तच...तुझ्या ब्लॉगस्पॉटलाही भेट दिली मस्तच आहे....