अजीब दास्ता हैं ये..... शेवट

भानस's picture
भानस in जनातलं, मनातलं
9 Dec 2009 - 7:34 pm

आज काय झालेय समीरला? मनकवडा झाल्यासारखे का करतोय. ममा म्हणते अगदी तसेच करण्याचा मोह होतोय. सांगावे का मनातले. फार तर काय म्हणेल, " वेडी आहेस का दिशा तू. अग अनुजाशी लग्न ठरतेय माझे. किंवा लग्न आणि तुझ्याशी? ना गं, मी तर नेहमीच तुला जवळची मैत्रीण समजत आलोय. पण कदाचित म्हणाला तर... दिशा, तेवढ्यासाठीच तर परत आलोय मी. खरेच असे म्हणेल का समीर? " अग अग दिशा, काय करते आहेस? आत्ता त्या सायकलवाल्याला मारले असतेस तू. लक्ष कुठेय तुझे? " निमा ओरडत होती. मागून रेश्मा व दिल्यानेही हटकले. " अरे बापरे! दिशा सांभाळ गं बाई, उगाच कोणा बिचाऱ्यावर गाडी घालू नकोस बरं का. कसला एवढा गहन विचार करते आहेस? " " बरं बरं कळले, तुम्ही पुढे बघा." असे म्हणत दिशाने सावरून घेतले खरे पण हा गुंता कसा सुटावा?

सगळे रजतच्या घरी पोचले. श्री आणि रजतने पुढे जाऊन थोडी तयारी करून ठेवलेली होती. चिप्स, कोल्ड ड्रिंक्स, पण सगळ्यांना कडकडून भूक लागलेली. हे असले स्नॅक्स प्रकार कोणालाच नको होते. " रजत अरे मी इतका लांब प्रवास करून आलोय ते काय हे चिप्स खायला होय. मुलींनो जरा आपापली पाककला दाखवा ना. मस्त पोहे करा गं. तरसलो आहे मी गेले सहा महिने. " समीर पटकन म्हणाला. आता इतक्या जणांसाठी पोहे म्हणजे किलोभर तर करावे लागतील. सकाळी सकाळी पोरींनाही सुटीचा मूड असल्याने बिलकूल इच्छा नव्हती... मग ढकलाढकली सुरू झाली. तू कर गं, ए मी नाही हं... माझे मुळीच चांगले होत नाहीत, मग कोणी खाणार नाही. शेवटी दिशाने वैतागून म्हटले, " पुरे झाले गं तुमचे, मी करते. खायला मात्र याल पहिल्या. जारे किमान कोणीतरी पोहे घेऊन तरी या तोवर मी तयारी करते." असे म्हणत स्वयंपाकघरात घुसलीही.

"अरे कोणीतरी तिला मदत तरी करा रे. " दिल्या ओरडत होता. त्यावर अनुजाचा आवाज आला, " समीर पोहे कोणाला हवेत? तुला ना, मग ऊठ चल, जा जा कांदे कापून दे जरा. " टोपलीतून कांदे काढत हे आवाज दिशा ऐकत होती. तेवढ्यात हालचाल जाणवली म्हणून पटकन मागे वळली तो समीर अगदी जवळ उभा होता. संपूर्ण साडेसहा महिन्याने इतक्या जवळून दिशा समीरला पाहत होती. त्याच्या ओठांवरचा कट - लवकट म्हणत असे ती त्याला. त्याच्या परफ्यूम, डिओचा मिक्स सुगंध, कुडत्यामधून दिसणारी भरदार छाती... वाटले झोकून द्यावे स्वतःला. " दे गं ते कांदे इकडे, पोहे हवेत तर मदतही करायला हवी ना तुला. " असे म्हणत तिच्या भारलेल्या अवस्थेकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत समीरने कांदे चिरायला सुरवात केली. पोहे होईतो सगळा वेळ तो दिशाच्या आसपास अगदी जवळ वावरत राहिला. मध्येच अनुजा दोन वेळा डोकावून उगाचच समीरशी गोड गोड बोलून गेली. समीरही अगदी साथ देत होता. असा राग आला होता पण करणार काय, हसून साजरे करणे भागच होते.

पोहे तयार झाले, घरभर वास दरवळत होता. बाहेर सगळे भूक भूक ओरडत होते, आणारे लवकर. दिशाने प्लेट्स भरायला घेतल्या तसे समीरने तिला थांबवत पातेलेच उचलले आणि बाहेर नेऊन मधोमध ठेवले. लिंबे, कोथिंबीर, खोबरे व शेव घेऊन मागोमाग दिशाही आलीच. प्लेट्स, चमचे व दही कोणीतरी जाऊन पटकन आणले आणि हल्ला बोल करत सगळे तुटून पडले. पोहे सुंदरच झाले होते. हातातोंडाची लढाई सुरू झाली. जरा पोटोबा शांत झाल्यावर चहाची फर्माइश आली. दिशाला कल्पना होतीच त्यामुळे तिने बाहेर येताना चहा ठेवलाच होता. " दिशा, समीर चहाचे पाहा रे. आता नाश्ता काम पूर्ण करावेच लागेल. काय रे बरोबर आहे ना मी म्हणतो ते. " सगळ्यांनी हो हो म्हणत श्रीला साथ दिली. पुन्हा दोघांची वरात किचन मध्ये आली.

दिशा कपबश्या शोधत होती तोच तिच्या खांद्याला धरून समीरने तिला स्वत:कडे वळवले, " दिशा, कशी आहेस गं? मिस केलेस मला? " आत्तापर्यंत अनेकवेळा समीरने दिशाला स्पर्श केला होता, पण आजचा स्पर्श वेगळाच होता. निदान दिशाला तरी जाणवत होता. मनाने फितुरी कधीचीच केली होती. आता या स्पर्शाने तर दिशा थरथरू लागली. घाईघाईने कप ओट्यावर ठेवण्याच्या निमित्ताने दिशाने स्वत:ला सावरले. मोकळे हसून समीरचे केस जरासे विस्कटत ती म्हणाली, " मी एकदम चकाचक आहे. आणि तुला मी कशाला मिस करेन रे. ते काम अनुजा करतेच आहे ना? आणि कारे शहाण्या तू तरी कुठे माझी आठवण काढीत होतास? " बोलता बोलता दिशा ओट्याला चिकटली तसे तिच्या दोन्ही बाजूने ओट्यावर हात रोवून, कोंडलेल्या आवाजात समीरने विचारले " दिशा, मी जर तुला सांगितले की मी तुला वेड्यासारखे मिस केले, आत्ताही मी फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच परत आलोय तर विश्वास ठेवशील माझ्यावर? "

तोच अनुजा आत आली. दिशा अन समीरला इतके जवळ उभे पाहून गोंधळली, " काय रे समीर, नाही म्हणजे सगळे ठीक आहे ना? चुकीच्या वेळी आले का मी आत? तुम्ही काय बोलत होतात? आणि दिशा का अशी थरथरतेय? दिशा अग मी तुला विचारतेय ना? बोल की काहीतरी. तुम्ही तुम्ही दोघे......समीर समीर...... तू.....ओह्ह्ह्ह्ह." अनुजा रडायलाच लागली. दोघांकडे पाहत रडत रडत बाहेर गेली. दिशाला समजेचना हे काय चाललेय. तिने समीरकडे पाहिले तर तो अजूनही तसाच भारलेला होता, डोळ्यात प्रश्नचिन्ह घेऊन. बाहेर आवाज वाढू लागले . रेश्मा, निमा, रजतच्या हाका येऊ लागल्या, " सम्या, दिशा बाहेर या ताबडतोब. ही अनुजा कशाला हमसून हमसून रडतेय? सम्या ए सम्या....." तशी दिशाकडे पाहत हात झटकून समीर बाहेर गेला.

दिशा, मूर्ख मुली चांगला समीर स्वत:हून विचारत होता. आता तरी सांगायचेस त्याला. नाहीतरी घोळ घातलाच ना, ती अनुजाही इतके कशाला रडतेय कोण जाणे, असे काय घडलेय इथे? आता उगाच मी बदनाम होणार, तेही काही न करता. तोच बाहेरून अनुजाची हाक आली, " दिशा, आता कुठला मुहूर्त शोधते आहेस? बाहेर ये ताबडतोब. " नाइलाजाने दिशा बाहेर आली. नजर जमिनीवर खिळलेली, कोण कोण काय बोलतंय ते ऐकायची तयारी करत होती....पण एकदम शांतता का पसरली आहे. कोणीच काही बोलत नाहीये. डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहायचा प्रयत्न करीत होती. सगळे माझ्यावर भडकलेत आणि अनुजा तर ...समीर या सगळ्यांच्या तोंडी मला देउन तू कुठे......

समीर दिसला, दिशाचा विदीर्ण चेहरा पाहून तिच्या पुढ्यात येऊन उभा राहिला. तिचे हात हातात धरून गुडघ्यावर बसत म्हणाला, " दिशा, मला हवीस तू. लग्न करशील माझ्याशी? अग मी सदैव तुझ्यावरच प्रेम करत होतो. मला जाणवायचे तुलाही मी आवडतो पण तू नेहमीच तुझ्या परिघात राहिलीस. अनुजा व माझ्या घरच्यांची फार इच्छा होती आमचे लग्न व्हावे पण अनुजा दोन वर्षांपासूनच मनिषच्या प्रेमात बुडलेली आहे. तो पायलट आहे एअर फोर्स मध्ये. दोन महिन्यांनी सुटीवर आला की अनुजाला मागणी घालेल तोवर तिच्या घरच्यांना कळू द्यायचे नव्हते म्हणून मग आम्ही नाटक करत होतो. तुम्हालाही कोणाला कळू दिले नाही. शिवाय यामुळे तरी तू काहीतरी बोलशील असे वाटत होते. पण तू शांतच राहिलीस. चुकून कधीतरी तुझे डोळे तुला दगा देत आणि मग तुझी होणारी तगमग, अपराधीपण तुझ्या चेहऱ्यावर दिसत राही. मला सहन होईना गं ते. म्हणून कंपनीने विचारले सहा महिन्यांनसाठी जातोस का तर मी हो म्हणून टाकले. वाटले मी लांब गेल्यामुळे तरी प्रेम व्यक्त करशील, निदान तुझे हे अपराधीपण दूर होईल. मी गेलो तुझ्यासाठी पण झाले उलटेच. या सहा महिन्यांत मी तुला अतिशय मिस केले. जिकडे तिकडे फक्त तूच दिसायचीस. अगदी साध्या साध्या गोष्टीही मला आठवत. आत्ता दिशा असे म्हणाली असती, अशी बसली असती. अगदी भिकार सिनेमा पाहतानाही धो धो रडली असती. आणि जाणवले तू जगू शकशीलही माझ्याशिवाय पण मी नाही जगू शकत. पहाटे चारला फोन लावला, पण तू घेतला नाहीस. तेव्हाच सांगणार होतो तुला, दिशू, आय लव्ह यू, चल पटकन लग्न करून घेऊयात. ए अनुजा दे ना गं. दिशू नाही म्हणू नकोस गं या चमेलीच्या कळ्यांची शपथ तुला आहे. "

सगळे श्वास रोखून ऐकत दिशाच्या चेहऱ्याकडे पाहत होते. दिशा भांबावली....... गोंधळली ....... मग रागावली ...... शेवटी मोहरली. डोळ्यांतून आसवे ओघळत होती त्यांना पुसत अनुजाला एक फटका मारून समीरच्या मिठीत तिने स्वत:ला झोकून दिले. त्याच्या कंठावर नाक घासत, " दुष्ट कुठला, किती तरसवलेस मला. वचपा काढेन बघ सगळ्याचा. दामदुपटीने वसूल करून घेईन हा सारा त्रास." असे म्हणत त्याला घट्ट बिलगली.टाळ्या, शिट्यांचा एकच गदारोळ झाला. दिशाला मिठी मारत अनुजा सारखी सॉरी म्हणत होती. पुढे सगळ्या गोष्टी झपाट्याने घडल्या. दिशाच्या ममाला तर कोण आनंद झाला. बाबाही समीरला ओळखत होतेच. समीरच्या घरी अनुजाचे लग्न दुसऱ्याच कोणाशी होतेय हे ऐकून थोडा गोंधळ झाला खरा. पण समीरने सगळे नीट मॅनेज केले. शिवाय दिशाला सगळे ओळखत होतेच. तीन महिन्यातच अनुजा-मनिष व दिशा-समीरचे शुभमंगल पार पडले. पाव्हणे मंडळी पांगली तसे दिशा-समीर मनालीला आले.

लग्न होऊन सहा दिवस झाले तरी निवांत वेळ मिळालाच नव्हता. मनालीला आल्यावर पहिला दिवस कसा गेला ते दोघांना कळलेच नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी थोडे भटकून आल्यावर तृप्त दिशा फ्रेश होऊन आली तेव्हां समीर व्हरांड्यात तिची वाट पाहत उभा होता. तिला घट्ट जवळ ओढून घेत समीरने विचारले, " दिशू, सांग ना गं एकदा...मी आवडतो ना तुला?" आता राहवणे शक्यच नव्हते. दिशाने त्याच्या लव-कटला कुरवाळत हळूच हुंकार भरला. तसे तिला घुसमटवत समीर आरती प्रभूंचे गीत बेभान होऊन गाऊ लागला......

माझी वस्त्रे तुझी झाली पंख सारे मिटले गं
चोचीतले उष्टे थेंब पानोपानी पडले गं
माझी वस्त्रे तुझी झाली तुझी वस्त्रे वारा गं.....

वाजले गं मी ऐकले गं वाजले गं मी ऐकले गं
माझी वस्त्रे तुझी झाली रंग मात्र फसले गं
डोळे चारी मिटले आणि ओठ ओठा डसले गं.....

या अवसेच्या रात्री कुठे निघालीस परडी घेऊन
तृप्त फुले झाली गं फुलली तेव्हा सरली गं
आता कुठे उरली गं गंध फुटे गाली गं......

परडीभर तरी मिळेल का डोही कुठे चांदणे
कुठे कुठल्या झाडाखाली उभी नको राहूस गं
अजून त्यांची सळसळ नाही जिरली गं......

माझी वस्त्रे तुझी झाली तुझी वस्त्रे वारा झाली
गात्रांच्या गारा झाल्या माझी वस्त्रे भिजली गं
दूर तिथे देवळापुढे दीपमाळ विझली गं.......

तुझी वस्त्रे कुठे गेली माझी वस्त्रे तुझी झाली
परडीभर चांदण्यांनी देहपूजा सजली गं
परडीभर चांदण्यांनी देहपूजा सजली गं.......

समाप्त. :)

सुरवात येथे वाचा: http://misalpav.com/node/10448
मध्य येथे वाचा: http://misalpav.com/node/10462

कथा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

9 Dec 2009 - 7:44 pm | श्रावण मोडक

कथा सुरेख मांडलीत! आरती प्रभूंच्या गीताचेही नेमके उपयोजन!

मेघवेडा's picture

9 Dec 2009 - 7:53 pm | मेघवेडा

छान मांडलीत कथा. तुटली नाही कुठे! मी बाबा तुमचा फ्यान झालोया!

--

मेघवेडा.

आम्हाला अजून कुणाच्या खरडवहीत किंवा खरडफळ्यावर खरडायची अनुमती नाही. आम्ही काय करावे बरे? :O

प्रभो's picture

9 Dec 2009 - 8:14 pm | प्रभो

मस्त..आवडली..

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

sujay's picture

9 Dec 2009 - 8:18 pm | sujay

सहीच.
यु आर सिंपली टू गुड

सुजय

रेवती's picture

9 Dec 2009 - 8:18 pm | रेवती

प्रेमकहाणी सुफळ संपूर्ण झाली तर!
अश्याच शेवटाची अपेक्षा होती, तरी पण खात्री नव्हती.
लेखन आवडले.

रेवती

स्वाती२'s picture

9 Dec 2009 - 8:31 pm | स्वाती२

सुरेख!

लै टेंशन मधी होतो पयल्या भागा पास्न. आता सगळ कस हालक, हालक वटतया.
लै हाळवं केलसा बघा, दिशा संग रडु बी आल अन हसु बी आल.

नांदा सौख्यभरे

मदनबाण's picture

9 Dec 2009 - 9:58 pm | मदनबाण

व्वा. लयं झ्याक !!! :)

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

शेखर's picture

9 Dec 2009 - 11:08 pm | शेखर

अप्रतिम....
मस्त लेखन ... फक्त क्रमश: टाकु नका पुढच्या वेळी.... अशा सुंदर कथा एकाच बैठकीत संपवाश्या वाटतात...

चतुरंग's picture

9 Dec 2009 - 11:17 pm | चतुरंग

आत्ताच तीनही भाग सलग वाचले.
वातावरण निर्मिती, प्रसंगांची वर्णनं अतिशय सुरेख.
आरती प्रभूंची कविता देखील चपखल वापरलीये! :)

(ललित)चतुरंग

मी-सौरभ's picture

9 Dec 2009 - 11:40 pm | मी-सौरभ

सौरभ

भडकमकर मास्तर's picture

10 Dec 2009 - 1:14 am | भडकमकर मास्तर

छान

हर्षद आनंदी's picture

10 Dec 2009 - 2:24 am | हर्षद आनंदी

वाचताना अक्षरशः डोळ्यापूढे चित्र ऊभे राहिले..

दिशा एकदम भावली.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

sneharani's picture

10 Dec 2009 - 10:18 am | sneharani

मस्त... आवडली!

अवलिया's picture

10 Dec 2009 - 10:36 am | अवलिया

छान !

--अवलिया

भाग्यश्री कुलकर्णी's picture

10 Dec 2009 - 1:14 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त्च लिहीतेस तु.

गणपा's picture

10 Dec 2009 - 1:34 pm | गणपा

तिन्ही भाग परत एकत्र वाचुन काढेले.
शेवट गोड तर सगळच गोड.

खुप छान लिहिता तुम्ही.

आगाऊ सुचना: जर प्रत्येक भागात जुन्या भागांचे दुवे देता आले तर पहा.

-माझी खादाडी.

भानस's picture

10 Dec 2009 - 8:45 pm | भानस

सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. :)
गणपा प्रत्येक भागात जुन्या भागांचे दुवे द्यायचे राहून गेलेय.:(
आता जोडता येतील का? का संपादकच करू शकतात? तसे असेल तर संपादकांना विनंती आहे. आगाऊ आभार.
शेखर तिनही भाग सलग किंवा एकाच पोस्टमध्येच टाकणार होते. पण कोणी वाचणारच नाही ची भिती वाटली.... :)
जयपाल अरे याचा शेवट यापेक्षा वेगळा- दु:खी केला असता तर दिशा व समीर दोघेही माझ्या मानगुटीवर बसले असते ना..... हा हा....

jaypal's picture

10 Dec 2009 - 11:00 pm | jaypal

<जयपाल अरे याचा शेवट यापेक्षा वेगळा- दु:खी केला असता तर दिशा व समीर दोघेही माझ्या मानगुटीवर बसले असते ना..... हा हा....

म्या सोडल अस्त वै तुमाला? पीशीतुनच आलु आस्तु