हा लेख माझ्या अनेक आवडत्या पुस्तकातील एका पुस्तकाबद्दल आहे. धनंजय यांचा शंकराचार्यांवरील समतोल लेख वाचल्यावर, "फाऊंडेशन" आठवले आणि जरा वेगळे लिहावेसे वाटले ते... माझ्या आवडत्या पुस्तकाची मालीका (त्यातील पाच मुख्य पुस्तके): फांऊडेशन, फांऊडेशन अँड एम्पायर, सेकंड फांऊडेशन, फाउंडेशनज एज आणि शेवटी फांऊडेशन अँड अर्थ (प्रुथ्वी). ही मालीका आयझॅक ऍसिमोव्ह या सुप्रसिद्ध विज्ञान कादंबरीकाराने लिहीली आहे. खाली शक्य तितके थोडक्यात या आवडत्या पुस्तकांविषयी लिहीतो: (आठवणीतून लिहीत आहे, तेंव्हा चु. भू. द्या. घ्या.)
हॅरी सेल्डन नावाचा एक शास्त्रज्ञ हा आकाशगंगेत पसरलेल्या राजसत्तेच्या (गॅलेक्टीक एम्पायर) ट्रेंटर या राजधानीच्या ग्रहावरच राहात असतो. तो गणितज्ञ असतो आणि "सायकोहिस्टरी" या नवीन शास्त्राचा जनक असतो. त्याचे मूलतत्व हे "कायनेटीक थियरी ऑफ गॅसेस"प्रमाणे असते. म्हणजे एखाद्या वायूच्या स्त्रोतातील एका रेणूचे वर्तन कसे असेल हे आधीच सांगता येणार नाही (प्रेडीक्ट) पण तसे सांगणे हे रेणूंच्या समुदायाबद्दल काही माहीती आधारे सांगता येईल. हॅरी सेल्डन या तत्वावर वसवलेल्या "सायकोहिस्टरी" चा वापरकरून एका माणसाचे भविष्यातील वर्तन ठरवण्या ऐवजी संपूर्ण "गॅलेक्टीक एम्पायरचे" वर्तनच ठरवतो. त्याच्या प्रेडीक्शन प्रमाणे २०००० वर्षे जुने असलेले एम्पायर आणि त्याची सांस्कृतीक समृद्धी ही पुढच्या १००/२०० वर्षात लयास जाऊन नंतर पुनरुत्थान होण्यास ३०००० वर्षांचा कालावधी लागेल. हॅरी सेल्डनच्या या मॉडेल प्रमाणे ही राजसत्ता लयास जाणार हे नक्की असते ते थांबवणे आणि नंतर येणारा रानटीपणा (बार्बारिझम) थांबवणे शक्य नाही. फक्त शक्य असेल तर ते इतकेच की ३०००० वर्षाचा काळ कमी करून १००० वर्षात परत विश्वात "सिव्हीलायझेशन" आणता येईल. हॅरीचे हे विचार विश्वाच्या राजाला (एम्पररला) कळतात आणि त्याला आपल्याविरुद्ध काहीतरी हा हॅरी राजकीय उठाव करायचा प्रयत्न करतोय असे वाटते आणि म्हणून तो त्याला आणि त्याच्या पाठीराख्यांना मृत्यूदंड देणार असतो. पण मग हॅरी सुचवतो की तो काही फार काळ जगू शकणारच नाही त्यामुळे तो कुठे हलणार नाही पण त्याच्या पाठीराख्यांना दूरच्या टर्मिनस ग्रहावर पाठवून देण्याची विनंती करतो. ती करत असताना त्याचे कारण हेच असते की, "लवकरच ही मानवी संस्कृती (सिव्हीलीझेशन) लयास जाणार आहे आणि गणिती तत्वाप्रमाणे ती उदयास येण्यास ३०००० वर्षे वेळ लागेल आणि तो पर्यंत रानटीपण सर्वत्र वाढेल आणि जे काही शोधले गेले आहे, जी काही माहीती/ज्ञान तयार केले गेले आहे ते त्यामुळे कायमचे लयास जाईल. तसे होण्याचे - ज्ञान लयास जाण्याचे वाचवले - तर हा ३०००० वर्षाचा काळ कमी होवून १००० वर्षांपर्यंत आणता येईल (पण १००० वर्षे बार्बारिझम आदी-मध्य-अंत या पायर्यामधून येऊन जाणारच) . तेंव्हा माझे पाठीराखे सत्तेपासून दूर असलेल्या या टर्मिनस ग्रहावर "एनसायक्लोपेडीया गॅलेक्टीका" लिहतील आणि ते ज्ञान वाचवतील."
राजा हे मान्य करतो. हॅरीचे सहकारी दूरवरच्या टर्मिनस ग्रहावर जाऊन राहू लागतात आणि हॅरीच्या दृष्टीतले "फाऊंडेशन" स्थापतात आणि "एनसायक्लोपेडीया गॅलेक्टीका" लिहू लागतात. पण या ग्रहावर नॅचरल रिसोअर्सेस कमी असल्याने त्यांना "इनोव्हेटीव्ह" होवून नित्यनवीन गोष्टी शोधायला लागतात. तसे करता करता "महापौर" असलेले हे छोटे नगर तयार होते. हॅरी सेल्डनने त्यांना टाईम कॅप्सूल दिलेली असते. त्यातून तो काही वर्षांनी "उगवायचा" (रेकॉर्डींग केलेले) आणि त्या त्या वेळेस काय घडू शकत असेल याचे अचूक वर्णन करायचा आणि त्या त्या काळातील लोकांना मार्गदर्शन करायचा. थोडक्यात हॅरीचा साध्या भाषेत "बुवा/बाबा" होतो. पण नंतर काही काळाने (शतकांनी) एका हुशार महापौराच्या लक्षात येते की हे "एनसायक्लोपेडीया गॅलेक्टीका" एक 'फ्रॉड' आहे. सर्वजण घाबरतात असे कसे हा हॅरीबद्दल बोलतो? पण कर्मधर्म संयोगाने त्याच वेळेस हॅरी परत टाईम कॅप्सूल मधून उगवतो आणि स्वतःच सांगतो की, " मी तुम्हाला केवळ "एनसायक्लोपेडीया गॅलेक्टीका" लिहायला इतक्या लांब पाठवले नाही आहे तर, सत्ता केंद्रापासून दूर एक नवीन सत्ता तयार करण्याच्या हेतूने पाठवले आहे." तो पर्यंत "गॅलेक्टीक एम्पायर" लयास जाऊ लागलेले असते आणि "रानटी" पणा रोखण्यासाठी नवीन राज्य स्थापण्याची संस्कृती (सिव्हिलीझेशन) स्थापण्याची गरज भासू लागली असते.
त्याप्रमाणे एकीकडे "एनसायक्लोपेडीया गॅलेक्टीका" लिहीण्याचे काम चालू ठेवून दुसरीकडे नवीन वैश्वीक राज्यव्यवस्था जी हजार वर्षात तयार होईल ती तयार करायला सुरवात होते. ते चालू असतानाच समजते की हॅरीने जे काही हे "फाऊंडेशन" चालू केले आहे ते पहीले आहे, त्याच्या म्हणण्याप्रमाणे अजून एक फाऊंडेशन "सेकंड फाऊंडेशन" अस्तित्वात आहे पण कुठे ते माहीत नाही. पहील्या फाउंडेशनचे काम जर राज्यव्यवस्था आणि तंत्रज्ञान तयार करून तमाम वैश्वीक जनतेवर (चांगल्या अर्थाने) नियंत्रण आणायचे तर, सेकंड फाऊंडेशनचे काम हे फर्स्ट फाऊंडेशनवर नियंत्रण ठेवून स्रव व्यवस्था सांभाळणे हे असते. पहीले तत्वज्ञानाच्या भाषेत "राजसीक" असेल तर दुसरे "सात्वीक" असे त्यांना वाटत असते...
...
मग दुसर्या फाऊंडेशनचा शोध, मग त्यांच्या मारामार्या. ते चालू असताना अचानक एक "म्यूल" उपटसुंभासारखा तयार होतो ज्याचा हॅरीनेपण विचार केला नसतो. सर्वच काम "गोत्यात" येयची वेळ येते मग ही दोन्ही फाऊंडेशन (मला वाटते, दोन्ही मिळून) त्याचा नि:पात करतात.
....
अजून काही काळ (शतके) जातो/जातात. फाऊंडेशनचे वर्चस्व विश्बात बर्यापैकी प्रस्थापीत होते. पण एक उत्सुकता तयार झाली असते की मनुष्यजात सर्व प्रथम कुठे तयार झाली? त्याचा शोध घेण्यासाठी म्हणून तत्कालीन (मला आठवते त्या प्रमाणे) स्त्री पुढारी तीला डोईजड झालेल्या एका राजकारण्याला एका इतिहासकाराबरोबर हायपरस्पेस या नव्या तंत्राचा उपयोग करून विश्वात शोध घेण्यास पाठवते. त्यांना पृथ्वीचा शोध घेयचा असतो. हा राजकीय माणूस, "गोलन ट्रेव्हाईज" खूप हुषार आणि स्वतंत्र विचाराचा असतो... शोध घेता घेता त्यांना "गया" नावाचा ग्रह कळतो जे कदाचीत पृथ्वीचे नाव असू शकेल असे वाटल्याने ते तेथे स्वारी वळवतात. तेथे त्यांना एक वेगळाच अनुभव येतो. ज्याला "हर्मनी" म्हणतात ती दिसते. जी स्त्री व्यक्ती त्या ग्रहाच्या लोकांच्या वतीने त्यांच्याशी संवाद साधते तीच्या भाषेत, "येथे सर्वच गया आहेत, सर्व एकमेकांच्या साह्याने जगतात. पाउस जेव्हढा पाहीजे तेव्हढा पडतो. पशू पक्षी जेव्हढे खायला हवे तेव्हढेच त्यांचे अन्न खातात आणि तसेच माणसेही वागतात. माणसे एकमेकांशी समजून वागतात, ज्याचे जे काम आहे तेव्हढे तो करतो, तेव्हढी त्याला/तीला माहीती असते ... गया म्हणजे सारे एकच आहे. रुपे, वर्तन इत्यादी वरकरणि रुपे वेगळी आहेत पण आतून सर्व एकच आहे. एक प्रकाराची हर्मनी या ग्रहावर प्राप्त झाली आहे आणि सर्व सुखाने/शांततेत जगताहेत. एक प्रकारचे अद्वैत आचरणात आणलेले आहे." हे सर्व ऐकून ट्रेव्हाईज ला वेडच लागते. त्याचा अजीबात विश्वास बसत नाही आणि त्या ग्रहावरच्या माणसांचे कारस्थान वाटते. पण नंतर ती "गया" त्यांना मदत करायला म्हणून पृथ्वीचा शोध घेयला त्यांच्याबरोबर जाते. ह्या सार्या प्रवासात तो वेगवेगळ्या संस्कृत्या बघतो. शेवटी जेंव्हा पृथ्वीजवळ येतात तेव्हा लक्षात येते की अतिकिरणोत्सार्गाने ती राहण्यालायक राहीली नाही आहे. कारणे अर्थातच निनावी इतिहासात /काळाच्या पडद्या आड असतात.
पण त्यानंतर शेवट असा आहे की, कुठली तरी या गया पेक्षा आणि हॅरी सेल्डनपेक्षा मोठी शक्ती त्याला विचारते की विश्वात दोन प्रकारच्या संस्कृतींपैकी एक पुढे जाऊ शकते आणि ती आमलात आणायची आहे - फाउंडेशन (फर्स्ट आणि सेकंड मिळून) एक जिथे एक्मेकांवरील नियंत्रणे आणि यांत्रीकीतंत्रज्ञान असेल आणि दुसरी "गया" जेथे सर्वकाही "हर्मनी"त चालू आहे, अद्वैत आहे. आज ह्याचा निर्णय तू तुझ्या स्वतंत्र बुद्धीचा वापर करून घेयचा आहेस, तर तू कुठल्या संस्कृतीला वैश्वीक करायला निवडशील?...
ही मालीका ऍसीमोव्हने "राइज अँड फॉल ऑफ रोमन एम्पायर" वरून तयार केली. त्यात रोबोटीक्सचे काही उल्लेख आहेत ज्यावर त्याने अधीक लेखन (रोबो तयार होण्याआधी कल्पनाशक्तीवर केले). ....
प्रतिक्रिया
29 Sep 2007 - 1:19 am | राजे (not verified)
विकास भाऊ,
काय देखील कळाले नाय बॉ.
जरा पुन्हा मराठी मध्ये लिहता काय ?
नाय तशी अडचण नसावी तुम्हाला काय म्हणता ?
राजे
(*हेच राज जैन आहेत)
29 Sep 2007 - 9:39 am | विसोबा खेचर
विकासराव,
तुमचा व्यासंग पाहून थक्क झालो! लय भारी लेख..
तात्या.
29 Sep 2007 - 9:26 pm | धनंजय
ऍसिमोव्हच्या गोष्टी विचारपूर्ण असतात, ध्येयवादी असतात. माझ्या एका मित्राला ही फाउंडेशन मालिका आवडते, पण मी अजून वाचलेली नाही - "आगामी" यदीत आहे. परीक्षण-ओळखीबद्दल धन्यवाद.
1 Oct 2007 - 10:59 pm | सर्किट (not verified)
माझ्याही "आगामी" यादीत ही मालिका खूप वर्षांपासून आहे. आता वाचायला घ्यावी लगेचच असे वाटले, आपला लेख वाचून.
- सर्किट हॉयल
30 Sep 2007 - 3:48 am | प्राजु
विकासराव,
तुमचा व्यासंग पाहून थक्क झालो! लय भारी लेख..
तात्या.
हे खरं.....
पण.... मला सगळंच अगम्य वाटलं..म्हणजे बुद्धिला नाही झेपलं....
-प्राजु
30 Sep 2007 - 9:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काल पासून या लेखाला ओझरता वाचायचो आणि मधेच सोडून द्यायचो आता मात्र निवांत वाचून काढला !आम्हाला जे आवडले ते, दुसर्या फाऊंडेशनचा शोधापासून ते "तू कुठल्या संस्कृतीला वैश्वीक करायला निवडशील? " आणि याच विचाराजवळ येऊन थांबलो. आपले लेखन आणि आपली आवड आवडली ! येऊ द्या असेच संस्कृती आणि माणसाचा विचार करायला लावणारे लेख.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
30 Sep 2007 - 7:41 pm | विकास
नमस्कार,
आपल्या सर्वांच्या प्रतिक्रीयांबद्दल धन्यवाद. पुस्तक मालीका परिक्षण अमंळ मोठे झाल्याने आणि विषय अचानक वेगळा असल्याने जरा "आउट ऑफ कॉन्टेक्स्ट" झाले असल्यास क्षमस्व. त्यात मिसळपाव समिती सदस्य म्हणून गोष्टी दरोज नजरेखालून घालत असलो तरी वेळेअभावी पटकन प्रतिसाद देऊ शकलो नाही. पण खाली अगदी थोडक्यात मला काय सांगायचे होते ते लिहीतो:
फाऊंडेशन ही पुस्तक मालीका आजही खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे उदाहरणच देयचे झाले तर २० व्या शतकातील ऍन रँड चे फाऊंटनहेड, आर्थर सी क्लर्क चे २००१ ए स्पेस ओडीसी, अगदी एच जी वेल्सचे टाईम मशीन ही पुस्तके जशी अजून लोकप्रिय आहेत त्याच पद्धतीतील हे पुस्तक आहे. या पुस्तक मालीकेवरून जालावर अनेक संदर्भ (विकीसकट सर्वत्र) मिळतात.
त्याचा गाभा हा दोन संस्कृतीतील स्पर्धा दाखवतो - एक केवळ वैज्ञानीक जी त्या मानाने झटपट साध्य होते आणि ज्यात व्यक्तिगत स्वातंत्र्य हेच सर्वस्व मानणारे तर दुसरी "वसुधैव कुटुंबकम" या वचनावर आणि धर्म्-अर्थ-काम-मोक्ष यावर आधारीत - ज्यात देखील जीवन आनंदाने जगण्याबद्दलच म्हणले आहे फक्त एकेरी व्यक्तीगत स्वातंत्र्य हाच फक्त त्याचा गाभा न करता तो त्याचा सामाजीक जाणीव/जबाबदारी बरोबरचा एक भाग म्हणून केला आहे.
परंतू कुठलीही संस्कृती तयार करताना त्यातील तत्वज्ञान हे शुगरकोटेड पिल्स सारखे वेगवेगळ्या पद्धतीने सांगीतले जाते. त्याचा मतितार्थ न समजता ते "साधन" म्हणून वापरायच्या ऐवजी जेंव्हा "साध्य" म्हणून त्याच्या मागे जायची "साधना" केली जाते तेंव्हा सगळेच बिघडते. ऍसिमोव्हने वैज्ञानीक कथेत स्पेस, तंत्रज्ञान, विज्ञान याचा उपयोग करून असे मानवी स्वभाव व्यक्तिगत आणि सामुदायीक पणे उलगडून दाखवलेत. त्याची "सिमिली" बर्याचदा आत्ताच्या जगात पण पहायला मिळते. शंकराचार्याच्या चर्चेवरून मला अशीच सिमिली वाटली.. म्हणून हा वेगळा लेख लिहीला.
24 Nov 2015 - 8:21 pm | नया है वह
+१