स्ट्रॉबेरीचे गोड टार्ट

चित्रा's picture
चित्रा in पाककृती
24 Feb 2009 - 8:48 am

मार्था स्टुअर्ट या बाईंचे एक पुस्तक माझ्याकडे पडले आहे. परवा छोट्या मुलांसाठी म्हणून काही करण्याचा घाट घातला आणि या पुस्तकाची आठवण झाली. खरेतर मुले कशाला, हे असे छोटे टार्ट मलाही खूपच आवडतात. आणि बाहेरून आणायचे म्हणजे प्रत्येक टिचभर टार्टला दोन-अडीच नाणी मोजा. म्हणून एकतर मी काचेच्या आडून डोकावीत असणार्‍या अशा गोड गोष्टींना टाळून पुढे जाते, किंवा अगदीच मोह टळला नाही, तर स्वतः काहीतरी करण्याचा घाट घालते.

मी आधीही स्वयंपाकघरात असे बेकिंगचे प्रयोग केले आहेत, आणि अनेकदा माझ्या सुदैवाने ते यशस्वी झाले आहेत. पण टार्टच्या बाबतीत जेव्हा जेव्हा केले - दोन्ही तिन्ही वेळा - चुकतच होते. कधी कडक तर कधी चक्क चावताही न येणारे असे टार्ट निपजत. एकदोनदा स्वतःच्या कृतींचे अनुभव घेऊन स्वतःची पाककृती तयार करण्याचा नाद सोडून दिला. आणि मार्थाताईंच्या पुस्तकातील लेमन कर्ड घालून केलेल्या टार्टऐवजी स्ट्रॉबेरी प्रिझर्व (जॅमप्रमाणेच) घालून एक टार्टचा प्रकार मध्यंतरी करून पाहिला. आणि तो छान जमला. त्यामुळे मार्थाताईंच्या पुस्तकावर बेतलेली ही एक थोडी बदललेली पाककृती देत आहे. या साहित्यात साधारण दोन डझन तरी छोटे टार्ट होतील.

बाजारात लहान टार्टचे पॅन मिळतात. पण माझ्याकडच्या लहान मफिनच्या नॉनस्टिक वाट्यांच्या पात्रात मी हे टार्ट केले.

टार्टसाठी जिन्नस-
१-१/२ कप मैदा
१/४ च. च. मीठ
थोडेसे जाडसर दूध ( दोन-तीन मोठे चमचे)
६ टे. स्पून लोणी (मीठ न घातलेले बटर) - हे मी पूर्वी कमी घालीत असे, पण तसे करून चव/रूप बिघडे तेव्हा लक्षात आले की लोणी कमी घालून करण्यापेक्षा न केलेले बरे.
१/४ कप पिठीसाखर (मी आमच्याकडे मिळते तशी बारीक दाणेदार साखर घातली तरी विशेष प्रश्न वाटला नाही).
१ अंड्याचा पिवळा बलक ( मार्था दोन अंड्यांचा बलक सांगतात).

कृती:
लोणी फेटून घ्यावे. त्यात अंड्याचा बलक घालून फेटून घ्यावा, आणि मग पिठीसाखर आणि २ च. दूध घालून मिश्रण एकजीव करावे. यानंतर मैदा आणि मीठ एकत्र करून हळूहळू त्यात घालावे. गुठळी होऊ नये, तसेच अगदीच खूप घट्ट वाटले तरच दूध घालावे. साधारण आपल्या शंकरपाळ्यांसारखे पीठ तयार होते. कृती श़ंकरपाळ्यांसारखीच साधारण. म्हणजे हे तयार पीठ एक प्लास्टिकच्या पिशवीत (रॅपमध्ये) हवा जाणार नाही, यापद्धतीने काळजीपूर्वक बांधून फ्रीजमध्ये किमान दोन तास ठेवावे. मी रात्रभर ठेवले. दुसर्‍या दिवशी पीठ काढून ते काही वेळ तसेच ठेवावे. मळून लाटण्याइतपत सैल झाले (साधारण अर्धाएक तास) की लाट्या करून शंकरपाळ्यांप्रमाणे काहीसे जाडसर (पण खूप जाडही नाही) असे लाटून घ्यावे. प्रत्येक वेळी लाटल्यानंतर दीड-दोन इंचाच्या व्यासाच्या वाटीने त्यातून दोन-तीन छोटे गोल कापून घ्यावे. हे गोल प्रत्येक वाटीत हलक्या हाताने बसवावे. (मार्थाताईंनी हे पॅन परत प्लास्टिकमध्ये बंद करून बेक करण्यापूर्वी १/२ तास फ्रीजमध्ये ठेवायला सांगितले आहे, मी ते घाई असल्याने लगेच बेक केले). अव्हन ३५० डि. ला तापवून घ्यावा. आणि टार्ट १०-१२ मिनिटे बेक करावे. (चुकून टार्ट मऊ आहेत असे वाटून जास्त वेळ ठेवण्याचा मोह झाला, तरी ते १२ मिनिटांपेक्षा अधिक वेळ आत ठेवू नये, कारण टार्ट कडक करायचे नाहीत. ) लगेच वाट्यांमधून बाहेर काढून हवेवरच गार करावे.

आम्ही गार होताक्षणी त्यात स्ट्रॉबेरी प्रिझर्व्ह चमचाभर भरले आणि एकेक स्ट्रॉबेरी शोभेला लावली (मुलांना टार्टच्या वाट्या भरायला दिल्या तर आनंदाने भरतात असा अनुभव आहे). याखेरीज इतरही आंबटगोड वस्तू (लेमन कर्ड इ.) भरता येतात. लगेच खायचे नसल्यास गार झाल्यावर टार्ट हवाबंद डब्यात भरून ठेवावे. एका दिवसाच्या आत ते वापरावे.

100_3250

आता सगळ्या उपासकर्त्यांचा उपास सुटला असेल, त्यामुळे ही पाककृती मिपावर चालायला हरकत नाही.

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Feb 2009 - 10:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

चित्राताई, इकडे पण एखादा टार्ट पोस्ट करा ना ... पाणी सुटलं तोंडाला!

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

विसोबा खेचर's picture

24 Feb 2009 - 10:37 am | विसोबा खेचर

तात्यांचा ८४ लक्ष योनींचा फेरा सुटला आणि त्यांना मोक्ष मिळाला! :)

चित्राभाभी, पाकृ आणि फोटू सुरेख...!

आपला,
(मुक्त) तात्या.

सहज's picture

24 Feb 2009 - 11:37 am | सहज

कृपया फोटो जरासा मोठा करा. :-)

एखाद्या सुटीच्या दिवशी लहानग्यांना बरोबर घेउन असे केले पाहीजे, अशी उच्च थियरी पटते बट देन अगेन एखादा दिवस कशाला वाया घालवा/पसारा, कोपर्‍यावरच्या बेकरीतुन हा प्रॅक्टिकल घात होतो;-)

सुक्या's picture

24 Feb 2009 - 11:59 am | सुक्या

वजन वाढवणार्‍या, वजनाने हलक्या पाकक्रुती देउन आमचे वजन वाढवण्याचा घाट घालणार्‍या चित्राताईचा निषेध.
बाकी टार्ट एकदम झकास. १-२ खाउन काही होत नाही हो. एक डझन तरी पाहीजेत.
पाकृ आणि फोटू सुरेख...! हे. वे. सा. न. ल.

सुक्या (बोंबील)
चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.

रेवती's picture

24 Feb 2009 - 8:30 pm | रेवती

काय भारी फोटो आलाय!
मी नक्कीच करून बघीन.
मुलांना असे प्रकार फार आवडतात.

रेवती

प्राजु's picture

24 Feb 2009 - 10:31 pm | प्राजु

मस्त दिसतंय..
सह्हीये गं एकदम. भन्नाट!

बाकी, चित्राताई... त्या ब्रेडच्या रेसिपीचं काय झालं?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चित्रा's picture

25 Feb 2009 - 2:23 am | चित्रा

> त्या ब्रेडच्या रेसिपीचं काय झालं?

ती "माझी" पाकक्रिया होती, म्हणून इथे देण्याआधी जरा परत एकदा करून बघीन म्हणून जे मागे पडले ते पडले. आता आश्वासन देत नाही, (कारण आधी अशी आश्वासने देऊन पाककृती न दिल्यामुळे लाज वाटते आहे) पण पाककृती नक्की देते.

प्राजु's picture

25 Feb 2009 - 2:36 am | प्राजु

(कारण आधी अशी आश्वासने देऊन पाककृती न दिल्यामुळे लाज वाटते आहे) पण पाककृती नक्की देते.

मी सहजच विचारलं. जेव्हा जमेल तेव्हा लिही. गडबड नाही. :)

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चित्रा's picture

25 Feb 2009 - 5:17 am | चित्रा

पाककृती आवडल्याचे सांगणार्‍या सर्वांचेच आभार. अदिती, असे पार्सल नाही मिळणार, त्यासाठी माझ्याकडे यावे लागेल.

>>बट देन अगेन एखादा दिवस कशाला वाया घालवा/पसारा, कोपर्‍यावरच्या बेकरीतुन हा प्रॅक्टिकल घात होतो.
चुकलेच. आता यापुढे दुकानांचे/हॉटेलांचे पत्ते देत जाईन, ते सोपे.. :)

>>वजन वाढवणार्‍या, वजनाने हलक्या पाकक्रुती देउन आमचे वजन वाढवण्याचा घाट घालणार्‍या चित्राताईचा निषेध.
गोड आवडत असले तरी बेताने खा, आणि पळून या ट्रेडमिलवर असे लिहायला विसरले. :)

>>तात्यांचा ८४ लक्ष योनींचा फेरा सुटला आणि त्यांना मोक्ष मिळाला!
नको. "तिथला" मोक्ष नको, त्यापेक्षा इथेच गुरूचरणी मोक्ष शोधा ना. म्हणजे आम्हा पामरांमध्ये राहाल.

चकली's picture

25 Feb 2009 - 6:50 am | चकली

मस्त लिहली आहेस रेसिपी..आणि स्ट्रॉबेरी पण छान दिसतेय फोटोमध्ये!

चकली
http://chakali.blogspot.com