हे स्वातंत्र्यदेवते!

उमेश कोठीकर's picture
उमेश कोठीकर in जे न देखे रवी...
15 Aug 2010 - 2:34 pm

हे स्वातंत्र्यदेवते,
आज सालाबादाप्रमाणे,
परत टाळ्या वाजवितांना..
तुला स्वतंत्र आकाशात फडकतांना पाहून,
तुझ्या वाढदिवशी विचार येतोय्...
काय वाटत असेल तुला?
साठी ओलांडलीस तू, वय झाले तुझे,
दृष्टी अधू झाली असेल तुझी..अश्रू ढाळून,
बघून; झालेला रौरव नरक, या देशाचा,
तुझ्या प्रतिष्ठापनेसाठी ते नंतरही...आजपर्यंत,
अभिषेक सोसत आणि पाट पाहात...फक्त रक्ताचे!
रक्त बालकांचे, आयांचे, बहिणींचे, मुक्यांचे,
वेड्यांचे, गांधींचे, शांतीचे, मनाचे.....
तुझे, का? का? ........................??
फक्त रक्त, रक्त आणि रक्त बघून, डोळ्यांतूनही वाहात असेल
तुझ्या फक्त रक्त,
आणि पांढरा स्वच्छ रंग शांतीचा,
तुझ्या तिरंगी वस्त्रापैकी.... भासतोय आता
फक्त विधवेच्या उदास पांढर्‍या कपाळासारखा!

वाढून तुझ्याच कुशीत, मोठी झालेली ही मुले...
झालीत कोल्हे, गिधाडे, कुत्रे,श्वापदे,
तोडण्यासाठी तुझेच लचके! वाटून घेत्...
तुकडे, सजवीत नक्षी,
आपापल्या स्वार्थी,हरामी वाट्यावर...
रंगांची, जातीची, धर्माची,
आणि देत त्याच तुकड्यांची आहुती...सत्तेच्या या नरमेध यज्ञात,
आणि बळीसाठी निवडलेले नर..
तुझीच बालके, कळपातील, निष्पाप
यज्ञ अव्याहत चालू राहील...खुप आहेत...१०० कोटी!
नको, नको...दु:खाने हाताने तोंड झाकू नकोस्..
उलट हात जोड,
आणि स्वागत कर, खोटे हसून, पांढर्‍या हत्तींच्या
या नवनवीन पिढ्यांचे,
समजावून सांगणार आहेत, तेच तुला नवीन अर्थ..तुझाच,
दर पाच वर्षांनी.. नीट ऐक, श्रवणयंत्र लावून,
किती मोठे 'भांडवल' आहेस तू!
किती किती 'मोजल्या' आहेत.. योजना, यांनी तुझ्यासाठी!
आणि तरीही तुला ऐकू येतोय...फक्त भुकेचा आक्रोश, किंकाळ्या,
आत्महत्यांचे सूर, रडणे?
वेडी कुठली!
अरे हो; तुला कोठे माहित आहे वाढलेला विकासाचा दर?
सो अनएज्युकेटेड...रूरल, यू नो!

म्हणून हे स्वातंत्र्यदेवते,
तुझ्याभोवती वर्षानुवर्षे थापलेला हा राष्ट्रभक्ती,
देशप्रेमाचा शेंदूर हळुहळू नष्ट होऊन,
तुझे महत्व अजूनच चिमटीएव्हढे होण्याआधीच,
राखून ठेव तुझ्या अस्तित्वाचे आरक्षण! तू पण,
धडपडत, भांडत्....तुझे सच्चे कार्यकर्ते टिकवून ठेवीत,
अनंत काळापर्यंत;
कमीत कमी स्वतःसाठी तरी!
हो, हो...गात आहोत आम्ही, अजूनही
सगळे निवासी अभारतीय...
अजूनही विदेशी बँडमास्टरच्या तालावर
तुझ्याच एका, सच्च्या पुजार्‍याचे भजन; थोडे एडीट करून,
सारे जहॉं से अच्छा
था हिंदोस्ता हमारा!!

कविता

प्रतिक्रिया

गांधीवादी's picture

15 Aug 2010 - 6:26 pm | गांधीवादी

आपण कृपया पांढरपेशा लोकांना गाठावे (जालावर).
तुमच्या डोक्यातून वरील चित्र काढून,
सुखद, समृद्ध, खुशहाल, हरित, विकसित देशाचे चित्र तुमच्या मनात नाही उभे केले त्यांनी, तर माझे नाव गांधीवादी नाय

अविनाशकुलकर्णी's picture

15 Aug 2010 - 7:56 pm | अविनाशकुलकर्णी

१५ ऑगस्ट आला कि अश्या कवितांचा पुर येतो...

अथांग's picture

19 Aug 2010 - 3:03 am | अथांग

पण कवितेत व्यक्त होणारी भावना काळजाला भिडली, आणि तळमळ सुद्धा जाणवली. जिथे रोजच्या जगण्यातल्या जाणीवा नष्ट होत चालल्या आहेत, तिथे हा प्रयत्न मला नक्कीच स्तुत्य वाटतो.

-अथांग.