सुनीतः एक प्रयत्न

ऋषिकेश's picture
ऋषिकेश in जे न देखे रवी...
16 Mar 2008 - 10:54 pm

वृत्तबद्ध रचना करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. मलातरी हे सुनीत फसल्यासारखे वाटतेय पण तरीही तुमच्या अभिप्रायांच्या प्रतिक्षेत आहे.

सर्वांची करतो झटून कामे विचारे न कोणी मला
पूर्णत्व एक मागणीस असता दूजी वसे अंतरा |
साभांळून जरी घरास सगळ्या माझा असे कोपरा
लागे मी च जळी स्थळी अन तरी रात्री तिथे हा बरा ||

म्हातारी असते जर्जर तशी फिट्ट तिला मी करी
वैद्य'पाणि' असे भला जवळचा वाटे न मी अंतरी |
अन्नाने तुझिया भरून खळगी लाभे समाधानही
सांगावे मजला असे कुणितरी केव्हाचि ती आस ही ||

धिंगाणा पिउनी असे नि तरीही मी पाळली शांतता
त्याचे हेच असे मिळे फळ तरी माझ्यावरी आळ का |
अंधारात अश्या घरात तुमच्या दावी तुम्हा ज्योत ही
जेव्हा हा भरला प्रकाश सदनी, विचारले कोण मी ||

देव्हार्‍यात असेन कारण कि मी कामास आहे बरा
रामा नाहि असे वदून दमलो मी राम आहे खरा ||

ऋषिकेश

प्रतिक्रिया

प्राजु's picture

17 Mar 2008 - 12:04 am | प्राजु

शार्दुलविक्रिडीत चांगले जमले आहे...
चांगली जाण आहे तुम्हाला वृत्ताची..

- (सर्वव्यापी)प्राजु

मुक्तसुनीत's picture

17 Mar 2008 - 6:38 am | मुक्तसुनीत

सर्वांची करतो झटून कामे कोणी न पुसतों मला
पूर्णत्वी मम मागणीस असता , दूजी वसे अंतरा |
साभांळून जरी घरास सगळ्या माझा असे कोपरा
लागे मीच जळी स्थळी अन तरी "रात्री इथे हा बरा""||

म्हातारी असते जरी जर्जरा मी फिट्ट तिजला करी
वैद्यचि 'पाणि' असे भला जवळचा वाटे न मी अंतरी | (अर्थ लागत नाही ...:-( )
"अन्नाने तुझिया भरून खळगी लाभे समाधानही"
सांगावे मजला असे कुणितरी केव्हाचि ती आस ही ||

धिंगाणा पिउनी असे नि तरीही मी पाळली शांतता
त्याचे हेच असे मिळे फळ तरी माझ्यावरी आळ का |
अंधारात अश्या घरात तुमच्या दावी तुम्हा ज्योत ही
जेव्हा हा भरला प्रकाश सदनी, पृच्छा करे - कोण मी ??||

देव्हारी असणेचि योग्य मजला - कामास आहे बरा !
"रामा" नाहि असे वदून दमलो, मी राम आहे खरा ||

ऋषिकेश's picture

17 Mar 2008 - 9:19 pm | ऋषिकेश

धन्यवाद प्राजु आणि मुक्तसुनित :)
मुक्तसुनित,
पाणि मला हात या अर्थी घ्यायचा होता. वैद्याच्या हाताला गुण आला असा.
अभिप्रायाबद्दल धन्यु!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश