ती आली, तिने पाहिलं .. आणि तिने जिंकलं....

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
14 Mar 2008 - 10:20 pm

मंडळी, आमचं माहेर समस्त प्राणीमात्रांचं घर. समस्त प्राणीमात्रांचं याचा शब्दशः अर्थ सगळ्या प्राण्यांच्(पाळीव) आणि माणसांचं. म्हणजे घरात प्राणी हे हवेतच. कायम वस्तीला असलेले प्राणी म्हणजे २ कुत्री आणि १ मांजर आणि असलंच तर त्या मांजरीची पिल्लं. माझ्या लहानपणी आम्ही इचलकरंजी इथे डेक्कन कॉ.ऑप.मिल्स च्या क्वार्टर्स मध्ये रहात होतो. तिथले माझे बालपणीचे दिवस म्हणजे खरं सांगायचं तर सुवर्ण अक्षरात लिहावेत असे दिवस होते. एक घर आणि घराबाहेर बाग, त्या बागेत एक मोठे पायरी आंब्याचे झाड, एक मोठे फणसाचे झाड, सिताफळ,पपई आणि काही फुलांची झुडुपे... बाग छोटी असली तर मला खूप आवडायची. तर माझ्या या घरी ससे पाळले होते आम्ही. बाबांचा विरोध होता तरिही पाळले. आणि या सस्यांचा पिंजरा बागेत ठेवला होता. एक पोपटही होता पाळलेला. कुत्रा आणि मांजर तर होतेच. म्हणजे आमचे घर जरा कमी प्राणीसंग्रहालय होते असे म्हंटले तरी चालेल. माझ्या बाबांना, कुत्र्या खेरीज बाकी प्राणी विशेष आवडत नाहित. पण मेजॉरिटी मुळे त्यांचे काही चालत नसे. त्यात एकदा मी कहरच केला. तिथे रोज सकाळी एक मिलचा माळी सगळ्या घरातून फुले आणि दुर्वा वाटत हिंडत असे. आणि रोज तो दुर्वा ठेऊन गेला की मी लगेच त्या दुर्वा सश्यांना खायला घालत असेल. आजीला पूजेसाठी दुर्वा मिळत नसत. बिचारा माळीबुवा रोज शिव्या खाई आजीच्या. आणि एकेदिवशी साक्षात बाबांनी मला रंगेहाथ पकडले. आणि मग मस्त खरडपट्टी... तशातच एकदा आईचा पाय दुखावला, तिला चालताही येईना. सस्यांकडे बघायला कोणी नाही.. त्यामुळे त्यांना त्याच माळीबुवांच्या शेतावर ठेवण्यात आलं आणि माझं ससे पाळण्याचं स्वप्न धूळिला म्हणजे धूळीलाच मिळालं. त्यांतर काही काळाने कोल्हापूरला मोठ्ठ ... हो मोठ्ठच घर बांधलं आम्ही आणि सगळे तिकडे रहायला गेलो. लहानपणापासूनची सवय त्यामुळे २ कुत्री आणि मांजर आमच्यासोबत तिथेही आलेच. फक्त आता पोपट आणि ससे नव्ह्ते...... ही प्रस्तावना होती माझे प्राणिप्रेम सांगण्यासाठी.

तर अशा या आमच्या घरी, दिवाणखान्यात एकदा मी (वय वर्षे १७) सोफ्यावर झोपून टी.व्ही. पहात असताना... अचानक त्या मोठ्या खिडकीतून फडफड आवाज करत एक चिऊ (चिमणी) आली. सगळ्या दिवाणखान्यात भुर भुर फिरून ती पंख्याच्या एका पात्यावर बसली. माझ्या पायाशी बसलेल्या आमच्या कुत्रीने तिच्याकडे बघून गुर्रर्र.. असे केले. मी तिला डोक्यावर थोपटून शांत केले. वर पाहिले तर चिमणी माझ्याकडेच पहात होती. मी स्मित का काय म्हणतात ते हास्य केले.. बहुतेक तिला ते समजले असावे कारण पटकन उडून ती खिडकीतून बाहेर गेली... (मला थोडे वाईट वाटले) .. पण लगेचच दुसर्‍या मिनिटाला ती परत आली तिच्यासोबत आणखी एक चिमणी होती. बहुतेक चिमणा असावा.. अंगाने जरा बरा होता म्हणून मी अंदाज बांधला. पुन्हा दोघे त्याच पंख्याच्या पात्यावर बसले. यावेळी कुत्रीने गुर्रर्र.. नाही केले(किती शहाणी!). मग त्या दोन चिमण्या सगळ्या घरभर नुसत्या भिरभिरत होत्या. मला त्यात काही वेगेळे वाटले नाही. त्या भिरभिरल्या आणि गेल्या निघून.

दुसरे दिवशी बरोबर त्याच वेळी तीच चिमणी आली.. सोबत नवरा नव्हता. पुन्हा सगळ्या घरभर फिरली आणि भिंतीवर असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या फोटोच्या वरती जाऊन बसली. दर्शन घेत असावी बहुतेक गणपतीचे. तिथे बसली काही काळ आणि निघून गेली. तिसर्‍या दिवशी मी आणि बाबा काहितरी गप्पा मारत बसलो असताना ती चिमणी आली. आली ती एकदम गणपतीच्या फोटोवरच जाऊन बसली. मी कुतुहलाने तिच्याकडे पाहिले..... तर.. तोंडात ..सॉरी चोचीत , काही गवताच्या काड्या, पिसं असं बांधकामाचं सामन होतं. अरे व्व्व्वा! माझं मन एकदम प्रसन्न झालं. पण लक्षात आलं की बाबा आहेत घरात. बाबांचं तिकडे लक्ष जाण्या आधीच मी बाबांना, " तुम्हाला आजी बोलावते आहे" असं सांगितलं. "हो का?" असं म्हणत उठत असतानाच नेमकं लक्ष त्या चिमणी कडे गेलं आणि तिचा इरादा लक्षात आल्यावर त्यांनी गोंधळ सुरू केला. "अगं (आईला), हे बघ चिमण्या इथे घरटं बांधताहेत.. हाकल त्यांना. नको हे काहीतरी.. अगं.. ए... कुठे आहेस? झाडू आण, त्या चिमणीला हाकलतो मी." त्यांनी झाडू घ्यायच्या आधीच, त्यांच्या दंग्याने ति बिचारी (चिमणी) बाहेर भुर्रर्र.....

त्यानंतर पुढे दोन दिवस ती चिमणी काही आली नाही घरी. लालूच म्हणून मी खिडकीत, तांदूळ ठेवले, पाणी ठेवलं..ज्वारीचे दाणे ठेवले ..पण चिमणी काही दिसेना. बाबांमुळे चिमणी बेघर झाली असा विचार करून मी माझ्या इतर व्यवहारात गुंतले. आणि लगेचच २ दिवसांनी पुन्हा ती चिऊ, चोचीत काड्या घेऊन खिडकीत हजर. मी एकदम खुश झाले. खिडकीच्या गजावर बसून ती काहीतरी इकडे तिकडे पहात होती. बहुतेक बाबा घरांत नाहीत याचा अंदाज घेत असावी. "अगं चिऊताई, बाबा नाहीयेत घरांत.".. मी. जणू माझं बोलणं समजल्या सारखी ती आत आली आणि पुन्हा एकदा मुक्काम गणपतीचा फोटो. फोटोच्या मागे जाऊन त्या काड्या ठेऊन ती पुन्हा बाहेर गेली. मला आता खूप खूप बरं वाटू लागलं. चिमणी घरटं बांधणार, त्यात मग अंडी घालेल, त्या अंड्यातून इवले इवले चोच असलेले मांसाचे गोळे बाहेर येतील, त्यांना हळू हळू पंख येतील. चिमणी त्यांच्या चोचीत दाणे भरवेल... आपली इवलिशी चोच उघडून ते दाणे खातील.. हळू हळू ती पिलं मोठी होतील.... आणि कधितरी एकदा भुर्रकन उडून जातील. आपण त्या पिलांचे घरट्यातले फोटो काढू... चिमणी नसताना आपण त्यांच्य घरट्यात थोडे तांदूळाचे दाणे ठेऊ... अशी स्वप्नं मी रंगवू लागले. संध्याकाळी बाबा आले घरी आणि आत आल्या आल्या त्यांना गणपतीच्या फोटोच्या इथे खाली जमिनीवर काही काड्या आणि पिसे पडलेली दिसली... झा...लं! त्या ज्या काही १-२ काड्या होत्या त्या सुद्धा घराबाहेर गेल्या. खूप समजावून सुद्धा बाबा ऐकत नव्हते. मला म्हणाले," घरांत मांजर आहे, ती पिलं झाल्यावर मांजराने मारून टाकली तर??? " ... या विचाराने एकदम शहारा आला. मी नाद सोडून दिला.

त्यानंतर २ दिवस तरी चिमणी पुन्हा नाही दिसली. मी मनांत म्हंटले,'ठिक आहे नाही आलेलीच बरी. बाबा सांगतात ते ही काही चुकिचे नाही.' आणि मी स्वतःची समजूत घालून माझे कॉलेज, क्लासेस.. इ. मध्ये गुंतून गेले. त्यानंतर २ दिवसांनी आम्ही कोकणांत जाणार होतो. निघताना, आईने मला सांगितले, "पाठिमागचे दार, सगळ्या खोल्यातल्या खिडक्या, आणि गच्चीचे स्लाईंडिंग दार बंद आहे ना बघून ये." असे म्हणून माझ्या हातात कुलूप किल्ली देऊन ती बाहेर गाडीत बसायला गेली. मी सगळी दारे खिडक्या बंद आहेत हे पाहिले. मागचे दार बंद केले. मागच्या दाराला आमच्या ग्रिल आहे. ते बंद करून कुलूप घातले. आणि त्याच्या आतले जाळीचे दार ओढून घेताना... का कोणास ठाऊक ते बंद करावेसे नाही वाटले. मी ते पूर्ण बंद नाही केले थोडीशी फट ठेवली... थोडीशी.. अगदी थोडी... एक चिमणी जाण्याएवढी... :)

आम्ही सगळे कोकणांत गेलो. तिथे वेळणेश्वरचे दर्शन घेऊन , समुद्रावर खेळण्यात मी त्या चिमणीला अगदी विसरून गेले. दोन दिवस अगदी मजेत गेले. दुसर्‍यादिवशी रात्री उशिरा सगळे घरी परतलो. येताना जेऊनच आलो होतो त्यामुळे आल्या आल्या सगळेच निद्रादेविच्या आधिन झालो. सकाळी जाग आली ती घरातल्या दंग्यामुळे. उठले आणि बाहेर आले. बघते तर सगळे जण त्या गणपतीच्या फोटोखाली उभे राहून काहितरी घोळ घालत होते तिथेच खाली पिसं, काड्या पडलेल्या दिसत होत्या. मला शंका आलिच. मी तिथे गेले.. आणि फोटोच्या एका बाजूने काही दिसते का ते पाहू लागले. मला काय दिसले असेल.... चक्क घरटे.. पूर्ण नाही दिसले पण .. हो.. ते घरटेच होते. २ दिवसांत चिऊताईंनी घरटे बांधून पूर्ण केले होते. मी बाबांना म्हणाले,"बघा दोन दिवसांत तिने घर पूर्ण केलं बांधून, नाहीतर तुम्ही .. आपलं हे घर बांधायला १० महिने घेतलेत".. बाबांनी माझ्याकडे एक असहाय्य कटाक्ष टाकला आणि ते अंघोळीला गेले. ते गेल्यावर लगेच मी स्टूल आणले आणि ते घरटे पाहिले, चिमणी नव्हती त्यात, पण २ अंडी मात्र होती, राखडी रंगाची. आता माझे स्वप्न पूर्ण होणार या आनंदाने मी हुरळून गेले. पण लेगच बांबांच्या कडे जाऊन म्हणाले,"बाबा, घरट्यात अंडी आहेत. तुम्ही काळजी करू नका, आपल्या मनी(मांजर)पासून मी नक्की त्यांची काळजी घेईन." आणि त्या अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट...

- प्राजु

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

15 Mar 2008 - 10:40 am | इनोबा म्हणे

अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट...
हे बरे केलेस्.आम्ही लहान असताना आमच्या घराच्या बाहेरच्या बाजूस चिमण्यांची बरीचशी घरे होती. त्यामुळे दिवसभर चिवचिवाट चालायचा.नंतर घर पाडून पुन्हा नव्याने बांधले तेव्हापासून ते ही गेले.आता चिमणी दिसली तरी फार.

छान लिहीले आहेस.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

सृष्टीलावण्या's picture

15 Mar 2008 - 10:54 am | सृष्टीलावण्या

मस्त. लेख वाचून छान वाटले. पुढला भाग येऊ दे.

मला पण काही ना काही प्राणी / पक्षी रस्त्यावरून उचलून आणायची सवय होती. सध्या फक्त
मांजर आहे.
>
>
सदा सर्वदा देव सन्निध आहे । कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे ।।

विसोबा खेचर's picture

15 Mar 2008 - 11:05 am | विसोबा खेचर

मस्त लेख..! वाचून बरं वाटलं...

पुन्हा सगळ्या घरभर फिरली आणि भिंतीवर असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या फोटोच्या वरती जाऊन बसली. दर्शन घेत असावी बहुतेक गणपतीचे.

हे मस्तच! :)

आणि रोज तो दुर्वा ठेऊन गेला की मी लगेच त्या दुर्वा सश्यांना खायला घालत असेल.

सश्यावरून आठवलं, सशाचं मटण फार छान लागतं! मी एकदा सापुतार्‍याला खाल्लं होतं! :)

तुम्ही काळजी करू नका, आपल्या मनी(मांजर)पासून मी नक्की त्यांची काळजी घेईन." आणि त्या अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट...

हा लेख क्रमश: वाचायला देखील आवडला असता... छान लिहिला आहे. चिमण्यांच्या पिल्लांची जल्मकथा वाचायला आवडली असती!

आपला,
(शेणाच्या घरातला) तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

15 Mar 2008 - 1:38 pm | प्रभाकर पेठकर

पाल्हाळीक मांडणी परंतु चांगला विषय. लेखाच्या शेवटी 'क्रमशः' असे लिहीलेले नाही पण , पुढे काय झाले उत्सुकता आहे.

मुंबईतले आमचे घर जुने आणि कौलारू आहे, आजुबाजूला बरीच झाडे-झुडपे आहेत. मोठा व्हरांडा आहे. कुठले प्राणी पाळले नाहीत तरी त्यांची (चिमण्यांची) वर्दळ घरात, आजुबाजूला असायचीच. चिमण्या (असंख्य), कुत्रे, गाई-वासरं, कोंबड्या (आणि त्यांची गोंडस पिल्ले ), डुकरे, कावळे, पोपट, साळूंख्या, सुतार पक्षी, कोकीळा आदींचा बराच सहवास लाभला.

चिमण्यांना दाणे खाऊ घालणे, कावळ्यांना-कुत्र्यांना पोळीचे तुकडे, डुकरांना-गायी वासरांना भाज्यांची देठे, आंब्यांच्या कोयी आणि सालं, जवळच्याच गोठ्यातील गायींना गोग्रास असा खुराख मी पुरवायचो.

उन्हाळ्यात अंगणात खाटेवर वाळत घातलेले पापड, कुरडया, सांडगे इत्यादी गोष्टी आमच्या परवानगीशिवाय चाखण्यासही गायी-गुरं यायची, कावळे यायचे.

घरातून पिंजर्‍यात पकडलेले उंदीर, बाहेर उघड्यावर जाऊन काव-काव ओरडून कावळ्यांना जमा करायचे आणि कावळे जमले की पिंजर्‍यातील उंदीर उंच उडवायचा (ती ही एक कला असते) की मग कावळे त्याला जमिनीवर पडायच्या आंत वरचेवर हवेतच चोचीत 'कॅच' करायचे आणि घेऊन जायचे हाही माझा आवडता छंद होता.

गेले ते बालपण...

मीनल's picture

15 Mar 2008 - 5:49 pm | मीनल

शिर्षक लेखाचा शेवट सांगून जातोय .
ते वेगळे/अपूर्ण असत तेव्हा ,उत्सुकता शेवटपर्यंत टिकते.
नुसत `ती आली` असं असत तर छान तर वाटल असत.

चांगली सुरवात आहे लेखाची.
साधे साधे प्रसंग.प्रत्येकानी अनुभवलेले.तरीही उत्तम वर्णनामुळे आपलेच वाटतात.छान शब्द बध्द केले आहेत.

गोट्या's picture

15 Mar 2008 - 7:52 pm | गोट्या (not verified)

"मी ते पूर्ण बंद नाही केले थोडीशी फट ठेवली... थोडीशी.. अगदी थोडी... एक चिमणी जाण्याएवढी... :)"

हाहा..... पुर्वनियोजित काम पुर्ण झाल्याचा आनंद झालाच असेल नाही :)))

मस्त.... लेखन !

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

व्यंकट's picture

15 Mar 2008 - 8:05 pm | व्यंकट

मराठीच्या पुस्तकातली एक कथा आठवली. ती अशी काहिशी होती: लेखकाच्या घरात चिमण्या येऊन घरट बांधतात. पहिल्यांदा तो चिमण्यांना घर बांधू देतो, पण साफसफाई करतांना त्याच्या हातून ते घरट पडतं आणि त्यातलं अंड फुटतं. पण चिमण्या पुन्हा जिद्दीनी घरट बांधू लागतात. ह्यावेळी लेखक विचार करतो की परत असं व्हायला नको म्हणून तो चिमण्यांना हाकलू पहातो. पण चिमण्या घरट बाधंतच रहातात. तो घरटं काढून फेकून देत रहातो. असं बर्‍याचदा होतं. चिमण्या आपला हेका सोडत नाहीत. शेवटी लेखक घरटं अंगणात नेऊन जाळतो. मग परत चिमण्या त्याच्या घरात घुसतं नाहीत.

व्यंकट

चकली's picture

15 Mar 2008 - 9:57 pm | चकली

मला जस आठवतय त्याप्रमाणे तो धडा ग्रेस यांचा होता.

चकली
http://chakali.blogspot.com

अभिज्ञ's picture

15 Mar 2008 - 9:08 pm | अभिज्ञ

प्राजुताई,
लेख आवडला.खुप छान विषय सुरु केला आहात.
थोडे परिच्छेद जास्त केले असतेस तर वाचायला आणिक मजा आंलि असति.
किंवा काहि परिच्छेद थोडेसे छोटे हवे होते.!
नाहितर लेखन लाम्बल्यासारखे वाटते.बाकि लेखनशैली खुप आवडलि.
पण माझा ज्ञानेश्वर ह्या लेखा पेक्षा जास्त चान्गला लिहिला होतात.
जाता जाता....
त्या अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट...

माझ्या माहितीप्रमाणे काहि पक्षांना माणसाने शिवलेले चालत नाहि असे म्हणतात.ते कितपत खरे आहे?

अबब

प्राजु's picture

15 Mar 2008 - 9:20 pm | प्राजु

अबब राव,

त्या अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट...
ह्याचा अर्थ, मी त्यांना हातात घेऊन चारा भरवला असा होत नाही. त्यांचे मा़ंजरापासून रक्षण करण्याची जबाबदारी मी घेतली इतकेच.

त्यामुळे,
माझ्या माहितीप्रमाणे काहि पक्षांना माणसाने शिवलेले चालत नाहि असे म्हणतात.ते कितपत खरे आहे?

त्या पिलांना मी हात लावला असे कुठेही म्हंटलेले नाही .

- (सर्वव्यापी)प्राजु

अभिज्ञ's picture

15 Mar 2008 - 9:51 pm | अभिज्ञ

प्राजुताई,
तुमचा काहितरि गैरसमज झालेला दिसतोय.
अहो मी जनरल संदर्भात विचारले होते.हे असे असते का?असे मला विचारायचे होते.
त्यात तुमच्या ह्या वाक्यावरुन हा विचार आला म्हणून विचारले.बाकि काहि नाहि.
काहि चुकले असल्यास माफ़ि.!

अबब

सर्वसाक्षी's picture

15 Mar 2008 - 9:47 pm | सर्वसाक्षी

वाचून मलाही माझ्या 'चिउताई'ची आठवण झाली, अजूनही रोज सकाळी उठून बाहेर आल्यावर पहिला संवाद होतो तो माझ्या चिमण्यांशीच. त्यांच्यात रमले की काही दिवसात जणु त्यांची भाषा समजते. दाणे हवे असल्याची चिवचिव वेगळी. दाणे टाकलेले दिसल्यावर आपल्या जोडीदाराला बोलावायची चिवचिव वेगळी. आणि त्यांचे दाणे पळवायला कबुतरे वा साळुंक्या आल्या की होणारी चिवचिव वेगळी. रोजच्या धावपळीच्या आयुष्यातला सकाळचा हा एक आनंददायी कार्यक्रम.

प्राजु's picture

15 Mar 2008 - 9:52 pm | प्राजु

फोटो सुंदर आहे.
ती त्यांची भाषा... आणि नंतर आपल्याबद्दल वाटणारे भय कमी होत चाललेले जाणवणे...
धन्यवाद सर्वसाक्षी..

- (सर्वव्यापी)प्राजु

ब्रिटिश टिंग्या's picture

15 Mar 2008 - 11:02 pm | ब्रिटिश टिंग्या

फोटोप्रमाणे लेखही सुंदर आहे.....
बाकी काहीही म्हणा.....चिमण्यांची घरं स्वस्तात मस्त (अन् २ दिवसात) बनून जातात्...नाही तर आपली.....भरत बसा जन्मभर होमलोनचे हप्ते.... :((

- (हप्ते भरून कंटाळलेला)छोटी टिंगी

स्वाती राजेश's picture

16 Mar 2008 - 12:31 am | स्वाती राजेश

प्राजु, मस्त आठवण लिहिली आहेस...
त्या अंड्यांना म्हणजेच पिलांना मी दत्तकच घेतले त्यांच्या आईसकट...
वा मस्तच..
सशांना दुर्वा खायला घालणे....आवडले.

आमच्या घरी एक मांजराचे पिल्लू होते. त्याला लोणी खूप आवडायचे. आम्ही असेच घरातील लोणी चोरून त्याला घालत असू.
त्याची आज आठवण झाली.

पुणेरी's picture

16 Mar 2008 - 5:07 am | पुणेरी

सुंदर आठवण..

अवांतरः पुण्यात आता फक्त आठवणी.. चिमण्याच दिसत नाहीत.. प्रदुषणामुळे का माहित नाही पण नाहिश्या झाल्या.. :((

पिवळा डांबिस's picture

16 Mar 2008 - 6:03 am | पिवळा डांबिस

मस्त आहे. आम्हाला हा लेख (कथा?) त्या ज्ञानेश्वरांवरच्या लेखापेक्षा जास्त आवडला. तो लेख म्हणजे, लेख लिहायचा, असं निश्चित करूनच लिहिल्यासारखा वाटत होता. या लेखात लेखिकेची (आणि वाचकांची) स्वअनुभूती जाणवते. घरात चिमणी येणे, तिने घरटे बांधणे ही सर्वांच्या (अगदी मुंबयकरांच्याही) परिचयाची गोष्ट. प्राजुने तिचा अनुभव (असावा, अगदीच लेख काल्पनिक वाटत नाही) लिहिला असला तरी प्रत्येक वाचक त्याच्याशी रिलेट करू शकतो.

मी अगदी लहान (२-३ वर्षे) असतांना आई स्वयंपाक करीत असतांना मी मध्ये-मध्ये लुडबुड करू नये म्हणून आई मला खिडकीच्या जवळ बसवीत असे व तिथे थोडे तांदूळ टाकीत असे. मग ते तांदूळ खाण्यासाठी येणार्‍या चिमण्या मी तासंतास बघत बसत असे (असे आई सांगायची). त्यामुळे तिला निर्वेध स्वयंपाक व इतर कामे करता येत असत. आज आई जाऊन बावीस वर्षे झाली पण प्राजु, तुझा लेखाने तिची आठवण जागी केली...

पण एक गोष्ट खटकली,
"बघा दोन दिवसांत तिने घर पूर्ण केलं बांधून, नाहीतर तुम्ही .. आपलं हे घर बांधायला १० महिने घेतलेत".. बाबांनी माझ्याकडे एक असहाय्य कटाक्ष टाकला

काय गरज होती बापाला असं छळण्याची? तू विनोद केला असशील पण त्यांच्यासाठी? उगाच नाही त्यांनी तुझ्याकडे एक असहाय्य कटाक्ष टाकला! मुलांसाठी इतकं करूनही जेंव्हा मुलं असं बोलतात ना तेंव्हा काय वाटतं हे कळायला बापच व्हावं लागतं!:(((
त्यांनी काय ते घर फक्त स्वतःसाठीच बांधलं असेल? ते बांधतांना त्यांना किती शारिरीक, मानसिक (कदाचित आर्थिक) ताण आला असेल! बाप कितीही कडक झाला तरी तो माणूसच असतो, आणि त्याला त्याच्या भावना आवराव्याच लागतात. आई चटकन रडू शकते आणि त्यात काही वावगं वाटत नाही, पण बापाने असं केलं तर? अब्रम्हण्यम! किती ताण येत असेल त्याच्या मनावर!

तू केलेलं वर्णन कदाचित काल्पनिक असेल आणि प्रत्यक्षात घडलं नसेलही. पण इथे मिपावर अनेक लहान वयाची मुलं येतात. त्यांना आपल्या वडिलांच्या भावनांची कल्पना यावी म्हणून हे लिहीत आहे, राग नसावा...

तुझा,
डांबिसकाका

प्राजु's picture

16 Mar 2008 - 9:50 pm | प्राजु

डांबिसकाका,
ही गोष्ट जरी खरी असली तरी (चिमणीची) तरी, मलाही नीट आठवत नाही की, मी बाबांना खरंच असं बोलले होते का? बहुतेक नसावेच. कारण मुलगी ही वडिलांना मुलापेक्षा जास्ती लाडकी असते. तशी मिहि आहे. आणि खरं सांगायचं तर जरा जास्तीच आहे.
आणि बाबांनी माझ्याकडे असहाय कटाक्ष टाकला तो, मी त्यांना तसे बोलले म्हणून नाही तर, त्यांनी इतका खटाटोप करूनही चिऊताईने घरटे बांधले म्हणून... :)
असे मला वाटते.
बाकी तुम्ही म्हणता त्याचाशी मी पूर्णपणे सहमत आहे. बाबा लोक असतातच असे... मूकपणे रडणारे..
- (सर्वव्यापी)प्राजु

सुधीर कांदळकर's picture

16 Mar 2008 - 8:29 am | सुधीर कांदळकर

अकृत्रिम शैली, संवेदनाक्षम कविमन. मजा आली. कवींनी गद्य जरूर लिहावे.

आता पुढील गद्य केव्हा?

चतुरंग's picture

17 Mar 2008 - 3:38 am | चतुरंग

आमच्या वाड्यात तर चिमण्यांची असंख्य घरटी असत. त्यातली अंडी, नंतर येणारी पिले, क्वचित मांजराने कावेबाज हल्ला करुन मारुन टाकलेले एखादे पिलू असे कितीतरी दिसे.
प्राजूच्या त्या चिमणीने त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.
ह्या चिउ-काउचं आपल्या जीवनात एक वेगळंच स्थान असतं.
अगदी लहानपणीच वरणभात खाताना एक घास चिऊचा पासून त्यांची सोबत असते ती बघता बघता कधी मागे पडते ते कळतही नाही.
मग आपल्या मुलांच्या वेळेला परत एकदा ती येतात ती त्यांच बालपण संपलं की जातात.
त्यानंतर ती अशा लेखातूनच भेटतात आणि मनातला एक निरागस, हळवा कप्पा थोडासा किलकिला होतो.

चतुरंग

अवधुत पुरोहित's picture

17 Mar 2008 - 5:39 am | अवधुत पुरोहित

फार छान लिहीले आहेस....
(फिल्मी प्राणी) अवधुत

प्रमोद देव's picture

17 Mar 2008 - 9:06 am | प्रमोद देव

प्राजु मस्तच लिहिले आहेस.
आमच्याकडे तर चिमण्या इतक्या होत्या की त्यांनी अगदी नकोसे करून सोडलेले होते. आमचे घर दोन्ही बाजूला उतरत्या छपरांचे होते. त्यामुळे घराचा मध्यभाग हा जवळ जवळ १५ फूट उंच होता आणि त्या मध्यभागात चांगली ऐसपैस जागा होती. त्या ठिकाणी कितीतरी चिमण्यांच्या पिढ्या नांदल्या ह्याची गणती नाही. कैक वेळेला ह्या चिमण्यांची सामुदायिक सभा होत असे. मग घरातल्या निरनिराळ्या ठिकाणी बसून त्यांचा चिवचिवाट चालायचा. तो कधी कधी ऐकण्यासारखा असायचा. मग मधेच काय व्हायचे माहित नाही पण आपल्याकडे हल्ली जसे विधानसभेत/लोकसभेत सभासद आपापसात मारामार्‍या करतात ना अगदी तसे व्हायचे. त्या चिमण्यांच्यात दोन तट पडायचे आणि मग अक्षरशः चिवचिवाट करत मारामार्‍या चालायच्या. एकमेकांशी मारामारी करताना जोडी-जोडीने धाडकन येऊन जमिनीवर पडायच्या. त्यात एखादी चिमणी जखमी व्हायची. मग तिच्यावर इतर चिमण्या सामुदायिक हल्ला करून तिला बेजार करायचे.
हे सगळे पाहताना आधी जरी गंमत वाटायची तरी नंतर नंतर आम्ही त्यांना 'भुर्रर्र्-फुर्रर्र' वगैरे करून हुसकुन लावायचो.
खरे तर ह्या बद्दल लिहिण्यासारखे बरेच आहे. पण इथेच थांबतो.
तुझ्या ह्या लेखामुळे जुन्या आठवणी चाळवल्या आणि थेट त्या चिऊ-काऊच्या राज्यात पोचलो.

आनंदयात्री's picture

17 Mar 2008 - 11:58 am | आनंदयात्री

प्राजु, लेख छान झालय. तुझ्या या लेखाने बहुतेकांच्या लहानपणाच्या आठवणी ताज्या केल्या ! आमच्या घराच्या छोट्याश्या व्हरांड्यात बदाम, पारिजातक, कन्हेर, तुळस अश्या वेगवेगळ्या झाडान्ची गर्दी होती त्यामुळे चिमण्या खुप असत. साधारण उन्हाळ्याच्या दिवसात त्या चिमण्या जवळच ठेवलेल्या आमच्या ड्रमातले पाणी किंवा जमिनीवर सांडलेले सांडपाणी प्यायच्या, मी जमेल तेव्हढी बोळकी जमा करुन त्यात प्यायचे पाणी भरुन थोड्याथोड्या अंतरावर ठेवुन द्यायचो, मला वाटायचे चिमण्या आपले दिलेले स्वच्छ पाणी पितील तर त्यांना काविळ होणार नाही. (मराठवाड्यात उन्हाळ्यात हमखास काविळीची साथ येते). ना आता चिमण्या राहिल्या ना ती निरागसता. आणी हो ती उन्हाळ्यात असणारी गर्द गार झाडांची सावली अनुभवुन पण बराच काळ लोटला असावा, दुपारचे मी म्हणनारे उन, जरासे विसावलेले घर, तुरळक कुठुनतरी येणारा मंदसा टीव्ही चा आवाज, अन आम्हा भावंडाचे त्या गर्द झाडांच्या सावलीत रमलेले खेळ !!

छ्या बॉ ... गेलेच ते दिवस.

siddhumarathe's picture

17 Mar 2008 - 9:50 pm | siddhumarathe

...

siddhumarathe's picture

17 Mar 2008 - 9:44 pm | siddhumarathe

वाचत असताना सागळं डोळ्यासमोर घडतयं असं वाटत होता....

प्राजु's picture

18 Mar 2008 - 3:17 am | प्राजु

आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद..

- (सर्वव्यापी)प्राजु