चार छोटुल्या...

वैभव देशमुख's picture
वैभव देशमुख in जे न देखे रवी...
17 Aug 2010 - 12:36 pm

ठसे वाटेत बैलांच्या खुराचे
दिसे डबक्यातले पाणी चहाचे
उठे पाण्यावरी गोरे तरंग
कुणाचे घासले पाण्यास अंग

हवेचा येइ हिरवागार झोका
झुले त्याच्यासवे डोंगरही अख्खा
कसे हे साठवू सौंदर्य डोळी
बहरल्या डोंगरावर रानकेळी

धुक्याचा सारला परदा हवेने
उभे डोळ्यात हिरवेगार लेणे
कळेना काय डोळ्यांनी टिपावे
कळेना ओठ कोठे टेकवावे

निळा अंधार होता दाटलेला
पिकांचा वास ओल्याशा हवेला
कमी ना भासली कुठल्या दिव्याची
अशी झगमग बघितली काजव्यांची...

- वैभव देशमुख

कविता

प्रतिक्रिया

मनीषा's picture

17 Aug 2010 - 4:05 pm | मनीषा

निळा अंधार होता दाटलेला
पिकांचा वास ओल्याशा हवेला
कमी ना भासली कुठल्या दिव्याची
अशी झगमग बघितली काजव्यांची..

सुंदर ...!

छान आहेत चौघीजणी .

परिकथेतील राजकुमार's picture

17 Aug 2010 - 4:36 pm | परिकथेतील राजकुमार

कसे सुचते हो तुम्हाला येवढे छान छान ?

फ्रॅक्चर बंड्या's picture

17 Aug 2010 - 7:27 pm | फ्रॅक्चर बंड्या

मस्तच ...

शिल्पा ब's picture

17 Aug 2010 - 10:33 pm | शिल्पा ब

छान लिहिलंय...मला आधी वाटलं छोटुल्या मुलींबद्दलच कविता आहे कि काय..

रश्मि दाते's picture

17 Aug 2010 - 10:57 pm | रश्मि दाते

मस्तच जमल्या आहेत ४ छोटुकल्या.
काजवे पाहीले आहेत अनेक वेळा शेततळयापाशी पण असं लहिता यायला हवे,अभिनंदन

बेसनलाडू's picture

17 Aug 2010 - 11:53 pm | बेसनलाडू

चारही छोटुल्या आवडल्या.
(बालक)बेसनलाडू

मदनबाण's picture

18 Aug 2010 - 1:05 am | मदनबाण

निळा अंधार होता दाटलेला
पिकांचा वास ओल्याशा हवेला
कमी ना भासली कुठल्या दिव्याची
अशी झगमग बघितली काजव्यांची...

सुरेख... :)

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2010 - 1:21 am | राजेश घासकडवी

उठे पाण्यावरी गोरे तरंग
कुणाचे घासले पाण्यास अंग

हायकूच्या जातीचा अनुभवचित्रांचा आविष्कार आवडला.

धनंजय's picture

18 Aug 2010 - 1:54 am | धनंजय

वेगळीच लय. ताज्या कल्पना.

पाषाणभेद's picture

18 Aug 2010 - 5:13 am | पाषाणभेद

मस्त रे भाऊ

निरन्जन वहालेकर's picture

18 Aug 2010 - 10:07 am | निरन्जन वहालेकर

सुन्दर ! !
खुपच आवडल्या ४ छोटुकल्या ! ! !.

वैभव देशमुख's picture

18 Aug 2010 - 11:24 am | वैभव देशमुख

सगळ्यांचे मनापासून धन्यवाद...