सप्रेम नमस्कार मंडळी !
जवळजवळ ७ वर्षे झाली असतील ( २७ जुलै २००३) एक कविता लिहायला सुरुवात केली , पण एक कडवे झाल्यावर काही सुचेचना.ती कविता आज एका मैत्रिणीचा "मैत्री" वर एस एम एस आला आणि त्याला उत्तर म्हणून ४ ओळी पाठवल्या तेंव्हा ती पूर्ण होण्याएव्हढे काही सुचले आहे , बघा आवडते का ते !
तत्वज्ञान.....
बदलते ते वय
बदलत नाही ती सवय
भावतो तो भाव
भोवतो तो स्वभाव !
सतत बदलतो तो रंग
अविचल रहातो तो श्रीरंग
समजण्यासाठी वाढते ती संगती
आणि मग जाणवते ती विसंगती !
ऐकावासा वाटतो तो सूर
गायल्यावर होतो तो भेसूर
वहात जाते ती लय
वहावत नेतो तो प्रलय !
ती/तो आयुष्यात येणं तो योगायोग
ती/तो आयुष्यातून जाणं तो योग?!
ति/त्या ला पहाताच हृदयात येते ती कळ
ति/त्या च्या पर्यंत पोचत नाही ती कळकळ !
ती/तो येताच उठतात ते तरंग
ती/तो नसतां कण्हते ते अंतरंग !
ति/त्या च्यासाठी बांधावं ते घर
ति/त्या च्या मुळे येते ती घरघर !
ति/त्या च्याकडे असते ती कला
आम्ही करतो त्या नकला !
आम्ही करतो प्रेम तो व्यापार
जग दाखवून देतं तो व्यवहार !
तन जख्मी करतं ते शस्त्र
मन भळभळतं ते शास्त्र !
अकस्मात् जडते ते प्रेम
आजीवन दृढ रहाते ते सप्रेम !
प्रतिक्रिया
22 Jan 2010 - 8:01 pm | प्राजु
हम्म!
छान आहे. वेगळी धाटणीची आहे.
आवडली.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/