मी भटकंती का करतो?

भटकंती अनलिमिटेड's picture
भटकंती अनलिमिटेड in कलादालन
13 Jan 2010 - 1:39 am

"मी भटकंती / ट्रेक्स का करतो?" मला कुणी हा प्रश्न विचारलात एका शब्दात मी म्हणेन "खाज"..!!!
हो हेच उत्तर आहे खरे. पण जेव्हा मी स्वतःलाच हा प्रश्न विचारतो तेव्हा असे उर्मट उत्तर देऊ शकत नाही. [कुणापेक्षाही स्वतःचा आदर करावा माणसाने :-) ] एक तर हा प्रश्नच का असावा? उलट प्रश्न असा असावा: तू (आणि आणखी मोजके काहीजण) सोडून बाकी लोक भटकंती / ट्रेक्स का करत नाहीत? असो करणं - न करणं ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण जेव्हा मी खरंच स्वत:ला असे विचारतो तेव्हा माझा आतला आवाज काय बरे सांगत असतो? असाच एके दिवशी तंद्रीत काही उत्तरं ऐकू आली मला माझ्याच आतमधून. बऱ्याच उत्तरांमध्ये खाज, माज, मस्ती, रग आणि तत्सम शब्दही ऐकू आले :-) आणि ते नाही आले तरच नवल... कारण त्याशिवाय काही माणूस पहाटे साडेतीनला उठून गाडी दामटवत सह्याद्रीच्या ऊन-वाऱ्यात झोकून द्यायचा नाही.

मला आठवतंय जेव्हा मी पहिला ट्रेक (?) केला... चौथीतच होतो. शेंबूड पुसायची पण अक्कल नव्हती. शेजारच्या काही मंडळींबरोबर मी आणि पप्पा डबे घेउन सिंहगडावर निघालो होतो. त्या वेळी सिंहगड म्हणजे "अबब... किती दूर आहे" अशी अवस्था होती. स्कूटरमधे (Bajaj Cub - 1987 model) कँपात सिल्व्हर ज्युबिलीच्या पंपावर पेट्रोल टाकले आणि आम्ही स्वारगेटवरुन व्हाया सिंहगड रोड खानापूरला पोचलो. तिकडे पप्पांनी सांगून टाकले की मी गाडीवर वरती येणार आणि तुम्हांला चालत यायचे तर या. आजच्या एवढीच खाज होती त्यावेळी ना... मग आम्ही चालत वर गेलो होतो. येही सरळ रस्त्याने न जाता शॉर्टकट मारत मारत. वरती पोचता पोचता पप्पा रुमाल हलवून आम्हांला प्रोत्साहन देत होते. आजही मला वाटचाल करताना ते आज नसले तरी त्यांचीच मूर्ती समोर दिसते, प्रोत्साहन देणारी. हा माझा पहिला धडा. त्यानंतर चौथीला प्रतापगड पाहिला. सहावीला असताना शाळेत असताना बाईंनी विचारले होते सहलीला कुठे जायचे तर माझे उत्तर सिंहगड होते. आणि माझ्या सांगण्यावरुन गेलोही तिकडे. सगळ्यात आधी मीच.. वर चढण्यात, सगळी ठिकाणे दाखवण्यात आणि खाली उतरण्यात पण (कारटं पहिल्यापासूनच आगाऊ आहे).

खरा ट्रेक केला तो लोहगड... सन-२००० च्या पावसाळ्यात. पहिलटकरणीसारखी अवस्था होती. ट्रेक म्हणजे नक्की काय करायचे असते ते माहीतही नव्हते. पण वरती पोचल्यावर जे काही अनुभवले ते अविस्मरणीय होते. आम्ही जात असतानाच लोहगडवाडीतून परत येणारा ग्रुप दिसला आणि त्यात एक अंध मुलगा...

लोहगडावर मुक्कामी ट्रेक करुन ते परत निघाले होते. तेव्हाच वाटले हे की बास इथून पुढे कधीच थकायचं नाय, दमायचं नाय. आजवर जे काही ट्रेक केलेत, किल्ले पाहिलेत त्यात प्रत्येक वेळी तो अनामिक मुलगा माझे स्फूर्तिस्थान राहिला. असाच अनुभव मला गेल्या वर्षी पुरंदर-वज्रगडाच्या ट्रेकमधे आला. पायाने अधू असणारा एक अनामिक ट्रेकर गड चढून वर आलेला मी पाहिला. या डोंगरांनीच मला ही गोष्ट शिकवली. थांबायचं नाय, थकायचं नाय, दमायचं नाय. ट्रेकमध्ये आणि आयुष्यातही. कितीही निराशेने मनाला ग्रासले तरी कुठे तरी आशेचा दिवा तेजाळत असतो आणि सांगतो "ऊठ रे मर्दा, असे अश्रू आणि घामाचे थेंब कधी वाया घालवायचे नसतात, दाखवायचे तर मुळीच नसतात. तर धीराने त्यांना जगापासून लपवून बालेकिल्ला गाठायचा असतो. तुला पाणी आणि सावली देणारे असंख्य दूत देवाने पाठवले आहेत. फक्त तू चालता हो." आता सांगा हे असे शिक्षण कुठल्या विद्यापीठात आणि किती पैसे फेकून मिळेल?

लोहगडानंतर आपसूकच समोरच्या विसापूरने साद घातली आम्ही देखील त्याला ओ देत कित्येकदा त्याची माती भाळी लावली. त्यावेळी सह्याद्रीचा रांगडेपणा अनुभवला आणि तोच मनाला भावला. जो काही कस काढणे म्हणतात (मी नवीन असल्याकराणाने) तिथे दिसला. वाळलेले गवत, निसरडी माती आणि वरुन तापते ऊन अशा विरुद्ध परिस्थितीत मार्ग काढताना नकळत एक जीवनाचे भान येत गेले, एक तत्त्वज्ञान समजत गेले. ते मला एरव्ही कुणी पन्नास पुस्तके कोळून दिली असती तरी आले नसते.

शहरी गलबलाटात माझे मन कधीच रमले नाही आणि रमणारही नाही. पाच दिवस जगरहाटीत घालवले की एक दिवस तरी मला माझ्यासाठी हवा असतो. शहराच्या गल्ली-बोळांतून आणि हॉर्नच्या कोलाहलातूनच मला सह्याद्रीची आव्हानात्मक हाक ऐकू येते "गड्या कधी येतोस? आख्खे पाच सात दिवस झाले भेटून!" काही दिवस आपल्या नेहमीच्या वर्तुळात काढले (खळ्याला जुंपलेल्या बैलासारखे) की एक प्रकारचा माज चढतो आपल्याला. मग तो पदाचा, प्रतिष्ठेचा, आपण करत असणाऱ्या कामाचा, मिळणाऱ्या ’पॅकेज’चा किंवा अन्या काही भौतिक गोष्टींचा असू शकतो. मग त्या बैलाला वाटते की मीच या खळ्याचा मालक आहे. एकदा सह्याद्रीचा ताशीव कातळकडा पाहिला आणि त्याला चिकटून घोरपडीसारखे वर चढून गेलात की तुम्हांला समजते की तो माज किती मागे सोडून आपण आलो आहोत. शिखरावर-बालेकिल्ल्यावर पोचल्यावर एकदा

भव्य सह्यकडा डोळ्यांत मावतो का पाहा. त्यावरुनच आपण किती खुजे आहोत हे समजून येईल. एकदा इथला हाडं गोठवणारा गारठा अनुभवा. रानवारा कानांत भरुन घ्या. ऑफिसमधला एसी झक मारेल त्याच्यापुढे. धोधो कोसळणाऱ्या धबधब्याखाली भिजा. जकुझी आणि शॉवर भिकार वाटू लागतील. खळाळत्या ओढ्याचे (अगदी चहाच्या रंगाचे दिसले तरी) पाणी पिऊन नशा घ्या. व्हिस्की-रम-स्कॉचच्या तोंडात मारेल. संध्याकाळच्या संधीप्रकाशात कड्यावरुन पाय खाली सोडून बसा आणि मनाला येईल तेवढ्या मोठ्या पडद्यावर खाली दरीत दिसणारा सोनेरी प्रकाश आणि आणि त्यावर चमचमणाऱ्या नदीचा आणि तिच्या तीराशी चाललेला रोमान्स अनुभवा. जगातले कुठलेही मल्टीप्लेक्स हा आनंद देऊ शकणार नाही. रात्री चुलीवर केलेली उरलेली मूगखिचडी आणि गरम मॅगी खाऊन मग बिनदुधाचा चहा प्यायले की सकाळचा ब्रेकफास्ट होतो. ट्रेक संपला की पायथ्याच्या गावात एका मामांच्या घरी आधीच सांगून गावरान कोंबडी चापली जाते त्याला KFCची सर नाही.

या सह्याद्रीच्या कुशीतल्या जीवनात जे काही शिकलो ते क्वचितच मला इतरत्र कुठे शिकता आले असते. पहिला कांदा कापला तो नाणेघाटाच्या गुहेत, डोळ्यांत पाणी येईपर्यंत. नंतर पाणी न येता कापायचे तंत्र पण जमले. खिचडी करण्यात तर आपला हातखंडा आहे. ती पण मी अशाच कुठल्या तरी ट्रेकमध्ये शिकलो. आहे त्या सामानात भागवायचे (resource management), आपले काम आपणच करायचे (self sufficiency), इतरांना मदत करत करतच टीमवर्कचे धडे गिरवायचे. आपल्या बरोबरीने असणाऱ्या ट्रेकरचा उत्साह वाढवायचा (encouragement), कसेही करुन डेडलाईन पाळायच्या (timelines) हे आम्हांला कॉर्पोरेट जीवनात पण उपयोगी पडतेच की.

सह्याद्रीच्या नेहमीच्या दृश्याने आता आमचे सौंदर्याचे मापदंड पण बदलले आहेत. सूर्योदय हा तोरण्याच्या माचीवरुन राजगडाच्या बालेकिल्ल्याच्यामागूनच व्हावा. सुर्यास्त हा कोकणकडा, रायगडचा होळीचा माळ आणि नाणेघाटासारखा डोळ्यांच्या पातळीखाली (below eye level) झाला तरच सुंदर दिसतो. समुद्र असावा तर तो सिंधुदुर्गाच्या भोवतालीच. पाऊस पडावा तर अगदी धो-धोच. ढगांचा गडगडाट व्हावा तो अगदी कानाचे पडदे फाटून जाईपर्यंत. या भीषण, रौद्र, रांगड्या रुपातच सह्याद्रीची सुंदरता आहे. माझे सौंदर्यबुद्धी त्यानेच विकसित केली.

गोनीदा सांगतात ना...
हे दुर्ग म्हणजे काही लोणावळा, माथेरान किंवा आपल महाबळेश्वर नव्हे. नुसत डोंगर चढणं आहे. रान तुडवणं आहे. स्वत:चं अंथरूण पांघरूण पाठीवर वागवीत रानोमाळ हिंडाव लागतं. तिथं असतो भराट वारा. असतं कळा कळा तापणार ऊनं. असतात मोकाट डोंगरदरे. पण हे आव्हान असतं जिद्दीला. पुरूषार्थाला...! ध्यानात घ्या, तिथं आपले पराक्रमी पूर्वज काही एक इतिहास घडवून गेले आहेत. कित्येकदा त्यांचा जय झाला. कित्येकदा पराभवही. कधी कधी दुर्गुणांनी त्यांच्यावर मात केली असेल. हे बलवंत दुर्ग मुकाट्यान शत्रूच्या ताब्यात द्यावे लागले असतील त्यांना. त्या सगळ्या प्राचीन इतिहासाच स्मरण हा आहे या दुर्गभ्रमंतीमागचा उद्देश...!"

आतापर्यंतच्या ५३ किल्ल्यांच्या भेटीतून मी स्वतःला हरप्रकारे समृद्ध केले आहे. या गडकोटांनीच आपला इतिहास अनुभवला आहे. कित्येक सुवर्णमयी क्षणांचे ते मूक साक्षीदार आहेत. अनेक भीषण पराभवही त्यांनी तितक्याच धीरोदत्तपणे पचवले आहेत. त्या अनुभवांवरुन त्यांचे विजयी गुण आत्मसात करावेत, पराभवास कारणीभूत झालेली कारणे दूर ठेवावीत. त्याचे निराकरण कसे करावे याचे ज्ञान मिळवावे. कालातीत युगपुरुषांच्या नखाचा का होईना गुण आपल्यात उतरवावा. सगळा द्वेष, राग, मत्सर दूर व्हावा. गडवासीयांच्या कष्टांची जाणीव राहावी आणि त्या दिसलेल्या दोन ट्रेकर्सबद्दलचा आदर नेहमी दुणावत जावा... म्हणून तर मी ट्रेक / भटकंती करतो... आणि करत राहीन (च)...!!!
.
.
.
.
-Pankaj भटकंती Unlimited
http://www.pankajz.com/

प्रवास

प्रतिक्रिया

मिसळपाव's picture

13 Jan 2010 - 3:02 am | मिसळपाव

पंकज,
काय सुंदर लिहिलं आहेस. दुर्दैवाने शहरी आयुष्यात आपण निसर्गापासून किती लांब रहातो ते लक्शात पण येत नाही. आणि किती नगण्य आहोत ते पण....

मीनल's picture

13 Jan 2010 - 6:16 am | मीनल

दुसरा फोटो आवडला.
तो आनंदचा सर्वात वरचा बिंदू दर्शवतो आहे.

मीनल.

प्रभो's picture

13 Jan 2010 - 6:19 am | प्रभो

आता कसं वाटतंय..??..बरं बरं वाटतंय.....

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

टारझन's picture

13 Jan 2010 - 11:51 am | टारझन

जबराट लिखाण ! आणि दोन नंबरचा फोटो तर केवळ एक नंबर !
बेष्ट !

- टारझन

सहज's picture

14 Jan 2010 - 10:49 am | सहज

हेच म्हणतो.

मी-सौरभ's picture

14 Jan 2010 - 1:55 pm | मी-सौरभ

अवांतरः टारोबा बर्याच दिवसांनी
'टारझन' अशी सही केलीत????

-----
सौरभ :)

घाटावरचे भट's picture

13 Jan 2010 - 6:50 am | घाटावरचे भट

फारच छान!!

हर्षद आनंदी's picture

13 Jan 2010 - 6:58 am | हर्षद आनंदी

आपणा भटक्यांची मानसिकता अगदी अचुक शब्दात मांडली आहेस.

या डोंगरांनीच मला ही गोष्ट शिकवली. थांबायचं नाय, थकायचं नाय, दमायचं नाय. ट्रेकमध्ये आणि आयुष्यातही. कितीही निराशेने मनाला ग्रासले तरी कुठे तरी आशेचा दिवा तेजाळत असतो आणि सांगतो "ऊठ रे मर्दा, असे अश्रू आणि घामाचे थेंब कधी वाया घालवायचे नसतात, दाखवायचे तर मुळीच नसतात. तर धीराने त्यांना जगापासून लपवून बालेकिल्ला गाठायचा असतो. तुला पाणी आणि सावली देणारे असंख्य दूत देवाने पाठवले आहेत. फक्त तू चालता हो."

अगदी खरे आहे... म्हणुनच सह्याद्रीच्या कुशीत दीवस-रात्र भटकताना आयुष्य जगल्यासारखे वाटते.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

चित्रा's picture

13 Jan 2010 - 7:07 am | चित्रा

मनमोकळे, आणि दुसरा फोटोही छान.

सुनील's picture

13 Jan 2010 - 10:21 am | सुनील

सुंदर प्रकटन. दुसरा फोटो अप्रतिम!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

झकासराव's picture

13 Jan 2010 - 12:18 pm | झकासराव

उत्तम लिहिलय.
दोन नंबरच्या फोटोत जे अचुक टायमिंग साधलय त्याला तोड नाही. :)

भाग्यश्री कुलकर्णी's picture

13 Jan 2010 - 12:26 pm | भाग्यश्री कुलकर्णी

जबरदस्त लिहलंय.आणी तो २रा फोटो तर सहीच आहे.

अमोल केळकर's picture

13 Jan 2010 - 12:29 pm | अमोल केळकर

वा मस्त .असंच फिरत रहा !

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

विशाल कुलकर्णी's picture

13 Jan 2010 - 12:33 pm | विशाल कुलकर्णी

मस्त.... आवडलं ! या कलंदर जगण्याची नशा काही औरच असते ! :-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

विमुक्त's picture

13 Jan 2010 - 2:04 pm | विमुक्त

मी भटकंती का करतो? हा प्रश्न... मी का जगतो? इतकाच अवघड आहे... काय उत्तर देणार ह्याला, पण तु उत्तर द्यायचा छान प्रयत्न केलायस...

एकदा भटकायला लागलात की भटकंती म्हणजेच जगणं होऊन जातं... बरंच काही शिकायला मिळतं... सगळ्यात जास्त काय शिकायला मिळत असेल तर ते म्हणजे "humility"...

फ्रॅक्चर बंड्या's picture

14 Jan 2010 - 10:24 am | फ्रॅक्चर बंड्या

मी भटकंती का करतो? हा प्रश्न... मी का जगतो? इतकाच अवघड आहे++
खरेच लेख भारी आहे...
binarybandya™

गणपा's picture

13 Jan 2010 - 2:09 pm | गणपा

पंकज,
फार सुरेख लिहिलं आहेस.
दुसर्‍या फोटोतल टायमिंग जबरा आहे..

चांभार चौकशी: कितिवेळा उड्या मारायला लागल्या हो?

sneharani's picture

13 Jan 2010 - 2:30 pm | sneharani

अन् मस्त फोटो...सूंदर
दुसरा फोटो छानच आहे.

ज्ञानेश...'s picture

13 Jan 2010 - 4:57 pm | ज्ञानेश...

अगदी मनातून आलेले लिखाण...
खूप आवडले!

चतुरंग's picture

13 Jan 2010 - 5:37 pm | चतुरंग

मनापासून आलेले प्रकटन. भटकंती ही मनात रुजते आणि मग पावलातून उमटते. दुर्गभ्रमंती ही वेड लावणारीच गोष्ट आहे.
तुझ्या भटकंतीला आणि त्यामागच्या विचारांना सलाम!!

चतुरंग

मदनबाण's picture

13 Jan 2010 - 5:48 pm | मदनबाण

पंकज मस्त लिहले आहेस...च्यामारी मला सुद्धा फिरायची लयं इच्छा झाली बघ.
तुझा ब्लॉग सुद्धा फार छान आहे.
फोटो === क्लास वन !!! :)

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

ऋषिकेश's picture

13 Jan 2010 - 7:08 pm | ऋषिकेश

अतिशय प्रांजळ प्रकटन.. थेट भिडले
त्यात शेवटचे दोन फोटो तर क्या कहने!!! अगदीच छान

बाकी समांतर अवांतरः गेल्या वर्षी कुर्गच्या ट्रेकला एक काकू आल्या होत्या. त्या सांगत होत्या की "मला बरेच जण विचारतात की तुम्ही उगाच इतके डोंगर का चढता? पूर्वी मी त्यांना उत्तरं द्यायचा प्रयत्नही करायचे आता मात्र सांगते.. काचढते? उतरण्यासाठी!" मला हे उत्तर फार आवडलं

-ऋषिकेश

अक्षय पुर्णपात्रे's picture

13 Jan 2010 - 8:20 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री झरेकर, मनस्वी प्रकटन आवडले. गोनिदांच्या 'दुर्गभ्रमणगाथा'ची आठवण झाली. आपले निसर्गावरील प्रेम व त्याच्या सान्निध्यात जावेसे वाटणे हे पटतेच. परंतु शहरांतही भटकायला मजा येते. मला शहरांमध्ये लांब लांब पायी भटकायला आवडते. शहरी कोलाहल नेहमीच घुसमटवणारा नसतो बर्‍याचवेळा त्यात दुर्दम्य मानवी इच्छाशक्तीचे त्राण हलका करणारा मोकळेपणाही असतो, असे माझे मत आहे.

स्वाती२'s picture

14 Jan 2010 - 3:34 am | स्वाती२

सुरेख प्रकटन! दुसरा फोटो खास!

टुकुल's picture

14 Jan 2010 - 8:50 am | टुकुल

एकदम जबरा लेखन आणी फोटोज,
मानल भौ तुम्हाला !!

--टुकुल

II विकास II's picture

14 Jan 2010 - 8:53 am | II विकास II

तुमचे भटकंती विषयीचे विचार आवडले.
तुमच्याबरोबर बसुन चर्चा करायला आवडेल.
तुम्ही अनुदिनी/डायरी लिहीता का? जर तुम्ही असेच अनुभव लिहीत राहीलात तर एक चांगला दस्तएवज तयार होइल.

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Jan 2010 - 11:03 am | बिपिन कार्यकर्ते

ए क स ल न् ट ! ! ! ... बास....

बिपिन कार्यकर्ते

जे.पी.मॉर्गन's picture

14 Jan 2010 - 11:50 am | जे.पी.मॉर्गन

झक्कास लेखन ! मनोगत खूप आवडलं !

शितल's picture

14 Jan 2010 - 1:06 pm | शितल

फोटो तर सुरेखच, असेच उठावे आणी गडावर जावे असे वाटले हेच लिखाणाचे श्रेय :)

शक्तिमान's picture

14 Jan 2010 - 1:38 pm | शक्तिमान

पंकजभाऊ.. काय लिहिले आहे.. तोड नाही.. असा वाटतं की मीच माझ्याशी बोलत आहे...

एक तर हा प्रश्नच का असावा? उलट प्रश्न असा असावा: तू (आणि आणखी मोजके काहीजण) सोडून बाकी लोक भटकंती / ट्रेक्स का करत नाहीत?

हे एकदम पटले...

कानडाऊ योगेशु's picture

14 Jan 2010 - 5:38 pm | कानडाऊ योगेशु

लेख सुरेख लिहिला आहे.
वडिलांची असलेली ह्रद्य आठवण,अंध मुलापासुन आणि अपंग मुलापासुन घेतलीली प्रेरणा हळवे करुन गेली.
असेच भटकत राहा.!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

jaypal's picture

14 Jan 2010 - 6:07 pm | jaypal

लेख आणि फोटो.
"सगळा द्वेष, राग, मत्सर दूर व्हावा. गडवासीयांच्या कष्टांची जाणीव राहावी आणि त्या दिसलेल्या दोन ट्रेकर्सबद्दलचा आदर नेहमी दुणावत जावा... म्हणून तर मी ट्रेक / भटकंती करतो... आणि करत राहीन (च)...!!!"
पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा. सगळ्यांच मंगल होवो
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

बहुगुणी's picture

16 Jan 2010 - 6:42 pm | बहुगुणी

..."काही दिवस आपल्या नेहमीच्या वर्तुळात काढले (खळ्याला जुंपलेल्या बैलासारखे) की एक प्रकारचा माज चढतो आपल्याला. ...... मग त्या बैलाला वाटते की मीच या खळ्याचा मालक आहे. एकदा सह्याद्रीचा ताशीव कातळकडा पाहिला आणि त्याला चिकटून घोरपडीसारखे वर चढून गेलात की तुम्हांला समजते की तो माज किती मागे सोडून आपण आलो आहोत."

असं वाटलं या वरच्या शब्दांत सर्वोत्तम कारणमीमांसा आहे भटकण्याच्या उर्मीची, अचूक वर्णन, जियो!

फोटोग्राफरची कमाल आहेच, पण त्या दुसर्‍या फोटोतल्या व्यक्तीलाही चक्रासन उत्तम येत असणार! शिवाय जमीन इतक्या जवळ असतांना पाय झटकन् अंगाखाली आणून land होणंही सोपं नक्कीच नाही! तेंव्हा दोघांचंही timing लाजवाब!

आणखी लिहा, आम्ही सर्व वाचत राहू.

शाहरुख's picture

18 Jan 2010 - 12:22 am | शाहरुख

चांगले लिहिले आहे..

मेघवेडा's picture

19 Jan 2010 - 4:49 pm | मेघवेडा

मस्तच! दर्जेदार लिखाण, फोटोग्राफीही उत्तम! वरचा क्लास अगदी!

आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे?

चिखलू's picture

23 Jan 2010 - 4:57 am | चिखलू

सलाम पंकज ...
अतिशय सुरेख .....
हा लेख आणि विमुक्त यांचे फोटो बघून जुन्या आठवणी जाग्या झाल्या (होतात)...
खाज मलाही होती पण आता न खाजवण्या इतका आळस अंगात भिनला आहे.
आता जरा विचार करायला हवा..........