माणूस म्हंटलं, की अडी-अडचणी, चिंता-काळज्या, ताण-तणाव हे सगळं ओघाने आलं....पण अशाही वेळांना आपण
आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवला, तर त्या चिंता-काळज्यांची बोच जरा कमी होते.
मला माझ्या एका मित्राने मध्यंतरी सहज एक नेहमीचाच प्रश्न विचारला...म्हणाला, "कशी आहेस सांग !" मी माझ्याही
नकळत सगळे वैताग-पाढे वाचले. कविताही लिहीली...ती पण अशीच आयुष्याचे रडगाणे सांगणारी..बोचरी !!
पण मग एकदम वाटले की मला त्याला असेही उत्तर देता आले असते की! थोडेसे सकारात्मक...
शेवटी सुखं आणि दुःखं या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. फक्तं नाणे उलटे करून बघायची देरी असते. तर काय..अजून
एक कविता लिहीली मग एक सकारत्मक विचार मांडणारी!
कविता म्हणजे काय...एक विचारच ना...कुठला विचार भावतोय, मनाला भिडतोय बघा.
कशी आहेस ते सांग?
डोक्यात प्रश्नांची मोठ्ठी रांग!
वेगवेगळ्या कोड्यांचे,
वळवळतात किडे....
मेंदूचा होतो भुगा,
पण सुटत नाहीत तिढे !
कशा-कशाचे सांग--
ओझे वाटून घेऊ?
श्वास होतोय जड....
म्हणून स्वतःस मिटून घेऊ??
क्षणा-क्षणाने आयुष्याची
होतेय वजाबाकी...
कसले गणित मांडू...
अन त्रासू फ़ुकाफुकी ?
रडायचेच झाले तर
कोरडे सुद्धा रडता येते,
पापणीस कशाला थेंबाचा भार?
असे म्हणून अडता येते!
जाऊदे !
तू विचारलेस, मी सांगितले..
उरलेले गंगेला मिळाले..
सगळ्यांचे हे असेच आहे...
शोधायचे काय निराळे ????
----------------------------------------------------------------------
कशी आहेस ते सांग?
अरे फ़िटले बघ नशीबाचे पांग!
डोळ्यांत एक सुद्धा नाही आसू,
ओठांवर फ़क्त गोड-गोड हसू...
हृदयाचे ठोके बघ कसे..
ताला-सुरांत धडधडतायत...
छान-छान स्वप्न बघत,
मनाचे पंख फ़डफ़डतायत !
अडचणी-बिडचणी ??
मारो यार गोली...
अभी अभी जलायी हमने..
बुराई की होली !!!
आला क्षण आंजारत-गोंजारत,
मी वाटचाल करणार..
नव्या जोमाचे नवे गाणे,
सारखे गुणगुणणार.....
कवितेलाही बघ माझ्या
फ़ुटतायत आता धुमारे...
शब्दच माझी शक्ती,
अन शब्दच सारे किनारे!
प्रतिक्रिया
11 Sep 2010 - 11:16 am | बाबुराव
भारी भावना उतरल्या शब्दामधी
लिव्हित राव्हा.
बाबुराव :)
11 Sep 2010 - 2:49 pm | काव्यवेडी
सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही तील सन्वेदना मनाला भिडणार्या
आहेत. एकदम झकास !!!! खूप शुभेच्छा !!!!!!!!
11 Sep 2010 - 3:58 pm | मनीषा
छान आहेत मनावरचे तरंग .
13 Sep 2010 - 10:56 am | गंगाधर मुटे
दोन्ही कविता सुंदर.
पण सकारात्मक आणि नकारात्मक हा स्वभावाचा खेळ नाही.
काही वेदना सकारात्मक घेताच येतात असे नाही. तसेच काही वेदना निष्कारण नकारात्मक घेऊनही उपयोग नाही.
13 Sep 2010 - 10:59 am | गंगाधर मुटे
डबल झाला होता.