बोनलेस ब्रेस्ट पिसेस- ५०० ग्राम,
पालक २,३ जुड्या,फ्रोझन पालक घेतला तर ७५० ग्राम ते १ किलो.
२/३ कांदे,२/३ टोमॅटो अथवा टोमॅटोची प्युरी १/२ वाटी. गरम मसाला
आले बोटभर, ७,८ लसूण पाकळ्या, ३,४ हिरव्या मिरच्या,मीठ,तेल,हळद,तिखट
मॅरिनेशन साठी दही १ मोठा वाडगाभर(साधारण ५०० ग्राम)
फ्रेश क्रीम १ मोठा चमचा
कृती -
चिकन चे तुकडे धुवून,साफ करून त्यावर थोड्या खाचा माराव्या.आले लसूण मिरचीची पेस्ट करून घ्यावी.त्यातील १ मोठा चमचा पेस्ट ,१ मोठा चमचा गरम मसाला ,हळद दह्यात घालावे आणि चिकनचे तुकडे त्यात घालावे व दीड दोन तास मुरवत ठेवावे.
कांदा बारीक चिरावा किवा पेस्ट करावी,टोमॅटोची प्युरी करावी,पालकाची पानेही मिक्सरमधून काढून प्युरी बनवावी.(फ्रोझन चिरलेला पालक तसाच वापरू शकतो.मिक्सर मधून काढायची अर्थातच जरुर नाही.)
डावभर तेल गरम करून त्यात कांदा लालसर परतून घ्यावा,मग त्यात टोमॅटो प्युरी ,१ते १.५ चमचा गरम मसाला,आले लसूण मिरचीची पेस्ट १ते १.५ चमचा घालावी व परतावे, झाकण ठेवून एक वाफ आणावी,मग पालक घालून ढवळावे,थोडे पाणी घालून सरसरीत करून घ्यावे.चवीनुसार मीठ घालावे.अजून तिखट हवे असल्यास लाल तिखट चवीनुसार घालावे.
मॅरिनेटेड चिकन थोड्या तेलावर परतून घ्यावे.(शॅलोफ्राय करावे) हे तुकडे पालकाच्या भाजीत घालावे,शिजू द्यावे.मुरलेले,तळलेले तुकडे पटकन शिजतात.
नंतर थोडे फ्रेश क्रिम घालावे.
पोळी/फुलके/भाकरी/भात कशाही बरोबर गरम गरम खावे.पण तांदळाच्या भाकरीबरोबर किवा भाताबरोबर खायला जास्त मजा येते.
आमचा रोमेन नावाचा एक स्वीस मित्र ह्या चिकनवर तुटून पडतो.
प्रतिक्रिया
4 Apr 2008 - 3:52 pm | मनस्वी
आता विकांताला... हे करू की ते करू... ते करू की हे करू...
चिकनसागची सोपी, सुटसुटीत रेसिपी छान आहे... नक्की करून बघीन.
4 Apr 2008 - 3:53 pm | विसोबा खेचर
पोळी/फुलके/भाकरी/भात कशाही बरोबर गरम गरम खावे.पण तांदळाच्या भाकरीबरोबर किवा भाताबरोबर खायला जास्त मजा येते.
वा स्वाती, उत्तम पाकृ दिसते आहे!
नाही, ठाण्याहून तिकडे पोहोचायला किती वेळ लागतो गं? काय विमान, ट्रेन, बस, टांगा जे मिळेल ते पकडून लगेच निघेन म्हणतो! तू चिकनसाग तयार करून ठेव! दिनेशभावजी कामावरून परतले की एकत्रच बसू जेवायला! :)
तुझा,
(एक द्वाड आणि खादाड शाळूसोबती!) तात्या.
4 Apr 2008 - 3:56 pm | स्वाती दिनेश
चालेल,चालेल..मिळेल त्या वाहनाने ये.येताना फक्त माळेतले कांदे घेऊन ये..म्हणजे भरीतही करते त्याचे मिरची चुरडून..
स्वाती
4 Apr 2008 - 4:03 pm | विसोबा खेचर
Done..! :)
4 Apr 2008 - 7:25 pm | प्राजु
एक टप्पा जर्मनीत करू का? तिथे येईन मस्त चिकन साग कर ते खाईन आणि मग भारतात जाईन...
रेसिपी एकदम छान. आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com
4 Apr 2008 - 7:31 pm | स्वाती दिनेश
अग ये ना...मस्त गप्पा आणि खादाडी करु मग जा भारतात,येताना पण ये वाटले तर आणि आंबे घेऊन ये..:-)
स्वाती
4 Apr 2008 - 4:06 pm | स्वाती राजेश
सोपी आहे. छान आहे.
करून पाहीन कशी झाली ते सुद्धा सांगेन...
अवांतरः तुझे प्रवास वर्णन कुठवर आले? छान लिहीतेस म्हणून...
4 Apr 2008 - 4:59 pm | स्वाती दिनेश
लिहिते लिहिते...टाकते ह्या एक दोन दिवसात,:-)
4 Apr 2008 - 4:12 pm | धमाल मुलगा
सगळ्ळे सगळ्ळे दुष्ट आहात!
इथ॑ एकतर काम सुचत नाहीय्ये आणि जो उठतोय तो खादाडीवर मोकाट सुटलाय!
मी चाललो प्रमोदकाका॑कडे. त्या॑च्याकडे साध॑ पाणी पिऊन त्या॑च्या लहानपणीच्या कुस्तीच्या ग॑मती ऐकत बसतो.
-(रुसलेला) ध मा ल.
4 Apr 2008 - 4:14 pm | विसोबा खेचर
त्या॑च्याकडे साध॑ पाणी पिऊन त्या॑च्या लहानपणीच्या कुस्तीच्या ग॑मती ऐकत बसतो.
हा हा हा! :))
4 Apr 2008 - 7:11 pm | अभिज्ञ
हि कशि करायचि?
किंवा हा नक्कि काय प्रकार असतो?
स्वाती ताई तेवढे जरा सांगाल का..
(चिकनप्रेमी) अबब
4 Apr 2008 - 7:22 pm | स्वाती राजेश
उकळ्त्या पाण्यात टोमॅटो घालणे. ५ मि नंतर बाहेर काढून त्याची साले काढणे व गर मिक्सरमधून काढणे.
5 Apr 2008 - 4:52 am | सर्किट (not verified)
टोमॅटो प्युरीची रेसिपी छान आहे, मला जमण्यासारखी.
त्याला फोडणी दिली, की झाले. !
- सर्किट
28 Nov 2015 - 10:19 pm | मनीषा
छान आहे पाककृती .
रविवारी करण्यासाठी योग्यं अशी .