चला! सकाळी ६.३० ची स्वारगेट - वेल्हा - घिसर बस मिळाली... आता घिसरला उतरायचं... समोरची डोंगररांग चढून मोहरी आणी मग सिंगापूर... सिंगापूरला मुक्काम करायचा आणि दुसर्या दिवशी पहाटे सिंगापूर-नाळेनं खाली कोकणात उतरुन पुण्याला परत...
"मास्तर, ३ घिसर द्या..."
"पावसात घिसर पर्यंत जात नाही बस..."
"कुठ पर्यंत जाते मग?"
"विहिर... त्यापुढं नाही जात..."
काय करायचं आता?... विहिर पासून चालत घिसरला जायचं म्हणजे १७-१८ कि.मी. चालावं लागणार... त्यात ४ तास तरी जाणार...
"सध्या वेल्ह्या पर्यंतच तिकिट द्या..."
तिकिटं काढली आणि आता काय करावं ह्यावर आमच्यात विचार सुरु झाले... बरच काही सुचत होतं आणि तितक्यात "ढवळ्याहून अर्थर-सीट करायचा का?" असं स्वानंद म्हणाला...
"ह्या पावसात जायचं तिथे?... दाट रान... अवघड वाट... पाऊस आणि धुक्यामुळे अजूनच अवघड होणार... ट्रेक पुर्ण होईल का?" असा विचार माझ्या डोक्यात आला...
"जाऊत रे... आता नाहीतर कधी करणार मग..." असं स्वानंद आणि यशदीप दोघं एकदमच म्हणाले... मग काय? नसरापुर फाट्याला बस सोडली आणि ट्रकनं वाई फाटा आणि मग बसनं महाबळेश्वरला पोहचलो... पोलादपुरची बस पकडली आणि आंबेनळी घाटात वाडा-कुंभरोशीच्या जरा पुढे दाभिळ-टोकाला उतरलो... पाऊस नव्हता, पण वातावरण ढगाळ होतं... समोर दूरवर मंगळगड दिसत होता...
(एकदम मागच्या रांगेत डावीकडून ३रा डाँगर म्हणजे मंगळगड (कांगोरी गड)...)
सावित्रीचं खोरं न्याहाळत सोंडेवरुन उतरायला लागलो... साधारण १.५ तासात सावित्री नदीच्या काठी पोहचलो... गार नितळ पाण्यात डूंबलो आणि समोरचा चढ चढून कंरजे गावात पोहचलो...
(सावित्री नदी...)
गावामागची खिंड पार करुन ढवळ्याला जाणार्या डांबरी रस्त्यावर उतरलो...
(करंजे खिंड चढताना दिसणारं सावित्रीचं खोरं...)
ह्या रस्त्याच्या कडेलाच एक मोठ्ठा धबधबा कोसळतो... सध्या त्यात पाणी कमीच होतं, पण जोराचा पाऊस झाला की हा धबधबा बघण्यासारखा असतो...
इथून साधारण अर्ध्या तासात ढवळं गाठलं...
(डोंगराच्या कुशीत वसलेलं ढवळं...)
शाळेच्या पडवीत मुक्काम मांडला... घरुन आणलेलं खाल्लं आणि लवकरच झोपी गेलो... रात्री २ वाजता जाग आली आणि असंच जरा चक्कर मारायला बाहेर पडलो तर एक अजबच नजारा अनुभवला... करोडो काजवे दरीमधे, झाडावरती चमकत होते... केवळ अप्रतिम... आणि काजवे सारखे जागा बदलत असल्यामुळे तो देखावा अजूनच मनोहर दिसत होता... थोडावेळ निसर्गाचा हा चमत्कार अनुभवला आणि परत झोपी गेलो...
पहाटे लवकर उठून सामान आवरलं आणि ७ वाजता चालायला सुरुवात केली... पुढची वाट दाट रानातून जाते आणि शेवट पर्यंत बहिरीची घुमटी किंवा आर्थर सीट दिसत नाही... एकदा जंगलात शिरलो की आपण नक्की कुठे आहोत आणि आपल्याला नक्की कुठे जायचय हे नीटसं कळत नाही... वाट चुकली तर आर्थर सीटला पोहचणं जवळ-जवळ अशक्यच आहे... उन्हाळ्यात एकदा मी ह्या वाटेने गेलो होतो, पण आता पावसात जरा अवघडच जाणार ह्याची खात्री होती... सोबत कोणी वाटाड्यापण घेतला नाही... ढवळ्याच्या जरा पुढं कोळ्यांचा वाडा लागतो, तो पार केला आणि जंगलात शिरलो... कोणत्याही मानव वस्तीतून जंगलात असंख्य वाटा शिरतात आणि सगळ्याच वाटा मळलेल्या असतात आणि नेमकं अश्या वेळीच चुकीची वाट पकडली जाते... आज आमचं पण असंच झालं... चुकीच्या वाटेवर वीसेक मिनीटं चालल्यावर कळालं की आपण चंद्रागडाच्या जरा जास्तच जवळ जातोय... माघारी वळलो आणि बरोबर वाट शोधून गाढव-माळला पोहचण्यात साधारण दिड तास लागला... गाढव-माळ म्हणजे कोळ्यांच्या वाड्यापासून जवळच असणारं लहानंस पठार...
(गाढव-माळ इथून दिसणारा देखावा...)
जंगल अनुभवायचं तर ते पावसात किंवा रात्री... दोन वर्षापुर्वी इथे आलो होतो तरी आता पावसात जंगल एकदमच अनोळखी वाटत होतं... पायाखाली ओल्या-पीकलेल्या पानांचा खच पडला होता... काही ठीकाणी झाडं उन्मळून पडल्यामुळे वाट एकदमच नाहीशी होत होती, पण जरा अंदाज घेत घेत शेवटी एका मोठ्या ओढ्यात पोहचलो... हा ओढा माझ्या चांगलाच लक्षात होता... ऑढ्याच्या उगमाकडे तोंड करुन उभे राहिलो की उजव्या हाताला चंद्रगड आणि डाव्याहाताला अजून एक प्रचंड डोंगर आहे...
ओढा नितळ पाण्याने खळखळून वाहात होता... गार पाण्यात मस्त डुंबून घेतलं आणि ऑढ्याकाठी नाष्टा उरकला... तसं पाहिलं तर ओढ्यापर्यंत नीट वाट आहे, पण पावसामुळे जंगल माजलं होतं आणि वाट सारखी हरवत होती... आणि ओढ्याच्या पुढची वाट तर अजूनच अवघड होती आणि त्यात पाऊस आणि धुकं...
आता पुढची वाट ओढ्याच्या उजवीकडून की डावीकडून हे नीटसं आठवत नव्हतं... मग डावीकडूनच वाट शोधायला लागलो... वाळक्या कारवीच्या झुडपांमुळे काहीच अंदाज येत नव्हता आणि नविन कारवी पण कंबरभर माजली होती... वाट नसल्यामुळे सगळीकडे भटकून अंदाज घेत होतो... चढ खूपच तीव्र होता... एक ते दीड तास वाट शोधली, पण सापडलीच नाही... अजून ओढ्याच्या जवळच होतो... उजवीकडून वाट शोधावी म्हंटलतर तिथेपण दाट रान होतं आणि वाट दिसत नव्हती... मग ओढ्यातूनच वर जाऊयात असं ठरवलं आणि चढायला लागलो... `आता काय आपण वर पोहचत नाही' असं सारखं वाटत होतं... अश्या जागी योग्य वाट सापडली नाहीतर ठरलेल्या जागी पोहचणं जवळ-जवळ अशक्यच असतं... पण पुरेपुर प्रयत्न करायचेच असं ठरवून चढत होतो... "काहीही झालंतरी चालेल, पण आता माघार घ्यायची नाही" असं स्वानंद म्हणाला... वेळ पडलीच तर जंगलात रात्र काढूत, पण आता वर जायचंच...
(वाटेत ह्याच्याशी भेट झाली...)
प्रवाहाच्या विरुध्द ओढ्यातून चढताना मजा येत होती... न थाबंताच तासभर चढलो... ओढा संपला आणि उजवीकडे चढायला लागलो... अजून वाटेचा, अर्थर-सीटचा काहीच अंदाज येत नव्हता... अधून-मधून पाऊस पडतच होता... दमट वातावरणामुळे घाम पण तेवढाच निघत होता... वाटेच्या शोधात दमल्याची जाणिवच होत नव्हती... ओढा सोडून बराच वेळ चढत होतो... थोडावेळ थांबून घोटभर पाणी प्यायलो आणि पुन्हा चढायला लागलो... का कोणास ठावूक पण आता आपण वाटेवर आहोत असं वाटू लागलं... भरभर थोडं अंतर पार केलं आणि एकदमच वाट सापडली असं वाटू लागलं... तेवढ्यात दाट धूकं आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला... आम्ही सरळ रेषेत चढत होतो... ही तर दरड कोसळल्यामुळे झालेली वाट होती... तरी चढून गेलो, पण पुढे तर कातळकडा होता... माघार घेण्याशिवाय पर्याय नव्हता... जपून उतरलो... पावसात दरड कोसळलेल्या वाटेवरुन उतरणं खूपच रीस्की असंत... माघार घेऊन परत वाट शोधू लागलो तर उजव्या हाताला एक पुसटशी वाट कारवीच्या रोपांमधून पळताना दिसली... मगाशी वर चढताना धूक्यामुळे आणि समोर असलेल्या वाटेमुळे ह्या वाटेकडे लक्षच नाही गेलं...
(अनमोल मोत्याची माळ...)
"काय रे! किती टक्के वाटतयं की ही बरोबर वाट आहे म्हणून?" स्वानंदने मला विचारलं... म्हणालो निदान ९० टक्केतरी वाटतयं... त्या पुसटश्या, नागमोडी आणि अतिशय अरुंद वाटेवर अर्धा तास चालल्यावर लहानसा, सोपा कातळ-टप्पा लागला आणि आम्ही योग्य वाटेवर चालतोय ह्याची १०० टक्के खात्री पटली... "चला! आता आपण पोहचणार..." असं तिघांना पण एकदमच वाटलं... धुकं होतच, पण आता नाकासमोरच्या वाटेवर निमुटपणे चालत होतो... अर्धातास चालल्यावर वाट डावीकडे वळली आणि फारच ट्रीकी झाली... डाव्या हाताला साधारण पाच फुटांवर खोलदरी होती आणि जागोजागी पावसामुळे माती वाहून गेली होती आणि वाट बर्यापैकी अवघड झाली होती... मागचे ५-७ तास स्वानंदची खूप बडबड चालू होती, पण ह्या जागी त्याचं तोंड एकदमच बंद झालं होतं... त्याला थोड्याफार मदतीची गरज पडत होती आणि तिच गत यशदीपची होती... हे थोडंस अंतर पार करायला बराच वेळ लागला, पण सगळे सुखरुपपणे बहिरीच्या घुमटीला पोहचलो...
तिथे पोहचलो तेव्हा यशदीपच्या चेहर्यावरचे एक्सप्रेशन्स बघण्या सारखे होते... त्यात भिती, आनंद आणि समाधान सगळ एकदमच होतं... दुपारचे ३.३० वाजले होते... जास्त वेळ वाया घालवणं परवडण्या सारखं नव्हतं... पटपट भेळ केली, खाल्ली आणि अर्थर-सीटच्या दिशेने निघालो... बहिरीच्या घुमटीच्या इथून जोर ला देखील जाता येतं आणि ती वाट अर्थर-सीटच्या वाटेपेक्षा सोपी आहे... धुकं खूपच दाट होतं, त्यामुळे यशदीप म्हणाला "पश्या, जोरला जायचं का? अर्थर-सीटची वाट वेळेत नाही सापडली तर फार उशीर होईल..."
"खूप नाही ना दमलास... अजून वर्ट्स केस निदान ४ तास तरी चालशील ना?े" मी...
"हो..."
"मग चल... अर्थर-सीटलाच जाऊत..."
(धुकं, धुकं आणि दाट धुकं...)
परत दाट रानात पाऊल टाकलं... इथून पुढे अर्थर-सीटचा चढ प्रचंड तीव्र आहे... दमलो होतो, पण भर पावसात हा चढ चढताना मजा येत होती... तीव्र चढ संपला आणि मग जरा सपाटीवर चालायला लागलो... धुकं नसंल तर इथून अर्थर-सीट दिसतो... आता परत कारवी आणि बांबूच्या रानातून वाट काढत पुढे सरकत होतो... कधी-कधी वाट एकदम दरीच्या काठाला चिकटून जात होती... साधारण एक तासात शेवटच्या कातळ-टप्प्याजवळ पोहचलो... आधी स्वानंदला चढवला, मग यशदीपला आणि मग एक-एक करुन सगळ्या पाठपिशव्या चढवल्या... आता मात्र जाम दमलो होतो... अर्थर-सीट हाकेच्या अंतरावर होतं... मग शेवटचा थोडासा चढ संपवला आणि अर्थर-सीटवर पाय ठेवला... अहहहहा!!! काय ते समाधान? काय तो देखावा? आणि काय तो निवांतपणा?... मला ते शब्दात वर्णन करणं शक्यच नाही... पावसामुळे कोणीच पर्यटक नव्हते... दरीत दाट धुकं साठलं होतं आणि पाऊस चालूच होता... आज आम्ही अर्थर-सीटवर पोहचू असं मला खरंच वाटल नव्हतं, पण ते शक्य झालं... खूप खूप आनंद झाला होता... जग जिंकल्या सारखं वाटत होतं... अर्थर-सीट वरुन लीफ्ट मिळाली आणि वेळेत बस-स्थानकावर पोहचलो... ६.३० ची शेवटची पुण्याला जाणारी बस मिळाली... भिजलेल्या अवस्थेतच ३.३० तासांचा प्रवास करुन रात्री १०ला पुण्याला पोहचलो... बस मधे बरेच विचार डिक्यात घोळत होते... "असा वेडेपणा परत करणे नाही... देवाच्या कृपेने आज सुखरुप घरी परततोय..." हा विचार सारखा येत होता...
नोटः हा ट्रेक पावसात अजिबात करु नका... पावसा नंतर करण्या सारखा ट्रेक आहे, पण ढवळ्यातून वाटाड्या जरुर घ्यावा... उगीच अनाठायी धाडस करण्यात अर्थ नाही...
प्रतिक्रिया
5 Jul 2010 - 7:05 pm | गणपा
नेहमी प्रमाणे अप्रतिम लेखन आणि फोटो.
तो रत्नहार पाहुन तर शब्दच खुंटलेत.
5 Jul 2010 - 7:11 pm | मेघवेडा
अरे आता बोलण्यासारखं काही उरलंच नाहीये रे.. तू भटकत राहावंस. इथं त्या भटकंतीचं वर्णन लिहावंस. सर्वांनी वाचावं आणि तुला फक्त सॅल्युट करावा राव! =D>
शेवटून दुसरा फोटो पाहून अगदी आत्ता तिथं जावंसं वाटलं! सलाम मित्रा, सलाम!
5 Jul 2010 - 7:16 pm | अप्पा जोगळेकर
जबरा. फोटो पण सही आले आहेत. तुमची प्रवास वर्णनं नेहमी वाचतो तुमच्या ब्लॉगवर. सही लिहिता राव. आणि सही फिरता पण.
उगीच अनाठायी धाडस करण्यात अर्थ नाही...
मी देखील असं प्रत्येक खेपेला म्हणत असतो. पण बर्याचदा मोह आवरत नाही हेही तितकंच खरं.
5 Jul 2010 - 7:27 pm | सुनील
अप्रतिम!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
5 Jul 2010 - 7:56 pm | jaypal
वरिल सग्ळ्यांशी सहमत.
आयला एस.टी. ने सिंगापुरला मुक्काम करायला जाणार हे वाचुन जाम हादरलो राव
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
5 Jul 2010 - 8:03 pm | किल्लेदार
मला पण जाऊन आल्यागत वाटलं.........
5 Jul 2010 - 8:09 pm | भारद्वाज
मोत्यांची माळ ...एकदम अप्रतिम !!!
5 Jul 2010 - 8:10 pm | अरुंधती
थरारक आणि बहारदार वर्णन, फोटोग्राफ्स! तो मौक्तिकहार तर अनमोल!
असे भर पावसातल्या अवघड व अपरिचित ट्रेकचे धाडस मी स्वप्नात पण नाही करणार! अनुभव शेअर केल्याबद्दल धन्स, पण जीवावर खेळून नको रे बाप्पा!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
5 Jul 2010 - 11:22 pm | मीनल
अनमोल मोत्याची माळ...
मला हवीच आहे. :''(
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
5 Jul 2010 - 11:41 pm | हर्षद आनंदी
तु वेडा आहेस!!
तुझ्या वेडाला आणि सगळ्यांच्या धाडसाला सलाम :)
वाहणारा ओढा चढत जाणे म्हणजे काय? हे अनुभवल्याशिवाय नाही समजत!
बाकी सर्व अप्रतिम हे सांगायला नकोच!!
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
5 Jul 2010 - 11:58 pm | अर्धवटराव
बा विमुक्ता !! तू आणि तुझे भटके मित्रं मागच्या जन्मि बहिर्जी नायकांचे साथीदार होता. तेंव्हा हेरगिरी करण्याच्या व्यापात तुम्ही हा रांगडा सह्याद्री हजारदा पालथा घातला, पण त्याचं सौंदर्य भोगायला तुम्हाला वेळचं मिळाला नसेल... ते तुम्हि या जन्मी करताय.
जोहार !!
(थक्क) अर्धवटराव
-रेडि टु थिन्क
6 Jul 2010 - 12:09 am | पुष्करिणी
अ प्र ति म!
खिळवून ठेवणारं वर्णन, सुरेख फोटो आणि माहिती...
पुष्करिणी
6 Jul 2010 - 9:29 am | डॉ.प्रसाद दाढे
हॅट्स ऑफ!
6 Jul 2010 - 9:40 am | नंदन
_/\_
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
6 Jul 2010 - 9:51 am | जिन्क्स
महाबळेश्वर - प्रतापगड - दाभिळ - करंजखिंड - ढवळ्या - आर्थरसीट असा ट्रेक पुण्यातिल युवाशक्ती ही संस्था organise करायची. अतिशय सुरेख ट्रेक आहे हा. ढवळ्यातुन आर्थरसीट म्हणजे सरळ १००० मी ची क्लाईंब आहे. सह्यद्रीमधे असे क्लाईंब जास्त नाहित.
सुरेख ट्रेकचं सुरेख वर्णन...
तुमचे सर्व ट्रेकचे पुर्वानुभव वाचुन कढले..
लिहित रहा वाचायला अम्ही आहोतचं...
जिन्क्स
6 Jul 2010 - 9:52 am | आनंदयात्री
कमाल आहे बुवा विमुक्त राव ! कसला थरारक अनुभव आहे. जियो !
6 Jul 2010 - 10:38 am | शिल्पा ब
छान...या सदरात महाराष्ट्रातील अनमोल हिरे बघायला मिळताहेत...खूप माहिती मिळते आहे...
वरील फोटोतील कोळ्याच्या जाळ्याची हिऱ्याची माळ खूप आवडली...सगळेच फोटो आणि वर्णन छान आहे...लिहित राहा.
हायकिंग करताना जवळ काही फळं, बर्यापैकी पाणी आणि sandwiches ठेवावी...भेळ वगैरे salty पदार्थ न ठेवणेच उत्तम असे माझे मत.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
6 Jul 2010 - 10:47 am | जे.पी.मॉर्गन
तुमच्या "किड्याला", फोटोजना आणि लेखनशैलीलाही! _/\_
जे पी
6 Jul 2010 - 7:32 pm | चतुरंग
पण तरीही थोडा जपूनच रे!
(कधीकाळी किडे केलेला)चतुरंग
6 Jul 2010 - 11:17 am | श्रावण मोडक
दंडवत!
6 Jul 2010 - 11:18 am | श्रावण मोडक
दंडवत!
6 Jul 2010 - 2:01 pm | विसुनाना
माझाही दंडवत!
7 Jul 2010 - 2:17 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
_/\_
अदिती
6 Jul 2010 - 7:04 pm | प्रभो
मस्त रे विमुक्ता......
6 Jul 2010 - 7:23 pm | रेवती
तू धाडसी आहेस रे बाबा विमुक्ता!
फोटू ग्रेट असतातच नेहमी!
बाकी ते सिंगापूर, विहिर, गाढव माळ अशी गावांची नावे वाचून मजा वाटली.
रेवती
7 Jul 2010 - 10:00 am | प्रचेतस
सुंदर ट्रेक विमुक्ता.
तिथेच अजुन २ घाटवाटा सुद्धा आहेत. कामठा घाटाने उतरून दाभिळ गावातून दाभिळ घाटामार्गे प्रतापगडावरून महाबळेश्वराला पोहोचता येते. हा ट्रेक पण जरूर कर. एवढा अवघड जरी नसला पण पायपीट मात्र प्रचंड आहे पण सुसह्य आहे ती तिथल्या दाट वनराईमुळे.
7 Jul 2010 - 2:38 pm | अप्पा जोगळेकर
हा ट्रेक केलाच पाहिजे. बाकी सह्याद्रीत २२० घाटवाटा आहेत. त्यामुळे किती फिरणार हादेखील एक प्रश्नच आहे.
पण हे विमुक्त २२० च्या २२० संपवतील असं दिसतंय. त्यांचा ब्लोग पाहा. दर महिन्याला एका नविन ट्रेकचं वर्णन.
मी तर बुवा ठरवलंय. आता किल्ल्याबिल्ल्यांना कल्टी. आता फक्त घाटातून फिरणार.
7 Jul 2010 - 2:08 pm | सुमीत भातखंडे
__/\__
7 Jul 2010 - 2:25 pm | भाग्यश्री कुलकर्णी
नेहमीप्रमाणेच उ त्त म. पण जरा जपुन रे भावा.
7 Jul 2010 - 3:19 pm | रंगोजी
विमुक्ता, जबरा वर्णन आणि छायाचित्रे सुद्धा.. खासकरुन पहिले आणि अनमोल मोत्याच्या माळेचे चित्र फार फार आवडले.
-रंगोजी
8 Jul 2010 - 5:01 pm | विमुक्त
भटकंतीचा नकाशा टाकलाय...
8 Jul 2010 - 5:17 pm | खादाड
मोत्याची माळ अप्रतिम ! वर्णन पण खूपच छान ! तुमच्यामुळे खुपकाहि बघायला मिळतं !! धन्यवाद !
10 Jul 2010 - 12:48 am | बज्जु
विमुक्ता, जबरा वर्णन आणि छायाचित्रे सुद्धा.. खासकरुन मोत्याच्या माळेचे चित्र भारी.
सात-आठ् वर्ष्यांपुर्वी हा ट्रेक केला होता. रात्री १२.०० ला ठाण्याहुन पिंपळवाडी एस्.टी ने पहाटे पिंपळवाडीला ऊतरलो, तिथुन मंगळगड करुन संध्याकाळी ढवळे गावात मुक्काम. दुसर्या दिवशी चंद्रगड करुन संध्याकाळी ऑर्थरसीटला पोहोचलो होतो.
२ वर्ष्यांपुर्वी देखील हा ट्रेक केला पण तेव्हा चंद्रगड करुन निघालो आणि चकवा लागल्यासारखे झाले, बहिरीच्या जवळ वाट चुकुन रात्रभर जंगलात रहावं लागल होत. दुसर्या दिवशी ऑर्थरसीटला पोहोचलो.
नोटः हा ट्रेक पावसात अजिबात करु नका... पावसा नंतर करण्या सारखा ट्रेक आहे, पण ढवळ्यातून वाटाड्या जरुर घ्यावा... उगीच अनाठायी धाडस करण्यात अर्थ नाही... सहमत.
पावसाळ्यात या ट्रेकला तुम्ही देखील वाटाड्या घेणे आवश्यक होते. वाटा शोधण्यात वेळ जास्त जातो आणि दमणुक होते ती वेगळीच. अर्थात हरवुन नंतर वाटा शोधण्यात आणि वाट न मिळाल्यामुळे जंगलात रहाण्यातसुध्द्दा एक वेगळीच मजा आहे.
असो, पुढील भटकंतीसाठी शुभेच्छा.
बज्जु