सही

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जे न देखे रवी...
1 Sep 2010 - 2:15 pm

चांदण्यात न्हालेलं ते रंगमंदिर आणि तो पूर्ण चंद्र
अत्तराचा सुवास फुलांचे रंग नि सनईचे सूर मंद्र
शिफॉन साड्या मलमली कुर्ते अभिजनांची गर्दी
तिला पाहायला आलेले प्रेक्षक चाहते आणि दर्दी

कोपर्‍यात तो उभा गुलाबांतल्या निवडुंगासारखा
दखल घ्यायला अपात्र नि एका नजरेसही पारखा
हातात एक पत्र अन् प्रतीक्षा त्या स्वप्नसुंदरीची
जरी स्थिर उभा तरी उघड व्याकुळता अंतरीची

स्मरतील का तिला दिवस मुग्ध किशोरवयातले
तासनतास गप्पा ती गाणी ते क्षण पावसातले
जरी आज ती श्रीमती अन् विख्यात अभिनेत्री
जपली असेल का तिने ती बालपणीची मैत्री

'आल्या आल्या'चा गलका अन चाहत्यांचा गराडा
धावला तोही ओढीने आणि घुसला तोडून वेढा
उभा क्षणभर तिच्यापुढे नजरेस नजर भेटली
हसला तो डोळ्यांत तिच्या ओळख ना उमटली

सरकला घोळका पुढे पण तो उभा तसाच खिळून
भंगलेले हृदय छातीत अन् स्वप्ने गेलेली जळून
सूर सनईचे छळती आता चांदणे अंग अंग दाही
हातात ते पत्र तसेच आणि त्यावर.. तिची सही

(पूर्वप्रकाशित)

करुणकविता

प्रतिक्रिया

निरन्जन वहालेकर's picture

1 Sep 2010 - 2:23 pm | निरन्जन वहालेकर

जबाब नही ! सुन्दर ! ! !
काळजात कालवाकालव झाली..

गणेशा's picture

1 Sep 2010 - 3:04 pm | गणेशा

कविता खुप खुप आवडली ..

आणि विशेषता खालील ओळी मनात घर करुन गेल्या

सूर सनईचे छळती आता चांदणे अंग अंग दाही
हातात ते पत्र तसेच आणि त्यावर.. तिची सही

फ्रॅक्चर बंड्या's picture

2 Sep 2010 - 9:37 am | फ्रॅक्चर बंड्या

मस्तच ...

मदनबाण's picture

2 Sep 2010 - 9:53 am | मदनबाण

सुंदर... :)

संदीप चित्रे's picture

2 Sep 2010 - 10:06 pm | संदीप चित्रे

>> सूर सनईचे छळती आता चांदणे अंग अंग दाही
हातात ते पत्र तसेच आणि त्यावर.. तिची सही

शेवट साधारण अपेक्षित असूनही विशेषतः ह्या ओळींमुळे कविता खूप आवडली

छान आहे.
लोकगीतांतून अशा कथा रंगवतात नाही?

गंगाधर मुटे's picture

13 Sep 2010 - 11:59 am | गंगाधर मुटे

फारच सुरेख.