२६/११ : एक पाशवी आगळीक

गिरीश कुळकर्णी's picture
गिरीश कुळकर्णी in जे न देखे रवी...
26 Nov 2009 - 9:23 am

*************************************
*************************************

नेहमी सामान्यांचे रक्त सांडती तो प्रकार पाशवी
"दुनियापर राज करेंगे"घुमटांचा प्रचार पाशवी

कैसी मनोगते ही कैसाच हा राक्षसी कांगावा सुरु
इथेच येऊन आमच्याच शांततेचा संहार पाशवी

धर्मासाठी सर्वस्व द्यारे,अबोध फसती कांगाव्याला
सहीष्णुतेवर पोसल्या जाणत्यांचे होकार पाशवी

अजाण-सुजाण सारेच झालेत मांडलीक जगभर
चोहीकडून नासल्या बौद्धीकांचा भडीमार पाशवी

माणसांची स्मशानेच व्यापतील अर्धी पृथ्वी अशाने
शस्त्राने जग बुडवणार्‍या धर्माचा यल्गार पाशवी

ज्यांचे आयुष्यच जणू काही फुटकळ नोंदी, त्यांना
अफुच्या गोळ्या वाटण्याचा मोफत व्यापार पाशवी

इतिहासात कोंडल्या आहेत ऐशा कैक आगळीकी
विनाशाची ग्वाही देतच विझले असे अंगार पाशवी

**************************************
**************************************
गिरीश कुलकर्णी
२६/११/२००९
www.maitreyaa.wordpress.com

कविता