तशी कॉलेजमधे असताना थोडीफार भटकंती केली आहे पण मधल्या ७-८ वर्षात नोकरी,मग कुठुंब या व्यापात भटकणं विसरून गेलो होतो.मिपावरचे भटंकतीचे लेख वाचुन स्फुरण चढलं होतं...ठरवलं बस् ! आता मागं फिरयचं नाही.
शेवटी मागच्या शनिवारी सगळं जमून आलं.दोन मित्र आधीपासूनच यायला तयार होते.कुठे जायच यावर थोडा विचार करुन पुण्यापासून जवळ आणि सोपा ट्रेक म्हणून सर्वानूमते लोहगडावर जायच निश्चीत झालं.अंतरजालावरुन लोहगडाबद्द्ल शक्यतेवढी माहिती मिळवली आणि सकाळी ६.०० वाजता निघायचं ठरवून ७.३० वाजता जून्या पूणे-मुंबई रस्त्याला लागलो.बाहेर थोडी थंडी आणि धुकं होतं,नटरंगची गाणी ऐकत,जून्या पूणे-मुंबई रस्त्यावरुन मळवली फाट्यावरून डावीकडे वळून रेल्वे रूळ आणि द्रुतगती मार्गावरचा उड्डाणपूल पार करून गप्पा मारत तासाभरात आम्ही "भाजे" गावात येऊन पोहोचलो.
तिथे पोहोचताच एक आजोबा काठी टेकीत गाडीजवळ आले.कुठून कसे जायचे,काय पहायचे हे सांगून,गाडी इथे लावा मी लक्ष ठेवतो ,जाताना २० रू. द्या,असे म्हणताच ज्याची गाडी होती त्या मित्राचा जीव भांड्यात पडला.बिचार्याला घरून निघाल्यापासून गाडी कुठे ठेवायची याची काळजी लागली होती.
जवळच एका टपरीवजा हॉटेलात २-२ डीश पोहे हादडून चहा घेऊन आम्ही ९:०० च्या दरम्यान भाजे लेण्यांच्या दिशेने निघालो.मस्त कोवळं ऊन आणि हवेतला गारवा अनुभवत पायर्या चढायला सुरूवात केली .खाली मस्त हिरवी शेतं आणि छोटी छोटी घरं दिसत होती.बाजुच्या डोंगरावर गुरं चरताना दिसत होती.
अश्या आल्हाददायक वातावरणात पायर्या चढायला सुरूवात केली खरी १०-१५ मिनीटातच पाय भरून यायला लागले,घामाने निथळायला झालं तेंव्हाच लक्षात आलं "ये ट्रेक नही आसान!"थोडी विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो.व्यवस्थीत बांधलेल्या पायर्यांमुळे लेण्यांपर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागला नाही.
लेण्यांचा परीसर रखवालदाराने स्व च्छ ठेवला होता.लेण्याच्या मधोमध दोन्ही बाजूनी खांब आणि वरती अर्धवर्तुळाकार लाकडी तुळयांनी बनवलेले मुख्य प्रार्थनाग्रुह आहे त्यात मधोमध एकाच दगडातुन कोरलेला स्तुप आहे.आजुबाजुला चौकोनी आकाराच्या गुहा आणि त्याच्या तळाशी पाण्याच्या टाक्या आहेत.या गुहा म्हणजे त्या लोकांचे राहण्याचे ठिकाण असावे.थोडे पुढे गेल्यावर असेच एका दगडातुन कोरलेले १४ स्तुप आहेत.
हे सर्व पाहून जास्त वेळ न घालवता रखवालदाराने सांगितलेल्या पायवाटेने आम्ही तो डोंगर उतरायला सुरुवात केली.खाली एक ओढा लागला.पावासाळ्यात इथे डोंगरातून मोठ्या धबधब्यातून पडणारे पाणी वहाते. अजूनही धबधब्यातून थोडेफार पाणी वाहत होते.जवळपास छान गवतफुले फुलली होती.ओढा पार करुन समोरचा डोंगर चढायला लागलो,आता मात्र खरा कस लागत होता.झुडुपातून जाणारी अवघड चढणीची पायवाट पार करून तासाभरात डोंगर माथ्यावर पोहोचलो.तिथे एक झोपडी दिसली,झोपडीसमोरच्या एका झाडाखाली जरा विसावलो,तिथे एक छोटा मुलगा बसला होता त्याचा फोटो काढून त्याला दाखवला,वाटलं फोटो पाहून हा खुश होईल पण झालं उलटंच,फोटो पाहाताच त्याने भोकाडं पसरले. झोपडीतल्या लोकाना रस्ता विचारला आणि पुढे चालते झालो.थोड़े पुढे गेल्यावर गायमुख खिंडित पोहोचलो इथुन डाव्या बाजूला विसापूरचा किल्ला आणि उजव्या बाजूला लोहागड़ काय मस्त नजारा होता.
अर्ध अंतर पार झाल होतं.पुढे थोड़ी सरळ पायवाट पार करून आम्ही लोहागड़ पायथा गावात येऊन पोहोचलो.लोणव्ळ्याहून इथे येण्यासाठी पक्का रस्त्ता आहे,या रत्याने इथे बरेच पर्यटक आले होते.इथे बरीच हॉटेल्स आहेत. नाश्ता,चहा ,सरबत,ऑर्डप्रमाणे शाकाहारी आणि मांसाहारी जेवण सर्वकाही इथं मिळतं.आम्ही १-१ पेला लिंबूपाणी घेऊन गडावर निघालो.गडाच्या पायथ्याशी गडाबद्दलची माहीती सांगणारा फलक आहे.इथे आम्हाला खूप माकडं दिसली,एक माकड तर माझ्या हातातून पेरु घेण्यासाठी अंगावर धावूनच आलं.
गडाच्या पायथ्यापसून वरपर्यंत एकूण ५०० पायर्या आहेत.या भागाची पुरातत्व विभागाने बरीच दुरुस्ती केली आहे.गडावर पोहोचेपर्यंत ४ दरवाजे लागतात.पहिला गणेश दरवाजा नंतर नारायण दरवाजा मग हनुमान दरवाजा आणि सर्वात वरचा महादरवाजा.गणेश द्वारामधे नव्यानेच लाकडी दरवाजे बसवण्यात आले आहेत.
या दरवाज्यावर मोठमोठे टोकदार खिळे आहेत,ते खिळे लागून पहिल्याच दिवशी कोणाच्यातरी डोळ्याला इजा झाल्याने फोटो काढताना काळजी घ्या असे आम्हाला रखवालदाराने सांगितले होते.महादारवाजातून किल्ल्यात प्रवेश करताच पठार लागले.इथे येईपर्यंत सूर्य माथ्यावर आला होता पण मस्त थंडगार शुद्ध हवा सोबतीला होती.उजव्या बाजूला थोडे पुढे गेल्यावर एक तोफ आहे,पुढे एक दर्गा दिसला,वाटेत पाणी साठवण्याच्या बर्याच टाक्या आहेत पण यातले पाणी खुपच खराब दिसत होते.लोकानी त्यात प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणि पिशव्या टाकल्या होत्या.ते पाहून खुप दुख: झाले.असे करताना आपण निसर्गाची किती हानि करतोय हे लोकाना कसे कळत नाही याचे नवल वाटले.पुढे डाव्या बाजूला कड्यावरून खाली दुधिवर्याचे ( प्रति पंढरपुर ) विट्ठल मंदिर आणि पवना धरण,तुंगचा किल्ला दिसतो.
आणखी पुढे उजव्या बाजुला मोठे १६ कोनी तळे आहे.या तळ्याचे पाणी मात्र बरेच स्व च्छ होते.तळ्यात उतरण्यासाठी पायर्या आहेत.तळ्यात उतरताना डाव्या बाजूला दगडात कोरलेली एक शिवकालीन मुद्रा दिसली पण खुप झीज झाल्याने काही वाचता आले नाही.
तळ्यापासून पुढे गेल्यावर पश्चिमेला १-२ की.मी. लांब कडा आहे, किल्ल्यावरुन पहाताना हा कडा विंचवाच्या नांगी सारखा दिसतो म्हणून याला विंचू काटा म्हणतात असे कळाले.या कड्याच्या दोन्ही बाजूला मजबूत तट्बंदी आहे.हा कडा म्हणजे किल्ल्याचे शेवटचे टोक.
इथे एक शिवपताका डौलने फडकताना दिसली.उन्हातुन बिकट पायवटेने तिथपर्यंत पोहोचेपर्यंत दुपारचे १.३० वाजले.तिथे जाऊन थोडावेळ विसावलो,थोडेफार खाऊन थंडगार पाणी प्यायलो आणि शिवपताकेला स्पर्श करुन परत फिरलो.परतीचा प्रवास त्यामानाने सोपा वाटला,मधे पायथ्याशी थांबुन जेवण केले आणि दुपारी ३:३० वाजेपर्यन्त भाजे गावात गाडीजवळ पोहोचलो.चालून पाय थकले होते,उन्हाने अंग करपले होते पण एक किल्ला यशस्वीपणे सर केल्याच्या आनंदात सर्वकाही विसरुन पुढच्या ट्रेकचा बेत ठरवत आम्ही गाडीत बसलो.
(ता.क. - मिपावर लेख लिहीण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे स्वागत.)
प्रतिक्रिया
19 Jan 2010 - 3:24 pm | सन्दीप
फोटो लवकरच चिकटवत आहे. त्या शिवाय मजा नाही मित्रा. बाकी वर्णन छान.
सन्दीप
19 Jan 2010 - 3:51 pm | झंडुबाम
असेच ट्रेक करत रहा.
विंचूकड्याचा फोटो एकदम सही आहे.
झंडुबाम
19 Jan 2010 - 4:41 pm | sneharani
मस्त ट्रेक वर्णन...
फोटोदेखील छान...
19 Jan 2010 - 10:24 pm | प्रभो
मस्त
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
20 Jan 2010 - 10:33 pm | मॅन्ड्रेक
चलते रहो. आम्ही देहिल गेलो होतो. मागच्या महिन्यात.
एथे नोंद केलि होति.
at and post : Xanadu.
22 Jan 2010 - 10:24 am | नाखु
छान वर्णन सुरेख छाया चित्रे....
22 Jan 2010 - 10:29 am | मदनबाण
झकास वर्णन आणि मस्त फोटो... :)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
22 Jan 2010 - 8:27 pm | मेघवेडा
उत्तम वर्णन आणि सर्व छायाचित्रेही उत्तम आहेत..
अशीच सफर आम्हांस घडवत राहा!
- मेघवेडा.
आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे?
22 Jan 2010 - 8:42 pm | प्राजु
सह्ही!
छान लिहिले आहे.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/