आज अचानक तुझी आठवण का यावी
आज पापणी ओली माझी का व्हावी
फार काळ या गोष्टीला झाला नाही
युगे लोटली असतील पण का वाटावी
जुन्या वहीची तीच दुमडलेली पाने
अकस्मात वार्याने येउन उघडावी
बरेच काही घडले ह्या मधल्या काळी
तुला कहाणी कुठून आता सांगावी
शब्द उतरण्या पानावरती घाबरले
भीती इतकी अर्थांची का वाटावी?
तुझ्याच साठी शिकलो मौनाची भाषा
फक्त तुला ही धडपड माझी समजावी
हिशोब केला तुला दिलेल्या ताऱ्यांचा
समजत नाही कुठे पौर्णिमा मांडावी
पुन्हा तोच पाऊस पडावा पूर्वीचा
पुन्हा तीच मी नाव कागदी सोडावी
पहाट होणे अशक्य आहे थांबवणे
तरी वाटते रात्र जरा ही लांबावी
मनात आहे काय काय दडले माझ्या
आज उडी डोहात मनाच्या मारावी
प्रतिक्रिया
17 Jul 2010 - 11:04 am | निखिल देशपांडे
छान...
पहाट होणे अशक्य आहे थांबवणे
तरी वाटते रात्र जरा ही लांबावी
या ओळी आवडल्या
स्वगत : अरे केसुंनी अजुन या कवितेचे विडंबन केले नाही :-)
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
17 Jul 2010 - 12:15 pm | शरद
एक चांगली गझल
ही एक थोडी लांबलेली पण चांगली गझल वाटते. थोडीशी काटछाट करावयास हरकत नव्हती.मला गझल आवडली याचे एक कारण गझलेचे एक लक्षण म्हणजे प्रत्येक शेर हा स्वतंत्रपणे स्वयंपूर्ण असावयास पाहिजे हा नियम येथे पाळला गेलेला दिसतो. प्रत्येक शेरात एका नवीन गझलेची सुरवात होऊ शकेल .उदा.
बरेच काही घडले ह्या मधल्या काळी
तुला कहाणी कुठून आता सांगावी
या दोन ओळीत न सांगितलेले बरेच काही वाचक आपल्या परीने वाचू शकतो व त्या आपल्याला आलेल्या अनुभुतीवर एकेक काव्य होऊ
शकते. परत ही कहाणी प्रियकर-प्रेयसी यांच्यातीलच हवी असे नाही. तुमच्या कल्पनाशक्तीला भरपूर वाव देणारा शेर. दुसरा एक घेऊ.
पहाट होणे अशक्य आहे थांबवणे
तरी वाटते रात्र जरा ही लांबावी
इथेही अटळ गोष्ट टाळण्याची मानवी इच्छा रात्र व पहाट या सामान्य प्रक्रीयेमधून दाखवली आहे. मिलनाची रात्र संपू नये असे वाटणे कितीही
उत्कट असले तरी अशक्य आहे हेही जाणवत असतेच. रात्र विरहाची असती तर ती लवकर संपावी वा दिवस आहे तो संपू नये व रात्र येऊ नये असेही वाटले असते. येथे सुद्धा नविन कवितेचे बीज दिसून येते.
ही झाली गझलची बलस्थाने. १० ऐवजी ७ किंवा ८ शेर जास्त शोभून दिसले असते. कारण जरा वेळ घालवून या मध्यवर्ती कल्पनेची भरारी आणखीन १० शेरांची भर घालू शकेल. पण मग तो वाण्याच्या घरसामानाचा कागद बनेल. Diminishing returns चा नियम कवितेलाही लागू होतो. आणखी एक सुचना. शक्य असेल तर शेराच्या अंताला चमत्कृतीजन्य झटका देता आला तर जास्त उठाव येईल.
शरद
17 Jul 2010 - 12:23 pm | श्रावण मोडक
वा... शरद म्हणतात तसे एका गझलेची उत्तम सुरवातच.
क्या बात है! पौर्णिमा हिशेबात मांडण्याची कल्पना खासच.
वा... वा... मनाचा खेळ!!!
17 Jul 2010 - 5:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सुंदर! गजल आवडली.
अदिती
17 Jul 2010 - 7:50 pm | चतुरंग
खूप दिवसांनी लिहिलीस रे! :)
चतुरंग
19 Jul 2010 - 3:24 am | अनिरुद्ध अभ्यंकर
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर