शुक्रवार होता तो... विक एण्ड तर दुपारीच चालू झाला होता. संध्याकाळी काम आटपून मी निवांत रमत गमत घरी आलो. पाठीला अडकवलेली सॅक जवळ जवळ फेकुनच दिली. सोफ्यावर कम्फर्टर तसंच पडलेलं दिसलं म्हणून ते उचललं. आणि मी आश्चर्यचकित झालो. अपूर्व, माझा रूम मेट एकदम अवघडल्या अवस्थेत सोफ्यावर कम्फर्टर अंगावर ओढून झोपला होता. तो असा कधीच झोपत नसे. काही तरी बिनसलं होतं. कदाचित कामाचा थकवा असेल म्हणून झोपला असेल असा विचार करून मी फ्रेश होण्यासाठी निघून गेलो...
रात्रीचे साडे नऊ वाजले होते. पोटात कावळे ओरडू लागले होते. जेवण तर सकाळचच होतं. फक्त गरम करायचं होतं. आता मात्र अपुर्वला जागं करायलाच हवं होतं. मी जोरजोराने त्याला हाका मारल्यावर तो उठला. फ्रेश होऊन आला. तरीही त्याचा चेहरा ओढल्यासारखा दिसत होता. आता मात्र माझी खात्रीच झाली की त्याचं काहीतरी बिनसलं आहे.
"काय झालं रे ?", मी आवाजात शक्य तेव्हधा हळुवारपणा आणत विचारलं.
"काही नाही रे..."
"काहीच नाही कसं अपूर्व ? तुझा चेहरा सांगतो आहे. काहीतरी झालं आहे एव्हढं नक्की"
खूपच मागे लागल्यावर अपूर्व सांगू लागला...
श्रद्धा त्याच्या शाळेत, जूनियर कॉलेजला होती. त्याच्याच गल्लीत तिचं घर होतं. त्याच्या छोट्या बहीणीसोबत ती त्याच्या घरी वगैरेही येत असे. जूनियर कॉलेजला असताना ती त्याला कधी आवडायला लागली हे त्याचं त्यालाच कळलं नाही. पण शब्द ओठावर कधी आले नाहीत. तिच्या बद्दलच्या नाजूक भावनांना त्याने मनातच ठेवलं तेव्हा. जूनियर कॉलेज संपलं. अपूर्व अभियांत्रिकीला गेला. श्रद्धाने बी एस्सी जॉइन केलं. अभियांत्रिकी कॉलेजमध्ये रूळल्यावर त्याला पुन्हा श्रद्धाची ओढ वाटू लागली. शेवटी त्याने एकदा मनाशी निश्चय करून, उसनं अवसान आणून श्रद्धाला एकटंच गाठून आपल्या भावना तिच्यासमोर व्यक्त केल्या. आणि पुढच्याच क्षणाला त्याचे डोळे पाण्याने डबडबले. श्रद्धाचं दुसर्या एका मुलावर प्रेम होतं. त्या मुलाचंही तिच्यावर प्रेम होतं...
पण त्याने स्वत:ला सावरलं. जणू स्वत:चीच समजूत घातली...
शिकवा नही किसीसे
किसीसे गिला नही
नसीब में नही था ज़ो
हमको मिला नही...
अपुर्वने अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. आयटी क्षेत्रातल्या एका नामांकित कंपनीत तो संगणक अभियंता म्हणून रुजू झाला. आणि बघता बघता कंपनीने त्याला अमेरिकेत प्रोजेक्ट्वर पाठवलं. हे सगळं होत असताना तो श्रद्धाला विसरला न्हवता. मित्रांकडून जशी जमेल तशी तिची माहिती तो काढत राहिला. पुढे पुढे त्याला हेही कळलं की श्रद्धा आणि तिचा प्रियकर लग्न करणार आहेत. पण त्याला त्याचं वाईट न वाटता उलट आनंदच झाला. कारण वयाबरोबरच तो विचारांनी परिपक्व झाला होता. ती कुठेही राहावी, सुखी राहावी एव्हधीच त्याची इच्छा होती.
... आणि आज अचानक त्याला एका मित्राकडून कळलं की श्रद्धाचा तिच्या मित्रासोबत ब्रेक अप झाला आहे. श्रद्धाचा प्रियकर त्याच्याच कंपनीतल्या एका मुलीसोबत लग्न करत आहे. आणि श्रद्धाने या गोष्टीचा धसका घेतला आहे. ती या सगळ्याने खूप डिप्रेस झाली असून तिला तिच्या घरच्यांनी दवाखान्यात ठेवलं आहे.
"खूप साधी आहे रे ती. नाही सहन होणार तिला हा धक्का..."
अपूर्व अश्रुभरल्या डोळ्यांनी सारं सांगत होता.
... आणि मी मात्र त्याच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांमध्ये प्रेमाचं अनोखं रूप पाहत होतो.
प्रतिक्रिया
29 Mar 2008 - 5:28 pm | धनंजय
तिच्याशी पुन्हा संपर्क साधावा.
या क्षणी श्रद्धाला तिच्यावर नि:स्वार्थी प्रेम करणार्यांची जरूर आहे.
(त्याने असे केल्यास लघुकथेचा शेवट दु:खांत न मानता सुखांत मानण्यास वाव आहे.)
30 Mar 2008 - 1:00 pm | विसोबा खेचर
धन्याशेठशी सहमत आहे..
तात्या.
29 Mar 2008 - 5:44 pm | आनंदयात्री
हे तर प्रेमाचे खरे रुप !!
30 Mar 2008 - 5:08 am | फटू
हेच प्रेमाचं खरं रूप आहे... पण अस प्रेम हल्ली अभावानेच पाहायला मिळतं... म्हणून 'अनोखं' हा शब्द वापरावासा वाटला
सतीश गावडे
आमची इथे शाखा आहे -> मी शोधतो किनारा...
29 Mar 2008 - 10:39 pm | प्रभाकर पेठकर
श्रद्धाचा प्रियकर त्याच्याच कंपनीतल्या एका मुलीसोबत लग्न करत आहे.
कारण नाही कळलं. श्रद्धाचा प्रियकर इतक्या कालवधी नंतर तिला सोडून का जातो आहे? त्याला दुसरी चांगली वाटू लागली म्हणून श्रद्धाला सोडतो आहे कि श्रद्धाच्या स्वभावात त्याला कांही गंभीर दोष आढळला म्हणून तो तिच्या पासून दूर जातो आहे? अपूर्वला श्रद्धाचा स्वभाव (कदाचित) नीट कळला नसेल. पण तिच्या 'त्या' प्रियकराला इतक्या मोठ्या कालावधीच्या सानिध्यातून कांही गंभीर दोष आढळला असेल. कदाचित त्याला लवकर मुले हवी असतील आणि कदाचित 'फॉर्म' टीकवण्यासाठी श्रद्धाला लवकर किंवा कधीच मुले नको असतील. कदाचित श्रद्धाला राजाराणीचा संसार हवा असेल आणि तो आई-वडीलांना सोडून वेगळा राहू इच्छित नसेल.
श्रद्धाच्या प्रियकराच्या स्वभावात काही दोष असेल, जसे श्रद्धाच्या सहवासातही तो इतर मुलींच्या शोधात असेल तर ती त्याची चूक आहे. जर लग्न न करता त्याला नुसतीच मजा मारायची असेल तर त्याला लवकरात लवकर सोडून देणंच उत्तम. पण त्याच्या स्वभावातील हा दोष जाणवला तरी श्रद्धाने इतके मनाला लावून घेऊ नये. (अपूर्व आहेच). की अपूर्व इतका टाकावू आहे की कुठल्याही परिस्थितीत श्रद्धा त्याचा 'विचार'च करू शकत नाही?
अनेक प्रश्न मनात उद्भवतात. अपूर्वचे श्रद्धावर एकतर्फी प्रेम आहे. त्यामुळे त्याला श्रद्धा निर्दोष, निष्पाप वाटणं साहजिक आहे पण वाचकांनी श्रद्धाच्या प्रियकराला एकदम मोडीत काढू नये, वरील प्रश्नांची उत्तरे मिळाली तर सारासार विचार करून स्वतःचे मत बनवावे, म्हणून हा लेखन प्रपंच.
30 Mar 2008 - 4:04 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
30 Mar 2008 - 5:33 am | फटू
मीही सहमत आहे तुमच्या मताशी.
श्रद्धा किंवा तिचा प्रियकर, दोघांपैकी कुणा एकाला नाव ठेवण्याआधी दोघांच्याही बाजूंचा विचार व्हायला हवा... हा भाग या कथेत आला नाही. श्रद्धाचा प्रियकर तिला सोडून जाण्यामागे काय कारण होतं हे कथेत असायला हवं होतं. तो या कथेचा दोष आहे...
बाकी प्रभाकरराव, तुमचं म्हणणं आपल्याला बिलकुल पटलं....
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद...
सतीश गावडे
आमची इथेही शाखा आहे -> मी शोधतो किनारा...