शनिवारी २७ ला रात्री राजमाचीला जायचे ठरले व आम्ही चौघे रात्री १०.३० च्या लोकल ट्रेनने ११.४५ ला लोनावळ्यात उतरलो. तिथून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर आलो. पुण्याच्या दिशेने काही अंतर पुढेच एक पेट्रोल पंप लागतो. तिथून डावीकडे वळून गुरुकुल मागे टाकून आम्ही तुंगार्ली गावात आलो. तिथून पुढे दृतगती महामार्गाच्या खालून जात आम्ही डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो. साधारण ४० मिनिटात रेल्वे स्टेशनपासून इथवर येता येते. डोंगर चढून आम्ही तुंगार्ली धरणाची भिंत उजवीकडे ठेवत पांगोळली गावात पोहोचलो. गाव संपताच एक घळ सुरु व्हायची. तो उतार संपला की थेट राजमाचीच मुख्य रस्ता लागायचा. पण आता मात्र घळिच्या बाजूने चारचाकी जाईल असा कच्चा रूंद रस्ताच बनवला आहे. त्यामुळे वापरात नसल्यामुळे घळीचा रस्ता बुजला आहे. आम्ही त्या रस्त्याने निघालो. आता पौणिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात राजमाचीचे आवळेजावळे बालेकिल्ले श्रीवर्धन-मनरंजन स्पष्ट दिसत होते. आता अजून बरेच अंतर चालायचे होते. रस्ता अनोख्या निसर्गसौंदर्याची अनुभूती देत होता. उजवीकडे सरळसोट कडा व डावीकडे खोल दरी असे आम्ही बरेच अंतर चालून गेलो.
वाटेत रातपक्षी, भेकरांचे आवाज चालूच होते. आता एक दाट जंगलाचा टप्पा सुरु झाला होता. विजेरीच्या साहाय्याने तो पार करून आम्ही एका फाट्यावर आलो. इथून सरळ जाणारा रस्ता ढाकच्या बहिरीला जातो व डावीकडचा राजमाचीकडे. आम्ही डावीकडून निघालो. काही वेळातच एक ओढा ओलांडून व तीव्र चढ चढून आम्ही गावाच्या वेशीवर पोहोचलो व काही वेळातच गावाच्या अलीकडे असलेल्या एका खोपीपाशी पोहोचलो. किल्ल्याचा कडा आता अगदी शेजारीच उभा होता. हा सबंध प्रवास १८ किमीचा असून ४ ते ५ तास लागतात.
राजमाची हा किल्ला सातवाहनकालीन कारण हा प्राचीन काळचा बोरघाटाचा मार्ग व आजुबाजूला बर्याच लेण्या. त्यावर लक्ष्य ठेवायला बलदंड किल्ला हवाच. खुद्द किल्ल्यावरही व आजुबाजूला बरीच सातवाहनकालीन टाकी आहेत.
खोपीत थोडी विश्रांती घेतली व थोड्या वेळातच फटफटले. आता जवळूनच बिबट्यांचे हूंकार ऐकू आले. पण भीती अशी वाटली नाही. ताजेतवाने होउन आम्ही श्रीवर्धन बालेकिल्ला पाहण्यास निघालो. व दोन बालेकिल्ल्यांच्या मध्ये असलेल्या भैरवनाथाच्या देवळापाशी आलो. तिथे काही मर्कट्लीला पाहिल्या.
दोघे जण मंदिरातच बसले व आम्ही दोघे किल्ला पाहण्यास निघालो. १५ मिनिटातच आम्ही किल्ल्याच्या गोमुखी दुमजली प्रवेशद्वारापाशी आलो. तिथून उजवीकडच्या वाटेने आम्ही पश्चिम बुरुजापाशी आलो. तिथून अगदी समोर ढाकच्या बहिरीच्या रौद्र कातळकड्याचे व कळकराय सुळक्याचे दर्शन होत होते. शेजारीच मांजरसुंबा होता. व डावीकडे दूरवर ईर्शालगड, माथेरान व त्या पाठीमागे प्रबळगड व कलावंतीण ही दिसत होता.
आता आम्ही सर्वोच्च टोकाकडे निघालो होतो. काही वेळातच कड्याला लगटून असलेल्या थंडगार पाण्याच्या टाक्यातील पाणी पिवून व ४/५ कोरीव पायर्या आम्ही ध्वजकाठीपाशी आलो. आता चौफेर प्रचंड विस्तृत प्रदेश दिसत होता.लोणावळ्याहून येणार पुर्ण मार्ग व त्यामधील खोल दरी, पलीकडे ड्यूक्स नोज, पाठीमागे ढाक बहिरी ई. सर्व दिसत होते.
आता आम्ही पूर्व बाजुच्या चिलखती बुरुजापाशी निघालो. बुरुजात जायला एक कमानदार जिनाच खोदला आहे. बाहेर येताच अप्रतीम दृश्य दिसते.
हा नजारा डोळ्यांत साठवूनच तट्बंदीवरून जात जात खोदीव कोठारे पाहून आम्ही किल्ला उतरलो व देवराई मधून जात पठारावरील उदयसागर तलावाकडे गेलो. तलावाच्या काठी पुरातन कोरीव खांब असलेले शिवमंदीर आहे.
कैलासनाथाचे दर्शन घेउन आम्ही रामभाउंकडे मस्त तांदळाची भाकरी, पिठले, ठेचा यांचे जेवण केले व साधारण सव्वा वाजतो कोकणातील कोंदिवडे-कर्जत च्या बाजुने निघालो. वाटेत एक हुप्प्यांची जोडी पाहिली. काही वेळातच सह्याद्रीच्या मुख्य धारेपाशी आलो. इथून खूप खोलवर ३५०० फूट खाली कोकण दिसत होते. एका तीव्र उताराच्या अरूंद पायवाटेने निघालो. अनंत वळणे घेत, घसरत घसरत पाणी संपवत आम्ही उतरू लागलो.
कितीही उतरले तरीही पायथा अजून बराच खाली होता.शेवटी कसेबसे आम्ही कोंढाणा लेण्यांपाशी पोहोचलो. डिहायड्रेशन मुळे कुणीच त्यांचे सौंदर्य टीपू शकले नाही. तिथून तसेच खाली उतरत इमू फार्मपाशी आलो. तिथे पाणी मिळाले. १५/२० मिनिटे तिथेच दम काढून कोंढाणे गावात आलो. मनरंजन आता दिमाखात उंच उभा होता.
कोंढाणे गावातून सहा आसनीने खरवंडि, कोंदिवडे, अशी गावे पार करत कर्जतला पोहोचलो व प्रगतीने लोनावळा गाठले. व तिथून पिंपरी.
प्रतिक्रिया
3 Mar 2010 - 10:15 am | बज्जु
छायाचित्र व वर्णन सुरेख. असेच गडावर भटकत रहा. पुढच्या भटकंतीसाठी शुभेच्चछा. ;;) :H
गडप्रेमी बज्जु ठाणेकर
3 Mar 2010 - 10:44 am | नंदू
छान वर्णन आणि सुंदर फोटोज.
राजमाची म्हट्लं की आठवतो तो 'माचीवरला बुधा', राजमाचीच्या पावसाळी सहली आणि वहाळातून गडावर जाणार्या वाटा.
नंदू
3 Mar 2010 - 10:44 am | नंदू
छान वर्णन आणि सुंदर फोटोज.
राजमाची म्हट्लं की आठवतो तो 'माचीवरला बुधा', राजमाचीच्या पावसाळी सहली आणि वहाळातून गडावर जाणार्या वाटा.
नंदू
3 Mar 2010 - 10:44 am | नंदू
छान वर्णन आणि सुंदर फोटोज.
राजमाची म्हट्लं की आठवतो तो 'माचीवरला बुधा', राजमाचीच्या पावसाळी सहली आणि वहाळातून गडावर जाणार्या वाटा.
नंदू
3 Mar 2010 - 11:30 am | विमुक्त
सुंदर फोटो...
3 Mar 2010 - 4:51 pm | गणपा
वर्णन आणि फोटो दोन्ही आवडले .
अशीच भटकंती करीत रहा आणि आम्हाला मेजवानी देत रहा. :)
3 Mar 2010 - 5:16 pm | मदनबाण
सहमत...
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
3 Mar 2010 - 6:47 pm | विसोबा खेचर
सुंदर..!
4 Mar 2010 - 5:03 pm | मेघवेडा
मस्तच! असेच विमुक्त भटकत राहा! आणि निसर्गाने केलेल्या सौंदर्याच्या उधळणीचे मस्त मस्त फोटो डकवत राहा!
-- निसर्गवेडा
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
8 May 2012 - 12:40 pm | स्पा
जबराट
8 May 2012 - 5:51 pm | गणेशा
जबरदस्त