भटकंती निळकंठेश्वर परीसराची

योगेश२४'s picture
योगेश२४ in कलादालन
12 Apr 2010 - 11:07 am

आपल्या महाराष्ट्रात बरीचशी धार्मिक स्थळे अशी आहेत की, ज्यांना अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे. परंतु त्यातली बरीच ठिकाणे आपल्या जवळ असुनसुद्धा आपल्याला माहित नसतात. पाश्चात्य देशातील लोक वेगवेगळे धबधबे, सरोवरे, नद्या शोधून काढतात आणि मग आपण ते पहायला जातो; परंतु आपल्याला मात्र अशी सौंदर्यस्थळे शोधायला जाण्याची प्रेरणा होत नाही. त्यामुळे अगदी आपल्या जवळ असलेली सुंदर ठिकाणेही आपल्याला माहित होत नाहीत. असेच एक पुण्या-मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आणि पानशेत धरणाच्या परिसरात असलेले एक सुंदर ठिकाण म्हणजेच आजच्या आपल्या भेटीचे "निळकंठेश्वर".

निळकंठेश्वरला जायला दोन मार्ग आहेतः
पहिला मार्ग - जर तुमची स्वतःची गाडी असेल तर पुण्याहून खडकवासला धरण - डोणजे फाटा - खानापुर मार्गे पानशेत गावी जायचं. पानशेतगावाजवळ दोन धरण आहेत आंबी नदीवरील पानशेत धरण (सध्याचे वीर तानाजी मालुसरे धरण) आणि मोसे नदीवरील वरसगाव धरण (सध्याचे वीर बाजी पासलकर धरण). पानशेत धरणाच्या भिंतीखालून एक रस्त्ता आपल्याला निळकंठेश्वरच्या पायथ्यापर्यंत घेउन जातो. पण पानशेत धरण ते निळकंठेश्वर पायथ्यापर्यंतचा हा रस्त्ता बराचसा खराब स्थितीतला आहे.

दुसरा मार्ग म्हणजे खानापुर आणि पानशेत दरम्यान रुळे नावाचे एक छोटेसे गाव आहे. गावात आल्यावर आपल्याला दिसते ते मुठा नदीचे सुंदर पात्र. नदीच्या पलीकडच्या तीरावर जांभळी नावाचे गाव आणि गावाच्या पाठीमागे असलेल्या उंच डोंगरावर वसले आहे "निळकंठेश्वर". नदी पार करण्यासाठी होड्या तयार असतात. जांभळी गावापासून निळकंठेश्वर पायथ्यापर्यंत जाण्यासाठी तुमची ४ किमी चालण्याची तयारी पाहिजे. आमच्यापैकी ४ किमी चालण्याची कुणाचीच तयारी नसल्यामुळे निळकंठेश्वर बद्दल पुरेशी माहिती गावकऱ्यांकडून मिळवून आम्ही पहिल्या मार्गाने जायचे ठरविले. पण जसे आम्ही पानशेत धरण पार केले तसा आम्हाला रस्त्याचा अंदाज येवू लागला. आम्ही गाडीत बसून होडीची मजा घेत पायथ्यापर्यंत पोहचलो आणि इथुनच डोंगराच्या खडी चढणीला सुरुवात झाली.

समुद्रसपाटीपासून निळकंठेश्वर साधारण तीन-साडेतीन हजार फूट उंचीवर हा डोंगर आहे. हा चढ अत्यंत सोपा असेल असे प्रथमदर्शनी वाटले. परंतु प्रत्यक्ष जेंव्हा चढण चढायला सुरुवात केली तेंव्हा लवकरच तिच्या सोपेपणाविषयीचा भ्रम नाहिसा झाला. हसत खेळत ती चढण चढत जाणारी आम्ही लवकरच धापा टाकीत, विश्रांती घेत, कसेबसे स्वतःला सावरत वर चढू लागलो. ह्याचे कारण लहाणपणाचे हलके शरीर, चपळाई व डोंगर चढण्याची सवय ह्यांच्या जागी सुस्तपणा, आय टी कंपनीत एका जागी ८-८ तास संगणकावर काम करणे, गिर्यारोहणाचा अभाव हेच असले पाहिजे. पायथ्यापासून तासाभरात आम्ही माथ्यावर पोहोचलो. सभोवतालचा परिसर आणि थंड वाऱ्याची झुळुक यामुळे क्षणार्धात आमचा थकवा नाहीसा झाला. डाव्या बाजुला असलेले पानशेत व वरसगाव धरण, ती खोल दरी आणि क्षितीजापर्यंत पसरलेली शेते ह्यांचे दृष्य फारच मोहक दिसत होते.

माथ्यावर निळकंठेश्वराचे प्रशस्त मंदिर आहे, पण मुख्य आकर्षण आहे ते इथल्या पुतळ्यांचे देखावे! दोन रेखीव हत्तींच्या पुतळ्याच्या स्वागत कमानीतून आपण आत शिरताच एकापाठोपाठ एक असे असंख्य सुंदर पुतळे आपणांस दिसु लागतात. निळकंठेश्वराच्या मुख्य मंदिरापर्यंतची वाट आणि संपूर्ण परिसर या आणि अशा सुंदर पुतळयांनी भरला आहे. दशावतार, इंद्राचा दरबार, सत्यवान-सावित्री, अमृत मंथन, कृष्ण्लीला, बकासुर वध, अष्टविनायक, नवनाथ जन्मकथा, शिवाजी महाराज, विविध जाती धर्मातले देव देवता, ऋषी-मुनी आणि रामायण-महाभारतातल्या प्रसंगांनी संपुर्ण परिसर सजीव झाल्यासारखे वाटते. १५-२० एकराच्या या परिसरांत एक हजाराच्या आसपास पुतळे आहेत. संपुर्ण पुतळयांचे दर्शन घेत आपल्या नकळतच आपण निळकंठेश्वराच्या मुख्य मंदिरात पोहचतो. त्याच भारावलेल्या अवस्थेत आपण त्याचे दर्शन घेतो. वनसंरक्षक व शिवभक्त शंकरराव सर्जे ऊर्फ सर्जेमामा यांन हे शिवलिंग सापडले, त्यांनी तिथे सुंदर मंदिर बांधले व हा पुतळ्यांचा देखावा उभारला आहे. सर्जेमामा यांनी सदर देवराई खुप चांगल्या प्रकारे सांभाळली आहे. सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून सर्जेमामा यांनी येथे दारु व्यसनमुक्ती अभियान सुरू केले आहे. देवळात लावलेल्या कात्रणानुसार सर्जेमामांनी सुमारे ४ ते ५ लाख लोकांना दारुच्या व्यसनातून मुक्त केले आहे. खरोखर त्यांचे कार्य खुप थोर आहे.

आम्ही तेथे गेलो त्यादिवशी त्रिपुरारी पौर्णिमा असल्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आम्हीही महाप्रसाद घेऊन तृप्त मनाने परतीच्या मार्गाकडे वळलो. आपल्या महाराष्ट्रात कितीतरी प्रसिद्ध व पवित्र तीर्थक्षेत्र आहेत. त्यातील काहींची ख्याती त्या त्या प्रदेषापुरतीच मर्यादित असली तरी त्याचे महत्त्व त्यामुळे जराही कमी होत नाही.

जेवणाची सोय: निळकंठेश्वर डोंगरावर एक छोटेसे हॉटेल आहे तेथे अल्पोपहाराची सोय होऊ शकते. पानशेतला बर्‍यापैकी हॉटेलमध्ये जेवणाची सोय उपलब्ध आहे.

निळकंठेश्वर परिसरातील इतर काही ठिकाणे:
पानशेत व वरसगाव धरणः संपूर्ण पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी हि दोन धरण एका दिवसाच्या सहलीची ठिकाणे म्हणून उदयास येत आहे. पुण्यापासून अंदाजे ४० किमी अंतरावरील या धरणामध्ये बोटिंगची सोय असल्याने सहकुटुंब सहलीसाठी योग्य ठिकाण.

खडकवासला धरण: स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेले व सध्या पुण्याची चौपाटी म्हणून ओळखले जाणारे खडकवासला धरण.

सिंहगडः पुण्याहून खडकवासला मार्गे डोणजे फाट्याहून अंदाजे १०-१२ किमी अंतरावरील ऐतिहासिक स्थळ.

निळकंठेश्वर प्रवेशद्वार

दशावतार

द्रौपदी वस्त्रहरण

विठू माझा लेकुरवाळा

इंद्र दरबार

अमृतमंथन

बाली-सुग्रीव

यमराज (सत्यवान-सावित्री कथा)

लक्ष्मी नारायण

मच्छिंद्रनाथ जन्मकथा

नवनाथ कथा

नारद-तुंबरू

विहंगम देखावा

पानशेत धरण

खडकवासला धरण

प्रवास

प्रतिक्रिया

मीनल's picture

12 Apr 2010 - 8:11 pm | मीनल

इथे जाऊन प्रत्यक्ष पहायला आवडेल.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

शुचि's picture

12 Apr 2010 - 8:42 pm | शुचि

सुंदर लेख तशीच छायाचित्रे : )
केवढे सुरेख पुतळे आहेत. आणि त्रिपुरारी पोर्णिमेला तुम्हाला दर्शन मिळालं, भाग्यवान आहात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I have always known that at last I would take this road, but yesterday I did not know that it would be today. - Narihara

गणपा's picture

12 Apr 2010 - 8:47 pm | गणपा

वाह!!!!
योगेश खुप छान माहिती वर्णन आणि प्रकाश चित्रं.

अरुंधती's picture

13 Apr 2010 - 7:57 pm | अरुंधती

माहिती, वर्णन व छायाचित्रे सुंदर आहेत! धन्यवाद!! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

स्वाती२'s picture

13 Apr 2010 - 8:21 pm | स्वाती२

छान सफर घडवलीत. धन्यवाद!

योगेश२४'s picture

14 Apr 2010 - 9:48 am | योगेश२४

प्रतिक्रियेबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!!

मदनबाण's picture

14 Apr 2010 - 12:35 pm | मदनबाण

भटकंती वाचायला मजा येतेय...फोटु मस्तच आले आहेत. :)

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

अमोल केळकर's picture

14 Apr 2010 - 2:38 pm | अमोल केळकर

अरे वा ! नवीन ठिकाणाची माहिती मिळाली.
मस्त शिल्प आहेत सगळी

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

चित्रगुप्त's picture

15 Apr 2010 - 4:03 pm | चित्रगुप्त

खूपच छान लेख आणि उत्तम छायाचित्रे आहेत....
हे पुतळे कुणी केले? केंव्हा? यांचा आकार किती मोठा आहे? आणि हे कसचे बनवलेले आहेत?

पुन्हा कधी जाल, तेंव्हा खास पुतळ्यांचे अगदी सकाळी आणि अगदी संध्याकाळी, त्यांच्या लांब लांब सावल्यांसकट फोटो काढा, आणखी मजा येइल.

चित्रगुप्त
आमचे काही धागे:
मोनालिसाच्या बहिणी ?????
http://www.misalpav.com/node/11860
आपल्या मोना(लिसा) वहिनी:
http://www.misalpav.com/node/11663
आमचे काही पूर्वजन्मः
http://www.misalpav.com/node/11667

मेघवेडा's picture

15 Apr 2010 - 4:09 pm | मेघवेडा

नितांतसुंदर! :)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

मितभाषी's picture

15 Apr 2010 - 6:39 pm | मितभाषी

सुंदर छायाचित्रे.
कुठला कॅमेर्‍याने काढले आहेत फोटो.

भावश्या.

प्राजु's picture

15 Apr 2010 - 11:11 pm | प्राजु

सुरेख माहिती आणि छायाचित्रे.
:)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

भडकमकर मास्तर's picture

16 Apr 2010 - 6:00 am | भडकमकर मास्तर

फोटो आवडले..
विशेषतः धरणाचे..
शिल्पे बरी आहेत पण रंग कमी भडक असते तर बरे झाले असते...

योगेश२४'s picture

16 Apr 2010 - 9:13 am | योगेश२४

कुठला कॅमेर्‍याने काढले आहेत फोटो.>>>कॅमेरा Sony Cybershot, 7 Mega Pixel

प्रचेतस's picture

16 Apr 2010 - 9:20 am | प्रचेतस

योगेशराव,
मस्त भटकंती करत आहात तुम्ही.

-----------------
(भटकंतीप्रेमी) वल्ली