मी ही लिहीन म्हणतो सारे जुने नव्याने
संदर्भ भेटले मज आपापल्या कलाने
उकरून काढला मी इतिहास आज थोडा
केले जिवंत काही मुडदे पुन्हा नव्याने
डोळ्यात आज माझ्या मी ही बघेन म्हणतो
नजरानजर घडावी केव्हा तरी अशाने
चुकलेच आज माझे संवाद साधला मी
होईल वाद आता येथे नव्या दमाने
ठाऊक सर्व होते होणार काय आहे!
लिहिलेच मी तरीही का नाव ते दवाने?
नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना?
चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने
ओढून बांधले मी अर्थास दावणीला
येतील शब्द त्यांच्या मागून हंबर्याने
नाही प्रकाश आला झाली अनेक वर्षे
होती सताड उघडी गाभ्यात तावदाने
गाडून टाक त्यांना होईल त्रास त्यांचा
गुंतू नये कधीही स्वप्नात आंधळ्याने!
आतून येत आहे आवाज हा कुणाचा?
समजूत सांग त्याची काढू तरी कशाने?
प्रतिक्रिया
6 Apr 2008 - 9:06 pm | ऋषिकेश
वा! दमदार गझल
हे सगळ्यात जास्त आवडलं
बाकी गझलही छान. आता कंसातला इतिहास कधी देताय ;)
बाकी "लिहिलेच मी तरीही का नाव ते दवाने?" इथे मात्रेची गडबड वाटतेय का?
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
6 Apr 2008 - 9:08 pm | व्यंकट
>>डोळ्यात आज माझ्या मी ही बघेन म्हणतो
नजरानजर घडावी केव्हा तरी अशाने
व्वा !!
व्यंकट
6 Apr 2008 - 11:10 pm | इनोबा म्हणे
काय गजल आहे रे अनिरुद्धा...
उकरून काढला मी इतिहास आज थोडा
केले जिवंत काही मुडदे पुन्हा नव्याने
अगदी बरोबर बोललास रे... आता मुडदे काय करतात ते पहायचं...
बाकी काहीही म्हण, या मुडद्यांनी आमचा एवढा धसका घेतलाय की,आम्हाला 'त्या' स्मशानात प्रवेश करायलाही मज्जाव केलाय रे!
ठाऊक सर्व होते होणार काय आहे!
लिहिलेच मी तरीही का नाव ते दवाने?
अगदी असंच झालं बघ...
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
7 Apr 2008 - 12:37 am | बेसनलाडू
सशक्त गझल. यावर आपले बोलणे झालेच आहे, ते पुनरुधृत करीत नाही. गझल फारच आवडली. अशाच उत्तमोत्तम गझला, कविता लिहीत चला.
(शुभेच्छुक)बेसनलाडू
7 Apr 2008 - 4:34 am | चतुरंग
'मोजणी' प्रमाणेच ही सुध्दा अत्यंत कसदार गझल आहे.
चतुरंग
7 Apr 2008 - 7:20 am | विसोबा खेचर
नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना?
चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने
वा, क्या बात है!
तात्या.
7 Apr 2008 - 12:45 pm | आनंदयात्री
गझल फार आवडली ! पुढच्या रचनेची वाट पहात आहे !
7 Apr 2008 - 1:03 pm | उदय सप्रे
अनिरुध्द भाऊ,
एकदम "सुरेश भट" यांचा प्रभाव जाणवतोय्.....अप्रतिम !
7 Apr 2008 - 1:40 pm | ॐकार
हे शेर खास आवडले-
नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना?
चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने
ओढून बांधले मी अर्थास दावणीला
येतील शब्द त्यांच्या मागून हंबर्याने
7 Apr 2008 - 5:06 pm | धनंजय
+१
7 Apr 2008 - 8:02 pm | अविनाश ओगले
उत्कृष्ट गझल...
नावे कुणा कुणाची घ्यावीत, हे कळेना?
चाळून पाहिल्या मी जखमा क्रमाक्रमाने
एकेक जखम ही पुस्तकाच्या पानासारखी चाळून बघणं ही कल्पना वेगळी.
7 Apr 2008 - 10:03 pm | ठणठणपाळ
मस्त गझल. ह्रदयनाथ मंगेशकर म्हणतात त्याप्रमाणे गझलेचं वृत्त आणि गझलेची वृत्ती दोन्ही साधलं आहे.
8 Apr 2008 - 9:06 am | अनिरुद्ध अभ्यंकर
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सगळ्या वाचकांचे मनापासून आभार...
अनिरुद्ध अभ्यंकर
8 Apr 2008 - 12:55 pm | गिरीराज
प्रत्येक शेर आवडला... मतला आणि दुसरा शेर विशेष आवडले!
:)
8 Apr 2008 - 1:13 pm | नंदन
गझल. अतिशय आवडली.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी