तैलचित्र

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in कलादालन
18 Jun 2010 - 11:05 am

तैलचित्र!
आदला दिवस पुर्ण आणि आज दुपार पर्यंत गाडी चालवून चालवून जीव अगदी मेटाकुटीस आला होता. कधी एकदा गादीला पाठ टेकवतोय असे झाले होते. गरम तर इतके होत होते की मुक्कामाला पोहोचल्या पोहोचल्या दोन बीअरच्या बाट्ल्या मागवून घेतल्या आणि त्याचा आस्वाद घेत बगिच्यातील खुर्चीवर निवांत बसलो. बसल्या बसल्या केव्हा डोळा लागला तेच कळले नाही.

हवेतल्या गारव्याने जाग आली आणि डोळे किलकिले करुन जरा बघितले आणि खोलीत धाव घेतली - कॅमेरा घ्यायला. कॅमेरा चालू केला आणि बाहेर आलो तर साक्षात "त्याने" हातात कुंचला धरला होता. समोर डोंगराच्या मधे पाण्याचे मस्त व्यासपीठ उभारले होते. आकाशाचा निळ्या रंगाचा कॅनव्हास त्या डोंगरात मस्त पैकी ताणून बसवला होता. हा साधासुधा कॅनव्हास नव्ह्ता. जादूचाच होता म्हणा ना ! त्याच्यावर रेखाटलेले पटकन पुसता येत होते आणि रंग तर असे पसरत होते की बस्स ! मी डोळे विस्फारुन तो रंगाचा अद्भूत खेळ बघत बसलो. किती कमी रंगात असंख्य छटा त्या कॅनव्हासवर फासल्या जात होत्या ! मधेच संगिताची साथ असावी म्हणुन गडगडाट, पावसाचा खर्जातला तालबध्द आवाज, दुसर्‍या पातळीवरचा पक्षांचा मंजूळ आवाज.... असले भारी पार्श्वसंगीत मी तरी आत्तापर्यंत ऐकलेले नव्हते. खेळ सुरू होण्याची घंटी म्हणून एक कडकडाट झाला आणि रंगमंचावर एकदम प्रकाशाचा झोत पडला. मी आता जरा सावरून बसलो. कॅमेरा सज्ज केला....

त्याने पहीला कुंचला पांढर्‍या रंगात बुडवला आणि त्या रंगाचा भला मोठा ठिपका त्या कॅनव्हासवर टाकला. बघता बघता तो खाली ओघळणारा रंग त्याने एका फटक्यात उलटा वरच्या दिशेला फिरवला आणि एक पांढराशुभ्र ढग त्या कॅनव्हास वर अवतिर्ण झाला. त्या रंगाला जणू याचा राग आला आणि तो डाव्या बाजूला जरा पिंजल्यासारखा झाला. निळ्यावर हा पारदर्शक पांढरा रंग म्हणजे..... तेवढ्यात त्या रंगमंचावर घोंगवणार्‍या वार्‍याचे आगमन झाले. त्या वार्‍याबरोबर त्याने काळा रंग शिंपडला. तो थोडा उचलला आणि तसाच सोडून दिला. ज्या वेगाने तो खाली पसरायला लागला ते पाहून मी दचकलो. मला वाटलं शाई सांडते तसा हा रंग आता खाली सांडणार आणि पाण्यात मिसळणार. पाणी काळे होणार, पण त्याने मग त्याच्या कुंचल्याची अजून एक करामत दाखवली. तो रंग त्याने आडव्या फटक्याने उजव्या बाजूला पसरवला आणि निवांत त्या रंगाची गंमत बघत बसला. मधेच त्याने कुठून कोणास ठाऊक एक पांढरा रंग त्या काळ्या रंगात सोडून दिला, त्याचा झाला तरंगणारा धुरकट डोंगर. मी आपला माझ्या इलेक्ट्रॉनिक कुंचल्याशी मारामारी करत त्याची कॉपी करायचा प्रयत्न करत होतो.

एकदम त्या रंगमंचावर स्तब्धता पसरली. जणू काही त्याने संमोहनअस्त्र वापरुन सगळे विश्व थांबवले, माझे तर बोटही उचलेना - कॅमेर्‍याचे बटन दाबायला. एक क्षण असा गेला आणि परत त्या रंगमंचावर गडबड उडाली. पावसाचे थेंब ताडताड वाजायला लागले, विज चमकली, रंगाची झपाझप सरमिसळ झाली आणि तो काळा रंग या टोकापासून ते त्या टोकापर्यंत झपाट्याने खाली उतरायला लागला. मी माझा श्वास रोखून पुढे काय होणार याची वाट बघू लागलो. तेवढ्यात काय झाले कोणास ठाऊक त्याने एकदम तो रंग जागेवरच थांबवला. जणू काही त्याला खालच्या डोंगराची काळजी वाटत होती. खालचे, मर्त्य जग खाली आणि हा स्वर्ग वरती राहिला. मधे तयार झाली एक या दोघांना विभागणारी रेषा. या रेषेत मी अडकलो. वर जाता येईना आणि खाली यायची इच्छा होईना !

त्यावेळी काढलेला हा फोटो.....
Tailchitra
जयंत कुलकणी.

स्थिरचित्र

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

18 Jun 2010 - 11:11 am | श्रावण मोडक

ऐन पावसाच्या सुरवातीला आलेली एक सुखद सर!

पाषाणभेद's picture

18 Jun 2010 - 12:31 pm | पाषाणभेद

हे तैलचित्र कसे? हे तर जल रंगात रंगविलेले चित्र आहे! एका महान कलाकाराने काढलेले! ज्याची कोणीही नक्कल करू शकणार नाही. त्याला त्यावर वॉटर मार्क ही टाकायची गरज वाटत नाही. त्याच्या आवाक्यातला कॅनव्हास तर कोणाकडेच नसेल. तुम्ही त्या कॅनव्हासचा एक कोपरातरी खास आमच्यासाठी आणलात त्याबद्दल तुमचे किती आभार मानावे?

एकच मागणी आहे लेखाचे नाव जलरंगातले चित्र करावे.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

सहज's picture

18 Jun 2010 - 1:38 pm | सहज

अजुन चांगली फ्रेम टाका ना.

जयंत कुलकर्णी's picture

18 Jun 2010 - 7:55 pm | जयंत कुलकर्णी

आपल्याला हे चित्र आवडल्याचे कळवल्याबद्दल धन्यवाद. मला माहीत नाही हे चित्र तुमच्या मॉनिटर्वर कसे दिसते ते. कारण फार कमी साईझ्ची इमेज आहे.

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com