पुन्हा ती भेटली तेव्हा..

ज्ञानेश...'s picture
ज्ञानेश... in जे न देखे रवी...
30 Nov 2009 - 10:38 am

(गतकाळातले प्रियकर- प्रेयसी अनेक वर्षानंतर एकमेकांना भेटतात.. ही कवितेची थीम आहे.
'गालगालगा.. गालगालगा' अशा चालीत वाचावे.)

==============

भेटलीस तू.. बोललीस तू..
थांबल्या दिशा, थांबले ऋतू
थांबला जणू काळ तेवढा
काळ जेवढा.. थांबलीस तू !

भासलीस तू कापरापरी,
काजळी जणू.. काजळावरी
कंप पावती खोल पापण्या
सांगती तुझी बातमी खरी

स्मित मोजके, बोलणे कमी
त्याच चौकश्या, तीच बातमी..
जे मनात ते, बोललो कुठे?
होत राहिले हेच नेहमी..

हासणे तुझे.. स्फुंदणे तुझे..
आळसावणे.. रंगणे तुझे..
त्या कळा कुठे? रंग ते कुठे?
लोपले कुठे.. चांदणे तुझे?

शब्द का मुके? मौन बोलके..?
बोल ना जरा, बोल नेमके
सांग कल्पना, सांग शक्यता
सांग वेदना.. सांग हुंदके!

सांग ना तुला, टोचते कुठे?
काय वाटते? बोचते कुठे?
बोलतेस तू त्या तटावरी..
या तटावरी पोचते कुठे?

तीच तू जरी.. तोच मी जरी
वेगळे किती वाटतो तरी !
एवढी कशी आज अंतरे?
वाढली कधी, सांग ही दरी?

पोकळी कधी ही भरायची?
उत्तरे कशी सापडायची?
प्रश्न राहिले.. आपल्यामधे
वेळ जाहली..तू निघायची..
.
.
.
काय घेतले? काय मी दिले?
काय वाढले? काय छाटले?
आठवे अता एवढेच की..
एकटे मला.. फार वाटले !

एकटे मला फार वाटले !

-ज्ञानेश.
===============

कविता

प्रतिक्रिया

फ्रॅक्चर बंड्या's picture

30 Nov 2009 - 2:22 pm | फ्रॅक्चर बंड्या

छान आहे कविता..

binarybandya™

गणपा's picture

30 Nov 2009 - 3:06 pm | गणपा

आवडली.

टारझन's picture

30 Nov 2009 - 3:19 pm | टारझन

पुण्याचे पेशवे, आदिती यांच्या कविता वाचाव्यात.

*(ह.घेणे)*

-(व्या)ख्यानेश..

ज्ञानेश...'s picture

30 Nov 2009 - 3:53 pm | ज्ञानेश...

भावना पोचल्या.