सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र ह्या प्रत्येक वेळेचा एक वेगळा सुर असतो... डोंगर-द्ऱ्यां मधून भटकताना हा सुर अगदी सहज जाणवतो... एकांत, शांतता, रातवा, घुबड, दरी मधून वाहणारा वारा ह्यांच्या स्वरांनी रात्रीचा सुर सजलेला असतो... रात्रीच जग जसं आपल्याला गुढ वाटतं अगदी तसाच रात्रीचा सुर देखील फार गुढ असतो... पण ही गुढता अनुभवण्यात वेगळाच रोमांच आहे...
मध्यरात्र उलटून गेली होती आणि आम्ही चौघे राजमाचीच्या दिशेने चालत होतो... मंद चंद्रप्रकाशात रात्रीच जग वेगळच भासत होतं... मेघा-हायवे मागे टाकला आणि लहानसा चढ चढून आम्ही तुंगार्ली तलावाजवळ पोहचलो... रात्रीच्या उजेडात तळ्यातलं पाणी मस्त चमकत होतं... गार वाऱ्यामुळे घामेजलेलं शरीर फार सुखावलं... ठाकरवाडी मागे टाकून उतरायला सुरुवात केली... दूरवर दरीच्या पल्याड श्रीवर्धन आणि मनरंजन चांदण्या मोजण्यात दंग होते... दुपारच्या उन्हात भाजून निघालेली माती रात्रीच्या गारव्याने तृप्त आणि सुगंधीत झाली होती... मातीचा ओला सुगंध, गार वारा, एकांत आणि शितल चंद्रप्रकाश अशा मंतरलेल्या वातावरणात आम्ही भटकत होतो...
दरीच्या अगदी टोकावर थोडावेळ विसावलो... दरीचा तळ दिसत नव्हता, पण खोली मात्र जाणवत होती... वाऱ्याचा स्वर दरीत घुमत होता... डोकं, मन आणि शरीर सगळच फार हलकं झालं होतं... जणूकाही दरीतल्या वाऱ्याशी एकरुप झालं होतं... कसल्याच यंत्राचा आवाज नाही... माणसांचा गोंगाट नाही... केवळ रात्रीची शातंता होती... मधूनच एखादा रातवा, घुबड खालच्या जंगलातून साद घालत होता... भान हरपून बराच वेळ हे सगळं अनुभवलं... मग घोट-घोटभर पाणी प्यायलो आणि पुन्हा वाटचाल सुरु केली... आता दाट झाडीतून पुढे सरकत होतो... झाडीत हालचाल जाणवायची, पण दृष्टीस काही पडत नव्हतं... साधारण पहाटेचे ४.३० वाजले होते... चंद्र आता जरा तांबूस-पिवळा भासत होता... पहाट होत होती मात्र काळोख वाढत होता... हळूहळू चंद्र राजमाचीच्या मागे अस्त पावला आणि सारं नभांगण नक्षत्रांनी, तारकांनी भरुन आलं... पहाटेच्या ऐवजी रात्र झाल्या सारखं भासू लागलं... आयुष्यात पहिल्यांदाच चंद्रास्त अनुभवला आणि तो देखील जंगलात, राजमाचीच्या सहवासात...
श्रीवर्धनाच्या माथ्यावरुन सुर्योदय बघायचाय म्हणून आम्ही झपाझप चालायला सुरुवात केली आणि साधारण ६ वाजता माथ्यावर पोहचलो... गार वाऱ्यात सभोवताल न्याहाळला... सारं जग शांत झोपी गेलं होतं... थोड्याच वेळात उगवतीचं आकाश जरा तांबूस वाटू लागलं... आणि हळूहळू शिरोटा तलावातून सुर्यबिंब वर आलं... सारा आसमंत सोनेरी प्रकाशात न्हावून निघाला... आळस झटकून मांजरसुंबा, ढाक जागे झाले आणि राजमाचीला साद घालू लागले... भवतालच्या जंगलातून पक्ष्यांची चिवचिवाट सुरु झाली... साऱ्या सृष्टीत चैतन्य पसरलं...
(मांजरसुंबा डोंगर आणि मागचा ढाक)
नारायणाला वंदन करुन उधेवाडीकडे निघालो... गावात एका घरात सामान ठेवलं आणि गावामागच्या तळ्याकाठी पोहचलो... तळ्याच्या गार पाण्यात मस्त पोहलो, ताजेतवाणे झालो आणि शंकराच दर्शन घेतलं...
पुन्हा गावात आलो... मस्त जेवलो... पोट भरल्यावर गुंगी आली आणि घराच्या अंगणात आडवे झालो... जाग आली तेव्हा दुपारचा १ वाजला होता...
(ह्यानं उठवलं वेळेत...)
चहा घेतला आणि लगेचच कर्जतच्या वाटेला लागलो...
(राजमाचीहून दिसणारं तळकोकण)
भर दुपारच्या उन्हात चालायला मजा येत होती... काटेसावर फुलून गेली होती, पण तिचा कापूस मात्र सगळीकडे पसरला होता... पांगारा, टबुबीआ अजून बहरलेले होते...
(पांगारा)
(टबुबीआ)
(ओळखता नाही आलं... रेन ट्रीचं फुल आहे का हे?)
इतकी नाजूक फुलं रणरणत्या उन्हात सुध्दा किती सुंदर दिसतात!...
कर्जतच्या बाजूला उतरताना वाटेत बरेच घोस्ट ट्री आहेत... रात्री चंद्राच्या प्रकाशात हे झाड चकाकत असतं म्हणून ह्याला घोस्ट ट्री म्हणतात...
(घोस्ट ट्री... मराठीत बहूतेक तरी ह्याला ‘सालदोड’ म्हणतात)
साधारण ३ तासात तळात पोहचलो... मग टमटमने कर्जतला... कर्जतहून पुण्यासाठी रेल्वे... लोणावळ्याकडे जाताना रेल्वेतून पुन्हा राजमाची आणि संपुर्ण डोंगररांग न्याहाळली... कितीही वेळ डोंगराच्या कुशीत घालवला तरी मनाचं काही समाधान होत नाही... आता परत कधी येणार अशीच हुरहुर असते...
प्रतिक्रिया
9 Apr 2010 - 12:30 pm | मी_ओंकार
नाईट ट्रेक म्हणजे एक वेगळाच अनुभव..
माहूली आणि मलंग गडावर केलेले रात्रीचे ट्रेक आठवले.
विमुक्ता,
सही वर्णन एकदम..
सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र ह्या प्रत्येक वेळेचा एक वेगळा सुर असतो.
इतकी नाजूक फुलं रणरणत्या उन्हात सुध्दा किती सुंदर दिसतात!...
ही वाक्ये आवडली.
- ओंकार.
9 Apr 2010 - 12:31 pm | मनिष
मला फार हेवा किंवा मत्सर सहसा वाटत नाही. पण विमुक्त हा त्याला एक सणसणीत अपवाद आहे...खरच किती मुक्त आणि सुरेख आयुष्य जगतो हा! बाबा रे, एकदा बोलव की असल्या भटकंतीला तुझ्या बरोबर.
9 Apr 2010 - 12:38 pm | चित्रगुप्त
खूपच सुंदर लेखन आणि फोटो.....
अभिनंदन.
9 Apr 2010 - 1:27 pm | मदनबाण
वा...भटकंती वाचायला मजा येतेय...
फोटो नेहमी प्रमाणेच सुंदर. :)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
9 Apr 2010 - 1:43 pm | अमोल केळकर
सुंदर निसर्ग. वर्णन आवडले. मला ही एकदा असचं निसर्गाच्या सानिध्यात जायचे आहे.
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
9 Apr 2010 - 1:46 pm | प्रचेतस
राजमाची हा चांदण्यारात्री करायचा सर्वांगसुंदर ट्रेक आहे. आम्हीही नुकताच केला होता. त्याचे वर्णन येथे पहा.
पण कर्जत बाजूला उतरताना आमचे डिहायड्रेशन मुळे खूप हाल झाले होते तरीही परत परत जावेसे वाटते.
-------
(राजमाचीवेडा) वल्ली
9 Apr 2010 - 3:58 pm | जयंत कुलकर्णी
हे असे फोटो इथे कसे टाकायचे कुणी सांगेल का ? मिपा चा सर्व्हर आहे का ? लिंक दिली तर इथे चित्र दिसते का ?
उत्ताराच्या अपेक्षेत....
जयंत कुलकर्णी
9 Apr 2010 - 7:52 pm | संदीप चित्रे
रेसिपींनी त्रास देतो आणि हा दुसरा.. भटकंतीनं त्रास देतो !
लेख आणि फोटू खूप आवडले.
लेखाचं पहिलंच वाक्य एकदम, "क्या बात है !" म्हणून दाद घेऊन गेले.
>> कितीही वेळ डोंगराच्या कुशीत घालवला तरी मनाचं काही समाधान होत नाही... आता परत कधी येणार अशीच हुरहुर असते...
आम्हालाही विमुक्त आता (मिपावरूनच) कुठल्या भटकंतीला नेणार अशीच हुरहुर असते.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
16 Apr 2010 - 12:16 pm | भय्या
लेख आव्ड्ला