साहित्यः
जुना बासमती तांदूळ - २ वाट्या
लालबुंद टोमॅटो - ५-६ नग
आलं - १ इंच
कढी लिंब - २ काड्या
काश्मिरी मिरची पावडर - १ टी स्पून (अथवा तिखट रंगहीन असेल तर किंचीत लाल रंग)
मीठ - चवीनुसार.
साखर - चवीनुसार.
तेल - ३ टेबल स्पून
जिरं - १ टी स्पून
बारीक चिरलेली कोथिबीर - सजावटीसाठी.
तयारी:
तांदूळ २०-२५ मिनिटे भिजत टाकावेत.
गॅस वर पाणी उकळवून त्यात टोमॅटो टाकावेत. २-३ मिनिटे उकळवून ते उकळत्या पाण्यातून काढून बर्फाच्या (किंवा साध्या) पाण्यात टाकावेत. गार झाले की टोमॅटोची साले काढून टाकावीत. आणि टोमॅटोचा गर मिक्सर मधून फिरवून गाळून घ्यावा. (पाणी अजिबात घालायचे नाही.)
आलं एकदम बारीक चॉप करावे.
कढीलिंबाची पाने काढून घ्यावीत.
कृती:
तांदूळ निथळवून जेवढ्यास तेवढे पाणी घालून भात मोकळा शिजवून घ्यावा. शिजलेला भात एखाद्या ताटात पसरवून जरा थड होऊ द्यावा.
कढईत ३ टेबल स्पून तेल (आवडत असल्यास तूप घेतले तरी चालेल) तापवावे. तेल तापले की जिरं फोडणीस टाकावे. जिरं चांगले तडतडल्यावर १-२ सेकंद थांबून (जिरं लाल झाले पाहिजे.) कढीलिंबाची पाने घालावीत. कढीलिंबांच्या पानांचा वास तेलात उतरल्यावर त्यात टोमॅटोचा गर घालून परतावे. त्यात बारीक चिरलेले आले, काश्मिरी मिरची पावडर, मीठ, साखर घालून परतत राहावे. टोमॅटोचा सर्व रस पूर्ण पणे आटला पाहिजे. मिश्रण घट्टसर होत येते. तेल सुटते.
टोमॅटोच्या मिश्रणातील पाणी पूर्ण पणे आटले आहे ह्याची खातरजमा करून त्यावर भात टाकावा. भात नीट परतून त्याच्या सर्वांगास टोमॅटोचा रंग लागला पाहिजे.
चव पाहून मीठ, साखरचे प्रमाण सारखे करावे.
भात सर्व्हींग बाऊल मध्ये काढून कोथिंबीरीने सजवावा.
शुभेच्छा....!
टीपा:
टोमॅटो मस्त लालबुंद असावेत.
टोमॅटोचे पाणी नीट आटवून टाकावे. घाई केल्यास आणि पाणी उरले असल्यास भात चिकट होतो. (मोकळा राहात नाही.)
साखरेचे प्रमाण टोमॅटोच्या आंबटपणावर ठरवावे. टोमॅटो गोडसर असतील तर योग्य प्रमाणात लिंबू रस घालावा.
प्रतिक्रिया
10 Apr 2008 - 11:25 pm | वरदा
काय मस्त क्रुती आहे...आता हा नक्कीच करते..किती पटकन दिलीत..काल विचारलं आज तयार्....वाव!
खूप खूप धन्यवाद
10 Apr 2008 - 11:47 pm | प्राजु
झकास.....!
फोटोच असा काही जबरा आहे.. की............ जाऊ दे.. नाही सांगत.
पाककृती मस्त.. आजचा रात्रीचा मेनू ठरला माझा. :))
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
11 Apr 2008 - 12:23 am | विसोबा खेचर
सु रे ख !!
11 Apr 2008 - 2:43 am | राजेन्द्र
फारच छान!!
11 Apr 2008 - 3:09 am | शितल
भुक लागली असे वाटते.
11 Apr 2008 - 6:19 am | धनंजय
मस्त पुलाव.
11 Apr 2008 - 9:41 am | चकली
मस्त कृती आहे. आणि लिहीली पण छान आहे.
धन्यवाद !
चकली
http://chakali.blogspot.com
11 Apr 2008 - 12:07 pm | स्वाती दिनेश
पुलाव मस्तच दिस्तो आहे,अगदी केलाच पाहिजे असा.
शंका-तयार टोमॅटो प्युरी वापरली तर चालेल का?आणि हा पुलाव आंबटसर असतो का?
स्वाती
11 Apr 2008 - 1:25 pm | सहज
पाव भाजी, प्रॉन्स बालचाव आता हा पुलाव, ही "लालेलाल" भानगड काय आहे? तुमची लाहीलाही होते मग उपाय म्हणुन पाककला करता का? नाही तो रक्तरंजीत भाव चांगला उतरलाय म्हणून म्हणतो.
मला नुस्त्या तिखट रंगावरुन दुसर्यादिवशी काय हाल होतील याची कल्पना करवत नाही.
कृपया ह. घ्या. तीनही पदार्थ अतिशय आवडले हे.सां.न.ल.
11 Apr 2008 - 7:30 pm | वरदा
मी खाल्ला होता एकदा..थोडा आंबट, थोडा गोड आणि मस्त तिखट झणझणीत असं म्हणू शकतो चवीला....बाकी पेठकरकाका सांगतीलच...
12 Apr 2008 - 6:45 am | चतुरंग
पंत, प्रथम तुमच्या पा.कृ.ला मनापासून दाद!!
कृती बघितल्यानंतर राहवलेच नाही. संध्याकाळचा मेनू ठरला.
बायकोलाही कल्पना एकदम पसंत पडली. अगदी तुम्ही दिल्याबरहुकूम सर्व पायर्या व्यवस्थीत घेत घेत पुलाव केला.
(जिरं आणि कढिपत्ता किंचित जास्त वेळ ठेवल्यामुळे त्यांची चव सुरेख उतरली.)
काय सांगू चव? आहाहा...एकदम झकास झाला होता!
केल्याकेल्या एवढी भूक लागलेली की फोटो काढायचे लक्षातच राहिले नाही शेवटी थोडा पुलाव उरला आहे त्याचातरी फोटो काढा असे हिने सांगितल्यावर मग काढला.
हा पहा -
(टोमॅटो मात्र एवढे लालबुंद नसल्याने तुमच्या पुलावासारखा रंग नव्हता, पण चव काय होती महाराजा! वा दिल खुश हो गया!:))
चतुरंग
12 Apr 2008 - 11:00 am | प्रशांतकवळे
पेठकर साहेब,
किती उपकार करता हो आम्हा एकटे रहाणार्यांवर!
साधी, सोपी आणी सुंदर पाककृती..
प्रशांत
16 Apr 2008 - 5:54 pm | गावठी
पाकक्रुती चा॑गली आहे . धाडून द्या .खाऊनच॑ बघतो .
17 Apr 2008 - 12:52 am | स्वाती राजेश
पुण्याला आले कि, तुम्हाला नुसते भेटायला नाही, तर तुमच्या हातचे जेवायला येणार आहे.
अगदी घरगुती, सोपी कृती आणि छान सा फोटो टाकून अगदी तोंडाला पाणी सुटले कारण त्याची चव थोडी आंबट, गोड आणि तिखट असते.
20 Apr 2008 - 8:00 pm | विद्याधर३१
विद्याधर
20 Apr 2008 - 10:12 pm | मदनबाण
एका पेक्षा एक जबरदस्त पाककृती येतात की म्हणाव वाटत लाजवाब,,,,,
या सगळ्या पाककृती एकत्र करुन मि.पा पाककृती या एका ऑप्शन खाली देता येतील काय? म्हणजे जेव्हा केव्हा कोणाला कोणती पाककृती करुन बघायची असेल तर त्याला या सर्व पाककृती एकाच लिस्ट मधेल मिळतील!!!!!
(भोजन प्रेमी)
मदनबाण
22 Apr 2008 - 3:47 pm | प्रमोद देव
साहित्य :- दोन वाट्या बासमती तांदूळ, ३ टेबल स्पून टोमॅटो सॉस, १ टेबल स्पून रेड चिली सॉस, थोडी काजू फुट, प्रत्येकी अर्धी वाटी हिरवे वाटाणे व गाजर (उभे मध्यम आकाराचे चिरुन), तेल, तेजपत्ता, ६ ते ७ दाणे काळी मिरी, १ टेबल स्पून बिर्याणी मसाला व चवीनुसार मीठ.
कृती : - तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजवून धुवुन ठेवावेत. पॅन मध्ये तेल गरम झाल्यावर काळी मिरी, तेजपत्ता, काजू व तांदूळ घालून चांगले परतुन घ्यावे, नंतर दोन्ही सॉस घालून अजून थोडे परतावे, वाटाणे, गाजर, बिर्याणी मसाला, मीठ घालून नंतर पाणी घालावे व प्रेशर पॅन मध्ये भात शिजवावा.
टीपः आम्ही ह्याला व्हेज. बिर्याणी म्हणतो!
ही प्रतिक्रिया माझ्या पुतणीने दिलेय. तिच्या वतीने मी ती इथे चढवतोय.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे