चिकन कॅफ्रियल

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in पाककृती
5 Apr 2008 - 11:02 pm

सहित्यः

चिकन ब्रेस्ट - अर्धा किलो (बोनलेस)

हिरव्या मिरच्या - ८
जिरं - १ टी स्पून
हळद - १/२ टी स्पून
अख्खी काळी मिरी - १/२ टी स्पून
आलं - १ इंच
लसूण - १० पाकळ्या
लवंग - ८ नग
दालचिनी - २ इंच
कोथिंबीर - मुठभर
पुदीना - ५ काड्यांची पाने
लिंबे - २ मोठी
साखर २ चमचे
तेल - चिकन फ्राय करण्यासाठी
कांदा - १ मध्यम
टोमॅटॉ - २ मध्यम
कोथिंबीर - सजावटीसाठी.

कृती:

चिकनचे मोठाले तुकडे करून घ्यावेत.
कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करून १ इंचाचे तुकडे करावेत. टोमॅटोचे प्रत्येकी ८ तुकडे करावेत.
हिरव्या मिरच्या + जिरं + हळद + अख्खी काळी मिरी + आलं + लसूण + लवंग + दालचिनी + कोथिंबीर + पुदीना + लिंबांचा रस + साखर ह्यासर्वाचे पाणी न घालता वाटण करून घ्यावे.
ह्यातील अर्धे वाटण चिकनच्या तुकड्यांना लावून १ ते १-१/२ तास मुरण्यास ठेवावे. बाकी अर्धे वाटण बाजूला ठेवून द्यावे.
फ्रायपॅन मध्ये भरपूर तेल तापवून त्यात चिकनचे तुकडे मघ्यम आंचेवर तळून घ्यावेत.
तळलेले तुकडे पेपर टॉवेलवर काढून नंतर, टेबलवर सर्व करायच्या प्लेट मध्ये सजवून घ्यावेत.
तेलातील मसला जळला असेल तर तेल गाळून घ्यावे. फ्रायपॅन पुन्हा धुवून त्यात थोडे तेल तापण्यास ठेवावे. ह्या तेलात चिकनचा आणि मसाल्याचा स्वाद उतरलेला असतो त्यामुळे हेच तेल वापरावे. नवीन घेऊ नये.
तेल तापले की कांद्यांचे तुकडे फ्राय करून घ्यावेत. कांदा जरा पारदर्शी झाला की त्यावर टोमॅटॉचे तुकडे आणि उरलेले अर्धे वाटण घालून परतावे. टोमॅटो जरा शिजला की (पूर्ण शिजवू नये, तो मऊ पडता कामा नये) हे सर्व मिश्रण प्लेट मधल्या चिकनवर नीट पसरवून घालावे आणि वरून, बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर भुरभूरून, डिश सजवावी.

हि सुद्धा पोर्तुगिझ पाककृती आहे. मिपावरील गोवेकर सदस्यांना कदाचित माहित असेल.

हे चमचमीत चिकन जेवणात साईड डिश म्हणून मस्त लागते. तसेच, ड्रिंक्स बरोबर चखना म्हणूनही मस्त आहे.

शुभेच्छा....!

पाकक्रिया

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

6 Apr 2008 - 12:49 am | स्वाती राजेश

बहुतेक स्टार्टर दिसते?
हीच जर ग्रेव्हीत केली तर मला वाटते कि भात व नान बरोबर सुद्धा छान लागेल.
करून पाहीन.

प्रभाकर पेठकर's picture

6 Apr 2008 - 6:57 pm | प्रभाकर पेठकर

ग्रेव्ही साठी कांदा आणि टोमॅटो वाढवावे लागेल. म्हणजे त्या प्रमाणात इतर साहित्यही वाढवावे.
पण मला वाटते ही पाककृती आहे तशीच मिरची, कोथिंबीर, पुदीना, लिंबू आणि तेलाच्या चवीने समृद्ध छान आहे.

विसोबा खेचर's picture

6 Apr 2008 - 12:37 pm | विसोबा खेचर

वा पेठकरशेठ...

अप्रतिम पाकृ आणि अप्रतिम फोटो...!

तसेच, ड्रिंक्स बरोबर चखना म्हणूनही मस्त आहे.

लाख रुपये की बात! :)

आपला,
(ग्लेन मोरांजीप्रेमी) तात्या.

स्वाती दिनेश's picture

6 Apr 2008 - 12:42 pm | स्वाती दिनेश

अहो काय धडाधड मस्त मस्त पाककृती देता आहात आणि त्यात फोटो सुध्दा झकास!प्रॉब्लेम एवढाच की आधी कोणती करायची हे सुध्दा ठरवता येत नाहीये.. सगळ्याच मस्त आहेत..:)
स्वाती

प्रभाकर पेठकर's picture

7 Apr 2008 - 1:01 pm | प्रभाकर पेठकर

कुठली - कुठली पाककृती बनवून पाहिली ?कशी झाली? ह्यावरही चर्चा व्हावी....