टेबल वरच घड्याळ कानात कर्कश्य गजरलं.
सकाळच्या सात वाजता माझी भली पहाट झाली होती.
जड पापण्या अतिकष्टाने उचलून डोळे किलकिले केले.
हॉटेल रूमच्या बाल्कनीला लावलेल्या पडद्यांच्या फटीतून थोडासा प्रकाश आत डोकावत होता.
खरतर उजाडताना बाहेर पाहायच होत. म्हणून तर सूर्योदयाच्या वेळी मला उठवून जागं करायची तंबी घड्याळाला देऊन ठेवली होती.
आळसाला बिछान्यात गुंडाळून ठेवलं. त्यातून माझ्या शरीराला अलगद सोडवून घेऊन बाल्कनीत लोटलं.
झुंजुमुंजू सकाळ रवीला साद घालत होती.
तोही जरासा चुळबूळ करू लागला होता.
त्या रवीशी मनातल्या मनात शर्यत लावली. "बीच वर कोण आधी पोचतय, तू की मी? ते बघुयाच."
माझ शरीर घाईघाईने बाथरूम मधे नेल.
जमेल तितक्या पटापट तिथले सर्व काही उरकून कपडे बदलले आणि लिफ्टची वाट न पाहता जिन्यांवर उड्या मारत खाली आले.
हॉटेलच्या मागच्या बाजूने असलेल्या स्विमिंग पूलच्या कडेच्या भिंतीचे लोखंडी फाटक उघडून दोन तीन लाकडी पाय-या उतरल्या.
लागलीच बारीक पांढरी वाळू दिसली.
पायातल्या स्लिपर्स काढून हातात घेतल्या आणि एक पाय खाली टाकला.
अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यातील डेटोना बीचवरच्या वाळूत...
थंडाव्याने शरीरावर सरकन काटा आणला.
दोन्ही पाय भराभर उचलत खालच्या वाळूकडे पाहतच पाण्यापाशी पोचले आणि वर पाहिलं.
तिथल दृश्य पाहून माझ भानच हरपल.
रवीशी नुकत्याच लागलेल्या शर्यतीतील मी विजेती ठरले होते ते मी विसरूनच गेले.
आभाळाने त्याचा काही भाग निळ्या रंगाने रंगवला होता.त्यावर गडद निळ्या-काळ्या ढगांची वेलबुट्टी काढली होती. त्या अजूबाजूला लाल, केशरी, पिवळा रंग कोरून भरला होता.
ही जय्यत तयारी केली गेली होती राजाच्या आगमनसाठी.
मी आतापर्यंत ज्याला एकेरीवर येऊन बोलावत होते तो रवी या ब्रम्हांडाचा चालक रवीराज आहे याची मला तिथे जाणिव झाली.
पिठीदार वाळूचा गारेगार सुखद स्पर्श अनुभवत रविराजाच्या आगमनाच्या पथाकडे मी लक्ष केंद्रित केल आणि त्यांच्या स्वगताला सज्ज झाले.
सर्व वातावरण राजाच्या दर्शनासाठी आसुसले होते.
आतुरता अधिक ताणून ने ठेवता सोनसळी अंगरखा घालून रविराज दिमाखात प्रकटले.
त्या दैदिप्य झगझगाटाने सर्व आभाळच काय तर सर्व सृष्टीच प्रकाशली.
डेटोना येथिल समुद्रातील लाटा हरखून हेलावून गेल्या.
आभाळातल्या त्या तेजपुंज सोनेरी अग्नीच्या गोळ्याला थंङावा देण्यासाठी त्यांची उछलकुद सुरू झाली.
आणि माझ लक्ष त्या समुद्रावर गेल.
इथून तिथवर अफाट पसरलेला तो अटलांटिक महासागर!
आकाशी रंगांची छाप स्वतःवर पाडून घेऊन आभाळाच्या निळाईत विलीन होणारा...
लांबवर दिसतय तिथपासूनच्या गडद निळ्या रंगांपासून ते किनारावरच्या पांढ-या वाळूच्या रंगांपर्यंत विविध छटांच्या लाटांची ओढणी पांघरलेला.
प्रत्येक लाटेचा मुरका आगळा आणि ठुमका वेगळा...लोभस... स्वतःत गुंतवून ठेवणारा..
कधी लाजत तर कधी मुरकत अलगदपणे किना-यावर येऊन चुळबुळत राहिलेल्या...
मधेच आवेगात फेसाळात येत समोर उभ्या ठाकलेल्या...
रवीराजाच्या स्वागतासाठी सज्ज...
या स्वागतासाठी तसेच आगमनाचा सोहळा पाहण्यासाठी त्या किना-यावर माझ्या आधीच काही प्रेक्षक उपस्थित राहिले होते.
सी गल समुद्र पक्षी.
सूर्योदयाचे मनोहर दृश्य ते अतिशय स्तब्धपणे पहात होते. थोडे संकोचलेल्या पाहुण्यांसारखे..
राजे जसजसे पुढिल मार्गक्रमणास लागले तस तशी या प्रेक्षकात हालचाल सुरू झाली.
किना-यावर जमलेल्या त्या सी गल पक्षी समूहात एकच लगबग उडाली.
मला या पाहुण्यांची गंमत वाटली.
त्यांचे फोटो काढायला मी हातातला कॅमेरा सरसावला.
"आम्ही पाहुणे? आम्ही तर इथले स्थानिक रहिवाशी. पाहुणी आहेस तू." थव्यामधला म्होरक्या सीगल म्हणाला.
मी ही ते कबूल केले कारण खरोखर मी होतेच टूरिस्ट तिथे.
टूरिस्टनेच तर नविन जागेबद्दल, रहिवाश्यांबद्दल, त्यांच्या जिवनमानाबद्दल माहिती काढायची .त्यांनी नाही तर कुणी काढायची?
मी त्या रहिवाश्याच्या गप्पा कान लावून ऐकल्या. हालचाली टिपल्या.
सीगल पंत सकाळच्या प्रहरी एका पायावर उभ राहून योग करत होते.
पेहेलवान सी गल पाण्यात उभ राहून आपल अंग शक्य तेवढ पसरून व्यायाम करत होता.
सौ. सी गल आपल्या दोन लहान मुलांना घेऊन तिथे पोचल्या होत्या. आई चा जीव वर खाली होत होता. ती डोळ्यात तेल घालून त्यांच्याकडे लक्ष ठेऊन होती.
मुल डोक्यात वारं शिरल्यागत एकदम खुशीत इकडे तिकडे सैरावैरा पळत होती. लहानग्याला पडाधडायची अजिबात भिती नव्हती.
मिसेस सी गल आणि मॅडम सी गल बीच वर जमून शेजारणीच्या कुचाळक्या करत होत्या.संध्याकाळी तिला काय टाँट मारायचा याबद्दल आखणी चालली होती.
श्री. सीगल आपल्या वाढलेल्या आकारमानाच्या प्रतिबिंबाकडे पाहून गहन विचारात पडले होते.
मिस. सी गल ओठांना लिप्सटिक लावूनच मॉर्निंग जॉगिंगसाठी बीचवर अवतरल्या होत्या.
एक तरूण सी गल स्विमिंग करता करता आजूबाजूला बर्ड वॉचिंग करत होता.
रिटायर्ड सीगल आजोबा आपल्या झपाट्याने -हास होणा-या शक्तीच्या विचाराने चिंतातूर झाले होते.
सीगल आजी दुख-या पायांना खा-या पाण्याने मालिश करून घेत होत्या.
मिस्टर सीगल तर ऑफिसमधल्या पहिल्या मिटिंगच्या वेळेआधी पोचायच्या घाईत होते.
माझी सावली माझ्याच पायापाशी गोळा झाली तेव्हा लक्षात आल की बरेचसे सीगल आपापल्या कामासाठी निघून गेले आहेत.
ते काही रिकामे नव्हते.
मी रिकामी असले तरी त्या जागी पाहुणी म्हणून आलेले होते.
म्हणूनच तिथे उपस्थित असल्या नसल्या सी गल्सना निरोप देऊन मी ही पुढिल ठिकाणी जाण्यास मार्गस्थ झाले.
प्रतिक्रिया
10 Jan 2010 - 8:06 am | सहज
मस्त!
विठ्ठला पांडूरंगा! पूर्वी असे बीच फक्त प्रौढांसाठी असायचे हो! @)
14 Jan 2010 - 8:53 am | llपुण्याचे पेशवेll
मस्त.लेखन आणि फोटू लै भारी. आठवणींनी अमळ हळवा झालो.
ह्या फ्लोरिडावर आमचाही भारी जीव आहे हो.
बाकी
विठ्ठला पांडूरंगा! पूर्वी असे बीच फक्त प्रौढांसाठी असायचे हो! यातले पूर्वी म्हणजे कधी? तो साऊथ बीच तसलाच आहे म्हणे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
10 Jan 2010 - 7:54 am | प्रियाली
आम्हीही गेलो होतो डेटोनाला या वर्षी. डेटोनाच्या पांढर्या वाळूवर पाऊल टाकताच नेहमीप्रमाणेच, आम्ही जेथे जेथे पोहोचतो तेथे तेथे आमच्या मागावर असणारे वादळ आले आणि आम्ही परत!
10 Jan 2010 - 8:00 am | प्राजु
क्लास फोटो.
नुसतीच नजर फिरवली आहे लेखावरुन.
नीट वाचेन सवडीने. आणि सविस्तर प्रतिक्रिया देईन.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
10 Jan 2010 - 9:03 am | टारझन
व्वा !! काय क्लास आहे बीच ! फोटो लै भारी :)
सिगल परिवार अंमळ आणंदात आहे तर ;) मला ते आपलं वाढलेलं प्रतिबिंब पहाणारं सिगलभाईचं चित्र आवडलं !!
पण एक गोष्ट काय पटली नाय बॉ .. इथे फक्त चार लायनी लिहील्या असत्या, दोन फोटू चिटकवले असते , आणि "पुढे वाचा" म्हणून आपल्या ब्लॉगवर पुढचा लेख वाचायला लावला असता तर आमच्या मनात अंमळ आनंदाचे 'झरे" खळखळ वाहिले असते :)
त्यात सुरेख असं डिस्क्लेमर टाकून " आम्ही आमच्या ब्लॉगची ट्राफिक वाढवून पैसे कमवत नाही हो " असं ठणकावलं असतं तर क्या कहने :) चार चांद लागले असते :)
- Udhas टारकंती Ultimate
10 Jan 2010 - 2:04 pm | मदनबाण
व्वा... मस्त लेख. :)
काही फोटु का बरं दिसत नाहीत ? :?
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
10 Jan 2010 - 2:41 pm | II विकास II
१,२ व ४ हे फोटो दिसत नाहीत.
10 Jan 2010 - 7:01 pm | मीनल
टारझनची आयडिया बरी आहे नाही का ?
एक तर जाहिरात होईल माझ्या ब्लॉग ची
आणि इथे न दिसत असलेले फोटो ही दिसती तिथे.
http://meenalgadre.blogspot.com/
:D
मीनल.
10 Jan 2010 - 9:29 pm | टारझन
छे छे :) ही कसली टारझन ची आयडिया . हे श्रेय मी घेऊ शकत नाही ;)
अवांतर : ब्लॉगवरची लाट अंमळ रोमहर्षक आहे :)
10 Jan 2010 - 8:32 pm | चित्रा
आणि लिहीलंयही छान. पहिले पायाला लागलेल्या वाळूच्या गारव्याचे वर्णन वाचून पूर्वीची एखादी मुरूड- जंजिर्याची भेट परत अनुभवते आहे का काय असे वाटले. सुरेख लिहीला आहे लेख.
12 Jan 2010 - 11:52 pm | मी-सौरभ
-----
सौरभ :)
13 Jan 2010 - 6:23 am | मीनल
बीच अतिशय शांत होता आणि सकाळी तसाच असतो.म्हणूनच तर
ते सी गल्स आपापल्या जगात सुरक्षित दिसत होते.
एकट दुकट जॉगिंगसाठी /फिरायला आली होती. त्यात अजून मी आणि माझे यजमान. आम्ही ही शांतता खूप एंजॉय केली.
मीनल.
13 Jan 2010 - 12:19 am | प्राजु
आज लेख पूर्ण वाचला. अतिशय सुंदर, आणि मोहक झाला आहे.
सुर्योदयाचे वर्णन तर खूपच छान.
मस्त!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
13 Jan 2010 - 1:27 pm | परिकथेतील राजकुमार
आ हा हा !
केवळ अ प्र ति म !! पारणे फिटली डोळ्याची.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
13 Jan 2010 - 3:57 pm | sneharani
मस्तच्...छान लिहलयं
काही फोटो का दिसत नाहीत?