हा माझा पहिलाच नवा प्रयत्न. सुप्रसिद्ध उर्दू कवी क़तिल शिफाई यांच्या 'अपने होटोंपर सजाना चाहता हूं' या गझलचा स्वैर भावानुवाद.
ओठांवरती तुज सजवावे
गीतापरि गुणगुणत रहावे
लाभावा तव पदर आसवां,
त्या थेंबांचे मोती व्हावे
या विश्वाचे तम मिटवाया,
मी माझे घरटे जाळावे
तुला पुरेसे स्मरून झाले,
अता तरी तू मला स्मरावे
तुझ्या मिठीतच श्वास विरावा,
मरणानेही काव्य जगावे
आणि ही मूळ गझल ::::::::
अपने होटोंपर सजाना चाहता हूं
आ, तुझे मैं गुनगुनाना चाहता हूं
कोई आंसू तेरे दामन पे गिराके,
बूंद को मोती बनाना चाहता हूं
छा रहा है सारी बस्ती में अंधेरा,
रोशनी को घर जलाना चाहता हूं
थक गया हूं करते करते याद तुझको,
अब तुझे मैं याद आना चाहता हूं
आखरी हिचकी तेरे जानों पे आए,
मौत भी मैं शाइराना चाहता हूं
प्रतिक्रिया
28 Feb 2010 - 3:56 pm | शुचि
कविता अतिशय उत्तम भाषांतरीत केलीयेत तुम्ही.
फक्त एक वाटलं -
"छा रहा है सारी बस्ती में अंधेरा,
रोशनी को घर जलाना चाहता हू"
या ओळींतून जो सामाजीक जाणीवेचा, आसपासच्या समाजाशी निगडीत असण्याचा आशय व्यक्त होतो, तो आशय खालील ओळींमध्ये अतिव्यापक होऊन हरवतो.
"या विश्वाचे तम मिटवाया,
मी माझे घरटे जाळाव"
पण बाकी कडवी अतिशय मस्त भाषांतरीत पेलली आहेत!!
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
28 Feb 2010 - 4:32 pm | राजेश घासकडवी
भाषांतर उत्तम झालं आहे. कवितेचं भाषांतर करताना शब्दाला शब्द ठेवल्याने होणारी हानि इथे दिसत नाही. 'चाहता हू' चं 'व्हावे' केलेलं आहे ते इतर कशाहीपेक्षा जास्त फिट बसतं. बऱ्याच वेळा भाषांतर करताना कवितेचा रेखीवपणा जातो. इथे बांधणी मूळ कवितेपेक्षा जास्त पक्की झालेली आहे.
मूळ कवितेत कवी आपल्या कवितेशी बोलतो आहे असं वाटतं. ते भाषांतरातही आलेलं आहे. मला शाइराना चा अर्थ नीट कळला नाही (कवित्व करणे?), पण शेवटच्या ओळीचा 'मृत्यूचे मी काव्य करावे' अशासारखा अर्थ आहे का?
राजेश
28 Feb 2010 - 7:48 pm | sur_nair
चांगलं जमून आलं आहे. शेवटची ओळ मात्र अनुवादाच्या दृष्टीने जरा कठीण आहे. जे चित्र मूळ कवितेत उभं होतं ते भाषांतरात थोडं सैल पडतं असं वाटतं. 'जानो पे' याचा अर्थ मांडीवर असा होतो. 'हिचकी' या शब्दाचा इथल्या context मध्ये मराठीत बसेल असा शब्द नाही. 'शायराना' चे ही तसेच. प्रत्येक भाषेची स्वतःची काही शब्दचित्र उभी करण्याची ताकद असते आणि काही मर्यादाहि असतात. असो. एकूण आवडले.
1 Mar 2010 - 6:04 am | बेसनलाडू
जानो = मांडी या अर्थाने येथे तुझ्या मांडीवर डोके ठेवून/ठेवले असता शेवटचा श्वास घ्यावा असे काहीसे अभिप्रेत आहे. तसे असल्यास -
तुझ्या मिठीतच श्वास विरावा च्या ऐवजी तुझ्याच अंकी श्वास विरावा असे चालेल का? (अंक = मांडी)
(पर्यायसूचक)बेसनलाडू
1 Mar 2010 - 7:45 am | प्राजु
आवडला हा प्रयोग. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/