सर्व मिपाकरांना आणि त्यांच्या प्रियजनांना २०१० च्या आरंभी मनापासून शुभेच्छा.
आज ही तळलेली कोलंबीची थोडी वेगळी पाककृती करून पाहिली. मध्यंतरी बाहेरगावी गेले असताना एका कुठच्याशा हॉटेलात थांबलो होतो, तिथल्या शेफने केलेली नारळ लावून ग्रिल केलेली कोलंबी चाखली होती, त्यामुळे तशी चव येते का ते करून पाहावे, अशी इच्छा होती. त्या पाककृतीत काय होते हे आठवत नाही. किंचित आंबट-गोड चव होती, आणि नारळ होता, त्यावरून ती बहुदा थाई पाककृतीवर आधारित असावी असा माझा समज तेव्हा झाला होता. त्यामुळे आज थोडा वेळ असल्याने, घरात कोलंबी असल्याने (आणि लेमनग्रासही!) ही पाककॄती करून पाहिली. पण ते करताना मी बरेच, बहुदा गरज नसलेले, प्रयोग केले आहेत, आणि घरात असलेल्या पदार्थांवर भागवले आहे, त्यामुळे ती झाली तशी झाली! चवीत आवडीप्रमाणे थोडेफार बदल करून स्विकारता येईल असे वाटते.
साहित्य -
कोलंबी - मध्यम ते मोठ्या आकाराची हवी असेल तेवढी डोके काढून टाकलेली, पण वरील कवच आणि शेपटीसकट
लेमनग्रास - १-२ मोठे दांडे (लेमनग्रास वरून सोलून घ्यायचे, आतल्या दांड्याचे बारीक तुकडे करायचे किंवा ठेचायचे) - हे चिरून साधारण दोन-तीन मोठे चमचे झाले
बेसिलची पाने - मी सुकवलेली बेसिल घेतली - दोन चहाचे चमचे (ताजी अधिक चांगली लागेल असे वाटते)
किसलेला नारळ - १/२ वाटी
तांदळाचे पीठ - १/२ वाटी
किसलेले आले २ चमचे
बारीक केलेली लसूण किंवा पेस्ट - १ चमचा
लिंबाचा रस - २ लहान चमचे
कश्मिरी लाल तिखट
चवीप्रमाणे मीठ (१.५ च. चमचा)
साखर (चिमूटभर हवी असल्यास)
सजवायला कोथिंबीर किंवा सॅलडची पाने
कृती -
आधी कोलंबीवरचे कवच अर्धे ("पाय" दिसतील तितक्या भागापर्यंत") काढून टाकावे. फक्त शेपटी आणि शेपटीच्यावरील अगदी थोडा भाग हातात धरण्यापुरता राहीत एवढेच ठेवावे.
१. कोलंबीला लिंबाचा रस, मीठ आणि किंचित साखर (हवी तर) लावून ठेवावे.
२. एका लहान कढईत अगदी थोडे तेल घेऊन ते जरा तापले की त्यात लसूण/आले यांची पेस्ट घालून किंचित परतावे, लाल करायचे नाही, त्यामुळे आच कमीच ठेवावी. जरा परतल्यावर लेमनग्रास घालून गॅस बंद करावा. याचा तेलाला किंचित मंद सुगंध येईल. शेवटी त्यात कश्मिरी तिखट घालावे. (तिखट जळू द्यायचे नाही, नुसता रंग आला पाहिजे).
३. वरील तेल जरा थंड झाले की कोलंबीला लावून कोलंबी थोडावेळ तशीच ठेवावी.
४. एका थाळीत तांदळाचे पीठ, नारळाचा कीस आणि बेसिल, आणि चवीपुरते मीठ (साधारण १ लहान चमचा) घालून चांगले एकत्र करावे.
५. एका पसरट तव्यावर तेल घालून, त्यावर थोडे लेमनग्रासचे तुकडे वासासाठी घालून एकेक कोलंबी नारळ आणि पिठाच्या मिश्रणात घोळवून तव्यावरील तेलात परतावी. आच मध्यम असावी. कोलंबीचा एका बाजूने रंग बदलला (गुलाबीसर/केशरी) की दुसर्या बाजूने चांगली परतून बाजूला प्लेटवर काढावी.
६. कोथिंबीर किंवा सॅलडच्या पानांनी सजवून गरमच खायला द्यावी.
परत एकदा नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा!
प्रतिक्रिया
1 Jan 2010 - 9:08 am | पाषाणभेद
तुमालाबी नविन वर्शाच्या सुबेच्चा बरं का.
रातच्याला बरूबर नव्या वर्शी पाकृ टाकाय जाग्रण केलेले दिसूं र्हायलेय.

आन कोलंबी बी नवाच्या आकारात हाय. आज एखांदी पाकृ १० च्या आकड्यात टाका.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
1 Jan 2010 - 10:47 am | वेताळ
कोलंबी एकदम मस्त दिसते आहे, त्या अर्थी ती चांगली नक्कीच झाली असणार.
पाकृ बद्दल धन्यवाद,नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
वेताळ
1 Jan 2010 - 2:18 pm | पांथस्थ
मस्तच दिसत आहे.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
1 Jan 2010 - 2:54 pm | सहज
पण अश्या डिशचा प्रॉब्लेम हा आहे की करायला जितका वेळ लागतो त्याच्या एक शतांश वेळात खाउन संपते त्यामुळे इतकी मेहनत घ्यावी का? :-)
बाकी डिश उत्तम आहे त्यात वाद नाहीच :-)
1 Jan 2010 - 6:00 pm | स्वाती२
मस्त!
1 Jan 2010 - 7:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाकृ मस्तच...!
-दिलीप बिरुटे
1 Jan 2010 - 7:58 pm | रेवती
फोटू छान!
नविन वर्षाच्या शुभेच्छा!
रेवती
1 Jan 2010 - 8:34 pm | jaypal
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
2 Jan 2010 - 2:00 am | विकास
बापरे! 8|
"जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/" असे खाली लिहीलेले आणि वरती मिटक्या मारणारा अथवा तोंडाला पाणी सुटलेला वाघ बघतोय... :SS
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
1 Jan 2010 - 8:55 pm | चित्रा
सर्व प्रतिसादकर्त्यांना धन्यवाद!
रेवतीताई, स्वतः सामिष खात नसूनही फोटो आवडल्याचे कळवल्याबद्द्ल धन्यवाद.
सहजरावांना नेहमी मी दिलेल्या पाकक्रियांबद्दल एवढी मेहनत का घ्यायची, वेळ का दवडायचा असे प्रश्न पडतात. त्यामुळे आजही पडला याबद्दल आश्चर्य वाटले नाही! ;) या पाककृतीचा वेळ नेहमी मासे तळतो, तेवढाच आहे हो.
मी पाककृती करण्याचे खरे कष्ट फार कमी वेळा करते - जसे पुरणपोळी, मोदक. हे सर्व खरे वेळकाढू आणि निगुतीचे प्रकार. खरा वेळ लागला तो ते सर्व असे मांडायला, हे सुद्धा गणपा यांच्यामुळे हल्ली लाजेकाजेखातर का होईना, थोडेसे डेकोरेशन करणे भाग असते म्हणून ;)
पाषाणभेद (जी), पाककृती आमच्या दुपारी टंकली आहे, ३१ च्या रात्री खाण्याच्या ऐवजी पाककॄती कोण टंकणार? !
1 Jan 2010 - 9:16 pm | धनंजय
दिसायलाच चविष्ट म्हणजे असायला - चट्टामट्टा!
1 Jan 2010 - 9:24 pm | निमीत्त मात्र
चित्राताई, सविस्तर पाककृती छानच आहे. पण मी एका हाटेलात खाल्लेले कोकोनट श्रींप असे दिसत होते आणि चवील नुसतेच गोड होते त्यामूळे अजिबात आवडले नाहीत. तुम्ही पाककृती मॉडीफाय केली आहे का?
1 Jan 2010 - 9:57 pm | चित्रा
हा प्रत्येकाच्या चवीचा प्रश्न असतो. कोणाला काय आवडेल, आणि काय आवडणार नाही हे काही सांगता येत नाही!
मी खाल्ले होते ते ग्रिल्ड श्रिम्प होते. त्यामुळे तशीच दिसणारी रेसिपी केली. फक्त ग्रिल न केल्याने तळलेले असे म्हटले आहे. फार तर तुम्ही परतलेले असे म्हणू शकता..
पाककृती मॉडिफाय केली आहे का म्हणायला मला ओरिजिनल पाककृती काय होती हेच माहिती नाही :)
असो.
2 Jan 2010 - 6:42 am | निमीत्त मात्र
पण तरीही श्रींपवर चिकटलेले खोबरे दिसायला हवे ना? तरच ते कोकोनट श्रींप असते ना? म्हणून विचारले.
हे पाहा ग्रील्ड श्रींप

2 Jan 2010 - 7:36 am | चित्रा
आधीचा प्रश्न वेगळा होता नाही तुमचा?
असो. आपल्याला आपण दिलेल्या फोटोतल्यासारखा आवडत असेल तर तसा करा किंवा माझ्यासारखा करू नका. बाकी माझ्या पाककृतीत नारळ घातलेला आहे, विश्वास नसला तर खायला येता का? पण मग आपला मुखवटा दूर करावा लागेल :)
2 Jan 2010 - 8:16 am | निमीत्त मात्र
अरेच्या! मी सहजच विचारलं होतं. इतकं चिडायला काय झालं?
मला फोटोतल्या सारखा अजिबात आवडला नाही म्हणूनच विचारतो आहे की तुम्ही पाककृती बदललीत का ते. खोबरं घातलंत की नाही ह्या विषयी अविश्वास असण्याचा प्रश्नच नाही पण कोकोनट श्रींप असे नाव घेण्यासाठी त्या श्रींपवर कुरकुरीत खोबरे दिसणे गरजेचे असते का इतकाच माझा दुसरा प्रश्न होता. असो.
2 Jan 2010 - 8:43 am | चित्रा
आपल्यावर चिडायला काहीतरी निमित्त झाले पाहिजे ना? ते तर इथे काहीच नाही. मीही सहजच म्हटले होते, खायला येता का म्हणून. आपलाच काहीतरी गैरसमज होतो आहे असे दिसते आहे.
मी खाल्लेल्या श्रिम्पला खोबर्याची चव होती, पण खोबरे कमीच होते. तसेही खोबरे जरा बेतानेच खावे म्हणतात ना? :)
मला फोटोतल्या सारखा अजिबात आवडला नाही
त्यात काही आश्चर्य नाही, ते तुम्ही कुठे खाल्ले असतील त्यावरही अवलंबून असते. प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी.