उपकरणे भाग १ - अस्थप्रग्रा (डिजीटल स्टिल कॅमेरा)

विनायक रानडे's picture
विनायक रानडे in काथ्याकूट
4 Mar 2010 - 7:24 pm
गाभा: 

उपकरणे भाग २ - भिंग

ह्या सदरात तुम्हाला आवडणाऱ्या उपकरणांची अनुभवलेली माहिती मी मराठी भाषेतून लिहिण्याचा हा प्रयत्न करीत आहे. मराठीतून तंत्रज्ञान माहिती असावी हाच एक उद्देश आहे. इथे वापरलेले शब्द शक्यतितके कार्य दर्शविणारे असावेत हा प्रयत्न मी केला आहे. दुमत असू शकेल.

अंकित स्थिर प्रतिमा ग्राहक म्हणजेच "अस्थप्रग्रा" (डिजीटल स्टिल कॅमेरा). मी हा विषय सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आज बाजारात पुढील तीन प्रकारच्या प्रतिमा ग्राहकाच्या जाहिराती तुम्ही बघता. १ - पंज्यात मावणारा (पॉकेट कॅमेरा), २ - एक संध (ऑल इन वन कॅमेरा) आणि ३ - भिंग बदलता येणारा डीएसेलार. जाहिरातीत दिलेली माहिती वाचून मदत होण्याऐवजी जास्त गोंधळ होतो. पण मग एक प्रतिमा ग्राहक "प्रग्रा"(कॅमेरा)तुम्ही विकत घेता.

अस्थप्रग्रा हा बर्‍याच सुट्या भागांचा एक संच आहे. ह्यातील काही भागांच्या मर्यादा व क्षमतेचा छापील छायाचित्राशी संबंध आहे. बघूया पहिला महत्त्वाचा भाग प्रतिमा संवेदक (इमेज सेन्सर) व त्यात असणार्‍या चित्रपेशी म्हणजे काय?

चित्रात दिसणारा कृष्ण-धवल चौकोनांचा संच हा एक सामान्य कृष्ण-धवल प्रतिमा संवेदक असून कोणत्याही वस्तूची प्रतिमा प्रत्येक छोट्या चौकोनात विभागली जाते. ह्या प्रत्येक चौकोनाला मराठीत चित्रपेशी (पिक्सेल) म्हणतात. निळ्या, हिरव्या व लाल रंगाच्या काचेच्या चौकोनातून संबंधीत रंगाचा विद्युत भार संबंधीत चित्रपेशी तयार करतात. ह्या विद्युत भाराने प्रतिमा निर्मिती प्रक्रियेतून रंगीत दृश्य प्रतिमा तयार होते.

१ - सीसीडी, २ - सीमॉस आणि ३ - प्रत्यक्षात एखादा संवेदक प्रतिमा ग्राहकात नाण्याच्या तुलनेत केवढा असतो हे समजू शकते. प्रतिमा संवेदकाचे दोन प्रकार आहेत. सीसीडी व सीमॉस. सीसीडी म्हणजे चार्ज कपल्ड डिव्हाइस ह्याचा मराठीत अर्थ प्रतिमा प्रकाशाचा विद्युत भार निर्माण करणारे उपकरण. तसेच सीमॉस म्हणजे कॉम्प्लीमेंट्री मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर ह्याचा अर्थ असा की प्रतिमा प्रकाशाने निर्मीत विद्युत भार नियंत्रण करणारी पद्धत ज्यात सीमॉस फेट (फील्ड इफेक्ट ट्रान्झीस्टर) वापरतात. ह्याचे फायदे तोटे हा फार मोठा चर्चेचा विषय आहे. सीसीडी संवेदक प्रकारात गेली २० वर्ष सतत शोध होत आहेत तरीही उत्पादन किंमत जास्त आहे. पण सीमॉस संवेदकाचे उत्पादन सोपे व कमी किमतीत होते. दोन संवेदकातील फरक पुढील चित्रात दाखवण्याचा हा एक प्रयत्न आहे. चित्र ४०१ सीसीडी संवेदकाने काढले आहे व चित्र ९११ सीमॉस संवेदकाने काढलेले असून २०० टक्के मोठे करून तुलना करण्याचा प्रयत्न केला आहे.

आधुनीक कॅमेऱ्यात ३.३ ते ५६ दशलक्ष चित्रपेशींचे संवेदक उपलब्ध आहेत. जितक्या जास्त चित्रपेशी तितकी जास्त प्रतिमेची माहिती मिळते, व म्हणूनच मोठे छाया चित्र छापणे शक्य होते. छायाचित्राचे दोन प्रकार आहेत एक निव्वळ अंकित माहिती (सॉफ्ट) ज्याचा उपयोग फक्त संगणकाच्या दर्शकावर (मॉनिटर) दिसण्यासाठी तर दुसरा प्रकार कागदावर छापलेले चित्र (हार्ड कॉपी). चित्राचा दर्जा चित्रपेशींच्या तपशिलाने (रिझोल्युशन) ठरतो. संगणक दर्शक सामान्यतः: १०२४ पिक्सेल लांबी व ७६८ पिक्सेल रुंदीचा असतो त्यावर दर इंचाला ७२ ते ९६ चित्रपेशी (रिझोल्युशन) दिसण्याची सोय असते. ह्याचाच अर्थ ९६ चित्रपेशी दर इंचाला (पिक्सेल पर इंच) किंवा बिंदू दर इंचाला (डॉट पर इंच) ह्या तपशिलाने १० इंच लांब ७ इंच उंच रेखीव प्रतिमा दिसू शकते. अशा प्रतिमेचे १०२४ X ७६८ = ७८६४३२ चित्रपेशी असतात. परंतु कागदावर छपाई करताना ३०० चित्रपेशी दर इंचाला / बिंदू दर इंचाला तपशिल असणार्‍या प्रतिमेचा दर्जा चांगला असतो. त्यापेक्षा कमी तपशिलाच्या प्रतिमेतील रंग, रेखीवपणा कमी असतो व नको असलेल्या डागांची संख्या वाढते. पुढील चित्रातून हा फरक जाणवेल.

पहिल्या चित्रात संत्र्याच्या आजूबाजूला व मागे काळे डाग दिसतात तसेच प्रतिमेचा रेखीवपणा कमी झालेला दिसतो. हे छायाचित्र ४०० पेशी लांब, ३४० पेशी रुंद व ७२पेशी दर इंचाच्या तपशिलाचे आहे. तर दुसर्‍या छायाचित्र ४०० पेशी लांब, ३४० पेशी रुंद पण ३०० चित्रपेशी दर इंचाला तपशिलाचे आहे. नको असलेले काळे डाग बाजूच्या चित्रापेक्षा कमी असून प्रतिमा जास्त रेखीव व सुबक दिसते आहे. म्हणूनच जास्त चित्रपेशी (पिक्सेल) प्रग्राने (कॅमेरा) घेतलेल्या प्रतिमेचे सुबक, रेखी मोठे चित्र छापता येते.

पुढील तक्त्याने अस्थप्रग्रातील संवेदकाच्या चित्रपेशी संखेने कोणत्या आकाराची छापील प्रतिमा तयार होते हे समजेल.

पुढील भागात प्रतिमा भिंगसंचा विषयी (काम्पौंड लेन्स) माहिती मिळेल. आजच माझा "उपकरणे" हा ब्लॉग मी सुरु केला आहे. http://skillsvap2.blogspot.com/

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Mar 2010 - 7:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रानडे साहेब, माहितीपूर्ण लेख आहे. आवडला.

-दिलीप बिरुटे

भिडू's picture

4 Mar 2010 - 8:00 pm | भिडू

छान माहिती

मदनबाण's picture

4 Mar 2010 - 10:27 pm | मदनबाण

उत्तम माहितीपूर्ण लेख... :)

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

अक्षय पुर्णपात्रे's picture

4 Mar 2010 - 11:21 pm | अक्षय पुर्णपात्रे

माहिती

शैलेन्द्र's picture

5 Mar 2010 - 11:08 am | शैलेन्द्र

डी एस एल आर बद्दल माहीती मिळेल का? सध्या कोणता चांगला आहे? व्यक्तीगत उपयोगासाठी कोणते स्पेसीफीकेशन बघुन घ्यावे?

आशिष सुर्वे's picture

5 Mar 2010 - 11:26 am | आशिष सुर्वे

छान, सोप्या शब्दांतील माहिती..

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..