सफरचंदाच्या हंगामातली गाय - रॉबर्ट फ्रॉस्ट
- - -
या गायीमध्ये शिरलेय काहीतरी हल्ली,
कुंपण-फाटक काहीही मानायचीच थांबली.
भिंत बांधणारे वाटतात वेडे की खुळे?
चोथ्याने भरलेय तोंड , गळतोय त्यातून
सफरचंद पाक. फळे चाखून खाऊन
नको झालीत हिला नीरस गवत-मुळे.
पाडलेली वार्याने झाडाझाडाखालची
फळे खड्यांसकट, अळ्यांसकट खायची,
अन् अर्धवट खाल्लेली सोडून जायचे पळत.
टेकाडावर हांबरते आभाळाला बघत -
सुरकतले हिचे आचळ, दूध चाललेय सुकत.
- - -
प्रतिक्रिया
31 Mar 2010 - 4:10 am | शुचि
सुंदर आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
31 Mar 2010 - 5:28 am | चित्रा
सफरचंदांची चटक लागलेल्या गाईची.
अनुवाद सुरेखच.
1 Apr 2010 - 2:19 am | धनंजय
फ्रॉस्टची ही कविता मी प्रथम वाचली तेव्हा सुरुवात खेळकर वाटली. जेव्हा शेवटच्या ओळीवर आलो, तेव्हा धक्का बसला.
तेवढ्यावरून कविता खेळकर नाही, असे काही ठाम म्हणता येत नाही. पण काहीतरी पाणी मुरते आहे, खास.
काय गोम आहे, त्याबद्दल अतिशय कुतूहल आहे. त्यामुळे, ही कविता अधूनमधून पुन्हा वाचली जाते.
1 Apr 2010 - 2:39 am | चतुरंग
काही उकल होते आहे का बघ
http://war-poets.blogspot.com/2009/02/any-reader-of-robert-frosts-must-s...
चतुरंग
1 Apr 2010 - 3:08 am | धनंजय
विश्लेषणासाठी चांगली सुरुवात आहे. भाषांतर करण्यापूर्वी हे पान वाचले होते.
ही युद्धविरोधी कविता आहे, हे पटू शकते.
पण ती पोस्ट लिहिणारा खुद्द वेगळा अर्थही सांगतो - फ्रॉस्टच्याच "मेंडिंग वॉल" कवितेचा संदर्भ देऊन. त्या कवितेत भिंती या नैसर्गिक रीतीने पडतात, त्या पडूच द्याव्या का? असा विचार कवी करतो.
भाषांतरही तसेच संदिग्ध ठेवले आहे. ही एककल्ली गाय अनुकरणीय-सहानुभूती करण्यालायक आहे; की अपकार्याची वाईट फळे भोगणारी-चुचकारण्यालायक आहे?
मन कधी एक अर्थ लावते, कधी दुसरा.
1 Apr 2010 - 2:48 am | शुचि
"ड्रंकन काऊ" ...... अर्थात दुसर्या , अमूर्त, सामान्य माणसांना अनाकलनिय अशा जगाचा जसजसा वेध व्यक्तीस लागू लागतो त्या व्यक्तीची "उपयुक्तता"(?) .... mundane utility ज्याला आचळातल्या दूधाची उपमा दिलीये कमी कमी होत असावी. अधिकाधिक ती व्यक्ती "मेडिटेशन" मय/ आत्मरत होत असावी.
असं असेल का?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे
1 Apr 2010 - 5:15 am | राजेश घासकडवी
शेवटच्या ओळीतनं कवितेचा नक्शाच बदलतो, त्यामुळे तिथूनच अर्थ लावायला लागतो.
दूध सुकलंय हे प्रतीक प्रतिभा आटल्याचं असू शकेल. तसं असेल तर काव्य देवीची आराधना करण्याऐवजी ऊत आल्याप्रमाणे किडलेली पण रसाळ फळं खात, अर्धवट टाकून देत ती (किंवा कवी स्वत:) मस्तवालपणे हिंडते. सफरचंदाच्या गोडीची नशा तिच्या डोक्यात गेली आहे. भिंती, कुंपणं व गवत मुळे हे जीवनपद्धतीचं, 'दूध' उत्पादनासाठी आवश्यक शिस्तीचं प्रतीक असेल असं वाटलं.
राजेश
1 Apr 2010 - 8:20 am | sur_nair
Christainity मध्ये सफरचंद हे 'forbidden fruit ' असे दर्शविले जाते. ते खाऊन मनुष्यजातीने पहिल्यांदा काही कुकर्म केलं (original sin ) असे मानले जाते. ही कविता त्याबद्दल तर नसावी?
Original Sin - The term most generally refers to any indulgence or pleasure that is considered illegal or immoral and potentially dangerous or harmful.