समिकरणे

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
19 Aug 2010 - 9:26 pm

उणे अधिक का उणे? न कळली ही समिकरणे
गुणिले सुख, भागिले दु:ख, उरली मग स्मरणे!

बुडायचे तर ठरले होते, ठरले नव्हते
बुडता बुडता तुला पाहुनी अलगद तरणे

दु:खाला का असते उंची, लांबी, रुंदी?
सुख मोजाया कुठली वजने अन् उपकरणे?

जगण्यासाठी मला आणखी काय हवे रे?
तुझे ध्यास, आभास, श्वास माळून विहरणे

म्हणे, "वाचले सखी तुझे मन!" (वगळुन सारी
अधोरेखिते, विरामचिन्हे अन् अवतरणे!)

गझल

प्रतिक्रिया

छान कविता. शेवटची ओळ कंसात का टाकली?

क्रान्ति's picture

19 Aug 2010 - 10:30 pm | क्रान्ति

स्वगत असल्यामुळे कंसात टाकली आहे.

पुष्करिणी's picture

19 Aug 2010 - 10:31 pm | पुष्करिणी

कविता आवडली

धनंजय's picture

20 Aug 2010 - 6:21 am | धनंजय

मला वृत्त/बहर समजू येत नाही.

मात्र क्रान्ति यांची रचना असल्यामुळे "वृत्त नाही" असे म्हणायला कचरतो.

हे ही छान.

जगण्यासाठी मला आणखी काय हवे रे?
तुझे ध्यास, आभास, श्वास माळून विहरणे

ही द्वीपदी खूप आवडली.

दु:खाला का असते उंची, लांबी, रुंदी?
सुख मोजाया कुठली वजने अन् उपकरणे?

अ प्र ति म. . . :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Aug 2010 - 7:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दु:खाला का असते उंची, लांबी, रुंदी?
सुख मोजाया कुठली वजने अन् उपकरणे?

अ प्र ति म. . .

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

20 Aug 2010 - 3:57 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त ग तै.

स्वगत एकदम जास्ती आवडले.

विसोबा खेचर's picture

21 Aug 2010 - 10:42 am | विसोबा खेचर

छान..

घाटावरचे भट's picture

21 Aug 2010 - 3:32 pm | घाटावरचे भट

झकास.... पहिल्या कडव्यात मीटर समजायला जरा अडचण पडते, दुसर्‍या कडव्यापासून मीटर नीट क्लीअर होते.

धनंजय's picture

21 Aug 2010 - 8:05 pm | धनंजय

दुसर्‍या कडव्यापासून मीटर असे आहे :
८ || ८ || ८ मात्रा

मात्र असे असल्यास पहिल्याच कडव्यात यतिभंग होतो आहे. अनुभवी क्रान्ति असे वैचित्र्य कशामुळे आणत आहेत? मुद्दामून केलेल्या यतिभंगाचा (मुद्दामून घातलेल्या वर्ज्य स्वरासारखा) भावनेशी किंवा सौंदर्यानुभवाशी काही संबंध असावा. मात्र मला तो येथे कळत नाही.

प्रशांत उदय मनोहर's picture

31 Aug 2010 - 12:39 pm | प्रशांत उदय मनोहर

यतिभंग होत असला, तरी एक उत्कृष्ठ "चमत्कृती" निर्माण होत असल्यामुळे (मलातरी) खटकत नाही. एखादी तान किंवा आलाप घेऊन एक मात्रेतलं तोंड दीड, सव्वा, पाऊण किंवा अर्ध्यामात्रेत घेऊन समेवर येण्याची जी मजा आहे तसा प्रकार आहे त्यात.

अनिल हटेला's picture

21 Aug 2010 - 7:38 pm | अनिल हटेला

सुंदर रचना !!

आवडली !!! :)

विलासराव's picture

31 Aug 2010 - 12:43 pm | विलासराव

लिहा अजुन.

राजेश घासकडवी's picture

31 Aug 2010 - 1:30 pm | राजेश घासकडवी

पण काहीतरी खटकलं. हे अर्थातच क्रान्तिंनी निर्माण केलेल्या उंच मानदंडांपोटीच...
मोजमापांच्या, समीकरणांच्या, सिंटॅक्सच्या थीममध्ये पाचपैकी फक्त तीन कडवी बसतात.

बुडायचे तर ठरले होते, ठरले नव्हते
बुडता बुडता तुला पाहुनी अलगद तरणे

ऐवजी

बुडायचे तर ठरले होते, ठरले नव्हते
त्या खोलीच्या अथांगतेने मी गुदमरणे

असं काही जास्त शोभून दिसलं असतं... पुन्हा कवयित्रीची कविता कशी असावी हे सांगण्यापेक्षा, मुळात काय अपेक्षा निर्माण झाल्या होत्या ते सांगण्याचा प्रयत्न आहे.

जर गजलच्या गुच्छात तीन लाल व दोन निळी फुलं ठेवून मुद्दाम उठाव देण्याचा प्रयत्न असेल तर... व्यक्तीशः मला तो विशेष आवडला नाही असंच म्हणावं लागेल.