मेतकूट

स्वाती राजेश's picture
स्वाती राजेश in पाककृती
8 Mar 2008 - 3:17 am

वरदा सहा महिन्यांची वाट पाहाण्यापेक्षा घरी ट्राय कर.

आवडाबाई आणि आनंद यांना ही कृती हवीच होती.
ही घ्या कृती मेतकूटाची....

साहित्यः
१ भांडे हरभरा डाळ
१/२ भांडे तांदूळ
१/४ भांडे उडीद डाळ
१ च. गहू
१ च.धने
१च्.जीरे
छोटा दालचिनीचा तुकडा
४ लवंगा
अर्धे जायफळ
१.च. मोहरी
१ च. हिंगाची पूड
१.च्.सुंठ पूड
१ च. हळद
७-८ सुक्या मिरच्या

सर्व धान्ये कढईत एक-एक करत कोरडीच भाजावीत. भाजताना मंद आचेवर,खमंग( वास येईपर्यंत) भाजावीत.जास्त भाजून करपू नयेत कारण मेतकूटाला करपट वास येतो.
हिंग, हळद, सुंठ पूड इत्यादी साहित्य भाजता येत नाहीत म्हणून वरील धान्ये भाजून झाली कि त्यात टाकावेत.
नंतर सर्व एकत्र मिक्सरवर बारीक करावे. साधारण दोनदा करावे लागते. पण धान्ये भाजली असल्यामुळे पटकन होते.
मैद्याच्या चाळणीने चाळून काचेच्या बरणीत भरुन ठेवावे.

टीपः मेतकूट बरणीत भरल्यावर त्यात एक हिंगाचा खडा ठेवावा.

रेसिपी:
१/२ वाटी दही घेऊन त्यात मेतकूट, १ च. लाल तिखट,मीठ, कोथिंबीर, २ च. फोडणी घालून कालवावे.
आम्ही याला डांगर म्हणतो.

पाकक्रिया

प्रतिक्रिया

धनंजय's picture

8 Mar 2008 - 4:05 am | धनंजय

धन्यवाद. मिक्सरवर माझे चांगले दळून होत नाही. (म्हणजे भरड चटण्या मी करतो मिक्सरवर.)

याबाबत काही युक्ती?

स्वाती राजेश's picture

9 Mar 2008 - 12:23 am | स्वाती राजेश

मिक्सर वर बारीक होते. पण २-३ वेळा करावे लागते.
तसेच ते चाळ्णीने चाळून घ्यावे. धान्ये व इतर साहित्य खमंग भाजल्यामूळे व्यवस्थित बारीक होते.
इंडियात मी मिक्सरवर करत होते पण इकडे (परदेशात) कॉफी ग्राइंडरचा उपयोग करते..

सुवर्णमयी's picture

27 Mar 2008 - 6:56 pm | सुवर्णमयी

स्वाती,
मेतकुटाच्या पाककृती साठी आभार.

धनंजय,
कॉफी ग्राईंडर वापरुन बघा. धने जीरे पूड, दाण्याचे कूट, काजूची पावडर, मसाले सगळे कोरडे जिन्नस त्यात चांगले भरडले जाते, बारीक होते पण त्याचा लगदा होत नाही असा माझा अनुभव आहे.
ज्यात अगदी थोडा ओलसरपणा आहे, किंवा पाणी घातलेले चालते, पदार्थांना रस सुटतो ते सर्व ब्लेंडर/ मिक्सरमधे होते.

प्राजु's picture

8 Mar 2008 - 9:21 pm | प्राजु

मिक्सरवर खूप बारिक होत नाही. पण बराच वेळ मिक्सर चालवला की थोडतरी होतच.

स्वाती,
बरं झालं इथे रेसिपी दिलीस. माझ्याकडे आईकडून आणलेले डबाभर मेत़कूट आहे. आता जाते आहे पुन्हा घेऊन येईन. तिथे मेतकूट करताना ही रेसिपी उपयोगी पडेल.
हे मेतकूट, चिवडा करताना घालता येते.
एका वाटीत २ चमचे तूप पातळ करून त्यात मीठ, तिखट आणि साखर घालावी. हे मिश्रण पातळ पोह्यांवर घालावे आणि वरून १ चमचा मेतकूट घालावे आणि खाताना त्यावर कांदा, कोथिंबीर , लिंबाचा रस घालून खावे. याला माझी आई खुळे पोहे म्हणते. काही जण लावलेले पोहे असेही म्हणतात. लागतात एकदम भारीच.
- (सर्वव्यापी)प्राजु

स्वाती राजेश's picture

8 Mar 2008 - 4:09 pm | स्वाती राजेश

फारच छान रेसिपी आहे.
असे पोहे खात खात टी.व्ही. पाहताना काय मस्त मजा येईल.
शिवाय पिकनिक साठी पण छान रेसिपी आहे.

विसोबा खेचर's picture

8 Mar 2008 - 5:13 pm | विसोबा खेचर

स्वातीताई,

मेतकुटाची पाकृ अगदी झकास...

और भी आने दो..

मिपावर आल्यापासून तुम्ही अगदी नेटाने आणि मन लावून वैविध्यपूर्ण पाकृ देऊन मिपाचे रसोईघर सजवले आहे आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला "मिपाच्या अन्नपूर्णादेवी" हा किताब बहाल करून सन्मानित करत आहोत. कृपया स्विकार करावा..

तात्या.

स्वाती राजेश's picture

8 Mar 2008 - 9:41 pm | स्वाती राजेश

खरे तर मीच आभार मानायला हवेत.
मिसळपाव सारखे उत्तम संकेत स्थळ मला लाभले. तसेच मि.पा. वरील सर्व सदस्य अगदी घरच्या प्रमाणे दाद देतात त्यामुळे लिहिण्यास आणखी उत्साह येतो.
तेव्हा हा मान माझा एकटीचा नसून मि.पा. वरील सर्व मित्र आणि मैत्रिणींचा कि ज्या मनापासून दाद देतात त्यांचा आहे.

व्यंकट's picture

9 Mar 2008 - 12:26 am | व्यंकट

मेतकूट भात फार आवडतो, करून पहायला पाहीजे.

स्वातीताई आभार!

तात्यांशी सहमत.. निष्ठेने पाकृ चा अभ्यास आणि समस्त मिपा करांना ते अनुभवसिध्द ज्ञान पुरवणे ह्यात स्वातीताई नं. एक आहेत!

चतुरंग

आवडाबाई's picture

10 Mar 2008 - 7:49 pm | आवडाबाई

आजच करून पाहते
उद्या रिपोर्ट !!

आवडाबाई's picture

27 Mar 2008 - 9:39 am | आवडाबाई

उद्या उगवलाच नाही, तो शेवटी परवा उगवला, मेतकूट मस्त झाले !!
धन्यवाद !! आता खुळे पोहे देखिल करून पाहते उद्या (!!!!!!) :-)

वरदा's picture

27 Mar 2008 - 6:27 pm | वरदा

क्रुती छान आहे पण थोडा वेळ लागेल करायला आणि मला साधी चटणी करायची असेल तर १५ मिन. लागतात मिक्सर मधे इथे तर एवढं होईल असं वाटत नाही..तूर्तास परवा सुमा फुड मधुन आणलंय थोडं...पण तरीही एखादी डाळ भाजून वाटून पहाते होतय का....थँक्यू गं एवढी लक्षात ठेवून दिलीस माझ्यासाठी क्रुती....